Thursday, February 16, 2017

एक होता हिवाळा
         मधे म्हणाले तसे सध्या सतत बर्फ चालूच आहे गेले काही दिवस. रोज बर्फाचे आणि इथल्या निसर्गाचे वेगळे रूप दिसत राहते. मागच्या आठवड्यात स्नो स्टॉर्म होते. सतत २४ तास बर्फ पडला. आदल्या दिवशीच लोकांनी जाऊन दुकानातून खाण्याचे सामान इ घेऊन आले, शाळांना सुट्ट्या, मग दिवसभर घरात बसून राहायचं हे सर्व झालं. माझ्यासारख्या लोकांना जे घरी बसून काम करू शकतात किंवा ज्यांना सुट्टी पडली तरी चालू शकते अशांना इतका त्रास होत नाही, जितका रोजगारावर काम करणाऱ्या लोकांना होतो. किंवा ज्यांना बर्फात ड्राईव्ह करून जावेच लागते किंवा बर्फ काढणे हेच ज्यांचे काम असते. 
       यावेळी एका मित्रांच्या घरची लाईटही गेली होती आणि घर प्रचंड थंड पडले होते. ज्यांना पर्याय असतात त्यांचे चालून जाते पण असे लोक जे थंडी सहन करू शकत नाहीत किंवा ज्यांचे कुणी नाही किंवा ज्यांना एखाद्या हॉटेलात जाऊन राहणे परवडणार नाही अशा लोकांना त्रास आहेच याचा. तर निसर्गाच्या अनेक भयानक रूपांपैकी हेही एक. जे समोर आल्यावरच त्याच्या शक्तीची प्रचिती येते. पण त्याचसोबत वादळ शमल्यावर त्याचं सौन्दर्यही दिसून येतं. तितकंच शांत आणि सुंदर. असेच काही फोटो गेल्या काही दिवसांतले. इथल्या उंच झाडांच्या प्रेमात आहे मी. त्यांच्यामुळे हा गाव जरा जास्तच खुलून येतो हे नक्कीच, उन्हाळा हिवाळा किंवा पानगळ कुठलाही ऋतू असो.

विद्या भुतकर.

Wednesday, February 15, 2017

एका लग्नाची भन्नाट गोष्ट

     जात्यावर हळद दळली, मुहूर्तमेढ रोवली, बायकांची गाणीही म्हणून झाली. गावातल्याच फोटोग्राफरनं सगळ्या बायकांचा एकेक फोटो काढला. '१०० रुपयाला एक फोटो' म्हटल्यावर शैलाक्कानं तिचा आणि सुनेचा वेगळा फोटो घ्यायचा विचार रद्द केला. आता गाडीत बसून निवांत नाश्ता करायचा या विचारानं ती एका कोपऱ्यात जाऊन बसली. सुनेलाही तिने जवळ बसवलं. बाकी मांडव बांधून झाला होता. आता कसं लगीनघर वाटत होतं. पक्याच्या आईला, काकीला, काय करू अन काय नको असं झालेलं. नवरदेवाची आई म्हणून मान असला तरी काम सरता सरत नव्हतं. सगळे आहेर, बस्ता, पाहुणचार यातून कधी सुटतो असं तिला झालं होतं. मनात हजार वेळा तिने देवीला साकडं घातलं होतं,"हे लगीन पार पडू दे, पोराला घेऊन पयलें तुझ्या दारात येऊन तुझी साडी चोळी करतो बघ".
       दुपारी ४ ला गाडी निघणार होती मुलीच्या गावात जायला. काकीनं हजारवेळा तरी शिव्या घातल्या होत्या मनात,'मेल्याना कितीदा म्हटलं हिकडं करून द्या लगीन पण नाय. " अण्णाही वैतागले होते, अण्णाही एकेका पोराला कामं सांगून दमले होते. त्यांनी तिला शांत केलं. "जाऊ द्या ओ. किती चीडनार अजून? आता ते लोक आडूनच बसले तर काय करनार? नायतर मग आपल्याला करायला लागला अस्ता खर्च हितला. त्यापेक्षा गाडी घिऊन जायचं आणि गाडी घिऊन पोरीला आणायचं. बास !". काकी जरा शांत झाली. आता दोन दिवसांसाठी अशी हिम्मत सोडून चालणार नव्हती. तिनं पुन्हा एकदा घरात, ओसरीवर, स्वंयपाकघरात फेरी मारली. तिच्या भैनीच्या पोरीने तिला समजावलं,"मावशे बास की आता. परत हितंच यायचं हाय. आणि काय राह्यलं तरी आपन पोराकडंच हाय. असा रुबाब तरी कधी करनार?". तेही बरोबरच होतं म्हणा, मुलाची आई म्हणून रुबाबात राह्यचं सोडून काकीला सामान न्यायची, सगळं ठीक होण्याची काळजी.
       तिने घड्याळात पाहिलं, पाच वाजून गेले होते. सगळे पै-पाहुणे दारात जमा झाले. बाहेरगावच्या लोकांना सकाळ सकाळी दणकून जेवण घातलं होतं अण्णांनी. सगळे सुस्तावले होते. गाडी आली तशी सगळे खडबडून हलले. पक्याच्या हातावर काढलेली मेंदी अजून तशीच होती. चार गोळे का होईना काढायलाच पाहिजे होते ना? त्यामुळे बाकी पोरांनीच सामान उचललं. पक्या पुढे जाणाऱ्या ट्रॅक्स मध्ये बसला तसं काकीनं त्याला अडवलं, म्हटली,"एक मिनिट दम काढ". पक्यानं,"आता काय" म्हणून तोंड वाकडं केलं. ती घाईत घरात गेली, खडेमीठ-चार लाल मिरच्या घेऊन आली, ४-५ उठाबशा काढत, पुटपुटत त्यांचं मीठ काढलं आणि म्हणाली,"आमच्या गाडीत बस. उगा पोरा-सोरांच्या बर्बर मजा मारत बसू नका. आमच्या गाडीत दोन-चार तरणी पोरं पायजेल का नको?". पक्या आता वैतागला होता पण काकी लई दमली होती काम करून, तिला काय बोलणार म्हणून गप बसमध्ये बसला.
      बाकी बायकांनी, पुरुषांनी जागा पकडल्या, पिशव्या ठेवल्या. शैलाक्कानं पन आपली आणि सुनेची जागा पकडून घेतली. तिला आतल्या बाजूला बसवून ती बाहेरच्या सीटवर बसली. पुन्हा एकदा उठून पिशवी खाली घेऊन चाचपडली, परत ठेवली आणि खाली बसली. सुनेनं नुसतंच बघितलं आणि बाहेर बघायला लागली.
 शेजारच्या सीटवरल्या एका बाईनं विचारलं,"काय शैलाक्का, झाला का सासूबाई? काय म्हटला सुनेचं नाव ते?". शैलाक्कानं नाव सांगितलं,"जानवी".
ती बाई बोलली,"अस्स. चांगलं नाव हाय की".
शैलाक्कानं कौतुकानं सांगितलं,"होय, आम्हीच ठेवलंय. मला ती शिरेल मधली लै आवडली हुती बगा. मग म्हणलं, हेच ठेवायचं नाव सुनेचं. "
सून तिकडून थोडंसं हसली, नाईलाजाने. जागेवरून हात जोडून नमस्कार केला. तसं शैलाक्का म्हटली,"असं काय पुडाऱ्यागत हात जोडतेया, वाकून कर.या आपल्या पक्याच्या मावशी हायेत." म्हणून स्वतः उठून बाजूला झाली. तिकडे त्या बाईंनी,"असू दे असू दे" म्हटलं तरी सुनबाई उठल्या, बसमध्येच वाकून नमस्कार केला आणि पुन्हा जागेवर बसल्या.
"पोरगा आला न्हाई ते?" त्या बाईंनी विचारलं.
"हां त्याला जरा काम होतं. मग म्हटलं हिला तरी नेतो. नवी सुनबाई जरा समाजात चार लोकांची ओळख व्हायला पायजे ना? म्हनून घेऊन आलो मग."
त्या बाईंनी मान हलवली.
       गाडी भरली, बारकी पोरं उगाच उड्या मारत होती, त्यांना त्यांच्या आयांनी गप्प बसवलं, नारळ फुटला आणि देवीचं नाव घेऊन गाडी निघाली. सगळा मिळून ६ तासांचा रस्ता. पण रस्त्यात जेवण खाणं करून पुढं जायला वेळ होणारच होता. 'पहाटे पहाटे गाडी पोचायलाच पायजे' असा विचार करून काकीने एक सुस्कारा उसासा सोडला. जरा सगळे स्थिर झाल्यावर तिनं एक मोठी पिशवी पक्याला वरून काढायला लावली. त्यातनं एकेक करत बुंदीचे लाडू आणि चिवड्याचं पाकीट तिने मागे पाठवायला सुरुवात केली. शैलाक्काने सुनेला एक देऊन आपलं लगेचच उघडलंही. बकाणा भरत तिने शेजारच्या मावशींशी बोलायला सुरुवात केली. सुनबाईंनी दोन चार घास खाल्ले आणि पाकीट पुढच्या जाळीत ठेवलं. खाऊन हळूहळू करत सगळे पेंगले.

दोनेक तासांनी सुनबाईंनी शैलाक्काला हळूच हलवलं,म्हणाली,"आत्याबाई जायचं होतं. " "कुठं?" विचारल्यावर तिने करंगळी दाखवली.
"आता कुटं ? जरा दम काढ." म्हणून शैलाक्काने तिला गप्प बसवलं. ती गप्प बसली, कशीतरी अर्धातास कळ काढून तिने पुन्हा उठवलं, म्हणाली,"लै घाईची लागलीय." कुटं आडोश्याला थांबली तरी चालंल". तिचा चेहरा पाहून शैलाक्का उठली, तिने काकीला उठवून कानात सांगितलं, मग काकींनी पक्याच्या कानात. पक्याने पुढे जाऊन गाडी एका ठिकाणी थांबवली. त्या दोघी उतरल्या तशा अजून दोन चार बायका उतरून आडोशाला जाऊन आल्या. जानवी येईपर्यंत शैलाक्का बाहेर उभ्या राहिल्या. सगळे आत येऊन पुन्हा गाडी सुरु झाली. त्यात अर्धा तास तरी गेला होता. आत येऊन शैलाक्का शेजारच्या मावशीला सांगू लागली,"तुम्हाला म्हनून सांगते. दोन दिवस झाले सारकी ही अशी जायला लागलीया. आता येऊन डॉकटरला दाखवाय पायजे."
         आपल्याबद्दल असं लोकांशी बोललेलं जानवीला अजिबात आवडलं नाही. ती मान फिरवून बाहेर बघत बसली. तासाभरात गाडी पुन्हा थांबवायची वेळ आली. आता मात्र जानवीचा चेहरा रडवेला झाला होता. तिला पाहून पुन्हा गाडी थांबवली. एका तरण्या पोरीनं म्हटलंही,"मी जाते सोबत", तर शैलाक्काने काही ऐकलं नाही. स्वतःच तिच्यासोबत जाऊन आली. दोघी आत आल्यावर गाडी सुरु झाली. आत बाहेर जाताना, सगळे लोक आपल्याकडे बघत आहेत हे पाहून दोघीना अजूनच अवघडल्यासारखं झालं होतं. अजूनच आता सगळे जागे झाले होते आणि भूकही लागली होती. .पुढे पोरांनीच थोडं बघून एका ढाब्यावर गाडी थांबवायला सांगितली. गाडी थांबल्यावर सगळ्यांसाठी एकेक थाळी सांगून पक्याने मेंदीचे हात धुतले. आणि जेवायला बसला.
        तिकडे सगळ्या बायकांनी टेबल जोडून आपला घोळका बनवला. सगळ्या गप्पा मारत जेवल्या. कुणी आपल्या पोरांना खायला घातलं. कुणाला उलटी झाली म्हणून काहीच खाल्लं नाही. जानवीलाही जेवण काही जाईना. उगाचच चिवडून तिने रोटीचे चार घास खाल्ले आणि गप्प बसली. आता मात्र शैलाक्काला पोरीची काळजी वाटायला लागली. घरी गेल्यावर तिची दृष्ट काढायचं तिने मनोमन ठरवलंही. आता सगळ्यांचं जेवण झाल्यावर सगळे पुन्हा एकदा बाथरूमची फेरी मारून आले. आत गेलेल्या जानवीची वाट बघणाऱ्या शैलाक्काला चैन पडेना. शेजारीच असलेल्या काकीशी ती बोलायला लागली. आपल्यामुळे उशीर होतोय हे तिला कळत होतं. काकीला म्हणाली," आता महिनाभरच झाला लग्नाला. म्हटलं जरा सगळ्यांशी ओळख पाळख हुईल पोरीची. पण उगाच आनलं असं वाटाय लागलंय. काय खाईना, पिईना. आनी सारकी जायला लागलीय. काय कळंना."
काकींला स्वतःच्या टेन्शनमध्ये हिच्याकडे लक्ष लागत नव्हतं. काहीतरी बोलायचं म्हणून ती म्हणाली,"हां आल्यावर डॉकटरला दाखवा. नायतर तिकडे गेल्यावर त्याच गावात जमलं तर जाऊन या. बघू कुणी भेटलं तर."
शैलाक्काने मान हलवली.
पुन्हा विचार करत काकी म्हणाली,"दिवस तर गेलं नसतील?"
        अरेच्चा हा विचार तिने केलाच नव्हता. आता तिला सगळी चिन्हं दिसायला लागली आणि शैलाक्का खूष झाली. पोरगी बाहेर आल्यावर दोघी गाडीत बसल्या आणि गाडी सुरु झाली. तरण्या पोरांनी गाण्यांच्या भेंड्या सुरु केल्या आणि मागे बसून बायकांनी गप्पा. या दोघी सासू-सुना फक्त ऐकत होत्या. मधेच जानवीने हळूच गाणं सांगितलं,"हमें तुमसे प्यार कितना.." तिच्या बारीक आवाजाकडे लक्ष जाणं अवघडंच होतं. शेजारच्या मावशीने आग्रहाने तिला गाणं म्हणायला लावलं. तेव्हढं गाणं सांगून ती पुन्हा बाहेर बघू लागली. मध्ये एकदा जानवीने सासूला उठवलंच. यावेळी मात्र तिने पुढच्या पोराला पण सोबत घेतलं. रात्रीच्या अंधारात दोघी कुठे एकट्या जाणार म्हणून. यावेळी तिने पोरीला बाहेरच्या बाजूला बसवलं आणि झोपी गेली.
     बराच वेळाने पोरांचा उत्साह सरला. काकीने सगळयांना 'उद्या कामं हायेत मुकाट्याने झोपा' म्हणून गप्प बसवलं. लाईट बंद झाले. हळहळू करत सगळी गाडी शांत झाली. रात्रीच्या गुडूप अंधारात कधीतरी सगळ्यांची गाढ झोप लागलेली असताना त्या पोरीने पुन्हा सासूला हलवलं. आता मात्र शैलाक्काला झोप आवरत नव्हती. जानवींने समोरच्या पोराला उठवलं. तिने हळूच सासूला सांगितलं,"आत्याबाई हे दोघं आहेत झोपा तुम्ही." तिनेही पडत्या फळाची आज्ञा म्हणून एकदा फक्त उभ्या राहिलेल्या पोरांकडे पाहिलं आणि 'बरं' म्हणून झोपून गेली. ड्रायवर लाईट लावणार इतक्यात पक्याने त्याला थांबवले,"'इतक्या रात्री लाईट नगू लावूस' म्हणून. गाडी थांबली, अंधारात चाचपडतच ती, ते पोरगं आणि पक्या उतरले.  दहा मिनिटाने तिघे आत आले आणि 'चल रे' म्हणून पोराने सांगितल्यावर गाडी सुरु झाली.
       पुढचे तीन तास मात्र शैलाक्काची झकास झोप झाली. गाडी मुलीच्या गावात येऊन पोचली होती. गाडी थांबल्या थांबल्या अचानक धाडकन तीन पोरं उठून दार उघडून पळत सुटली. पेंगलेल्या वऱ्हाडाला काय झालं ते नक्की कळलं नाही. ड्रायवर एकदम ओरडला,"चोर चोर" म्हणून. सगळे एकदम दचकून जागे झाले. शैलाक्काला तर काही कळत नव्हतं. तिने शेजारी पाहिलं तर पोरगी शेजारी नव्हती. पटकन पिशवी वरून काढली आणि पाहिलं तर पोरींचे सगळे सोन्याचे दागिने गायब होते. तिने तिथेच हंबरडा फोडला,"कुठं गेली रे माझी पोर? चोरांनी धरलं का काय तिला? सगळे दागिने बी गेले की रं."
तिचा आवाज ऐकून सगळे आपापल्या पिशव्या बघत असताना एकदम काकी ओरडली," आरं देवा. हा काय घात झाला रं?". तिच्या हातात एक कागद होता. अण्णांनी तो कागद हातात घेऊन वाचला,"अवो अक्का तुमची सून आमच्या पोराबर पळालीया. "
"अन्ना काय पन बोलू नका" म्हणून शैलाक्का ओरडली.
अण्णा पुढे बोलले,"म्हनं त्यांचं प्रेम होतं अधिपासुन. तिच्यावर शंका आली म्हून बापानं घाईनं लग्न केलं आनी तुम्ही माझं पैशापायी, म्हनं. आमी लग्न करणार हाय. आमाला शोधू नका असं लिहलय बघा तुम्हीच. "
काकीला तर चक्करच आली होती आणि शैलाक्का आपली रिकामी पिशवी हातात घेऊन उध्वस्त बसली होती.
आता त्यांना शोधणार तरी कुठे आणि कसं हे कुणालाच कळत नव्हतं. ड्रॉयव्हरलाही नक्की कुठे गाडी थांबवली ते आठवत नव्हतं आणि हे असं होऊच कसं शकतं यावर अजूनही कुणाचा विश्वास बसत नव्हता.

तिकडे पक्या आणि जानवी, नाही नाही, मेघा केंव्हाच दूर निघून गेले होते. अनेक प्रयत्नांनी का होईना ते एकमेकांना कायमचे भेटले होते.

विद्या भुतकर.

Tuesday, February 14, 2017

शेअरिंग: एक आवडता उद्योग

         आपल्याला आयुष्यात नसते उद्योग करायला लै जोर असतो. शेअरिंग म्हणजे तर आवडता उद्योग. :) अगदी पोराच्या 'डायपर रॅश' क्रीमबद्दलचं आपलं मतही एकदम उत्साहाने देणार. आधी कधी इतकं लक्षात आलं नव्हतं, पण एकूणच मी मला एखादी गोष्ट आवडली असेल किंवा नसेल तर त्याबददलचं मत लगेच मित्र-मैत्रिणींना वगैरे सांगून टाकते. म्हणजे मला आवडलंय तर बाकीच्यांना ते समजलं पाहिजे ना? आणि नसेल तर त्यांचा तरी त्यांचाही त्रास वाचेल असं माझं स्पष्ट मत असतं. तर अशीच 'स्पष्टं' मी ऊठसूट देत असते. 
         या मत देण्याच्या यादीत बऱ्याच गोष्टी येतात. मुलं, त्यांचे अनुभव आणि त्यानुसार लागणाऱ्या सर्व गोष्टींबाबत तर देतेच. पण एखादे हॉटेल, शॉपिंग मॉल, एखादा कपडा, एखादे पुस्तक अशी बरीच मोठी यादी आहे. आता हा विषय निघाला तो म्हणजे गाण्यांवरून. अनेकदा आपण एकदम विचारतो, "अरे तू हे गाणे ऐकलंस का?" आणि मग गप्पा सुरु होतात. काल असंच एका मैत्रिणीला दोन चांगली गाणी 'नक्की ऐक' म्हणून सांगितलं. तिनेही लगेच त्यातलं एक ऐकून घेतलं आणि खूष झाली, "अरे कसलं भारी गाणी आहे म्हणून". मग मी उत्साहात अजून दोन-चार सांगितली. आता हे गाणी शेअर करणं तसं नवीन नाही. पण समोरच्या व्यक्तीने ते लगेच ऐकून त्यालाही आवडले म्हणजे जणू आपण स्वतःच गाणं लिहिलंय, गायलंय अशा टाईपचा आनंद होतो. खरं की नाही?
         असे लगेच ऐकणारे लोक म्हणजे अशा शेअरींग टाईप लोकांचे फेव्हरेट. त्यांना मग जितके जास्त माहिती देता येईल ती द्यायची. तेही ऐकून घेतात आणि लगेच एखादी वस्तू किंवा जे काही असेल ते अनुभवतात. कधी कधी या शेअरिंग मध्ये साध्या रेसिपीज वगैरे असतात किंवा त्याच्या छोट्या टिप्सही. आणि आपण सांगितल्याप्रमाणे खरंच एखाद्याचा पदार्थ चांगला झाला की केव्हढा तो आनंद होतो, दोन्ही पार्टीना. रेसिपी किंवा टिप्स जाऊ दे, एखादा पदार्थ ठराविक पद्धतीनेच कसा खाल्ल्यावर भारी लागतो हेही मी सांगितलंय आणि ऐकलंय. म्हणजे उदा: गुलाबजाम गरम करून आणि आईस्क्रीम, तूप मीठ भरलं वांग आणि भात(तोही कोरडा), असे अनेक. मग समोरच्याला ते आवडलं की अजून मस्त. सानुला मी अनेकवेळा असं सांगत असते, 'हे असं खाऊन बघ भारी लागतं'. :) 
       आता सगळ्यांच लोकांमध्ये हे असे गुण दिसत नाहीत. अनेकजण समोरच्याचे मुकाट्याने ऐकून घेतात. 'मी असे करते' किंवा 'तसे बनवते' वगैरे अजिबात बोलत नाहीत. तर असेही काही असतात जे समोरच्याने सांगितले की लगेच त्याला पर्याय सांगतातच. 'मी असे करते' म्हटलं की 'त्याऐवजी असे करून बघ', आपण एक गाणं सांगितलं की त्यापेक्षा हे अजून भारी आहे असे अनेक पर्याय त्यांच्याकडे असतात. :) असतो एकेकाचा स्वभाव. पण माझ्यासारखे जे काही असे उत्साही लोक असतात जे सर्व बाबतीत मत/सूचना देतातच, त्यांच्याकडे पाहून कधी कधी साशंक लोकांना सारखे वाटत राहते,'अरे हा इतका त्या प्रॉडक्ट बद्दल का सांगतोय? नक्कीच त्याचा काहीतरी स्वार्थ असणार'. अशा वेळी मात्र मी धडा शिकले आहे, कितीही वाटलं तरी गप्प बसायचं. काही अडत नाही आपल्या सूचनांशिवाय कुणाचं. :) अर्थात तसं ठरवलं तरी मूळ स्वभाव जात नाहीच. 
         आजकाल तर फोटो, जोक्स, कविता, गोष्टी कितीतरी गोष्टी शेअर केल्या जातात. एखादा जोक ओठांवर एकदम हसू आणतो तर एखादी गोष्ट रडू. पण आपल्या माणसांनी ते शेअर केल्यावर ते अजूनच खास बनतं. असो. एका गाण्याच्या गप्पांवरून हे विचार मनात आले म्हणून लिहिले. बाकी, त्याच मैत्रिणीला लगेच एक मूव्हींची यादी पण दिली आहे. :) आणि तिचीही घेतली आहे. :) अशा गोष्टीत जे सुख असतं ते किती लहान असलं तरी इतकं सहज मिळून जातं, नाही का? तुम्ही अशा काय गोष्टी किंवा वस्तू किंवा अनुभव शेअर करता का? इथेही लगेच सांगून टाका. चान्स मिळाला तर का सोडा? 

विद्या भुतकर.
      
   

Monday, February 13, 2017

'बिडी' ची जोडी

येडी बिडी झालीस का काय?
साडी बिडी मिळायची नाय. 
गाडी बिडी गेली अंगावर?
काडी बिडी हाय का ?
शिडी बिडी लागलं त्याला!
जोडी बिडी जमायची नाय.  


आयुष्यात 'बिडी' ची जोडी किती वेळा जमवली असेल मोजायला हवं. :)

विद्या भुतकर.

Sunday, February 12, 2017

चौकट

      फेब्रुवारी हा इथल्या थंडीतला सर्वात त्रासदायक महिना.  या वर्षी तशी थंडी कमी असली तरी या महिन्यात बऱ्यापैकी बर्फ पडत आहेच. मागच्या वेळी बर्फ पडला तेंव्हा मुलांनी मस्त घरासमोर घसरगुंडी करून मजा केली. ते खेळत असताना, रविवार दुपार असल्याने मी जेवण बनवत होते. दुपारीही मी मस्त झोप काढली आणि मुलं बाहेर खेळून आली. यावेळी शेजारच्या काकांनी त्यांना त्यांची स्लेड उधार दिली होती आणि त्यामुळे स्वनिकच्या तोंडावर मस्त स्नो उडून चेहरा लाल झाला होता. घरी आल्या आल्या त्याने तक्रार केली,"आई तू का आली नाहीस?". खरंतर माझ्या लक्षातच नाही आले की आपणही जायला हवे होते. त्याने आग्रहाने सांगितलं,"पुढच्या वेळी मात्र तू यायचंस आणि त्या स्लेड वर पुढे बसायचं." मीही तेव्हा 'हो' म्हणून सोडून दिलं.
         त्यानंतर महिनाभर काही स्नो झाला नाही. मागच्या आठवड्यात स्नो झाल्यावर पुन्हा मुलं बाहेर पडत होती आणि मी त्यांना आतूनच बाय करत होते. पण अचानक मागच्या गेली केलेलं प्रॉमिस लक्षात आलं आणि पटकन कपडे बदलून बाहेर गेले. त्यांच्यासोबत दोन वेळा स्लेडवरून गेलेही. स्वनिक म्हणाला तसं, पुढे बसून. मला जाम भीती वाटत होती. आणि मजाही. त्यामुळं जोरात ओरडून खाली जात होते. खूप वर्षांनी बर्फात खेळले असेन. तेंव्हा माझ्या लक्षात एक गोष्ट आली, त्याबद्दलच लिहायचं होतं.
         याआधीही मी मोठ्या राईड्स मध्ये गेले आहे. आणि मी इतकी काही भित्री नाही. पण कधीतरी काहीतरी बदललं. कसं ते मलाही कळलं नाही, पण 'मला हे जमत नाही' ,  'मला थंडी आवडत नाही', 'मला बर्फात काही जमत नाही' अशी काही वाक्य समोर म्हणली नसतील तरी डोक्यांत नक्कीच येऊन गेलीत. आणि मी स्वतःला कधी स्वतःच ठरवलेल्या चौकटीत बांधून घेतलं हे कळलंही नाही. परवा ती स्लाईड करताना ते जाणवलं. आता मी काही इतकी शूरवीर होऊन उगाच बर्फात जाणार नाही, पण आधीपेक्षा नककीच जास्त जाईन, असं ठरवलंय.
         हेच नाही अशा अनेक गोष्टी असतात त्याच्या चौकटीत आपण स्वतःला कधी अडकवतो हे कळतच नाही. उदा: 'मला हा रंग आवडत नाही', 'मला भात खाल्ल्याशिवाय जमतच नाही', 'व्यायाम करणं मला कधी जमलंच नाही' किंवा 'हे असले कपडे मी घालतच नाही' अशी वाक्य आपण कधी बोलायला लागतो कळतंच नाही. मी अनेक आईबाबांना पाहिलं आहे, अगदी माझ्याही, जे 'आम्हाला हे असंच लागतं' किंवा 'हे मला जमणार नाहीच' अशी वाक्यं बोलताना. आणि परवा ते मीही करत होते. खरंतर मला वाटतं, या गोष्टींचीं सुरुवात अशीच होते जिथे कधीतरी कामामध्ये असताना एखाद्या गोष्टीला प्राधान्य देत नाही किंवा 'खरंच मी काहीतरी वेगळं करावं का?' असा विचार करायला वेळ घेत नाही. तिथून मग पुन्हा पुन्हा तीच गोष्ट घडताना आपण त्याचा विचार करायचं टाळतो आणि ती कधी सवय होऊन जाते आणि पुढे अलिखित नियम हे आपल्यालाही कळत नाही.
        आपण स्वतःला कुठल्या चौकटीत अडकवत आहोत हे एकदा जाणून घ्यायला हवं आणि त्याच्यावर काही प्रयत्नही केले पाहिजेत, तरच मजा आहे. नाहीतर १५ वर्षांपूर्वी आपण जी गोष्ट आवडीने करायचो ती कधी हरवून गेली हे कळणारही नाही. नाही का?

विद्या भुतकर.

Sunday, February 05, 2017

सो...... सी यू.....अगेन?

         ती मैत्रिणीसोबत आली. छातीत अजूनही धडधड होतंच होतं. आपण योग्य करतोय का? उगाच नसत्या उत्सुकतेपोटी चुकीच्या ठिकाणी तर जात नाहीये ना? बरं नुसती उत्सुकता नव्हती आज तर मैत्रिणीने, मिहिकाने जबरदस्तीच केली होती. गेल्या अनेक महिन्यांपासून मिहिका तिची जवळची मैत्रीण झाली होती. खरंतर मिहिकाचे वागणे, दिसणे, बोलणे पाहून 'आपण अशा मुलींशी मैत्री करतंच नाही' असं पक्कं मत तिने बनवलं होतं. पण हॉस्टेल वरच्या त्यांच्या सहा महिन्याच्या सहवासात मैत्री कधी झाली तिलाही कळले नव्हते.

"हे बघ तू उगाच सॅटरडे नाईटला अशी आंटी सारखी रूमवर बसू नकोस हा.", मिहिकाने तिला डिवचले.
"मी आंटी वगैरे नाहीये. आणि मला बरीच कामं पडलीत. सोमवारी घालायला एक कपडा नसतो मग. तू जाऊन ये ना? मग आपण इथेच पिक्चर बघू. "
"पिक्चर? इथे तुझ्या लाईफचा पिक्चर ब्लॅक व्हाईट झालाय आणि तू पिक्चर काय बघते? ते काही नाही आज तू यायचंच पार्टीला माझ्याबरोबर.", मिहिका हट्टाने बोलली.
"अगं पण माझ्याकडे कपडेही नाहीयेत चांगले.", तिने मिहिकाच्या पार्टी ड्रेसकडे पाहून सांगितलं.
"तू का काळजी करते? मी आहे ना? आपण सर्व करू, तू बस हां बोल.",मिहिका.
"बरं बाई चल, हां.  एकदाच हं पण. परत नाही येणार मी तुझ्यासोबत. मला हे असले प्रकार आवडत नाही जास्त." तिने सांगितले.
"एक बार आके तो देख जानी ....." मिहिका खूष झाली.
   
        तिचाच एक ड्रेस तिने स्मिताला दिला. पण स्मिता अगदी सामान्य उंचीची, सामान्य व्यक्तिमत्व असलेली आणि तितकीच साधी राहणारीही. कधी मेकअप वगैरे करणेही जमायचं नाही तिला. 'उगाच कशाला असल्या गोष्टीत वेळ घालवायचा' असं तिला वाटायचं. मिहिका हिच्यापेक्षा उंच, रंगाने सावळी असली तरी स्मार्ट आणि चुणचुणीत होती. तिच्या मेकअप करण्याच्या कलेला स्मिताने अनेकदा मनोमन सलाम केला होता.
         आज स्वतःवर प्रयोग होताना पाहून तिला स्पेशल वाटलं. चेहरा उजळ वाटत होता. ते ओठ तसेच ठेवणे, केसांना पोनीमध्ये घट्ट न बांधता मोकळे सोडणे, सारखे त्यांच्याशी चाळा करणे किंवा अगदी तोंडावर येत असताना स्टाईल मध्ये मागे करणे वगैरे तिला काही झेपत नव्हतं. त्यात मिहिका उंच असूनही तिचा ड्रेस अगदीच हिच्या गुढघ्यांपर्यंत येऊन थांबला होता. त्याला सावरत, खाली ओढत चालणं अजूनच अवघड होतं. पुढे काय होणार? या विचारातून बाहेर पडेपर्यंत रिक्षा क्लबसमोर येऊन उभी राहिली होती.
          रिक्षावाल्याचे पैसे देत तिने मोठ्या बिल्डिंगकडे पाहिलं. तिथे पोचण्यासाठी मोठ्या रस्त्यापासून किलोमीटरभर तरी आत आले होते ते. त्यामुळे 'गडाचे दरवाजे बंद झालेत' असं फिलिंग तिला आलं. मिहिका तिला सांगत होतीच, हे कर, ते करू नकोस इ. तिनेही हिंदी पिक्चर अनेकवेळा पाहिलेले. त्यानुसार, समोर दारात मोठा रांगडा माणूस सिक्युरिटीसाठी होताच. त्याला पाहून तिला थोडं सुरक्षितही वाटलं. काही झालंच तर याला बोलावू मदतीला, टाईप्स. आत जाताना मात्र थोडी धाकधूक जास्त वाढली. तिच्या आजूबाजूने अगदी गळ्यात पडून जाणारे मुलं-मुली बघून काय मत करावं हे तिलाही कळत नव्हतं. एकदा तिथे गेलं की,'मी यातली नाहीच' म्हणण्यात काही अर्थ नसतो. लॉबीमधून आत जाताना तिने तिथल्या प्रशस्त कमानी आणि इंटेरियर चे मनोमन कौतुक केले.
        दोघीही पार्टी हॉल मध्ये गेल्या. क्लबच्या त्या मोठया पार्टी हॉलमध्ये गेल्यावर मिहिकाने तिच्या मित्रांशी ओळख करून दिली. रुबीन, महेश, शान्क्स म्हणजे शशांक. तर त्या 'शान्क्सची' पार्टी होती. अजूनही एकदोन मुली आल्या. एका टेबलाभोवती त्यांनी गप्पा मारायला सुरुवात केली. या अशा ठिकाणी मोठ्या आवाजात चालणाऱ्या म्युझिकमध्ये अनोळखी लोकांशी काय बोलायचे हा तिला प्रश्न पडला. तरीही त्यांनी तिला सहभागी करून घ्यायचा प्रयत्न केलाच. 'तू काय करतेस?', 'ऑफिस कुठे आहे?', 'मूळची कुठली?' असे जुजबी प्रश्न तिला विचारले. तिनेही त्यांना मोजकंच उत्तर दिलं. ज्या शान्क्सची पार्टी होती तो मात्र बराच वेळ फोनवर होता. त्याला तिच्या येण्याने काहीच फरक पडला नव्हता, चांगला किंवा वाईटही. तिनेही त्याला 'हॅपी बर्थडे' इतकंच बोलून मिहिकाशी बोलणं सुरु ठेवलं.

        मधेच त्याने सगळ्यांना विचारलं, 'काय घेणार?'. सर्वांनी काही बोलायच्या आधीच तिने सांगितलं,"पाणी ". तो हसला, ती शरमली.
मिहिका तिला म्हणाली,"अरे इथे पाणी असं मिळणार नाही. बाहेर मशीनला बॉटल विकत घ्यावी लागेल. चल मी येते तुला पाहिजे तर. "
स्मिता,"नाही नको, मी कोल्ड्रिंक घेईन मग."
बाकिच्यांनीही त्यांचे ड्रिंक्स सांगितले. त्याने 'ओके' म्हणून चालायला सुरुवात केली. मागून मिहिका त्याच्याकडे पळत आली आणि त्याच्यासोबत चालत राहिली.
"नई है यार?",मिहिका.
"अरे पण इतकं माहित नाही? गांव से आयी है क्या?", शशांक.
"बरं जाऊ दे. फोन आला का 'तिचा'?",
"नाही. नाही यायची ती यार . जाऊ दे. उगाच ब्रेकअप नंतर पण ती येईल अशी काही एक्सपेक्टशन का ठेवायची?" शशांक.
"अरे, पण आपली जुनी फ्रेंडशिप आहे. अशीच वाया गेली?"
"तू पण ना? काय पण 'उच्च' विचार करतेस. चल तुझं 'कोल्ड्रिंक' घेतो." तो उपहासाने बोलला. मिहिका हसली.
           तिकडे स्मिताला मात्र चैन पडत नव्हती. एक तर आवरण्यात दोन तास गेलेले आणि यायचं टेन्शन होतंच त्यामुळे दोन-चार तासात काहीच खाल्लं  नव्हतं. तिला प्रचंड भूक लागली होती. इकडे काय खायची खास सोय दिसत नव्हती. हे लोक कधी जेवणार हे विचारायची सोयही नव्हती. सगळे एकदम निवांत होते. जोरात चाललेल्या गाण्यांवर पाय हलवत एकाच जागी उभे होते. तिला मात्र त्या दारूचा वास, सिगारेटचा भरलेला धूर, सर्व नको वाटत होतं. पार्टीत 'आपल्या शेजारीच असलेल्या लोकांशी बोलायला ओरडायला का लागतं?' हे तिला पटत नव्हतं. त्यात शेजारी डान्सच्या नावावर चाललेले एकेक प्रकार पाहून मान कुठे करायची तेही कळत नव्हतं. त्यांचे कपडे, ड्रिंक्स, तो वास सर्वच असह्य झालं तिला. त्यांतच मगाशी कुत्सितपणे हसलेल्या शशांकचा चेहरा आठवून तिला स्वतःवरच चिडचिड झाली. आजूबाजूला पाहून तिला आपण चुकीच्या जागी आलोय अशी एका क्षणात अनुभूती झाली आणि ती ताडकन निघाली.

मिहिका आणि शशांक परत आले तेंव्हा स्मिता जागेवर नव्हती.

मिहिकाने रुबीनला घाबरून विचारलेही,"स्मिता किधर है?" त्याने खांदे उडवले.

तिच्या मैत्रिणीची नैतिक किंवा कसलीच जबाबदारी त्याची नव्हती.

तो पुढे बोलला,"वो अचानक निकल गई. मुझे लगा बाथरूम गई होगी."

मिहिकाने ट्रे खाली ठेवून बाथरुमकडे धाव घेतली. तिथल्या सर्व स्टॉलवर ठोकून काहीही प्रतिसाद मिळाला नाही म्हटल्यावर तिने हातातला फोन पहिला. फोनवर अजिबात रेंज नव्हती. फोन घेऊन ती बाहेर येऊन कॉल लावण्याचा प्रयत्न करत होती. समोर तिला शशांक दिसला.

"नाही आत पण?" त्याने विचारले.
तिने मान हलवली. "असं काय करते ही? सांगायची काही पद्धत?"
तिला काळजीत पाहून "तू दुसऱ्या साईडच्या बाथरूममध्ये बघून ये मी बाहेर बघतो" म्हणून तो बाहेर पडला.

इकडे तिकडे बघत असताना, क्लबच्या बाहेरच्या बागेत एका बेंचवर त्याला ती दिसली. त्याने सुस्कारा सोडला. आधी त्याने बाहेरून मिहिकाला कॉल लावला, कॉल लागत नव्हताच.
मग त्याने धावत जाऊन मिहिकाला सांगितले,"ती आहे बाहेर."
ती बाहेर यायला निघाली. शशांक बोलला,"तू थांब इथेच, माझ्यामुळे तुमचा सर्वांचा पण मूड खराब नको. मी तिच्याबरोबर बसतो बाहेर. मला असेही पार्टीत इंटरेस्ट नाहीये आज. "
"कमॉन शान्क्स !" मिहिका बोलली.
"इट्स ओके. आय एम फाईन" बोलून पुन्हा बाहेर गेला घाईघाईनेच.
 'ही आता पुन्हा गायब होती की काय?' अशी भीती होती त्याला. सुदैवाने ती अजूनही तिथेच होती. तो धावत तिच्या शेजारी जाऊन बसला. ती एकदम दचकली. तिने वर पाहिलं आणि तिच्या डोळ्यातले टपोरे थेंब त्याला दिसले. केवळ २-४ वाक्य बोललेल्या मुलीला कसे आणि काय बोलणार हा प्रश्न त्याला पडला. ती तशीच बसून राहिली. तोही बराच वेळ बसला.
मग त्याने तिच्या गुढग्यावर हात ठेवून बोलायला सुरुवात केली,"दोन महिन्यांपूर्वी माझं ब्रेकअप झालं माझ्या गर्लफ्रेंडशी." तिने इतका वेळी खाली घातलेली मान वर काढली. तिने त्याच्या हातापासून तिचा पाय बाजूला केला. तो हसला.
"हसलास का?"
"काही नाही. तुला बघितलं तेंव्हाच लक्षात आलं माझ्या तू एक टिपिकल मिडलक्लास मुलगी आहेस."
"मग? व्हाट्स रॉंग विथ दयाट?"
"नथिंग. पण माझा अंदाज बरोबर होता हे कळल्यावर.... "
 ".... आनंद झाला. बरोबर? मलाही झाला, तू श्रीमंत बापाचा बिघडलेला मुलगा आहेस हे ओळखून. "
 "अच्छा? मी श्रीमंत आहे? हा बरोबर ओळखलंस. पण बिघडलेला कशावरून? "
"कशावरून म्हणजे? तुझा अटीट्युड दिसतो ना बोलताना. मघाशी ... पाणी म्हटल्यावर... "
"अच्छा ते? मग क्लबमध्ये कुणी पाणी मागतं का?"
"पण मग तहान लागल्यावर काय करायचं?"
"ड्रिंक्स आहेत ना? "
"म्हणजे आजार एक आणि औषध वेगळंच? मला तहान लागलेली असताना पाणीच लागतं."
"हेच ते मिडलक्लास विचार..."
"असू दे ना? तुला काय प्रॉब्लेम आहे?"
"सॉरी. काहीच प्रॉब्लेम नाहीये.  जाऊ दे. पण तू अशी निघून का आलीस?"
"मला तिथे श्वास घेता येत नव्हता. गुदमरल्यासारखं झालं. म्हणून आले. "
"आणि रडत का होतीस?"
ती हळूच बोलली,"मला भूक लागली होती."
"काय SSSSS ?" तो जोरात हसला.
"का ? इतकं काय झालं हसायला?"
"भूक लागली तर खायला घ्यायचे ना? लहान बाळ आहेस का रडायला?"
"साधं पाणी मागितलं तर इतकं हसलास तू. जेवण मागितलं तर सगळे अजून काय बोलले असते काय माहित?"
"हहंम्म...सॉरी. परत नाही हसणार. आत चल, खाऊन घे. "
"नाही मी आत परत जाणार नाहीये. "
"हा काय हट्ट आहे?", तो चिडून बोलला.
"मी बाहेर पडले तिथून तेव्हाच म्हटलं, परत असल्या ठिकाणी पाय पण ठेवणार नहिये.  "
"अरे पण जेवणार कुठं मग?"
"रूमवर जाऊन मॅगी खाईन पण इथे खाणार नाही. "
"बरं. मग काय इथेच बसणार पार्टी संपेपर्यंत?"
"हो. चालेल मला. इथे शुद्ध हवा तरी आहे. यु हो अहेड."
" अरे इथे मी होस्ट आहे पार्टीचा."
"मग मी काय करू?"
"काय म्हंजे? मला पटत नाहीये तुला असं एकटीला इथे सोडून जाणं. "
ती हसली,"इट्स ओके" म्हणाली.
मग तोही बसूनच राहिला बराच वेळ. शेवटी तो उठला, म्हणाला,"चल."
"कुठे? मी आत येणार नाहीये."
"खायला जाऊ बाहेर कुठंतरी."
"आता या वेळेला?"
"मग काय? माझी गाडी रुबीनला सांगतो आणायला. मी टॅक्सी ने सोडेन तुला."
ती उठली. "कुठे जाणार?  "
"इथून मेन रोडला ढाबा आहे तिथे खाऊ."
दोघेही चालू लागले. त्याने खिशातून सिगारेट काढली आणि पेटवली. तिने त्याच्याकडे एकदा पाहिलं आणि पुन्हा खाली मान घालून चालत राहिली.
त्याने विचारलं,"तू काय करतेस इथे?"
"काय म्हणजे? नोकरी करते, मघाशी सांगितलं की."
"हा सॉरी लक्ष नव्हतं. "
"बरोबर माझ्यासारख्या मुलीकडे कोण लक्ष देणार?"
"तसं नाही. मी जरा टेन्शनमध्ये होतो. "
"ओह ते गर्लफ्रेंडचं?"
"ह्म्म्म..."
"पण तू अशा गोष्टींचा इतका विचार करतोस?"
"म्हणजे काय? का नाही करणार? "
"आय मीन, तुझ्यासारखा मुलगा सेंटी विचार करेल असं वाटत नाही."
"श्रीमंत असले की भावना नसतात का?"
"सॉरी! "
"इट्स ओके. ब्रेकअप नंतर पहिलाच बर्थडे आहे ना म्हणून जरा जास्त वाईट वाटलं."
"आता मला खरंच वाईट वाटतंय रूडली बोलल्याबद्दल तुला."
"मीही तसेच वागत होतो तुझ्याशी, सो फाईन."
"बरं ते जाऊ दे, कसा आहे तो ढाबा?" तिने विचारले.
"ठीक ठाक आहे. एकदा उशिरा मी आणि नुपूर गेलो होतो. चांगला होता." त्याने विचार करत सांगितले.
"नुपूर कोण?"
"...... "
"ओह तीच का ती? सॉरी आज सर्वच चुकीचे प्रश्न विचारतेय."
दोघेही चालत ढाब्यापाशी येतात. बाहेरच एका टेबलवर बसतात. ती मेनूकार्ड बघते. तो फोनकडे बघत बसतो अजूनही.
"४ रोटी, पनीर बटर मसाला, डाळ फ्राय, जीरा राईस", तिने ऑर्डर दिली.
"और कुछ मॅम? वेटरने विचारले.
"हां रोटी, बटर रोटी. आणि पेप्सी २. पाणी थंड." तिने लिस्ट संपवली.
तिची ऑर्डर किती वेळ चालू आहे ते बघून त्याने शेवटी फोनमधून मान वर काढली. तिने काय काय मागवलंय ते ऐकून हसला.
"आता काय झालं?" तिने विचारलं.
"पनीर बटर मसाला ! जेवणाची चॉईस पण एकदम सूट करते तुला.. यू आर सो टिपिकल."
ती चिडली. "पण मला आवडत असेल हे सर्व तर? बाकी लोकांचं मला काय करायचंय?"
"बरं जाऊ दे. ......" त्याने वेटरला हाताची दोन बोटे वर करून परत बोलावलं.
"एक चिल्ड बियर लाना" त्याने सांगितलं.
तशी ती एकदम उठली. "काय झालं?" त्याने विचारलं.
"हे बघ तू ड्रिंक घेणार असशील तर मी जाते माझी मी आताच. उशिरा जाण्यापेक्षा आता गेलेलं बरं. "
"अरे पण बियर हे काय 'ड्रिंक' आहे का?", त्याने विचारलं. 
"माझ्यासाठी आहे. म्हण 'सो टिपिकल'... ", ती चिडून बोलली.
त्याने घड्याळ पाहिलं, ११ वाजले होते. त्याने मग वेटरला 'कॅन्सल कर दे' असं सांगितलं. ती बसली.
"तू फारच बोअर आहेस." त्याने तिला म्हटल्यावर ती परत उभी राहिली.
"बरं.... तोंड बंद करूनच बसतो. बास? " त्याने मस्करीत म्हणलं. ती हसली.
लवकरच जेवण आलं आणि तिने ताव मारायला सुरुवात केली. तो तिच्याकडे बराच वेळ बघत राहिला. मधेच ब्रेक घेत तिने त्याच्याकडे पाहिलं आणि विचारलं,"खा की. काय झालं?"
"नाही जेवण संपलं तर अजून रडशील. म्हणून थांबलोय." तो हसत बोलला.
तिने त्याच्याकडे दुर्लक्ष करत पुन्हा खायला सुरुवात केली.
"तू डाएट वगैरे काही करत नाही का?" त्याने तिला विचारलं.
"कशाला? मी काय इतकी जाड नाहीये." ती वैतागून म्हणाली.
"हो, पण बिनधास्त बटर घेऊन २-३ रोटी, राईस खाणारी मुलगी मी बरीच वर्षं बघितली नाही. तू पहिलीच."
"पाहिलंस ना आता? जेव मुकाट्याने." ती चिडून भात खात बोलली. त्यानेही मग थोडा भात खाऊन घेतला.
 तिने बिल भरायला पर्स काढली तर तो म्हणाला," आज माझा बर्थडे आहे अजून. आजची पार्टी माझीच."
तेंव्हा तिच्या लक्षात आलं, त्याचा वाढदिवस आहे हे आपण पूर्ण विसरून गेलोय. तिने मग पुन्हा आईस्क्रीम मागवलं आणि 'याचे पैसे मी देणार' हेही सांगितलं.
बाहेर थंड हवा होतीच. आईस्क्रीम खाऊन बाहेर पडले तशी तिला अजून थंडी वाजू लागली. तिच्या त्या छोट्या, बिनबाह्यांच्या ड्रेसचा तिला राग येऊ लागला. ती आपल्या तळहाताने दंड चोळू लागली. तो तिच्याकडे पाहून पुन्हा हसला. "आता काय झालं?" तिने विचारलं.
"जमत नाही तर मग असले ड्रेस का घालायचे?" त्याने विचारलं.
"घातला कधीतरी, चूक झाली. परत नाही घालणार ! चिडचिड नुसती! "
त्याने तिला आपले जॅकेट काढले आणि "घे " म्हणून सांगितले.  तिने मानेनेच दिला.
त्यानेही मग पुन्हा घालून घेतले. फोनवरून त्याने कॅब साठी कॉल केला.
"दहा मिनिटात येत्ये कॅब" त्याने तिला सांगितलं. तिने मान हलविली.
"तुझा कोणी बॉयफ्रेंड नसेलच?" त्याने तसे विचारल्यावर ती पुन्हा चिडली.
"हो नाहीये. कारण मी मिडलक्लास आहे. बरोबर ना?"
"अरे चिडते काय? तो असता तर तू एकटी कशाला आली असती, म्हणून विचारलं. मी काय एव्हढा वाईट वागलो का इतका वेळ? "
तिच्या हे ध्यानातच आलं नव्हतं.
नरम आवाजात ती बोलली,"सॉरी. तुझं का ब्रेकअप झालं म्हणे?"
"असंच काहीतरी. जाऊ दे ना ते. " त्याला बोलायचं नव्हतं.
"बाकी घरी कोण असतं?", तिने विचारलं.
"बहीण, भाऊ आई वडील सगळे आहेत."
"अच्छा? मग इथे काय करतोयस? त्यांच्यासोबत जायचं ना? का बोलत नाही त्यांच्याशी पण?"
"त्यांनी काल रात्रीच केलं सेलिब्रेशन, आज मित्रांसोबत जाणार म्हणून."
"ओह ओके."
"पैसे असले की नाती नाहीत असं असतं का? आख्खी फॅमिली तेव्हढीच क्लोज आहे मला."
"अरे चांगलंच आहे की. मी असंच विचारलं."
त्याने सिगारेट काढली. ती पेटवणार तेव्हढ्यात तिने,"लगेच ओढलीच पाहिजे का?" असं विचारलं.
"तुम्ही मुली जरा नीट बोललं की लगेच एकदम 'आई' टाईप होता. एकदम कॉमन मॅन मेन्टॅलिटी. दारू पिऊ नको, सिगरेट ओढू नको. तू कोण माझी मला ऑर्डर देणारी? " त्याचा आवाज ऐकून ती गप्प बसली. समोरून येणाऱ्या कॅबच्या उजेडात तिच्या डोळ्यातलं पाणी त्याला दिसलं.
दोघेही कॅब मध्ये बसले. त्याने तिच्या रूमचा पत्ता द्यायला सांगितलं. दोघेही गप्प बसून राहिले रूमवर पोहोचेपर्यंत. त्याने तिला खाली उतरु दिले. तोही मागून उतरला. तिच्यासमोर जाऊन उभा राहिला.
त्याने हात पुढे केला आणि 'थँक्स' म्हणाला. तीही मग हात मिळवून 'ओके' म्हणाली.
"गेले काही दिवस खूप त्रास होत होता या ब्रेकपचा. आजचा दिवस कसा जाईल भीती होती. 'तिच्या'शी रिलेटेड कुठल्याही व्यक्तीबरोबर थांबायची इच्छा नव्हती. पण एका अनोळखी व्यक्तीबरोबर अशी एक संध्याकाळ गेली. कशी होती यापेक्षा ती सरली हे बरं झालं. सो थँक्स ! ", तो मनापासून बोलला.
ती बोलली," आजपर्यंत मीही अशी कुठे क्लबला गेले नव्हते. तिथलं वातावरण बघून परत जाईन असं वाटत नाही. त्या अशा एका वेगळ्या दिवसाची आठवण म्हणून तू नक्कीच राहशील. पण इतक्या परक्या आणि माझ्यापेक्षा इतक्या वेगळ्या माणसासोबत एक संध्याकाळ सरली. मी घरी नीट पोचले इतकंच बास आहे."
त्याने एक मिनिट थांबून विचारलं,"सो... सी यू..... अगेन?
"सी यू नेव्हर. ", ती एकदम बोलली.
त्याचा चेहरा एकदम उतरला.
ती घाईने बोलली," अरे ऐकून घे. तू मला सांग किती वेगळे आहोत आपण. "
तोही हा विचार करून तो हसला.
ती बोलत राहिली, "आजची रात्र, अशी परिस्थिती निर्माण झाली म्हणून तू माझ्याशी आणि मी तुझ्याशी बोलले. नाहीतर तू तरी माझ्यासारख्या मुलीला इतकं एन्टरटेन केलं असतंस का? "
त्याने मान हलवली.
ती पुढे बोलली, " ती परिस्थिती पुन्हा ती कधी येईल असं वाटत नाही. सो, मला नीट आणून सोडलंस, थँक्स. आणि सी यू नेव्हर."
तोही मग निवळला.
तिचा पुढे आलेला हात आपल्या दोन्ही हातात घेऊन एक क्षण पकडला आणि
म्हणाला,"सी यू नेव्हर डियर". तीही थोडंसं हसली. तो कॅब मध्ये जाऊन बसला. तिला कॅबच्या खिडकीतून त्याने 'बाय' केले आणि ती वळली.

एक गोष्ट सुरु व्हायच्या आधीच संपली होती. :)

विद्या भुतकर. 

Friday, February 03, 2017

Thursday, February 02, 2017

अराजकता आणि असुरक्षितता !

       गेल्या काही दिवसांपासून पाहतेय, माझ्यासारखेच अनेक लोक 'उचलली जीभ लावली टाळ्याला' असे प्रत्येक विषयावर आपले मत देत आहेत. त्यामध्ये, स.ली. भ. ने बाजीराव मस्तानी मध्ये जे काही दाखवलं ते चूक हे आधीच ठरवून, नंतर त्याचंच कौतुक करणारे लोक पाहिले. दुसऱ्याने आपल्या मुलाचं नाव काय ठेवायचं, बायकोचे कुठले फोटो पोस्ट करायचे, कुठल्या देशातील लोकांना मुव्ही मध्ये घ्यायचे किंवा नाही, आणि आता त्या नवीन मुव्ही मध्ये जे काही 'सो कॉल्ड' शूटिंग होत आहे त्यावरही मत आहेच. बर नुसते मत नाही, आता तर मारहाणही होत आहे. म्हणजे साध्या माणसाच्या आयुष्यात रोजच्या जीवनात इतके काही घडत असताना या सर्व गोष्टींचा विचार करण्याचा त्रास का?  
       आपल्या शेजारच्यांनी जाऊ दे मुलांनीही त्यांच्या मुलाचे नाव काय ठेवायचे हे ठरवले तर त्यात आपण काही बोलू शकत नाही. का? तर तो त्यांचा प्रश्न आहे. मग कुणी आपल्या मुलाचे नाव अमुकतमुक ठेवले तर आपला काय संबंध? खरं सांगायचं तर आपल्याकडे मुलीला 'लग्न झाल्यावर नवऱ्याकडे जाऊन काय हवं ते कर' असं म्हणणारे अनेक आईवडील असतात. आणि खरंच नवऱ्याला चालतंय ना? मग आम्ही कोण बोलणारे असे म्हणून नंतर गप्पही बसतात. पण तेच एखाद्याने आपल्या बायकोसोबतचा फोटो टाकल्यावर त्याला वाटेल ते कमेंट लिहिणे याला काय अर्थ आहे?  
      परवा पासून जी पद्मावतीच्या सेटवरचा प्रसंग आणि त्यांवर नंतर लोकांचे आलेले कमेंट पाहून खरंच कळत नाही की लोक कुठे चालले आहेत? एखाद्या चित्रपटात काय दाखवले आहे हे पाहिल्याशिवाय कसे कळणार आहे? आणि त्यासाठी सेन्सॉर बोर्ड आहे अजून. आणि आपल्याकडे मस्ती च्या सिरीजसारखे असणारे गलिच्छ चित्रपट चालतात, मग अजून प्रदर्शितही न झालेल्या चित्रपटासाठी एकदम मारहाण? कधी कधी प्रश्न पडतो हे असे कोण लोक असतात ज्यांना आपल्या पोटापाण्याचे सोडून बाकी प्रश्न महत्वाचे आहेत? आणि समजा असतील तर मग तक्रार करा पोलिसात, शूटिंग वर बंदी आणा, असे अनेक पर्याय आहेत त्यासाठी. कुठला तरी हेतू या लोकांच्या मनात नक्कीच असणार असं मला तरी वाटतं आणि त्यांना प्रसिद्धी देऊन, त्यावर चर्चा करून आपण त्यांना अजून खतपाणी घालतो. 
       मध्ये पाकिस्तानवरच्या सर्जिकल स्ट्राईक नंतर, एका चित्रपटावर अनेक विरोध झाले, वाद झाले. त्यानंतर अजून दोन पाकिस्तानी कलाकार असलेले चित्रपट प्रदर्शित झाले. त्यावेळी हा असाच गोंधळ का नाही केला गेला? म्हणजे देशभक्ती फक्त १५-२० दिवसच टिकते का? आणि दोन महिन्यात, दुसरे चित्रपट कसे १०० कोटीच्या घरात जातात यावर चर्चा करतात. का? विरोध करायचाच तर सर्वांनाच करायचा, सरसकट. उगाच नुसते मीडियामध्ये नकारात्मक कमेंट टाकून नंतर पिक्चर बघायला जायचे नाही. आपल्या नकारात्मक वागण्याचा लोकांवरही सामुदायिक परिणाम होत असतो याचा विचार कुणी करतं  का? 
        तामिळनाडू मध्ये जल्लीकटूच्या समर्थनासाठी इतके मोर्चे निघाले. मग त्यांनी काढले म्हणून केरळमध्ये अजून एका खेळासाठी निघाले. उद्या पुन्हा दहीहंडी किती थरांची करायची यासाठी निघतील. अजून मराठा मोर्चा वगैरे आहेच. मला असं वाटतंय की एखाद्या देशात इतकी अराजकता का? कोणी मुद्दाम हे सर्व तर करत नाहीये ना? आपण या अशा अनेक आवाहनांच्या आहारी जाऊन आपणच कुठल्या मोठ्या कारस्थानाला बळी पडत नाहीये ना हा विचार जरूर करायला हवा.
       दोन तीन दिवसांपूर्वी एका मुलीची  इन्फोसिस ऑफिस मध्ये हत्या झाली. त्यावरून आम्ही बोलत होतो की मुलींना अशा शिफ्ट मध्ये येऊ द्यायचं की नाही? मी म्हणले का नाही यायचं त्यांनी? जर एखादा मुलगा शिफ्ट मध्ये काम करू शकतो तर मुलीलाही करता आले पाहिजे. लोकांची मानसिकता बदलली पाहिजे, तिचे काम नाही? हा, त्या सुरक्षिततेसाठी उपाय जरूर करू शकतो, पण एखादा वाटेल त्या नजरेने मुलीकडे बघतो म्हणून त्याला शिक्षा न देता मुलींचे काम बंद करणे हा उपाय नक्कीच नाही. आता वरच्या आणि या हत्येचा संबंध तसा पाहिला तर काहीच नाही. पण मला प्रश्न पडलाय, लोकांना एखाद्याच्या बायकोचे फोटो कसे किंवा एका राणी पद्मावती बद्दल सिनेमात काय दाखवलं जावं किंवा नाही याची इतकी काळजी असते, तेच लोक स्त्री सुरक्षा आणि त्यांचा सन्मान अशा महत्वाच्या विषयांवर प्रत्यक्षात का काम करत नाहीत? 
        खरं सांगते आजकाल अजिबात बातम्या वाचायची इच्छा होत नाही. कुठलीही बातमी काही ना काही कारण असल्याशिवाय समोर येत नाही. मीडियावरचा तर विश्वास उडतच आहे, पण लोकांच्या चांगुलपणावरचाही. एक सामान्य व्यक्ती म्हणून मला अतिशय असुरक्षित वाटते आजकाल, सगळीकडेच. फक्त ते तसं वाटू देण्याचा प्रयत्न कोणी मुद्दाम करत आहे का हे मात्र जरूर वाटत राहतं. तुम्हाला काय वाटतं? 

विद्या भुतकर.

Wednesday, February 01, 2017

ये बेटीया किस घर की होती है ??

          गेल्या काही दिवसांत एक पोस्ट व्हाट्स अप वर येत होती, हळदी कुंकू बद्दल. आमच्या बिल्डिंगच्या ग्रुपवरही आली होती. फक्त केवळ लग्न झालेल्या स्त्रियांनाच का हळदीकुंकू चे आमंत्रण द्यायचे या विषयावरून. मला ते पटलेही. विधवा स्त्रियांना, अनेक विभक्त स्त्रियांनाही केवळ नवरा नाही किंवा सोबत नाही म्हणून एखाद्या सामाजिक प्रथेतून वर्ज्य का करायचे असा विषय होता. आता त्यात या स्त्रीला स्वतःहून भाग घ्यायचा आहे की नाही हा तिचा वैयक्तिक प्रश्न आहे पण आमंत्रण द्यायचेही टाळणे वगैरे प्रकार अतिशयच दुखी करत असणार अशा व्यक्तीला. भारतीय स्त्रियांना विधवा असताना कितीतरी कार्यक्रमाला, आनंदाला मुकावे लागते आणि याचा त्यांना किती त्रास होत असेल याची केवळ कल्पनाही करवत नाही. सर्वांना सामावून घेणे किती आवश्यक आहे ते अशा ठिकाणी जाणवते. आणि बिल्डिंगमधील अनेक जणींनी त्यावर होकारही दिला हे पाहून आनंद वाटला.
        आता हा झाला एक पैलू त्या हळदीकुंकू कार्यक्रमाचा. आता त्याच विषयावर अजून एक मत काल पुढे आलं जेव्हा एका अशाच तरुण मुलीने मला तिचा अनुभव सांगितला. एका सोसायटीमध्ये जिथे ती लहानपणासून वाढली, संक्रांतीसाठी आईकडे गेल्यावर तिथे सोसायटीमध्ये कार्यक्रम चालू होता त्यामुळे तीही तिथे गेली. अर्थात अजूनही काही माहेरी आलेल्या मुली होत्याच. आधीच संयोजकांनी जाहीर केलं की वाण म्हणून त्यातले फक्त सुनांना आणि तिथल्या राहणाऱ्या स्त्रियांनाच देण्यात येणार. त्यामुळे नाराज होऊन अनेक जणी तशाच निघून गेल्या. अशा ठिकाणी केवळ सर्वाना भेटणे हे मुख्य कारण असते. अशा छोट्यामोठ्या वस्तू नाही. आणि अपमान होत असेल तर कोण थांबेल. 
       सोसायटीत मनोरंजनाच्या कार्यक्रमात काही छोटंसं बक्षीस ठेवलेलं. जेव्हा कार्यक्रम संपला आणि ती बक्षिसं दिली गेली, त्यातही त्या मुलीला मात्र दिले गेले नाही. का? कारण ती आता लग्न होऊन दुसऱ्या घरी गेली, त्यामुळे तिला इथे काही देण्याचे कारण नाही. खरं सांगू तिने हे बोलल्यावर, तिला तिथे काय वाटलं असेल याचा विचार करूनच वाईट वाटलं पण मुलगी जिद्दी होती. तिने त्यांना सर्वाना प्रश्न केला की, कायद्याने मला या घरात येण्याचा हक्क दिला आहे तर मी इथे का भाग घ्यायचा नाही? आणि तो प्रश्न बरोबरही होता. उद्या जर त्याच घरात मुलाची बायको आली तर तिला सून म्हणून त्यांनी बक्षीस दिलंच असतं ना? समजा ती एकटीच मुलगी असेल आईवडिलांची तर तिने काय लग्न झाल्यावर अशा कार्यक्रमात भाग घ्यायचाच नाही? आणि प्रश्न पैशाचा असेल तर तसे स्पष्ट करावे ना आयोजकांनी?
        म्हणले तर हा मुद्दा छोटा आहे, केवळ बक्षिसाचा आहे, ज्याची किंमत अगदी कमी असेल. पण विचार करा की किती महत्वाचा आहे. पुण्य मुंबईसारख्या शहरात सासर-माहेर जिथे एकाच गावात आहे तिथे मुलीचं लग्न झालं म्हणून तिला माहेरच्या सोसायटीत वेगळी वागणूक मिळावी? तिचे आई वडीलही मेन्टेन्सन्स वगैरे भरत असणारच ना? आणि मग नकार द्यायचा तर मुलाच्या बायकोलाही दिला पाहिजे बरोबर ना? मुलगी नवरात्रीला आली, दिवाळीला आली अशा वेळी मग बाहेर पाटीच लावली पाहिजे, कार्यक्रमांना लग्न झालेल्या मुलींना सहभाग घेता येणार नाही म्हणून? कायद्याने मुलीला समान हक्क देऊनही समाजात अजूनही लोक असे विचार करतात आणि तसेच वागतात हे पाहून वाईट वाटतं. मी ज्या ठिकाणी राहते तिथे माझे सासू सासरे असतील तर त्यांना तितक्याच मानाने सर्व गोष्टीत भाग घेता येतो. मग तेच मुलीला आईवडिलांच्या घरी का नको? 

थोड्या दिवसांपूर्वी मला आईने एक पोस्ट पाठवली होती, 

'मायका केहता है ये बेटीया पराये घर की होती है, 
ससुराल केहता है ये पराये घर से आयी है
ए खुदा तूही बता ये लड़कियां किस घर के लिए बनायीं है'

       अगदीच इमोशनल वगैरे पोस्ट होती. म्हणले मला असे काही वाटत नाही. माझ्यासाठी माझं माहेर आणि सासरचं घर तितकंच आपलं आहे, हक्काचं आहे आणि शिवाय मला स्वतःचं म्हणता येईल असं आमचं घरही आहेच. त्यामुळे मला दुःखी वाटत नाही असले पोस्ट वाचून. 
       
        पण कालचा अनुभव ऐकून खरंच असं वाटलं की मुलींना इतक्या पटकन परकं करता येतं? आणि घरचे तर करतही नसतील, पण बाकी लोकांचं काय? अशा या विचारांना मोडीत काढलेच पाहिजे. उद्या आपलीच मुलगी आपल्याकडे आल्यावर तिला लोकांनी अशी वागणूक देऊ नये म्हणून आजच हे बोललं पाहिजे, सर्वाना सांगितलं पाहिजे. आणि मुळात एक स्त्री म्हणून आपण स्वतःच असे नियम बनवून पाळत नाहीये ना? हा विचार केला पाहिजे. आज त्या मुलीने योग्य ठिकाणी बोलण्याची हिम्मत केली तशीच आपणही केली पाहिजे आणि समजूनही सांगितले पाहिजे लोकांना. विचार करा जरूर आणि पटलं तरी दुसऱ्यांनाही सांगा. 

विद्या भुतकर.