Thursday, February 16, 2017

एक होता हिवाळा
         मधे म्हणाले तसे सध्या सतत बर्फ चालूच आहे गेले काही दिवस. रोज बर्फाचे आणि इथल्या निसर्गाचे वेगळे रूप दिसत राहते. मागच्या आठवड्यात स्नो स्टॉर्म होते. सतत २४ तास बर्फ पडला. आदल्या दिवशीच लोकांनी जाऊन दुकानातून खाण्याचे सामान इ घेऊन आले, शाळांना सुट्ट्या, मग दिवसभर घरात बसून राहायचं हे सर्व झालं. माझ्यासारख्या लोकांना जे घरी बसून काम करू शकतात किंवा ज्यांना सुट्टी पडली तरी चालू शकते अशांना इतका त्रास होत नाही, जितका रोजगारावर काम करणाऱ्या लोकांना होतो. किंवा ज्यांना बर्फात ड्राईव्ह करून जावेच लागते किंवा बर्फ काढणे हेच ज्यांचे काम असते. 
       यावेळी एका मित्रांच्या घरची लाईटही गेली होती आणि घर प्रचंड थंड पडले होते. ज्यांना पर्याय असतात त्यांचे चालून जाते पण असे लोक जे थंडी सहन करू शकत नाहीत किंवा ज्यांचे कुणी नाही किंवा ज्यांना एखाद्या हॉटेलात जाऊन राहणे परवडणार नाही अशा लोकांना त्रास आहेच याचा. तर निसर्गाच्या अनेक भयानक रूपांपैकी हेही एक. जे समोर आल्यावरच त्याच्या शक्तीची प्रचिती येते. पण त्याचसोबत वादळ शमल्यावर त्याचं सौन्दर्यही दिसून येतं. तितकंच शांत आणि सुंदर. असेच काही फोटो गेल्या काही दिवसांतले. इथल्या उंच झाडांच्या प्रेमात आहे मी. त्यांच्यामुळे हा गाव जरा जास्तच खुलून येतो हे नक्कीच, उन्हाळा हिवाळा किंवा पानगळ कुठलाही ऋतू असो.

विद्या भुतकर.

Wednesday, February 15, 2017

एका लग्नाची भन्नाट गोष्ट

     जात्यावर हळद दळली, मुहूर्तमेढ रोवली, बायकांची गाणीही म्हणून झाली. गावातल्याच फोटोग्राफरनं सगळ्या बायकांचा एकेक फोटो काढला. '१०० रुपयाला एक फोटो' म्हटल्यावर शैलाक्कानं तिचा आणि सुनेचा वेगळा फोटो घ्यायचा विचार रद्द केला. आता गाडीत बसून निवांत नाश्ता करायचा या विचारानं ती एका कोपऱ्यात जाऊन बसली. सुनेलाही तिने जवळ बसवलं. बाकी मांडव बांधून झाला होता. आता कसं लगीनघर वाटत होतं. पक्याच्या आईला, काकीला, काय करू अन काय नको असं झालेलं. नवरदेवाची आई म्हणून मान असला तरी काम सरता सरत नव्हतं. सगळे आहेर, बस्ता, पाहुणचार यातून कधी सुटतो असं तिला झालं होतं. मनात हजार वेळा तिने देवीला साकडं घातलं होतं,"हे लगीन पार पडू दे, पोराला घेऊन पयलें तुझ्या दारात येऊन तुझी साडी चोळी करतो बघ".
       दुपारी ४ ला गाडी निघणार होती मुलीच्या गावात जायला. काकीनं हजारवेळा तरी शिव्या घातल्या होत्या मनात,'मेल्याना कितीदा म्हटलं हिकडं करून द्या लगीन पण नाय. " अण्णाही वैतागले होते, अण्णाही एकेका पोराला कामं सांगून दमले होते. त्यांनी तिला शांत केलं. "जाऊ द्या ओ. किती चीडनार अजून? आता ते लोक आडूनच बसले तर काय करनार? नायतर मग आपल्याला करायला लागला अस्ता खर्च हितला. त्यापेक्षा गाडी घिऊन जायचं आणि गाडी घिऊन पोरीला आणायचं. बास !". काकी जरा शांत झाली. आता दोन दिवसांसाठी अशी हिम्मत सोडून चालणार नव्हती. तिनं पुन्हा एकदा घरात, ओसरीवर, स्वंयपाकघरात फेरी मारली. तिच्या भैनीच्या पोरीने तिला समजावलं,"मावशे बास की आता. परत हितंच यायचं हाय. आणि काय राह्यलं तरी आपन पोराकडंच हाय. असा रुबाब तरी कधी करनार?". तेही बरोबरच होतं म्हणा, मुलाची आई म्हणून रुबाबात राह्यचं सोडून काकीला सामान न्यायची, सगळं ठीक होण्याची काळजी.
       तिने घड्याळात पाहिलं, पाच वाजून गेले होते. सगळे पै-पाहुणे दारात जमा झाले. बाहेरगावच्या लोकांना सकाळ सकाळी दणकून जेवण घातलं होतं अण्णांनी. सगळे सुस्तावले होते. गाडी आली तशी सगळे खडबडून हलले. पक्याच्या हातावर काढलेली मेंदी अजून तशीच होती. चार गोळे का होईना काढायलाच पाहिजे होते ना? त्यामुळे बाकी पोरांनीच सामान उचललं. पक्या पुढे जाणाऱ्या ट्रॅक्स मध्ये बसला तसं काकीनं त्याला अडवलं, म्हटली,"एक मिनिट दम काढ". पक्यानं,"आता काय" म्हणून तोंड वाकडं केलं. ती घाईत घरात गेली, खडेमीठ-चार लाल मिरच्या घेऊन आली, ४-५ उठाबशा काढत, पुटपुटत त्यांचं मीठ काढलं आणि म्हणाली,"आमच्या गाडीत बस. उगा पोरा-सोरांच्या बर्बर मजा मारत बसू नका. आमच्या गाडीत दोन-चार तरणी पोरं पायजेल का नको?". पक्या आता वैतागला होता पण काकी लई दमली होती काम करून, तिला काय बोलणार म्हणून गप बसमध्ये बसला.
      बाकी बायकांनी, पुरुषांनी जागा पकडल्या, पिशव्या ठेवल्या. शैलाक्कानं पन आपली आणि सुनेची जागा पकडून घेतली. तिला आतल्या बाजूला बसवून ती बाहेरच्या सीटवर बसली. पुन्हा एकदा उठून पिशवी खाली घेऊन चाचपडली, परत ठेवली आणि खाली बसली. सुनेनं नुसतंच बघितलं आणि बाहेर बघायला लागली.
 शेजारच्या सीटवरल्या एका बाईनं विचारलं,"काय शैलाक्का, झाला का सासूबाई? काय म्हटला सुनेचं नाव ते?". शैलाक्कानं नाव सांगितलं,"जानवी".
ती बाई बोलली,"अस्स. चांगलं नाव हाय की".
शैलाक्कानं कौतुकानं सांगितलं,"होय, आम्हीच ठेवलंय. मला ती शिरेल मधली लै आवडली हुती बगा. मग म्हणलं, हेच ठेवायचं नाव सुनेचं. "
सून तिकडून थोडंसं हसली, नाईलाजाने. जागेवरून हात जोडून नमस्कार केला. तसं शैलाक्का म्हटली,"असं काय पुडाऱ्यागत हात जोडतेया, वाकून कर.या आपल्या पक्याच्या मावशी हायेत." म्हणून स्वतः उठून बाजूला झाली. तिकडे त्या बाईंनी,"असू दे असू दे" म्हटलं तरी सुनबाई उठल्या, बसमध्येच वाकून नमस्कार केला आणि पुन्हा जागेवर बसल्या.
"पोरगा आला न्हाई ते?" त्या बाईंनी विचारलं.
"हां त्याला जरा काम होतं. मग म्हटलं हिला तरी नेतो. नवी सुनबाई जरा समाजात चार लोकांची ओळख व्हायला पायजे ना? म्हनून घेऊन आलो मग."
त्या बाईंनी मान हलवली.
       गाडी भरली, बारकी पोरं उगाच उड्या मारत होती, त्यांना त्यांच्या आयांनी गप्प बसवलं, नारळ फुटला आणि देवीचं नाव घेऊन गाडी निघाली. सगळा मिळून ६ तासांचा रस्ता. पण रस्त्यात जेवण खाणं करून पुढं जायला वेळ होणारच होता. 'पहाटे पहाटे गाडी पोचायलाच पायजे' असा विचार करून काकीने एक सुस्कारा उसासा सोडला. जरा सगळे स्थिर झाल्यावर तिनं एक मोठी पिशवी पक्याला वरून काढायला लावली. त्यातनं एकेक करत बुंदीचे लाडू आणि चिवड्याचं पाकीट तिने मागे पाठवायला सुरुवात केली. शैलाक्काने सुनेला एक देऊन आपलं लगेचच उघडलंही. बकाणा भरत तिने शेजारच्या मावशींशी बोलायला सुरुवात केली. सुनबाईंनी दोन चार घास खाल्ले आणि पाकीट पुढच्या जाळीत ठेवलं. खाऊन हळूहळू करत सगळे पेंगले.

दोनेक तासांनी सुनबाईंनी शैलाक्काला हळूच हलवलं,म्हणाली,"आत्याबाई जायचं होतं. " "कुठं?" विचारल्यावर तिने करंगळी दाखवली.
"आता कुटं ? जरा दम काढ." म्हणून शैलाक्काने तिला गप्प बसवलं. ती गप्प बसली, कशीतरी अर्धातास कळ काढून तिने पुन्हा उठवलं, म्हणाली,"लै घाईची लागलीय." कुटं आडोश्याला थांबली तरी चालंल". तिचा चेहरा पाहून शैलाक्का उठली, तिने काकीला उठवून कानात सांगितलं, मग काकींनी पक्याच्या कानात. पक्याने पुढे जाऊन गाडी एका ठिकाणी थांबवली. त्या दोघी उतरल्या तशा अजून दोन चार बायका उतरून आडोशाला जाऊन आल्या. जानवी येईपर्यंत शैलाक्का बाहेर उभ्या राहिल्या. सगळे आत येऊन पुन्हा गाडी सुरु झाली. त्यात अर्धा तास तरी गेला होता. आत येऊन शैलाक्का शेजारच्या मावशीला सांगू लागली,"तुम्हाला म्हनून सांगते. दोन दिवस झाले सारकी ही अशी जायला लागलीया. आता येऊन डॉकटरला दाखवाय पायजे."
         आपल्याबद्दल असं लोकांशी बोललेलं जानवीला अजिबात आवडलं नाही. ती मान फिरवून बाहेर बघत बसली. तासाभरात गाडी पुन्हा थांबवायची वेळ आली. आता मात्र जानवीचा चेहरा रडवेला झाला होता. तिला पाहून पुन्हा गाडी थांबवली. एका तरण्या पोरीनं म्हटलंही,"मी जाते सोबत", तर शैलाक्काने काही ऐकलं नाही. स्वतःच तिच्यासोबत जाऊन आली. दोघी आत आल्यावर गाडी सुरु झाली. आत बाहेर जाताना, सगळे लोक आपल्याकडे बघत आहेत हे पाहून दोघीना अजूनच अवघडल्यासारखं झालं होतं. अजूनच आता सगळे जागे झाले होते आणि भूकही लागली होती. .पुढे पोरांनीच थोडं बघून एका ढाब्यावर गाडी थांबवायला सांगितली. गाडी थांबल्यावर सगळ्यांसाठी एकेक थाळी सांगून पक्याने मेंदीचे हात धुतले. आणि जेवायला बसला.
        तिकडे सगळ्या बायकांनी टेबल जोडून आपला घोळका बनवला. सगळ्या गप्पा मारत जेवल्या. कुणी आपल्या पोरांना खायला घातलं. कुणाला उलटी झाली म्हणून काहीच खाल्लं नाही. जानवीलाही जेवण काही जाईना. उगाचच चिवडून तिने रोटीचे चार घास खाल्ले आणि गप्प बसली. आता मात्र शैलाक्काला पोरीची काळजी वाटायला लागली. घरी गेल्यावर तिची दृष्ट काढायचं तिने मनोमन ठरवलंही. आता सगळ्यांचं जेवण झाल्यावर सगळे पुन्हा एकदा बाथरूमची फेरी मारून आले. आत गेलेल्या जानवीची वाट बघणाऱ्या शैलाक्काला चैन पडेना. शेजारीच असलेल्या काकीशी ती बोलायला लागली. आपल्यामुळे उशीर होतोय हे तिला कळत होतं. काकीला म्हणाली," आता महिनाभरच झाला लग्नाला. म्हटलं जरा सगळ्यांशी ओळख पाळख हुईल पोरीची. पण उगाच आनलं असं वाटाय लागलंय. काय खाईना, पिईना. आनी सारकी जायला लागलीय. काय कळंना."
काकींला स्वतःच्या टेन्शनमध्ये हिच्याकडे लक्ष लागत नव्हतं. काहीतरी बोलायचं म्हणून ती म्हणाली,"हां आल्यावर डॉकटरला दाखवा. नायतर तिकडे गेल्यावर त्याच गावात जमलं तर जाऊन या. बघू कुणी भेटलं तर."
शैलाक्काने मान हलवली.
पुन्हा विचार करत काकी म्हणाली,"दिवस तर गेलं नसतील?"
        अरेच्चा हा विचार तिने केलाच नव्हता. आता तिला सगळी चिन्हं दिसायला लागली आणि शैलाक्का खूष झाली. पोरगी बाहेर आल्यावर दोघी गाडीत बसल्या आणि गाडी सुरु झाली. तरण्या पोरांनी गाण्यांच्या भेंड्या सुरु केल्या आणि मागे बसून बायकांनी गप्पा. या दोघी सासू-सुना फक्त ऐकत होत्या. मधेच जानवीने हळूच गाणं सांगितलं,"हमें तुमसे प्यार कितना.." तिच्या बारीक आवाजाकडे लक्ष जाणं अवघडंच होतं. शेजारच्या मावशीने आग्रहाने तिला गाणं म्हणायला लावलं. तेव्हढं गाणं सांगून ती पुन्हा बाहेर बघू लागली. मध्ये एकदा जानवीने सासूला उठवलंच. यावेळी मात्र तिने पुढच्या पोराला पण सोबत घेतलं. रात्रीच्या अंधारात दोघी कुठे एकट्या जाणार म्हणून. यावेळी तिने पोरीला बाहेरच्या बाजूला बसवलं आणि झोपी गेली.
     बराच वेळाने पोरांचा उत्साह सरला. काकीने सगळयांना 'उद्या कामं हायेत मुकाट्याने झोपा' म्हणून गप्प बसवलं. लाईट बंद झाले. हळहळू करत सगळी गाडी शांत झाली. रात्रीच्या गुडूप अंधारात कधीतरी सगळ्यांची गाढ झोप लागलेली असताना त्या पोरीने पुन्हा सासूला हलवलं. आता मात्र शैलाक्काला झोप आवरत नव्हती. जानवींने समोरच्या पोराला उठवलं. तिने हळूच सासूला सांगितलं,"आत्याबाई हे दोघं आहेत झोपा तुम्ही." तिनेही पडत्या फळाची आज्ञा म्हणून एकदा फक्त उभ्या राहिलेल्या पोरांकडे पाहिलं आणि 'बरं' म्हणून झोपून गेली. ड्रायवर लाईट लावणार इतक्यात पक्याने त्याला थांबवले,"'इतक्या रात्री लाईट नगू लावूस' म्हणून. गाडी थांबली, अंधारात चाचपडतच ती, ते पोरगं आणि पक्या उतरले.  दहा मिनिटाने तिघे आत आले आणि 'चल रे' म्हणून पोराने सांगितल्यावर गाडी सुरु झाली.
       पुढचे तीन तास मात्र शैलाक्काची झकास झोप झाली. गाडी मुलीच्या गावात येऊन पोचली होती. गाडी थांबल्या थांबल्या अचानक धाडकन तीन पोरं उठून दार उघडून पळत सुटली. पेंगलेल्या वऱ्हाडाला काय झालं ते नक्की कळलं नाही. ड्रायवर एकदम ओरडला,"चोर चोर" म्हणून. सगळे एकदम दचकून जागे झाले. शैलाक्काला तर काही कळत नव्हतं. तिने शेजारी पाहिलं तर पोरगी शेजारी नव्हती. पटकन पिशवी वरून काढली आणि पाहिलं तर पोरींचे सगळे सोन्याचे दागिने गायब होते. तिने तिथेच हंबरडा फोडला,"कुठं गेली रे माझी पोर? चोरांनी धरलं का काय तिला? सगळे दागिने बी गेले की रं."
तिचा आवाज ऐकून सगळे आपापल्या पिशव्या बघत असताना एकदम काकी ओरडली," आरं देवा. हा काय घात झाला रं?". तिच्या हातात एक कागद होता. अण्णांनी तो कागद हातात घेऊन वाचला,"अवो अक्का तुमची सून आमच्या पोराबर पळालीया. "
"अन्ना काय पन बोलू नका" म्हणून शैलाक्का ओरडली.
अण्णा पुढे बोलले,"म्हनं त्यांचं प्रेम होतं अधिपासुन. तिच्यावर शंका आली म्हून बापानं घाईनं लग्न केलं आनी तुम्ही माझं पैशापायी, म्हनं. आमी लग्न करणार हाय. आमाला शोधू नका असं लिहलय बघा तुम्हीच. "
काकीला तर चक्करच आली होती आणि शैलाक्का आपली रिकामी पिशवी हातात घेऊन उध्वस्त बसली होती.
आता त्यांना शोधणार तरी कुठे आणि कसं हे कुणालाच कळत नव्हतं. ड्रॉयव्हरलाही नक्की कुठे गाडी थांबवली ते आठवत नव्हतं आणि हे असं होऊच कसं शकतं यावर अजूनही कुणाचा विश्वास बसत नव्हता.

तिकडे पक्या आणि जानवी, नाही नाही, मेघा केंव्हाच दूर निघून गेले होते. अनेक प्रयत्नांनी का होईना ते एकमेकांना कायमचे भेटले होते.

विद्या भुतकर.

Tuesday, February 14, 2017

शेअरिंग: एक आवडता उद्योग

         आपल्याला आयुष्यात नसते उद्योग करायला लै जोर असतो. शेअरिंग म्हणजे तर आवडता उद्योग. :) अगदी पोराच्या 'डायपर रॅश' क्रीमबद्दलचं आपलं मतही एकदम उत्साहाने देणार. आधी कधी इतकं लक्षात आलं नव्हतं, पण एकूणच मी मला एखादी गोष्ट आवडली असेल किंवा नसेल तर त्याबददलचं मत लगेच मित्र-मैत्रिणींना वगैरे सांगून टाकते. म्हणजे मला आवडलंय तर बाकीच्यांना ते समजलं पाहिजे ना? आणि नसेल तर त्यांचा तरी त्यांचाही त्रास वाचेल असं माझं स्पष्ट मत असतं. तर अशीच 'स्पष्टं' मी ऊठसूट देत असते. 
         या मत देण्याच्या यादीत बऱ्याच गोष्टी येतात. मुलं, त्यांचे अनुभव आणि त्यानुसार लागणाऱ्या सर्व गोष्टींबाबत तर देतेच. पण एखादे हॉटेल, शॉपिंग मॉल, एखादा कपडा, एखादे पुस्तक अशी बरीच मोठी यादी आहे. आता हा विषय निघाला तो म्हणजे गाण्यांवरून. अनेकदा आपण एकदम विचारतो, "अरे तू हे गाणे ऐकलंस का?" आणि मग गप्पा सुरु होतात. काल असंच एका मैत्रिणीला दोन चांगली गाणी 'नक्की ऐक' म्हणून सांगितलं. तिनेही लगेच त्यातलं एक ऐकून घेतलं आणि खूष झाली, "अरे कसलं भारी गाणी आहे म्हणून". मग मी उत्साहात अजून दोन-चार सांगितली. आता हे गाणी शेअर करणं तसं नवीन नाही. पण समोरच्या व्यक्तीने ते लगेच ऐकून त्यालाही आवडले म्हणजे जणू आपण स्वतःच गाणं लिहिलंय, गायलंय अशा टाईपचा आनंद होतो. खरं की नाही?
         असे लगेच ऐकणारे लोक म्हणजे अशा शेअरींग टाईप लोकांचे फेव्हरेट. त्यांना मग जितके जास्त माहिती देता येईल ती द्यायची. तेही ऐकून घेतात आणि लगेच एखादी वस्तू किंवा जे काही असेल ते अनुभवतात. कधी कधी या शेअरिंग मध्ये साध्या रेसिपीज वगैरे असतात किंवा त्याच्या छोट्या टिप्सही. आणि आपण सांगितल्याप्रमाणे खरंच एखाद्याचा पदार्थ चांगला झाला की केव्हढा तो आनंद होतो, दोन्ही पार्टीना. रेसिपी किंवा टिप्स जाऊ दे, एखादा पदार्थ ठराविक पद्धतीनेच कसा खाल्ल्यावर भारी लागतो हेही मी सांगितलंय आणि ऐकलंय. म्हणजे उदा: गुलाबजाम गरम करून आणि आईस्क्रीम, तूप मीठ भरलं वांग आणि भात(तोही कोरडा), असे अनेक. मग समोरच्याला ते आवडलं की अजून मस्त. सानुला मी अनेकवेळा असं सांगत असते, 'हे असं खाऊन बघ भारी लागतं'. :) 
       आता सगळ्यांच लोकांमध्ये हे असे गुण दिसत नाहीत. अनेकजण समोरच्याचे मुकाट्याने ऐकून घेतात. 'मी असे करते' किंवा 'तसे बनवते' वगैरे अजिबात बोलत नाहीत. तर असेही काही असतात जे समोरच्याने सांगितले की लगेच त्याला पर्याय सांगतातच. 'मी असे करते' म्हटलं की 'त्याऐवजी असे करून बघ', आपण एक गाणं सांगितलं की त्यापेक्षा हे अजून भारी आहे असे अनेक पर्याय त्यांच्याकडे असतात. :) असतो एकेकाचा स्वभाव. पण माझ्यासारखे जे काही असे उत्साही लोक असतात जे सर्व बाबतीत मत/सूचना देतातच, त्यांच्याकडे पाहून कधी कधी साशंक लोकांना सारखे वाटत राहते,'अरे हा इतका त्या प्रॉडक्ट बद्दल का सांगतोय? नक्कीच त्याचा काहीतरी स्वार्थ असणार'. अशा वेळी मात्र मी धडा शिकले आहे, कितीही वाटलं तरी गप्प बसायचं. काही अडत नाही आपल्या सूचनांशिवाय कुणाचं. :) अर्थात तसं ठरवलं तरी मूळ स्वभाव जात नाहीच. 
         आजकाल तर फोटो, जोक्स, कविता, गोष्टी कितीतरी गोष्टी शेअर केल्या जातात. एखादा जोक ओठांवर एकदम हसू आणतो तर एखादी गोष्ट रडू. पण आपल्या माणसांनी ते शेअर केल्यावर ते अजूनच खास बनतं. असो. एका गाण्याच्या गप्पांवरून हे विचार मनात आले म्हणून लिहिले. बाकी, त्याच मैत्रिणीला लगेच एक मूव्हींची यादी पण दिली आहे. :) आणि तिचीही घेतली आहे. :) अशा गोष्टीत जे सुख असतं ते किती लहान असलं तरी इतकं सहज मिळून जातं, नाही का? तुम्ही अशा काय गोष्टी किंवा वस्तू किंवा अनुभव शेअर करता का? इथेही लगेच सांगून टाका. चान्स मिळाला तर का सोडा? 

विद्या भुतकर.
      
   

Monday, February 13, 2017

'बिडी' ची जोडी

येडी बिडी झालीस का काय?
साडी बिडी मिळायची नाय. 
गाडी बिडी गेली अंगावर?
काडी बिडी हाय का ?
शिडी बिडी लागलं त्याला!
जोडी बिडी जमायची नाय.  


आयुष्यात 'बिडी' ची जोडी किती वेळा जमवली असेल मोजायला हवं. :)

विद्या भुतकर.

Sunday, February 12, 2017

चौकट

      फेब्रुवारी हा इथल्या थंडीतला सर्वात त्रासदायक महिना.  या वर्षी तशी थंडी कमी असली तरी या महिन्यात बऱ्यापैकी बर्फ पडत आहेच. मागच्या वेळी बर्फ पडला तेंव्हा मुलांनी मस्त घरासमोर घसरगुंडी करून मजा केली. ते खेळत असताना, रविवार दुपार असल्याने मी जेवण बनवत होते. दुपारीही मी मस्त झोप काढली आणि मुलं बाहेर खेळून आली. यावेळी शेजारच्या काकांनी त्यांना त्यांची स्लेड उधार दिली होती आणि त्यामुळे स्वनिकच्या तोंडावर मस्त स्नो उडून चेहरा लाल झाला होता. घरी आल्या आल्या त्याने तक्रार केली,"आई तू का आली नाहीस?". खरंतर माझ्या लक्षातच नाही आले की आपणही जायला हवे होते. त्याने आग्रहाने सांगितलं,"पुढच्या वेळी मात्र तू यायचंस आणि त्या स्लेड वर पुढे बसायचं." मीही तेव्हा 'हो' म्हणून सोडून दिलं.
         त्यानंतर महिनाभर काही स्नो झाला नाही. मागच्या आठवड्यात स्नो झाल्यावर पुन्हा मुलं बाहेर पडत होती आणि मी त्यांना आतूनच बाय करत होते. पण अचानक मागच्या गेली केलेलं प्रॉमिस लक्षात आलं आणि पटकन कपडे बदलून बाहेर गेले. त्यांच्यासोबत दोन वेळा स्लेडवरून गेलेही. स्वनिक म्हणाला तसं, पुढे बसून. मला जाम भीती वाटत होती. आणि मजाही. त्यामुळं जोरात ओरडून खाली जात होते. खूप वर्षांनी बर्फात खेळले असेन. तेंव्हा माझ्या लक्षात एक गोष्ट आली, त्याबद्दलच लिहायचं होतं.
         याआधीही मी मोठ्या राईड्स मध्ये गेले आहे. आणि मी इतकी काही भित्री नाही. पण कधीतरी काहीतरी बदललं. कसं ते मलाही कळलं नाही, पण 'मला हे जमत नाही' ,  'मला थंडी आवडत नाही', 'मला बर्फात काही जमत नाही' अशी काही वाक्य समोर म्हणली नसतील तरी डोक्यांत नक्कीच येऊन गेलीत. आणि मी स्वतःला कधी स्वतःच ठरवलेल्या चौकटीत बांधून घेतलं हे कळलंही नाही. परवा ती स्लाईड करताना ते जाणवलं. आता मी काही इतकी शूरवीर होऊन उगाच बर्फात जाणार नाही, पण आधीपेक्षा नककीच जास्त जाईन, असं ठरवलंय.
         हेच नाही अशा अनेक गोष्टी असतात त्याच्या चौकटीत आपण स्वतःला कधी अडकवतो हे कळतच नाही. उदा: 'मला हा रंग आवडत नाही', 'मला भात खाल्ल्याशिवाय जमतच नाही', 'व्यायाम करणं मला कधी जमलंच नाही' किंवा 'हे असले कपडे मी घालतच नाही' अशी वाक्य आपण कधी बोलायला लागतो कळतंच नाही. मी अनेक आईबाबांना पाहिलं आहे, अगदी माझ्याही, जे 'आम्हाला हे असंच लागतं' किंवा 'हे मला जमणार नाहीच' अशी वाक्यं बोलताना. आणि परवा ते मीही करत होते. खरंतर मला वाटतं, या गोष्टींचीं सुरुवात अशीच होते जिथे कधीतरी कामामध्ये असताना एखाद्या गोष्टीला प्राधान्य देत नाही किंवा 'खरंच मी काहीतरी वेगळं करावं का?' असा विचार करायला वेळ घेत नाही. तिथून मग पुन्हा पुन्हा तीच गोष्ट घडताना आपण त्याचा विचार करायचं टाळतो आणि ती कधी सवय होऊन जाते आणि पुढे अलिखित नियम हे आपल्यालाही कळत नाही.
        आपण स्वतःला कुठल्या चौकटीत अडकवत आहोत हे एकदा जाणून घ्यायला हवं आणि त्याच्यावर काही प्रयत्नही केले पाहिजेत, तरच मजा आहे. नाहीतर १५ वर्षांपूर्वी आपण जी गोष्ट आवडीने करायचो ती कधी हरवून गेली हे कळणारही नाही. नाही का?

विद्या भुतकर.