Wednesday, November 14, 2018

गोसाव्याचा पाल

पोरं मोठी व्हायला लागतात तशी त्यांची तुलना सुरु झालीय, किंवा ईर्षा म्हणू.
"तुला माझ्यापेक्षा स्वनिकच जास्त आवडतो", "माझ्यापेक्षा तू दीदीचेच जास्त लाड करतेस, तिलाच सर्व आणून देतेस", अशी वाक्यं दोघांकडूनही ऐकून घ्यायला लागत आहेत.
आणि एक दिवस मला आठवलं की आम्ही लहान असतानाही असंच व्हायचं.
मग अनेकदा आई दादा म्हणायचे,"हो, आम्ही तुझे लाड करत नाही कारण तुला आम्ही गोसाव्याच्या पालातून घेऊन आलोय ना?".
तर सध्या आमच्या पोरांनाही तेच सांगतेय,"तुम्हां दोघांनाही गोसाव्याच्या पालातून घेऊन आलोय. एकदा जाऊन दीदीला आणलं आणि एकदा तुला."
पुढे जाऊन हेही सांगितलं,"आजीला विचारा, मावशी आणि मामालाही त्यांनी तिथूनच आणलं होतं की नाही?".
त्यामुळे पुढच्या कॉलवर त्यांनी आजीला विचारलंच.

फक्त आता मला विचारू नका की "हा गोसाव्याचा पाल कुठे आणि कसा असतो". ते काय आम्हांला आई दादांनी कधी सांगितलं नाही.

:)


विद्या. 

Tuesday, November 06, 2018

दिवास्वप्न आणि वशाट

दिवास्वप्नं !
डे ड्रीम !! दिवास्वप्नं चा गुगलने दिलेला अर्थ.
'कधी कधी गुगल खरंच खरं बोलतं', हे कसं पटवून द्यायचं हेही एकदा गुगलवर शोधलं पाहिजे.
दिवास्वप्नं म्हणजे काय ते सांगणारी म्हण, बाजारात तुरी आणि भट भटणीला मारी.
आजची म्हण? आपलीच मोरी आणि मुतायची चोरी.
अर्थात ही शाळेत न शिकवलेली म्हण.
तर दिवास्वप्न, स्टेशनवरून बसने घरी परततानाचं.
अगदी खरं वाटावं इतकं खरं.
बाहेर पडलेला अंधार, रिपरिप पाऊस (की पिरपिर? पिरपिर रडक्या पोराची असते.).
गच्च भरलेली बस.
शेजारी बसलेल्या बाईच्या ओल्या बुटांच्या सॉक्सचा येणारा वास, समोर स्ट्रोलरमध्ये बसलेलं पिरपिर रडकं मूल आणि हसणारी मी.
एम्ब्रॉयडरी, डॉक्टरांच्या श्रगपासून चड्डीपर्यंतची.
पिवळ्या दिव्यांच्या उजेडात अंधुक दिसत असलेल्या स्टॉपच्या खांबापाशी थांबणारी बस.
त्या पिवळ्या दिवांच्या उजेडात दिसणारा पाऊस.
आणि कुठला स्टॉप आलाय म्हणून प्रत्येक वेळी बसच्या खिडकीची बोटांनी पुसलेली काच.
बँकसी? त्याची गोष्ट.
मराठीत हे असंच लिहीत असतील का त्याचं नाव? एनीवे, काय फरक पडतोय.
आपण 'हजाम' आहे हे मान्य केलं की मग टेंशन नसतं आपल्याला प्रूव करायचं. एकदम बेसिक डिफेन्स मेकॅनिझम.
वशाट म्हणजे मांसाहार.
'वशाट'चा अर्थ मात्र गुगलने दिला नाही.
त्याचा ओरिजिन 'वश' असेल का?
माहित नाही. वशाट आलं म्हणजे दारू आलीच.
यातली मी वशाट की दारू? माहित नाही.
पार्लरमधल्या सीकेपी बायका, नवऱ्यांच्या वशाट खाण्याबद्दल बोलणाऱ्या.
इरफान खानच्या हातातला दिवाळीचा फोटो.
फक्त श्वासोच्छ्वास ! श्वास आणि उच्छवास!
समोरासमोर झोपल्यावर दोघांच्या श्वासांत लय नसेल तर एकाचा कार्बन डाय ऑकसाइड दुसऱ्याच्या नाकांत जात असेल का?
म्हणून मग समोरचा झाड होतो का?
कुत्री झाड बघूनच पाय वर का करत असतील?
हे आणि असे अनेक प्रश्न.
 . .
रन वे वरची एक ओलीचिंब रात्र, 
तितकेच भिजलेले तू आणि मी. 
सर्व निरर्थक ! सर्वच !
फक्त हसणारी मी.
आणि तू एक दिवास्वप्न !

विद्या.