Tuesday, September 25, 2007

एक बरस बीत गया...

काहीतरी लिहायचं म्हणून......
आता सगळ्य़ा Annevarsaries साजरी करण्याची सवयच झालीय. दिल चाहता है मध्ये नाही का तो एक नमुना आहे सोनाली बेंद्रेबरोबर. "यहां हम इस तारीख को,इतने बजे मिले थे...". तसं, जरा काही झालं की Annevarsary करा साजरी. पण तीही करण्यात जरा उशीरच झाला. मग काय? Belated Celebrations? Belated Wishes? I hate to do that. मला एक कळत नाही एखाद्याला दोन दिवसांनंतर 'हॅप्पी बर्थडे' असं म्हणून काय उपयोग? साजरा करण्याचा दिवस तर निघून गेलाय आणि नंतर तुम्ही त्याला शुभेच्छा दिल्यावर त्या माणसाने काय करावं?
असो, उशीरा का होईना याबद्दल मला काही तरी लिहायचंच होतं. कशाबद्दल? माझ्या ब्लॉग लिहिण्याला एक वर्ष पूर्ण झाल्याबद्दल. :-) २० सप्टेंबरला,एक वर्षापूर्वी मी पहिला पोस्ट लिहिला. तेव्हा मी इतकी उत्साहात होते तरीही मला कमीत कमी दोन तास लागले असतील काही ओळी पूर्ण करायला. पण मी तेव्हा इतकी खूष होते की मला मराठीमध्ये काहीतरी लिहायला मिळेल. त्याचबरोबर मला बाकी लोकांचे ब्लॉग बघूनही इतकं आश्चर्य वाटत होतं. कसं लिहीत असतील हे लोकं एव्ह्ढं सगळं, तेही इतक्या छान भाषेत आणि इतक्या नियमितपणे. तशी थोडी भीतीही वाटली होती की आपल्याला कुठे लिहायला जमेल असं. पण माझ्या उत्साहापुढे बाकी सगळ्या गोष्टी फिक्या होत्या.
पहिले दोन-चार ब्लॉग लिहिले आणि मला एक गोष्ट जाणवली. मला जो काही मराठीचा अभिमान होता तो अगदी ढासळत होता. मला मराठीमध्ये विचारच करता येत नव्ह्ता. मला एक कळलं होतं, कित्येक वर्षात माझ्या मराठी बोलण्यात विशेष फरक पडला नसला तरी माझी विचार करण्याची प्रोसेस(परत इंग्लिश) इंग्लिश मधूनच होत होती. म्हणजे मला इंग्रजीमध्ये विचार करून त्याचं मराठीत भाषांतर करायला लागत होतं. मग त्यातही मराठी शब्द आठवण्याची मारामारी. मग बाकीचे ब्लॉग वाचताना हळूहळू 'याददाश्त वापस आ रही है' असं झालं. :-)
मी मराठीमध्ये विचार करायला लागले, काही लिहायची इच्छा होत असताना शब्द जरा वेगात डोक्यात येऊ लागले.पण अजून एक गोष्ट होती. विचार करताना मला असं वाटायचं की मला हे लिहायचंय, असं म्हणायचंय. प्रत्यक्षात लिहायला घेतल्यावर मात्र काय आणि कसं लिहायचंय हे कळायचं नाही किंवा लिहिल्यावर वाटायचं की अरे मला असं म्हणायचं नव्हतं, इ.इ. आता सवयीने हेही कळलंय की प्रत्यक्षात शब्दात मांडताना बरेचसे विचार स्पष्ट व्हायला लागतात आणि डोक्यातले गोंधळही जरा कमी होतात. बाकी माझ्या लिखाणातून हे संदर्भ निघतील ते वेगळेच.
दुसरी गोष्ट म्हणजे, नियमितपणा. सुरुवातीचे काही दिवस मी रोजच विचार करायचे काय लिहायचं त्याबद्दल. तेव्हा अर्थात इतक्या वर्षाचं साठलेलं देखील होतं जे लिहायचं होतं, नंतर त्यातला उत्साह कमी झाला. मला वाटलं आता माझ्या आळसामुळे ही गोष्टही अशीच अर्धवट राहील की काय. पण प्रत्येक महिन्यात २-४ का होईना पोस्ट लिहिले गेले आणि आज मला बरं वाटतंय की, गेल्या दोनेक महिन्यांना वगळता बऱ्यापैकी नियमितपणे लिहिलं गेलं. आणि आता जरासं लिखाणाच्या विषयांबद्दलही. सुरुवातीला मला असं वाटलं होतं की मला प्रत्येक गोष्टीवर,सभोवतालाच्या घडणाऱ्या घटनांवर माझं असं मत असेल जे मला मांडायचंय. आता मला कळलंय की मला खास अशी काही वेगळी मत नाहीयेत मांडण्यासाठी. :-)) तरीही असाच एकदा डोक्यात विचार आला आणि एक लघुकथा(?)लिहिली आणि मग लिहीतच गेले, त्यात तथ्यं असो वा नसो. जरा बरं वाटलं काहीतरी वेगळं करायला लागल्यावर. थोड्या दिवसांत तेही कमी झालं कारण मी दुसऱ्याच व्यक्तीच्या दॄष्टीकोणातून हे सर्व बघतेय असं वाटलं. माझं 'मी' पण हरवलंय असं वाटलं. (अजून ते सापडलं नाहीये हे खरं, शोध चालू आहे.) आधी खूप काही लिहिण्यासाठी धावणाऱ्या मला,'माझिया मना जरा थांब ना' असं म्हणावं लागत होतं, ते 'माझिया मना जरा धाव ना' असं म्हणायची वेळ आली. सर्वात वाईट मला कविता न करता येण्याचं वाटलं. जुन्या कविता वाचताना ती जुनी मी आता कुठेतरी हरवून गेलेय असं वाटलं. तो विचार करण्य़ातला हळवेपणा, नात्यांतला नाजूकपणा सर्व नाहीसे झालेत असं वाटलं. आणि दु:खं याचं की ते हरवत असताना मला कळलं देखील नाही. अचानक चार वर्षांनी ते जाणवून काही उपयोगही नाही. :-(( असो.
ब्लॉगमुळे अनेक लोक भेटले आणि आवडलेही. त्यांच्या लिखाणातून हरवलेले संदर्भही मिळाले. तसंच,लिहून झाल्यावर प्रतिकियांची उत्सुकताही. Something to look forward to....माझ्या नेहमीच्या चार चौकटीतल्या आयुष्यापेक्षा काहीतरी वेगळं मिळाल्याचा आनंद आणि कित्येक वर्षात जे केलं नाही ते केल्याचं समाधान. हे सर्व माझ्यातले बदल मला लिहायचेच होते,म्हणून या पोस्टचा प्रपंच.....माहीत नाही की अजून किती दिवस हे सुरळीतपणे चालू शकेल पण 'एक बरस बीत गया'. असंच चालू रहावं म्हणून मी प्रयत्न नक्की करणार आहे. बघू कितपत जमतंय ते.
-विद्या.

Friday, September 14, 2007

आलीस का गौराई?

मी चौथीत होते तेव्हा पहिल्यांदा आईने मला एक दिवस दुपारीच घरी परत बोलावले. आपल्याला काय? सुट्टी मिळाल्याशी मतलब. :-) तर त्यादिवशी गौरी घरी आणायच्या होत्या. आईने मला आज उपवासच कर असं सांगितलं होतं, त्यामुळे जोरदार भूक लागली होती. पूजेची तयारी चालूच होती. आईने मग वेगवेगळ्या पाच प्रकारची फुले की पाने काहीतरी आणली होती, एका तांब्याला सजवून त्यात ती व्यवस्थित लावूनही ठेवली. मग सामानाच्या खोलीतून चार पत्र्याचे डबे काढले आणि त्यातल्या एकातून त्या दोघी बाहेर आल्या. अगदी अलगद आईने दोन मुखवटे एका ताटात ठेवले आणि त्यासोबत तो तांब्या पण.माझ्या हातात ते ताट देऊन आई म्हणाली,'हां आता आत ये, आधी उजवं पाऊल टाक. मग देवघर, स्वयंपाकघर, मग ओसरी असं करत मी जाईन तशी पाऊलं टाकत पुढे ये. ते ताट तसं बरंच जड होतं आणि त्यात ते नाजूक मुखवटे, त्यामुळे कसं बसं सांभाळत मी पहिलं पाऊल टाकलं. त्यावेळी पहिल्यांदा त्या गौरी माझ्यासोबत घरात आल्या. आईने मला सांगितलं होतं की पुढे काय करायचं आहे.
मी पहिलं पाऊल टाकल्यावर आईने प्रश्न विचारला,"आलीस का गौराई?"
मी,"आले गं वाई".
आई,"कशाच्या पावलाने?"
मी,"सुखसमृद्धीच्या पावलाने".

आई,"आलीस का गौराई?"
मी,"आले गं वाई".
आई,"कशाच्या पावलाने?"
मी,"मुलाबाळांच्या पावलाने"....."धनधान्यांच्या पावलाने"....."सौभाग्याच्या पावलाने".....असं करत कुंकवाच्या पावलांनी मी घर फिरून आले होते.
त्यानंतर आईने घाईघाइने शेपूची भाजी आणि भाकरी, लाह्या केल्या आणि नैवेद्य दाखवला. गौराया सासराहून माहेरी आल्या होत्या ना. त्यांना खाऊपिऊ घालायचे होते. नैवेद्य दाखविला आणि मी लगेचच जेवून घेतलं. :-) आणि हेच रुटीन पुढचे ८ वर्षें तरी चालू होतं.
कुणी एखाद्याला विचारलं की तुला ऎश्वर्या राय आवडते का? तर तो उत्तर देताना म्हणतो की मला तिच्यापेक्षा सुश्मिता सेन जास्त आवडते. तसं गणेशोत्सव आवडतो का? तर माझं उत्तर असतं, हो मला तो दिवाळीपेक्षा जास्त आवडतो.(न विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं द्यायची सवयच आहे मला. :-)) ) एकूण काय, गणेशोत्सव हा माझा आवडता सण. आमच्या घरी गणपती पाच दिवसांचा असतो. पहिल्या दिवशी गणपतीसाठी आरास करण्याची धावपळ, आधीच सिलेक्ट करून ठेवलेली मूर्ती घरी आल्यावर आरती वगैरे सर्वांकडे होतं तसंच. खरी मजा येते ती दुसऱ्या दिवशी सकाळपासून. गावात कुठेतरी सकाळी ५.३० च्या भोंग्याला गणपतीची गाणी सुरु होतात. माझं आवडतं गाणं म्हणजे,'गणराज रंगी नाचतो,नाचतो....'. त्या गाण्यांबरोबर दिवसाची सुरुवात होते. पुढचे दोन दिवस गणपतीची आरती आणि त्यासोबत अजून एक काम असतं ते म्हणजे, फराळाचे पदार्थ. गौरीच्या आरासेसाठी आई अनेक पदार्थ बनवते. त्याचा फोटो टाकतेच आहे मी खाली. तिसऱ्या दिवशी मी वर लिहिलंय तसं गौरीचं आगमन होतं.
भाकरी-शेपूची भाजी,वरण भात असं जेवण झाल्यावर आई कामाला लागते. गौरींना बसवायचं,सजवायचं. आमच्या घरच्या गौरी उभ्या असतात. मग अडीच-तीन पुट उंचीच्या गौरी उभ्या करताना आई त्यांना सहावारी साडी कशी नेसवते हे पाहण्यासारखं असतं. मागच्या वेळी मी व्हिडीओ शूटींग घेण्याचा प्रयत्न केला होता, पण ते अगदीच अमेरिकन व्हर्जन आहे सगळ्या गोष्टी करण्याचं. मग कॅमेरा सोडून मी नुसतं बघत बसले. साडी नेसलेल्या गौरी गणपतीच्या दोन्ही बाजूनी उभ्या राहिल्या की या सणाची खरी शोभा येते. मग यावेळच्या साड्य़ांमध्ये गौरी कशा दिसतात हे बोलण्यात, बघण्यातच जास्त मजा येते. तर हा झाला गौरींचा पहिला दिवस. दुसरा दिवस त्यांचा लाड करण्याचा. त्यादिवशी पुरण्पोळीचा नैवेद्य असतो. पोळ्यांचा स्वयंपाक होईपर्यंत आणी खाऊन झाल्यावर सगळे अगदी पेंगुळलेले असतात, पण मुख्य काम तर बाकीच असतं, सवाष्णींना हळदी-कुंकवासाठी आमंत्रण देण्याचं. रडत-खडत का होईना आम्हा बहिणींपैकी एक घराच्या एका बाजूला तर दुसरी दुसऱ्या बाजूला जाऊन सगळ्यांना आमंत्रण देऊन येतं असू. त्यातच एखादी आपलं काम पण करून घ्यायची. म्हणणार, आता बरीच कामं आहेत, त्यामुळे तुमच्या घरी सांगायला काही येता येणार नाही, तूच तुमच्या आईला पण सांग आमच्याकडे या म्हणून.
सगळी आमंत्रणं देऊन आल्यानंतर मग घरी येऊन आमची नटण्यासाठी घाई असायची. मग साडी नेसायची की नाही, कुठली नेसायची, कोण हळदी-कुंकू लावणार, कोण अत्तर लावणार इ. आधीच ठरवून घ्यायचो. तोपर्यंत संध्याकाळ्चे पाच वाजलेले असायचे आणि आई अजून स्वत:च आवरते आहे तोवर बायका घरी यायला सुरुवात व्हायची. दादांचं त्यानंतर काही कामं नसायचं त्यामुळे ते आणि आजोबा अंगणात खुर्ची टाकून बसलेले असायचे. :-) आई म्हणायची की त्यादिवशी गौरींचं तेज काही औरचं असतं. आणि मलाही ते पटलंय. त्या नेहमीच्याच मुखवट्यांवर काही वेगळेच तेज वाटायचं. सगळ्या जणी कौतुकाने आरास, गौरींच्या साड्या, फराळाचे पदार्थ यांच्यावर गप्पा मारत संध्याकाळ भुर्रकन निघून जाते. रात्री कंटाळून झोपायला जाताना त्या दोघींकडे एकदाचं शेवटंचं बघणं अपरिहार्य असतं. जेवण झाल्यावर आई त्यांची 'दॄष्ट'ही काढते. :-) आणि हो आमचीही, आम्ही पण गौरायाच नाही का? :-)
पाचव्या दिवशी सकाळी आई मुखवटे उतरवून ठेवते आणि घर एकदम भकास वाटायला लागतं. संध्याकाळी आरती करून, त्यांब्यातील गौरी आणि गणपती विसर्जन होतं आणि एक प्रकारची उदासी मनात येते. खरंच आपल्या घरी कुणी पाहुणे आले होते आणि ते गेले आहेत असं वाटायला लागतं.मी १२वी नंतर गणपतीला घरी गेले पण गौरी घरी आणण्याचा मान तोपर्यंत माझ्या छोट्या बहिणीकडे गेला होता. :-( दोन वर्षांपूर्वीही मी घरी होते गणपतीला पण गावात जाऊन सर्वांना आमंत्रण द्यायला काही मी गेले नाही. अर्थात कित्येक घरात आज्या जाऊन काकूंची बढती सासूपदावर झाली असल्याने, नवीन सुनांनी तुम्ही कोण म्हटलं की बरं वाटत नाही ना. जे कोणी घरी आले त्यांना भेटले,बोलले आणि पूर्ण संध्याकाळ ते जुने दिवस आठवत राहले. ह्म्म्म... असो.तेव्हाचाच एक गौरी-गणपतीचा फोटो.
चार दिवसांपूर्वी काही विशेष घडतंच नाहीये असं म्हणलं खरं पण आमच्या पार्क बटरफील्ड अपार्टमेंटमधे गेल्या २-४ दिवसांपासून धावपळ सुरु झाली आहे, गणपतीच्या स्वागताची? खासकरून GT च्या घरचा गणपती मागच्या वर्षी ज्या जोशात साजरा झाला त्यामुळे तर अजूनच. GT म्हणजे आमचे शेजारी. मागच्या वर्षी १० दिवस संध्याकाळी आम्ही जवळ-जवळ १५-२० लोक असायचॊ आरतीला त्यांच्या घरी. मग कुणी म्हणणार आज प्रसाद मी करते गं, तर कधी ५ आरत्या म्हणायच्या की ७ अशी डिस्क्शन्स पण व्हायची. खूप वर्षांनी असा गणेशोत्सव साजरा झाला होता. पण स्वत:च्या घरी मी काही केलं नव्हतं. का? माहीत नाही. या वर्षी मात्र मला सर्वांकडे पाहून जोर चढलाय. आज हरताळका आहेत. घरी गणपती बसवणार नाहीये पण पूजा,आरती करणं, मोदक वनवणं हे तरी करू शकते ना? :-) बघू कसा होतोय कार्यक्रम ते. जमलं तर लिहिनंच त्याबद्दल...तोपर्यंत...गणपती बाप्पा.....मोरया.....
-विद्या.

Tuesday, September 11, 2007

मग? अजून काय विशेष?

काही महिन्यांपूर्वी,मी जेव्हा बऱ्यापैकी नियमितपणे लिहित होते, एका ओळखीच्या माणसाने मला मेल केली होती,"छान लिहीतेस गं तू. मला माहीत नव्हतं. बाकी काय? आजकाल ऑफिसमध्ये बराच रिकामा वेळ दिसतोय, एव्हढं लिहायचं म्हणजे.." सॉलिड चिडचिड झाली होती माझी. त्याला कौतुक करायचं होतं की टोमणा मारायचा होता हे अजूनही माहीत नाही. :-) पण गेल्या काही दिवसांत कामाचा ताण खरंच वाढल्यामुळे लिहिणं जमलंच नाही, त्यामुळे 'त्या' मेलची आठवण झाली. :-) तसं नुसतं काम हेच काही कारण नाहीये, द्यायची म्हटलं तर बरीच आहेत, त्यापैकी एक म्हणजे 'कंटाळा'. सगळ्याच गोष्टींचा कंटाळा. घरात शेजारी पडलेली वस्तू उचलायचा कंटाळा, जेवण बनवायचा कंटाळा, उत्साहाने फिरायला जायचा कंटाळा, अगदी कुठली मोठी गोष्ट घडली तरी त्याबद्दल प्रतिक्रिया देण्याचाही कंटाळा.... आणि बराच काही. असो.
आजकाल कुणाशी बोलताना एका प्रश्नाची भीती वाटत राहते,"मग? अजून काय विशेष?" काय विशेष असणार कप्पाळ? दर दोन दिवसात काय विशेष होणार?
तसं आजकाल काही विशेष घडतंही नाही म्हणा.आमचे दादा त्यांची डायरी लिहितात तसं,
"आज सकाळी ८ ला उठले. आवरून ९.३० ला ऑफिसला पोचले. संध्याकाळी ६.३० ते ८ ला जिमला जाऊन आले. रात्री स्वयंपाक,जेवण, टिव्ही इ. उरकून लवकर झोपी गेले. "
बरं अगदीच ताणायचा म्हणला तर हे असं.....मी आज उशीरा उठले की लवकर, एखादा नवीन ड्रेस घातला. तो चांगला दिसला आणि कुणी compliments दिल्या तर (आजकाल तेही कमीच असतं म्हणा, :-) ) ऑफिसमध्ये एखादी मिटींग होती तिला (नेहमीप्रमाणे) उशीरच झाला, किंवा मॅनेजरने (नेहमीप्रमाणे) कशी कटकट केली, त्यानंतर घरी आल्यावरही जिमला जायचा कसा कंटाळा आला होता किंवा हिंमत करून गेलेच असेन तर अंग कसं दुखत आहे. मग आज कालची भाजी शिल्लक आहे की भाजी आणण्यापासून तयारी. बरं त्यातही रोज नवीन काय बनवणार. काही बनवलंच तर अजून २ मिनीटं ते कसं बनवलं यावर गप्पा.
बस्स....झाला एक दिवस, एकच दिवस काय,महिना, वर्षं काय, अशीच म्हणायची. म्हणजे या सगळ्यापेक्षा काहीतरी वेगळं घडणं आवश्यक आहे लिहिण्यासाठी असं वाटलं.दोन आठवड्यांपूर्वी मग ओरलॅंडोला गेलो होतो. म्हटलं चला जरा ब्रेक मिळेल नेहमीच्या कामातून.तिथं गेल्यावर जाणवलं की हा ब्रेक वगैरे जो म्हणतात तो फक्त निमित्त आहे कामाची टाळाटाळ करायचं, मला कुणी महिन्याभराचा ब्रेक दिला तरी परत आल्यावर माझी तीच ती जुनी रोजीनिशी सुरु होईल. :-) असो. तर तिथे गेल्यावरही जी काही उत्सुकता जाणवायला हवी ती मला वाटली नाही. त्यात एक दिवस Sea World ला गेले होते, आता मला माशांबद्दल किती उत्सुकता असेल सांगायलाच नको. एखाद दुसरा माशांचा खेळ पाहिल्यावर होता तो उत्साह ही सरला. मग त्यानंतर समुद्रकिनाऱ्यावर भटकणे, नासा,केनेडी स्पेस सेंटरला जाऊनही ठिकठाक वाटलं. माझ्या या असल्या निरस वर्णनात कुणाला रस असेल, अगदी मलाही नाहीये.पण त्या ट्रीपनंतर मला जे काही डोक्यात आलं ते शब्दात मांडण्याचा प्रयत्न करून बघते जमतंय का.
१. कुणाच्या डायरीबद्दल असं बोलणं बरं नव्हे पण दादांच्या २५ वर्षांच्या डायऱ्या केवळ चार ओळींच्या दिनक्रमात संपून गेल्या. मग मलाच काही तरी वेगळं हवं असण्याची इच्छा का, आणि ते मिळत असतानाही त्याला असमाधानाची झालर का? अगदी प्रत्येक emotion (भावना हा शब्द योग्य वाटला नाही म्हणून emotion) शब्दात टाकायची जबरदस्ती का? म्हणजे दादांनाही काही तीव्र विचार मनात आले असतील, पण त्याबद्दल लिहिलं नाही म्हणून त्यांची डायरी थांबली नाही, मग माझीच का? त्यांनाही अनेक संकटं आली पण तरीही त्यांची डायरी थांबली नाही, मग मलाच का प्रत्येक छोट्या गोष्टींचाही बाऊ करायची हौस? जरा कुठे खुट झालं की मला homesickness,sadness,nervousness, depression येतं. आणि मलाच त्यातून ब्रेक घ्यायची इच्छा का? एकदा मी घरी फोनवर बोलताना म्हटलं, मला खूप बोअर होतंय. आई तेव्हा जे म्हणाली ते मला अजूनही विसरता येत नाही. बरं ती ते अगदी सहजपणे म्हणाली होती, टोमणा म्हणून नव्हे. आई म्हणाली, "मघाशी पिंकीचा फोन आला होता, तीही म्हणे बोअर होतंय, आता तुला बोअर होतंय. आम्हालाच बोअर व्हायलाही वेळ नाहीये. उद्या कडधान्य साफ करून औषध लावून ठेवायचंय, परवा ते पिंकीला भेटायला जायचं म्हणताहेत, ....इ.इ." आणि विचार करताना मला खरंच असं जाणवलं की या दोघांनी कधीच मला कंटाळा आलाय,किंवा बोअर होतंय म्हणून सांगितलं नाहिये. मग सगळं व्यवस्थित चालू असतानाही मलाच का 'बोअर' होतं?
२. एकदा मी मावशीला फोन केला होता. म्हटलं काय चाललंय? मावशी म्हणे आईसक्रिम खातेय, येतेस का खायला? :-) तिच्या आवाजातही आईसक्रिम खाण्यातला आनंद जाणवत होता.माझी मावशीही पन्नाशीची असेल, म्हणजे हा निरागस आनंद काही वयासोबत कमी होत नाही हेही खरंच ना. एकीकडे मी छोट्या गोष्टींवर जास्तच विचार करतेय आणि त्याच्याविरुद्ध पूर्वी जसा एखाद्या लहानशा गोष्टीतून आनंद मिळायचा तो गमावतेय.
३. बरं छोट्या जाऊ दे, काही मोठं झालं तरी मला कितीसा फरक पडतॊ? देशाची परिस्थिती कशी आणि राजकारण कसं आहे यावर बोलण्याचा माझा हक्कही नाहीये, पण व्यक्तिगत आयुष्यात तरी मला कशाने फारसा फरक पडतो? प्रमोशन मिळाल्याचा आनंदही एखादा दिवस टिकला असेल. तसंच या ट्रीपमध्येही. मला आधी वाटायचं लोक किती सही असतात, सगळीकडे फिरून घेतात, डिस्नेला जातात, नासाला भेट देतात, इकडे-तिकडे जातात. शिकागो डाउनटाऊनमध्ये पहिल्यांदा मी जेव्हा आले तेव्हा माझ्या अंगावर अक्षरश: रोमांच उभे राहिले होते, आणि रात्री झोपल्यावरही डोळ्यासमोर प्रत्येक इमारत येत होती. पण त्याच्या तुलनेत आता मी बरीच स्थिरावलेय म्हणायचे. जसा आनंद तसंच दु:खं, थोड्यावेळासाठीचं. फारतर एखादा दिवस-अगदीच एखादा आठवडा, मग मी परत माझ्या साच्यात.
४. या सगळ्यात एक चांगली गोष्टही कळाली, माझ्या जिवंतपणाचं एक लक्षणच म्हणा ना. ट्रीपला जायचं म्हणल्यावर कृष्णाला भेटणं तर नक्की होतंच. गेल्या अनेक वर्षात भल्याबुऱ्या प्रसंगात त्याने सोबत केली, पण आजकाल त्याच्याशीही बोलणं कमी झालं आहे. तरीही त्याला भेटायचंच होतं. त्याला सांगितलं की बाबा आम्ही तुझ्या राज्यात येतोय, भेटशील का आम्हाला? पण एक-दोन आठवड्यात त्याने सांगितलं की मला वीकेंडला काम असेल, त्यामुळे आपण भेटू शकतो, पण मी गाडी चालवून तिकडे येऊ शकत नाही. अजून एक चिडचिड. आता एव्हढ्या जवळ आलोय, तर दोन तास गाडी चालवायला काय जातं याचं? असा विचार करून तर वाटलं ,मी पण का जाऊ तिकडे मग? इतक्या आधी सांगूनही त्याने असं केलं, इ.इ. त्याच्याकडे जायला निघालो त्यावेळी पण मी चिडलेले नव्हते पण काही खूप आनंद पण नव्हता. पण....
त्याच्या बिल्डींगच्या फाटकातून आत जाताना त्याचा तो दात काढलेला चेहरा दिसला आणि मला जाणवलं की ...काही नाती कधीच बदलत नाहीत....कितीही वर्षे,कितीही दूर रहा तुम्ही.....त्याला बारीक झालेला पाहून तर डोळ्यांतलं पाणी आवरणं अवघड झालं होतं. त्याच्याबरोबरचा अख्खा दिवस भुर्रकन उडून गेला.दुसऱ्या दिवशी भेटायचं असं ठरवूनही भेट झाली नाही आणि परतल्यावर ती रुखरुख लागून राहीली की नीट भेटच झाली नाही.....
असो. अजूनही असेच काही मुद्दे असतील पण अजून तरी ते गुंत्यातून बाहेर पडले नाहीयेत.आता हे सगळं मुद्दे टाकून लिहायची काय गरज? पण ही विचारांची गुंतवळ एकदा सोडवायचीच होती. लिहायच्या आधी वाटत होतं की हे लिहायचंय, ते लिहायचंय,पण प्रत्यक्षात सुरुवात केल्यावर जाणवतं की मलाच माहीत नाहिये काय लिहायचंय ते आणि मग गाडी Reverse मध्ये जाऊन मला नक्की काय वाटतंय यावर येते. असं करत अनेकदा लिखाण अर्धवट टाकून दिलं. पण आज कदाचित थोडं फार तरी समजलंय असं वाटतंय. हम्म्म....आज तरी पोस्ट करून टाकते म्हणजे एक उत्तर राहील आज कुणी परत विचारलं की ....'मग? अजून काय विशेष?'...
-विद्या.