Sunday, December 17, 2006

जन्म.... एका पुरुषाचा!!

तो माझा जुना सोबती. एकाच बिल्डींगमधे वाढलो,खेळलो. लहानपणी एकाच बालवाडीत गेलो आम्ही.तशा थत्ते काकू जरा वाचाळ होत्या पण मनाने चांगल्या.आमच्या आया चांगल्या मैत्रिणी होत्या. दुपारी धान्य निवडताना सुख-दु:खाच्या गप्पा करत त्यांची मैत्री गाढ झाली होती. आम्ही तिथेच आजूबाजूला खेळत असऊ.पण जसे असे मोठे झालो, त्याचा माझा दुरावा वाढला. आता मोठी झाल्यावर शाळेतले मित्र-मैत्रिणीच जास्त जवळचे वाटायला लागतात ना? त्याने आमच्या घरीही येणे सोडले होते का तर शाळेतले मित्र मग चिडवतात. आणि कधी भाजी द्यायला गेले की मला दिसायचा तो, पण तेव्हाही मोजूनच बोलणं. अभ्यास कसा चाललाय, परीक्शेला किती मार्क पडले हेही विचारण सोडून दिलं. काकूंकडून त्याच्या तक्रारी ऎकायला मिळायच्या. अभ्यासच करत नाही.अजिबात ऎकत नाही. थत्तेकाका फारच साधे होते. आपल्या कामात चोख आणि काम करून घेण्यात रोख-ठोक. ओफिसातला धाक घरात मात्र चालत नसे आणि काकू कितीही बोलल्या तरी मुलाला काही बोलायला त्यांची जीभ धजत नसे. तसा त्यालाही काकांचाच लळा जास्त.
१० वी झाली आणि आम्ही अगदीच वेगळे झालॊ. मी शास्त्र शाखेत प्रवेश घेतला आणि कसाबसा पास होत त्याने मिळेल त्या कोलेजात प्रवेश घेतला, वाणिज्य शाखेत.कधीतरी टपरीवर त्याच्या मित्रांसोबत तो दिसायचा, कधी फ.को. रोडवर गाडिवर गप्पा मारत बसलेला.आता तर येता-जाता मिळणारं अवघडलेलं स्मितहास्य पण बंद झालं होतं.त्याचं माहित नाही, मला मात्र तो अजूनही आवडायचा. का? हे ही माहीत नाही. कदाचित बालपणीचा तो भातुकलीचा खेळ अजूनही माझ्यासाठी संपला नव्हता. ११-१२ मधली मुलं कधी पाहीलीत? त्यांना कोलेजला गेल्यावर काय होतं कोण जाणे? आपल्याला एखादी गोष्ट जमेल, चांगली दिसेल, परवडेल यापेक्शा तो हिरो कसा हेअरस्टाईल करतो आणि माझा मित्र काय घालतो याचीच नक्कल करणं जास्त महत्त्वाचं असतं. एकदा ट्यूशन करून येताना त्याच्या मित्रांनी माझी छेड काढली. मला दिसत होतं तो तिथेच होता पण तोही त्यांच्या हास्यात सामील होता. मला खूप वाईट वाटलं त्यादिवशी. त्याचं वागणं मला त्याच्यापासून दूर-दूर नेत होतं.बिच्यारया काकूंनी तर बोलणंच सोडलं होतं.घरचं सगळं चांगलं होतं.प्रश्न पॆशाचा नव्ह्ता चांगल्या वागणुकीचा होता, त्याच्या भविष्याचा होता. एकाची दोन आणि दोनाची चार वर्ष झाली.आणि अश्यातच तो दिवस उजाडला...
गौरी-गणपतीची तयारी चालली होती. आई फराळाचे पदार्थ बनवत होती आणि वरून जोरात ओरडण्याचा आवाज ऎकू आला. आई म्हणाली 'कसला आवाज आला गं? जा जरा बघून ये वरून'.वर गेले आणि मला एकदम चक्करच आली. काकां लिफ़्टच्या बाहेर जमीनीवर पडलेले होते. काकू जोरजोरात त्याला हाक मारत होत्या. तो पळत-पळ्त जिना चढून आला आणि म्हणाला रिक्शा खाली थांबलीय चल लौकर. काकांना कसेबसे उचलून लिफ़्ट्मधे घेऊन ते खाली गेले. मी त्याच्या घरीच थांबले होते, घर तसंच उघडं होतं ना. मी आजूबाजूला पाहीलं, दिवाणखान्यात पेपर खाली पडला होता, चादर वेडीवाकडी झाली होती.मी स्वत:ला जरा सावरले आणि पसारा आवरू लागले.त्याचा तो घाबरलेला चेहरा, आईला सांभाळतं,बाबांना खांद्यावर समर्थपणे घेऊन जाणारा तो मला वेगळाच वाटला.काकांना ह्रदयविकाराचा झटका आला होता. थोडा वेळ गेला आणि काकूंची किंकाळी ऎकू आली. मी धावत खाली गेले. आई आधीच पोचली होती. दवाखान्यात जाईपर्यंतच काकांनी श्वास सोडला होता. तो अजून दवाखान्यातच होता. आम्हाला तर काही सुचत नव्हते. काकूंना कसे सांभाळणार? त्या तर शांतच होत नव्ह्त्या. सर्व नातेवाईकांना बोलावले. दोन दिवसात सारे विधी झाल्यावर बरेचसे लोक आपापल्या गावी निघून गेले.
आई बराचसा वेळ त्यांच्याच घरी असे. मी घरातली कामे शांतपणे करून शक्य ती मदत करण्याचा प्रयत्न करत होते. त्याला मी एकदा-दोनदा पाहीलं. एकदम स्थिरचित्ताने तो सारे विधी पार पाडत होता. त्याच्याकडे पाहून वाटत होते की तो काहीतरी विचार करत होता.मी एकदा त्याच्या घरी असताना, काकांच्या ओफ़िसातले अधिकारी येऊन गेले.ते काकांच्या पेन्शनबद्दल बोलत होते. काकू काहीशा बोलल्या आणि त्याने आतल्या खोलीतून येऊन स्वत: त्यांच्याशी बोलायला सुरुवात केली. जणू काही परिस्थितीचा ताबा त्याने घेतला होता. सारी कागदपत्रे त्याने चाळून पाहीली, म्हणाला मी दोन दिवसात येउन तुम्हाला भेटतो. त्याचे हे रूप मला नवीनच होते.
त्या रात्री मी अभ्यास करत बसले होते आणि दारावरची बेल वाजली. मी दरवाजा उघडला. पाह्ते तर, तो समोर उभा होता. किती तरी महीन्यानी-वर्षांनी मी त्याला आमच्या घरी आलेले पाहीलं होतं. त्याने विचारले 'काका आहेत का?'. मी बाबांना हाक मारली आणि त्याला बसायला सांगून आपल्या खोलीत पळून गेले. माझे कान मात्र बाहेरच्या खोलीतच होते. त्याने बाबांना कसले तरी कागदपत्र दाखवायला सुरुवात केली. त्यांच्या बोलण्य़ातून मला कळले की काकांचे लवकरच नोकरी सोडून कसलातरी धंदा करण्य़ाचे विचार होते. त्यासाठी त्यांनी मित्राकडून कर्ज घेतले होते आणि आता त्या मित्राने पैशासाठी तगादा लावला होता. संकटे एकटी कधीच येत नाहीत, नाही का? तो त्यांच्या त्या गुंतवणूकीचे कागद घेऊन आला होता. माझे बाबा वकील असल्याने त्याला त्यांच्या सल्ला हवा होता. त्याच्या दु:खी चेहर्याकडे पाहून त्याची संकटे मला अजूनच मोठी वाटत होती. त्या रात्री तो बराच वेळ बाबांसोबत बसला. सगळे व्यवहार समजून घेऊ लागला. घरी येतानाचा 'तो' आता मला जाताना एकदम मोठा पण आत्मविश्वासू वाटला. तो गेल्यावर जेवताना, मी आई-बाबांचा संवाद ऎकू लागले. कर्ज तर होतंच पण काकांची काही संपत्ती पण होती जी विकून ते फेडता आलं असतं. कर्ज फिटणार होतं पण ऎषारामाचं जीवन जगता आलं नसतं एवढं नक्की होतं.
दोन महीने गेले आणि मी त्याला आमच्या कोलेजच्या जिमखान्यात पाहीलं.घरी आल्यावर मी आईला हे सांगितलं तेव्हा ती म्हणाली 'अगं तुला माहित नाही, तो तुमच्या कोलेजवर स्विमिंग क्लासेस घेणार आहे. आठवडा झाला आता या गोष्टीला. बरं झालं बाई, पोरगं जरा मार्गी लागलं.' तो एवढा समजदार झाला म्हणून का मला रोज दिसणार म्हणून हे माहीत नाही, पण मला खूप आनंद झाला होता. :-) त्याचं बाबांकडे येणं आता नियमित झालं होतं. हळूहळू करत तो एकेक प्रश्न सोडवत होता. आई,बाबा, काकू यांच्या कडून त्याचं कौतुक ऎकलं की मला मुलखाचा आनंद व्हायचा. कधी कधी रात्री उशीर झाला तर आई त्याला जेवायचा आग्रह करायची आणि मी पटकन ताटं मांडून ठेवायचे.:-) माझा तो हरवलेला राजकुमार मला परत मिळत होता. त्याच्या मनात माझ्याबद्दल काय विचार होते हे मला माहीत नव्हतं पण मी तरी केव्हांपासून त्याचीच होते.
एकदा रात्री घरी यायला उशीर होतंहोता मला. मी लगबगीन पावलं टाकत घराकडे येत होते. त्या रस्त्यावर मला भितीच वाटायची, विशेषत: तिथल्या टपरीवरच्या टवाळांची. मला वाटत होते त्याप्रमाणेच टपरीवरून एक शिट्टी आणि मागून एक-दोन हिंदी गाण्यांच्या ओळी ऎकू आल्या.मी वैतागून अजून जोरात चालू लागले. अचानक सगळा गोंगाट बंद झाला होता. आर्श्चयाने मी टपरीकडे पाहीले तर ते लोक माझ्या पलिकडे काहीतरी पाहात होते.मी माझ्या बाजूला पाहीले, तो माझ्यासोबत चालत होता. त्याने मला एक रागीट कटाक्श दिला आणि आम्ही एकत्र घराकडे चालू लागलॊ. बिल्डिंग खाली पोचल्यानंतर त्याने मला रागाने विचारले 'इतक्या उशीरा बाहेर का फिरत होतीस? यापुढे काळजी घे.' असे म्हणून तो ताडताड जिना चढून निघून गेला. मी अविश्वासाने पहात राहिले. मी एका पुरुषाचा जन्म होताना पाहिला होता.
-विद्या.

Saturday, December 16, 2006

आई-बाप

केर काढता-काढता थांबून निताताईनी निमूला विचारलं,' काय वो ताई, मग तिकडं अमेरिकेत समदी इंग्रजीमधीच बोलत्यात व्हय'?निमू हसून म्हणाली, 'हो, सगळे इंग्रजीमधेच बोलतात'. 'पन मग तुम्हाला पन तसंच बोलाव लागल?' निमू, 'हो'. :-) निमू अमेरिकेला जाणार हे कळलं आणि त्यांच्या छोट्याशा गावातील जुन्याशा घरात धावपळ चालू झाली होती. तशी दर थोड्या वर्षात होतच होती. जेव्हा पहिल्यांदा तिने उच्च शिक्शणासाठी बाहेरगावी राहायचा हट्ट केला, जेव्हा पहिल्यांदा त्या घरातील कुणी मुलगी नोकरीला गेली आणि मुलगी १८ वर्षाची झाली की तिचे लग्न झालेच पाहिजे हा नियमही पहिल्यांदा तिने तोडला. प्रत्येकवेळी घरात छोटी-मोठी वादळं व्हायची पण एकुलती एक असल्याने आणि तेही तिचे आजपर्यंत प्रत्येक निर्णय यशस्वी ठरल्याने ही वादळं मंदावली होती. रागाचे कौतुकात रुपांतर झाले होते. पाटलांचं घराणं तसं सुशिक्शित होतं पण जुन्या वळणाचं. निमूची आई पण अगदी १२वी पास झाली होती.असो. तर पुढ्च्या आठवड्यात अमेरिकेला जायचे नक्की झाल्याने निमू ४ दिवसांसाठी घरी आली होती. आईने प्रेमाने रव्याचे लाडू, पापड,ओला मसाला यांचे डबे भरून दिले. 'अगं आई, तिकडे सगंळ मिळतं'. 'असू दे गं, चार दिवस तरी घरचं खाशील. मग हायेच की आपला हात जगन्नाथ!.'
नाही-नाही म्हणता एकाच्या दोन बेगा झाल्या आणि सुट्टीचे ४ दिवस भुर्रकन उडून गेले. पाटील आपल्या पोरीला सोडायला मुंबैला पण जाऊन आले. आयुष्यात पहिल्यांदाच विमानतळ पण पाहून घेतलं. निमूला जाऊन एक दिवस झाला नाही तोवरच तिचा अजून फोन आला नाही म्हणून आजोबांना चुटपुट लागलेली. लवकरच तिचा फोन आला आणि सगळ्या घराला हुश्श झालं. निमू व्यवस्थित पोहोचली होती. तिचा आता नियमितपणे शनिवारी फोन येऊ लागला. पाटलांची मान एकदम ताठ झाली होती गावात. लवकरच पाटलीण बाईनीही निताताईला अमेरिकेच्या गमती-जमती सांगायला सुरुबात केली. निमूच्या फोनची वाट पाहाणं, तिची खुशाली विचारणं, कुठं फिरून आली की कसं वाटलं याची चौकशी करणं हा त्यांच्या एक कार्यक्रमच झाला होता.तशी निमू कोलेजपासूनच बाहेर राहायला लागल्यामुळे पहीले एक-दोन महीने निवांतपणे गेले. लवकरच गणपतीचे दिवस जवळ येऊ लागले. सणवाराला निमू घरी असायचीच. पाटलीण बाईना जरा अस्वस्थ होऊ लागलं. तिकडे निमूला अमेरिकेत पोचल्यावर २-३ दिवसातच घर मिळालं. एक रुममेट पण. मग तिथल्या राहणीमानाशी जुळवा-जुळव सुरु झाली. घरातल्या भाजीपाला आणण्यापासून जेवून भांडी घासेपर्य़ंत सगळं स्वत:च करायचं. :-( शिवाय ओफिसातील काम सांभाळायचं. आठवड्याची लोंड्री स्वत:च करायची. कामाची तिला सवय होती पण प्रत्येक छोटी-मोठी गोष्ट पाहीली की तिला घरी सांगावसं वाटायचं. घरातला डिशवोशर पाहून तिला निताताईची आठ्वण झाली.इथे भांडी पण मशिनमध्ये घासली जातात सांगितल्यावर त्यांच्या चेहेर्यावरचे आर्श्चयाचे भाव कसे असतील याचा विचार करूनच तिला हसू आले. :-) फोन करण्यासाठी ती मग शनिवारची वाट पाहू लागली. आठ्वड्य़ाच्या सर्व गोष्टी तिला एकाच दिवसात, एकाच तासात सांगायच्या असत.एक-दोन महिने ठिकठाक गेले. सगळं मार्गी लागल्यावर मात्र घराची जास्त आठवण होऊ लागली.
अमेरिकेत आल्यावर कंपनीकडून मिळालेला संगणक, इंटरनेट या सगळ्या सुविधांचा वापर नियमित झाला होता.लवकरच तिला 'च्यटींग', वेबक्यम या सगळ्या गोष्टी पाहून निमूला वाटले आपणही घरी इंटरनेट घ्यायला सांगितले तर? निमू शिकत असताना तिने एक संगणकही घेतला होता. ती इकडे आल्यापासून तो तसा घरी पडूनच होता. फक्त इंटरनेट कनेक्शन तर घ्यायचे होते. तिने शनिवारच्या आधीच घरी फोन करून आनंदाने आपली कल्पना सांगितली. पण जितक्या उत्साहाने तिने ती सांगितली तेव्ह्ढ्याच लवकर तिची निराशाही झाली. पाटील म्हणाले," अग पोरी, आम्हाला कुठलं हे सगळं जमणार आता. आमची पन्नाशी उलटली आता. तो 'कंप्युटर' वगैरे आम्हाला काय जमत नाही बघ. आपली कोर्टाची काम पण मी त्या कोपर्यावरच्या बाळ्याकडून करून घेतो". पाटलीण बाईंची तर वेगळीच कारणे. "आता गौरी-गणपती आले. सगळी तयारी बाकी आहे, सफाई करायची आहे अजून, फराळाची तयारी. कसं जमणार आहे? ".
नेहेमीप्रमाणे निमूला पहिला नकार मिळाला होता. तिने आपला हट्ट कायम ठेवत परत समजावले, "अहो बाबा, तुम्हाला मला बघावसं वाटत नाही का? मलाही तुम्हाला बघता येईल. शिवाय माझे घर दाखवता येईल. मी काढलेले फोटॊ तुम्हाला पाहता येतील." निमू त्यांना सर्व प्रकाराचे लालूच दाखवून पहात होती. दोन आठवडे उलटून गेले आणि निमूने परत तोच विषय काढला. "बाबा, अहो मी सगळी चौकशी केली आहे. आपल्या टेलिफोन खात्यात जाऊन इंटरनेट कनेक्शनचा फोर्म भरायला लागतो फक्त. बाकी कंप्युटरसाठी आपले ते घोरपडे काका आहेत ना त्यांचा मुलगा आहे ना तिथे. मी त्याला फोन केला होता. तो म्हणाला आहे सगळे व्यवस्थित बसवून देतो म्हणून. मी त्याला बाकी लागणारे जे सामान आहे ते पण आणायला सांगितले आहे. तुम्ही फक्त फोर्म भरून या". निमूच्या त्या सूचना ऎकून पाटील थक्क झाले होते. त्यांच्याकडे नाही म्हणायला काही कारणच शिल्लक नव्हते. दोन दिवसांत घोरपडे काकांचा मुलगा येऊन घरातला संगणक काढून, त्याच्या सगळ्या वायर बरोबर लावून गेला होता. त्याने कसलासा क्यमेरा पण आणून जोडला होता.
काका नाईलाजाने टेलिफोन खात्यात जावून फोर्म भरून आले. आता पाटलांचा गावात काय कमी वट होता का? लवकरच टेलिफोन खात्यातला माणूसही येवून वायरी जोडून गेला. त्याने कसलेसे खात्याचे नाव आणि परवलीचा शब्द कागदावर लिहून दिला व म्हणाला, 'हा जपून ठेवा बरं का. याचाच वापर करावा लागेल कनेक्शन साठी'. पाटीलीण बाईनी तो कागद नीट जपून ठेवला.निमूच्या तिकडून सूचना चालूच होत्या. हे आले का,ते केले का? आता आपल्या आई-बाबाना पाहिल्यावरच ती शांत होणार होती. तिने आपल्या बाबाना समजावले." तो क्यमेरा आहे ना, त्यातून तुम्ही, आपलं घर सर्व मला दिसणार आहे. तुमचा आवाज पण ऎकू येईल आणि तुमच्याशी गप्पा पण मारता येतील". पाटील कुटूंबिय आपल्या मुलीच्या उत्साहापुढे काही बोलूच शकत नव्हते. लवकरच सगळा सेट-अप पूर्ण झाला. निमूने परत एकदा घरी फोन केला. "काय मग आई, उद्या येणार ना इंटरनेटवर? मी तुमच्यासाठी इंटरनेटवर एक खाते उघडले आहे. त्याची माहीती मी उद्याच देईन." निमूच्या आईने काही न बोलता फोन तिच्या बाबांकडे दिला. ते म्हणाले," हे बघ पोरी, तू हे सगळं केलसं खरं. आम्हालाही तुला बघावसं वाटतं. पण आता हे नवीन शिकणं-बिकणं आमच्याकडून नाही होणार बघ."निमू तर एकदम गळूनच गेली. तिने बर म्हणून फोन ठेवून दिला. पण तिच्या डोक्यातले विचार काही कमी होत नव्हते. का संगणकाबद्दल एव्हढी अनास्था? का नाही नवीन काही शिकायची इच्छा?.
थोड्यावेळाने परत फोन केला तिने घरी. आधी आईशी बोलाव असं ठरवलं.
पाटलीणबाई," बोल बेटा!".
निमू, "आई, तुला आठवत मी लहान असताना तू मला बाराखडी शिकवलीस. भाकरी थापता-थापता जमेल तशी मला गणितं सोडवायला मदत केलीस?"
पा.बा.," हो आठवतं ना".
निमू, "मग एकदा मी अभ्यास केला नाही म्हणून शिक्शा दिलीस व माझ्याबरोबर तूही नाही जेवलीस. तिथूनच तर माझ्या अभ्यासाचा पाया भक्कम झाला. तू जर मला शिकवलं नसतंस तर मी आज इथे आलेच नसते ना? मग आज तू अभ्यास नाही करायचा म्हणतेस, मी तुला काय शिक्शा देऊ? तूच मला प्रोत्साहन दिलंस ना की मी अजून शिकावं, नोकरी करावी, कधी कधी बाबांशी भांडलीस देखील माझ्यासाठी. मग आता का हा निरुत्साह? का तू स्वत: ठरवत की मी संगणक शिकेन, मुलीशी बोलेन.मला माहीत आहे तुला माझी आठवण येते. तर आपल्या मुलीला भेटायला, बघायला, तू जराही कष्ट नाही घेणार?".निमूचा प्रत्येक शब्द त्यांना लागत होता आणि प्रत्येक शब्द बरोबरही होता. त्यानी आपल्या डोळ्यातील पाणी आवरत फोन पाटलांकडे दिला. गंभीरपणे त्यानी फोन उचलला.
पाटीलसाहेब," काय गं काय बोललीस तू आईला? ती रडत बसलीय तिकडे".
निमू, " काही आठवलं ते सांगितलं तिला. तुम्हालाही काही विचारायचं होतं मला. तुम्हाला माहीतेय मला तुमचा खूप अभिमान वाटतो. काम करत-करत तुम्ही शिक्शण पूर्ण केलंत, तेव्हढच नाही मलाही खूप शिकू दिलंत. मी १२ वी नंतर हट्ट धरला होता ना की मला इंजिनियरींगलाच जायचं आहे. तेव्हा खरंतर मला फक्त शिकायचं होतं. पण तिथे प्रवेश घ्यायला जाताना मला काहीही माहिती नव्हतं. तुम्हीच तर मला तो फोर्म कसा भरायचा हे सांगितलं ना?सगळी माहितीपत्रक गोळा केलीत, नंतर अगदी फी भरून, माझ्यासाठी राहायची, जेवायची सोय कशी हे बघूनच तुम्ही परत गेलात घरी. म्हणजे तेव्हाची तुमची निमू तर तुमच्यासाठी छोटीच होती. मग पुढच्या चार वर्षात असं काय शिकलेय मी की मी तुमच्य़ापुढे गेलेय? असं काय आहे जे तुम्हाला शिकता येणार नाहीये? बाबा मला तुमची मुलगी म्हणूनच राहायचं आहे. तुम्ही मला शिकवावं आणि मी शिकावं,मी हट्टाने मागावं आणि तुम्ही पुरवावं, मी आळशी व्हावं आणि तुम्ही मागे लागून काम करवून घ्यावं. तुम्ही लोक आजही माझे आई-बाप आहात आणि मला तसेच हवे आहात जसे मी लहान असताना होतात. मला तुम्हाला पहायचं आहे, लवकरात लवकर !!! मग आता बोला कधी पूर्ण करताय माझा हट्ट?' पाटीलांना एकदम भरून आलं होतं. ते म्हणाले उद्या फोन कर मग बोलू.
निमूनेही भरल्या उराने फोन ठेवला होता. दुसर्या दिबशी तिने नेहेमीच्या वेळेस फोन केला. तर फोन लागतच नव्हता. बराच वेळ प्रयत्न करून मग तिने शेवटी शेजारच्या काकूंना फोन केला. त्या पण जरा घाईतच होत्या. म्हणाल्या, "बरं झालं फोन लावलास तुझ्याच घरी चालले होते. तुमचा तो कंप्युटर सुरु केलाय म्हणे तुझ्या बाबांनी". ती एक्दम उडालीच. पटकन संगणक सुरु केला तर काय???? 'या..........हूहूहूहूहू'......कुणाचे तरी बोलावणे आले होते. आई-बाबानी स्वत:चे खाते उघडले होते. :-) तिने मग घाईघाईने स्वत:चा क्यमेरा, माईक सुरु केला आणि त्यानांही सुरु करा म्हणून सांगितले. लवकरच तिला घोरपडे काकांच्या मुलाचा आवाज आला आणि ही जादू कशी झाली ते कळले. त्याच्या सूचना ऎकून पाटलांनी क्यमेरा सुरु केला व पुढे पाहून माईक हातात धरून बोलायला सुरुवात केली. निमूला तिचे आई-बाबा दिसले. खुर्चीत बसलेले आणि संगणकाकडे उत्सुकतेने पाहणारे त्यांचे चेहरे पाहून निमूला बाकी सारे धूसर दिसू लागले होते!!!
-विद्या.

Tuesday, December 12, 2006

त्रिशंकू!!!

कॉफी मशीनजवळ चार टवाळांचा खिदळण्याचा आवाज आला आणि तो वैतागला. मनातल्या-मनात एक दोन शिव्या घालून त्याने आपल्या कामात लक्ष घालण्याचा प्रयत्न केला. "साले एक तर उशिरा ऑफिसला येतात आणि त्यानंतरही असाच टाईमपास करत राहतात. कधी वेळेवर काम करायची बोंब." तसे त्याला त्यांच्यावर चिडायचे काही कारण नव्हते, तेही त्याच्याच देशातले, त्याच्यासारखेच नोकरीसाठी इथे राहिलेले. शिवाय त्यांनी आजपर्यंत कामात कुठेही चूक केली नव्हती. त्यामुळे त्याला फारसे बोलताही यायचे नाही.फरक फक्त एवढाच होता की तो आता जवळ-जवळ अमेरिकनच झाला होता तो काम करत असलेल्या कंपनी सारखाच. आणि या खिदळणाऱ्या, एका भारतीय कंपनीकडून आलेल्या लोकांचा तो साहेब झाला होता.तिकडून हसण्याचा आवाज वाढतच होता. शेवटी त्याने संगणकाला कुलूप लावून खिडकी समोर येऊन उभा राहिला. त्याची ती आवडती जागा होती. त्या खिडकीतून बाहेर पाहत त्याने कितीतरी गोष्टींवर विचार केला होता. पण आज त्या खिडकीतूनही फक्त सगळीकडे बर्फच बर्फ दिसत होते. प्रत्येक वस्तूवर एक प्रकारचा थंडपणा आला होता.इथली थंडी त्याला बऱ्याच जुन्या गोष्टींची आठवण करून द्यायची. त्या दिवसांची जेव्हा तो नुकताच इथे आला होता....
पुण्या-मुंबईच्या एका मध्यमवर्गातील घरातून तो आलेला. बारावी, अभियांत्रिकी शिक्षण सारे अगदी नेहमीसारखे.त्यानंतर त्याने उच्च शिक्षणासाठी अमेरिकेत जायचा निर्णय घेतला. आई-बाबांची आयुष्यभराची पुंजी खर्चून तो अमेरिकेत पोचला.मग अभ्यास,रात्रीची नोकरी, इथली थंडी, परीक्षा यांना तोंड देत त्याने डिग्री मिळवली. हे सगळं होईपर्यंत तरी तो तसाच होता, खेळकर, अभ्यासू, मनमिळाऊ, घराची, आपल्या देशाची ओढ असलेला एक भारतीय. शिकताना, पैसे पुरेसे नसले तरी मिळेल त्या वेळात, पैशात मित्रांबरोबर मजा करणे, घरच्यांशी बोलणे या सगळ्या गोष्टी तो करत असे. अगदी इथल्या लोकांवर, इथल्या व्यवस्थेवर, आसपासच्या गमतीजमती वर गप्पा मारणे, हसणे-खिदळणे हे ही करत असे. लवकरच डिग्री मिळाली आणि नोकरीची शोधाशोध सुरू झाली.आपल्या वक्तृत्व कौशल्यामुळे,चांगल्या मार्कांमुळे नोकरीही मिळून गेली. पैसे काही खूप जास्त नव्हते पण कर्ज फेडणे आवश्यक होते. एक-दोन वर्षात कर्जही फेडून टाकले त्याने. आई-बाबांची मान गर्वाने उंच झाली होती. पण हळूहळू त्याच्यातील बदल त्यांनाही जाणवत होता.

तो बराच एकटा एकटा राहत होता.अमेरिकन कंपनीमधल्या परक्या लोकांबरोबर जुळवून घेणे त्याला अवघड जात असले तरी आपले अस्तित्व टिकवण्यासाठी मिळून-मिसळून राहणे त्याला भाग होते.शिवाय आपल्या वेगळेपणाचा, बावळटपणाचा कुणी हशा उडवू नये यासाठी तो जास्तीत जास्त प्रयत्न करू लागला. त्यामुळे त्याच्या बोलण्याच्या ढंगात, वागण्यात, एक प्रकारची व्यावसायिकता आली होती.त्याचे मित्र आपलल्या कामात गुंग झाले होते. तो ही आपल्या आयुष्यात रमून गेला. पैशाची नशा दारूच्या एकदम उलट असते. आधी गरज म्हणून नंतर गंमत म्हणून पैशाची ओढ लागते, तशी ती त्यालाही लागली. लवकरच त्याला भारतातल्या व्यवस्थेचा, तिथल्या लोकांच्या वागणुकीचाही राग येऊ लागला. प्रदूषण, उष्ण वातावरण, गर्दी यात त्याचे मन रमेनासे झाले आणि त्याने कायमचे अमेरिकेतच राहण्याचा निर्णय घेतला!!!
आता आई-बाबांनी त्याला त्याच्या पसंतीने मुलगी बघून दिली आणि त्यांचे लग्न लागले......आरती....!बापरे!! तिला फोन करायचा होता! एकदम भूतकाळातून बाहेर येत त्याने तिला फोन लावला.
आरती, "अरे काय तू, जेवायला येणार आहेस की नाही घरी?"
त्याने वैतागून उत्तर दिले,'नाही गं,किती वेळा सांगितले मला वेळ नाहीये म्हणून? "
ती, "डबा तरी न्यायचा होतास."
तो अजून चिडला,"सांगितले ना मला नाही आवडत ते भाजी-पोळी डब्यात न्यायला."

तिने रागाने फोन ठेवून दिला. त्यानेही मग फारसे लक्ष न देता कामाकडे मोर्चा वळवला.दुपारी त्याच्या ऑफिसमधली बाकीची मंडळी आपापले डबे घेऊन जेवायला जाताना दिसली.कधीकधी त्याला त्यांचा हेवा वाटत असे.त्याला ती एकत्र डबे खाण्यातली गंमत आठवली. :-) पण त्याच्या बॉस बरोबर जाताना डबा घेऊन जाणे त्याला आवडत नसे. त्या लोकांना मात्र या माणसाची फार कमाल वाटत असे. सुरुवातीला भारतीय असल्याने त्याच्याशी बोलण्याच्या, ओळख वाढवण्याचा प्रयत्न केला होता, पण त्याने तो अगदी धुडकावला होता. मग त्याचा नाद सोडून दिला त्यांनी.एक जण बोलत होता,"हा काय फार स्वतः:ला शहाणा समजतो काय रे? एकदा बघितला पाहिजे मीटिंगअध्ये त्याला." दुसरा, "हो ना,अमेरिकन कुठला!" तिसरा," ते जाऊ दे.अरे या शनिवारी डाऊनटाऊन मध्ये महाराष्ट्र मंडळाचा कार्यक्रम आहे, जायचंय का बोला?" सगळे, " हो!!!" तर असं भारताबाहेरही त्याचं ते भारतीय मन आपलेपण शोधत होतं.'त्या'ला मात्र त्यांचं अव्यवस्थित राहणं अजिबात आवडायचं नाही. मोठ्याने बोलणे, हसणे, अकारण सलगी दाखवणे, त्यांचा बोलण्याचा हेल, सगळं कसं लाजिरवाणं वाटायचं. असो.
आजचा सगळा दिवसच कंटाळवाणा होता. त्याच-त्याच जुन्या आठवणी, नको असलेले विषय आणि वैताग आणणारे लोक, या सर्वांनी हैराण केलं होतं. त्यात अचानक एक मीटिंग बोलवली होती त्याच्या बॉसने, जॉनने. सगळी मंडळी एकत्र जमल्यावर कळले की प्रोजेक्ट संपत आल्याने बरेच लोक भारतात परत चालले आहेत. त्यांच्यासाठी एक पार्टी ठेवायचं बॉसच्या मनात आहे. आता हे काय? पार्टी कशासाठी? तिथं गेल्यावर या लोकांबरोवर बसायचं, बोलायचं, खोटं-खोटं हसायचं. :-(( त्याला नको होतं हे सर्व. त्याने टाळण्याचा प्रयत्न केला पण साहेबांची आज्ञा असल्याने गप्प बसावं लागलं. दोन दिवसांनी पार्टी होती एका अमेरिकन रेस्तराँमध्ये.

एक-एक करून सर्व लोक जमले. सर्व स्थिरस्थावर झाल्यावर गप्पा सुरू झाल्या. प्रत्यकेजण घरी गेल्यावर काय करणार याबद्दल जॊन विचारत होता. कुणाला लग्न ठरवायचे होते, तर कुणाला घरी निवांतपणे पडून घरच्यांशी गप्पा मारायच्या होत्या. पण चांगली गोष्ट होती की दिवाळी तोंडावर आली असल्याने तेव्हा घरी राहायला मिळणार म्हणूनही आनंद होता.जॉनने मग दिवाळी काय असते ते विचारले. सर्वांनी उत्साहाने बोलायला सुरुबात केली. तो गप्पच बसला होता. कित्येक वर्षात त्याने दिवाळी साजरी केली नव्हती. जॉनने एकदम त्याला विचारले, "बाय द वे, व्हाय डोंच्यू सेलिब्रेट दिवाली?". त्याच्याकडे काही उत्तर नव्हते.तो कसंसं हसला.

जेवायला घेताना कळले की बर्याचसे पदार्थ मांसाहारी होते,त्यातही गायीचे/डुकराचे मांस जास्त.मग प्रत्येकाने आपापली ताटली स्यलडकडे वळवली.ते पाहून जॉन त्याच्याकडे पाहत म्हणाला, 'ओह, आय अम व्हेरी सॉरी. आय डिड नोट नो मच अबाउट धिस.आय आलवेज सॉ हिम ह्यविंग इट'.खरंतर त्याने कुणी काही बोलायला नकॊ म्हणून कधी सांगितलेच नव्हते.आता मात्र सर्वांसमोर त्याला चोरट्यासारखे वाटत होते. हीच नाही अशा अनेक गोष्टी त्याने स्वतः:मध्ये बदलल्या होत्या. तो कॊणती एक सांगणार होता?

घरी जाणाऱ्या पैकी जवळपास सगळेच साधारण एक-दोन वर्षे इथे राहत होते.त्यांना आता घरी जाण्याची ओढ जाणवत होती. जॉन त्यांना म्हणत होता,"I can understand your feelings. I cannot stay away from my home or my folks for long. I miss them." घरी जाण्याची ओढ असलेले,मनाने अजूनही भारतीय असलेले ते साधे-सरळ लोक आणि एकीकडे त्यांच्या भावना समजून घेणारा जॉन यांच्यामध्ये तो एकटाच पडला होता. परत ये म्हणून-म्हणून थकलेले आई-बाबा, पूर्वी यांच्यासारखाच असलेला तो, त्याचे मित्र-मैत्रिणी, ते जुने दिवस आठवत, समोर आलेल्या मांसाहारी सूपमधले 'पोर्कचे' तुकडे बाजूला काढून खात असलेल्या त्याचा आज त्रिशंकू झाला होता!!

-विद्या.