Wednesday, October 18, 2017

रांगोळी

      गेल्या आठवड्याभरात भरपूर कामे होती. एकेक करत फराळ बनवायचा होता, त्यात पणत्या रंगवणे वगैरे चालूच होते. त्यामुळे दिवाळी सुरु झाली तरी घर अजून सजलं नव्हतं. उद्या लक्ष्मीपूजनाची मुलांना शाळेलाही सुट्टी आहे तर संध्याकाळीच सुरुवात करावी म्हटलं, रांगोळी आणि दिव्यांच्या माळा लावून. 
        रांगोळी म्हटलं की दिवाळीची पहाटच आठवते. आमच्या घराच्या पुढच्या आणि मागच्या अंगणात रांगोळी काढायची असायची. त्यात आम्ही कधी लवकर उठणारे नव्हतोच. तरीही दारात रांगोळी काढायला मिळेल या आमिषाने उठायचेच. आमची आई सुंदर रांगोळ्या काढते. त्यामुळे दिवाळीला पुढच्या अंगणात तिचीच रांगोळी असायची, असते. पण मला ते अजिबात पटायचं नाही. मोठी होऊ लागले तशी आईशी वाद घालायचे की मला तू मागच्या अंगणात रांगोळी काढायला लावतेस आणि स्वतः पुढे काढतेस म्हणून. कारण काय तर अर्थातच माझी रांगोळी पाहायला मागच्या अंगणात कुणी येणार नसायचं. आता वाटतं थंडीत लवकर उठून रांगोळी काढायचा मला तरी किती अट्टाहास. 
          कितीही कुडकुडत असले तरी सकाळी उठून रांगोळी काढायचेच. कधी ठिपक्यांची तर कधी फुलांची नक्षी. तेव्हा कॅमेरा असता तर फोटोही काढले असते. आता फक्त त्याच्या पुसत आठवणी आहेत. ठिपक्यांच्या रांगोळीत अनेकवेळा ठिपके कधी तिरके जायचे तर कधी रेषा जोडताना काहीतरी चूक व्हायची. मग त्यात खाडाखोड झाली की ते छान वाटायचं नाही. नक्षी काढताना रेषा तितक्या सुबक यायच्या नाहीत. तरीही ती पूर्ण करण्याचा आग्रह असायचा. तासभर बसून रांगोळी पूर्ण करेपर्यंत उजाडलेलं असायचं आणि सर्वांचे फटाके वाजले तरी आमच्या आंघोळी अजून बाकीच असायच्या. पण ती पूर्ण झालेली रांगोळी बघताना जे समाधान असायचं ते आजही मिळालं. 
          आज संध्याकाळी ऑफिसमधून आल्यावर सुरुवात केली. अंधार आणि थंडी अगदी घरी असायची तशीच, तिकडे पहाट असायची तो भाग वेगळा. पण मी सुरुवात केल्या केल्या मुलं हट्ट करू लागली. त्यात सान्वीला बाजूला कुठे रांगोळी काढायची नव्हती. वाटलं, माझीच लेक ती, माझ्यावरच गेलीय. :) मग तिला माझ्या शेजारीच खडूने फुले काढून दिली आणि रंग भरायला सांगितले. मुलांनी दोघांनी मिळून ते पूर्ण केलं. माझी मात्र रांगोळी बराच वेळ चालली. पूर्ण होईपर्यंत थंडीने बोटे वाकडी झाली होती आणि पाठ मोडलेली. पण उभे राहून पुन्हा पुन्हा पूर्ण झालेल्या रांगोळीकडे पाहायचे समाधान मात्र खूप दिवसांनी मिळालं. आणि हो, रंग आणि रांगोळी यावेळी भारतातून येताना आईचेच ढापून आणले होते. :) तिला आता यावेळी नवे घ्यावे लागले असणार. :) 
        इथे पहाटे उठणे, उटणं लावून अंघोळी, फटाके वगैरे काही करणं जमत नाही. पण मुलांना आमच्यासारख्या काही आठवणी मिळाव्यात म्हणून जमेल तेव्हा, जमेल तितकं करत राहतो, इतकंच. :) 
तुम्हा सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा !!
विद्या भुतकर. 

Sunday, October 08, 2017

पण सुरुवात करायला हवी....

     आज सकाळी बॉस्टन हाफ मॅरेथॉन झाली. या वर्षातील शेवटची रेस. मागच्यावर्षी प्रमाणे, यावेळीही ३ रेस केल्या, ५ कि.मी., १० कि.मी. आणि २१ कि. मी. आजची ! या वर्षीची ही शेवटची रेस खास होती एका कारणासाठी. ते म्हणजे ही माझी पाचवी हाफ मॅरेथॉन होती. २०१२ मध्ये स्वनिक चार महिन्यांचा असताना या प्रवासाला सुरुवात केली होती. तेंव्हा केवळ पुन्हा मूळच्या वजनाला यायचं हे एक ध्येय होतंच पण सर्व सर्वात जास्त मला स्वतःला वेळ देण्याची गरज वाटत होती. नोकरी, मुलं, घर आणि बाकी सर्व जे काही चालू होतं त्यातून स्वतःला वेळ काढायचा होता, कितीही अवघड असलं तरी. त्या रेसच्या निमित्ताने हे झालं होतं. 
      त्यानंतर रनिंग हे माझ्याच नाही तर आमच्या घरात नियमित झालं. पुण्यात असताना ५ किमी, १० किमी रेस पळाले मैत्रिणींसोबत. आणि सोबत नवऱ्याचीही पळण्याची सुरुवात झाली होती. तिथून पुढे आम्ही जवळजवळ सर्वच रेस सोबत गेलो आहे. अशा वेळी मुलांचं कुणीतरी बघणं आवश्यक असतंच. प्रत्येकवेळी घरातलं कुणीतरी किंवा मित्र-मैत्रिणी यांच्याकडे मुले आनंदाने राहतात. अशा वेळी आपण किती नशीबवान आहोत हे जाणवत राहतं. आमच्या दिनचर्येत पळणं अविभाज्य घटक झाल्याने मुलांनीही ते आता स्वीकारलं आहे. आणि आम्हाला त्यांच्याकडून प्रोत्साहन देत राहतात. कधी आम्ही मेडल्स घेऊन घरी आल्यावर ते गळ्यात घालून मिरवूनही. 
    मी सुरुवात केली होती तेंव्हा एकटीच पळत होते. मग हळूहळू नवरा, मित्र-मैत्रिणी सोबत आले. आवडीनुसार त्यातील अनेकांनी कधी रेसमध्ये सहभाग घेतला, काहींनी जिममध्ये. इथे बॉस्टनमध्येही दर रविवारी पळायला जाताना एकेक करत मित्र-मैत्रिणी सोबत येऊ लागले आहेत आणि हा सहभाग असाच वाढावा ही इच्छाही आहेच.  एकेक करत पाच मोठ्या रेस झाल्यावर जाणवत आहे की हे इथंच थांबणार नाहीये. 
     पहिल्या रेसच्या वेळी खूप काळजीत होते, आजूबाजूच्या लोकांना बघून आपण किती नवखे आहोत हे जाणवत राहायचं. ते अजूनही वाटतंच. पण तेव्हा एक पुस्तक वाचलं होतं. त्यात लिहिलं होतं की तुम्ही दिवसातून १५ मिनिट पळत असाल किंवा चालत असाल, तुम्ही ते करताय ते पुरेसं आहे स्वतःला 'रनर' म्हणवून घेण्यासाठी. तोच युक्तिवाद मी माझ्या ब्लॉग साठीही वापरला पुढे मग. अगदी नसेल मी मोठी लेखिका, पण नियमित लिहितेय ना? मग आहे मी लेखक. :) 
     तेच मी सर्वांनाही इथे सांगू इच्छिते, ज्यांना खरंच काहीतरी प्रयत्न करायचे आहेत किंवा ज्यांना कुठूनतरी सुरुवात करायची आहे. आपण एखादी गोष्ट जी नियमित करतो ती तेव्हा कितीही लहान वाटू दे, पण ती नियमित केल्याने त्यातूनच एक कारकीर्द बनते. मग ते रोजचा व्यायाम असो, एखादा आहारातील बदल असो किंवा एखादी लावलेली चांगली सवय असो. :) पण सुरुवात करायला हवी आजच!
पाच वर्षांच्या निमित्ताने सर्व मेडल्स सोबत घेतलेला एक फोटो. :)

विद्या भुतकर. 
https://www.facebook.com/VidyaBhutkar1/

Tuesday, September 26, 2017

चिंता

     काल रात्री झोपताना, पडल्यावर स्वनिकची चुळबुळ चालू होती. म्हटलं,"झोप आता सकाळी उठत नाहीस". काही वेळाने म्हणाला,"मी ते शाळेच्या लायब्ररीचं पुस्तक परत दिलं नाही तर मला दुसरं घेता येणार नाही. ". म्हटलं,"मग?". म्हणे,"मग फक्त तिथेच वाचून परत यावं लागतं. घरी आणायला मिळत नाही." त्याला विचारलं,"तू घरी आणलं होतंस का?". आम्हाला तर माहीतही नव्हतं. आम्ही दोघेही त्याला सांगू लागलो की शाळेचं पुस्तक घरी आणायचं नाही, तिथेच वाचून परत करायचं. आता त्याला कारण म्हणजे आमचे आधीचे अनुभव. मुलीने मागच्या वर्षी असंच एक पुस्तक आणलं होतं, सहा महिन्यांनी ने घरात सापडलं. एकतर बाकीचे व्याप कमी असतात म्हणून या सर्व गोष्टींचेही लक्षात ठेवायचे? 
        त्यात कालच आम्ही गावातल्या लायब्ररीची पुस्तके परत करून आलो होतो, तीही २४ होती. अचानक नवऱ्याला आठवलं की परत देताना २५ दिली आहेत. आता तो तरी किती लक्षात ठेवणार? एकूण काय की आम्ही हे अशी पुस्तके सांभाळणे आणि वेळेत परत देणे यात बरेच घोळ करतो त्यामुळे शाळेतून अजून घेऊन न येणे हेच उत्तम असं मुलीला सांगितलं आहे. पण स्वनिकचा शाळेतील पहिलाच महिना आहे त्यामुळे त्याला हे सर्व नवीनच. आता त्याला अजूनच चिंता पडली की ते पुस्तक गावातल्या लायब्ररीत गेलंय. आता तेही नाही मिळालं तर पुढे काय? बिचारा चांगलाच काळजीत होता. शेवटी मी त्याला समजावलं, आपण उद्या जाऊन घेऊन येऊ आणि मग तू शाळेत दे. त्याला हे लगेच पटलं नाहीच. दोन चार वेळा समजावून सांगितल्यावर झोपून गेला. 
      आज पुस्तक आणून दिलं आणि ते त्यानं लगेच बॅगमध्येही टाकलं. झोपताना त्याला म्हटलंही,"आता नाही वाटत ना काळजी? झोप निवांत.". "हो झोपतो, आता मी काळजी नाही करतेय", असंही म्हणाला. 
       किस्सा छोटाच आणि त्यात झालेला घोळही लहान. उलट आज गावातल्या लायब्ररीतून ते पुस्तक आणायला गेल्यावर नवऱ्याला कळलं की हे असं नेहमी होतं आणि ते लोक दार महिन्याला अशी जमा झालेली पुस्तकं शाळेला परत नेऊन देतातही. आता हे सर्व पाहिलं तर किती सोप्प वाटतं. पण काळ रात्री स्वनिकच्या जीवाला किती घोर लागला होता. मला अजूनही आठवतं शाळेचं किंवा लायब्ररीचं पुस्तक मिळत नाहीये म्हणून चिंतेत कितीतरी रात्री मी अशा घालवल्या आहेत. एका बाईंचं,'शामची आई' सापडत नव्हतं मला. कितीतरी महिने मला त्याची चिंता पडली होती. आता हे सर्व खूप वेडं वाटतं, पण त्या वयात ती किती मोठी काळजी होती. 
      चप्पल हरवली, शाळेला उशीर झाला, गृहपाठ झाला नाहीये, डबा शाळेतच राहिला, डबा घरी राहिला, पेपरला अभ्यास झाला नाहीये, केसांना काळ्या रिबिन्स हव्या होत्या-लालच लावल्या आहेत, अशा कितीतरी चिंता घेऊन जगले. निदान त्यांनी तरी तसं राहू नये असं वाटतं. पोरांना या वयात खरंच अशा छोट्या गोष्टींची चिंता करावी लागली की वाईट वाटतं. ते जुने दिवस आठवतात. अशावेळी आपण केवळ त्यांना शांतपणे समजावून तो प्रश्न सोडवून दिला तरी किती दिलासा मिळतो बिचाऱ्यांना, नाही का? 

विद्या भुतकर. 
https://www.facebook.com/VidyaBhutkar1/

Monday, September 25, 2017

कसं काय जमतं?

    सकाळी शेवटी डॉकटरकडे जाऊन आले. तीन दिवस बिघडलेल्या पोटावर सर्व प्रयोग करून झाल्यावर, नाईलाजाने. अर्थात सर्व शहाण्या भारतीय नागरिकांप्रमाणे मीही दुकानातून औषध आणलं होतं आणि ज्या लोकांना मला बरं वाटत नाहीये माहित होतं त्या सर्वांनी सांगितलेले सर्व घरगुती उपचारही करून झाले होते. डॉक्टरकडे जाणे म्हणजे जणू तुमच्या या सर्व उपचारांची हारच! त्याच हरलेल्या, पडलेल्या मानेने आम्ही गेलो. सुरुवातीचे पैसे वगैरे घेण्यासारखी महत्वाची कामे झाल्यावर तपासण्यासारखी मामुली कामे करायची वाट बघत बसलो. समोर टीव्हीवर ढिगाने चौकोनी बॉक्स दिसत होते. त्यात इतके सगळे ऑप्शन होते की आजारी पडावं तर इथेच असा विचारही मनात येऊनगेला.

      थोड्या वेळाने छान आवरलेली नर्स आली आणि गोड हसून चेकिंग रूममध्ये घेऊन गेली. निदान आज तिच्यासमोर माझ्या गबाळेपणाचं स्पष्टीकरण द्यायला 'मी आजारी आहे' हे कारण तरी  होतं. ते मी स्वतःला पुन्हा एकदा समजावलं आणि चेकिंग रूममध्ये गेले. तिथे तिने मला प्रेमाने प्रश्न विचारले. कधीपासून पोट बिघडले आहे, किती वेळा जाऊन आला, कळ येऊन होतेय का, पातळ-चिकट, लाल काळी वगैरे टेक्शर वाले प्रश्नही तिने विचारले. ताप आहे का पाहिलं आणि बीपीही तपासलं. हे सर्व वर्णन मी सविस्तरपणे सांगताना नवऱ्याचा चेहरा कडू होऊन वाकडा झाला होता. 
तर त्या नर्सने त्याला विचारलंही,"तुम्ही ठीक आहे ना?". मग कुठे जरासा तो हसला आणि म्हणाला,"हो हो". 

     सर्व चौकशा झाल्यावर डॉकटर येतीलच लवकर असे सांगून ती निघून गेली आणि आम्हाला जाणवलं,"बिघडलेलं पोट" या विषयावर बोलतानाही कुणी इतकं हसून आणि प्रेमानं कसं बोलू शकतं?

       खरं सांगते, अशा गोष्टींची सवय नाहीये हो? हॉस्पिटल मध्ये जाऊन आजारी माणसापेक्षा बाकी लोकांची तोंड पाहून आजारी पडू असं वातावरण पाहिजे. त्याची सवय आहे. नर्सने केवळ रक्त काढताना नीट शीर तपासून जास्त त्रास न देता रक्त घेतलं तरी आनंद वाटावा याचीही आहे. पण एकतर आजारी माणूस त्यात त्याला हसायला सांगायचं आणि स्वतःही हसतमुख राहायचं? शक्यच नाही.  पुढे डॉक्टरही असाच हसमुख ! मग त्याने मी जे काही करत आहे तेच सर्व करत राहा असा 'विकतचा' सल्ला दिला. शिवाय जाताना दोन-चार पाने प्रिंटआऊटही वाचायला. (मी ते वाचणार नव्हते हे सांगायला नकोच !) 

      तर हे असे अनेक अनुभव आजवर आले. पोरांच्या डिलिव्हरी पासून हातपाय मोडून घेईपर्यंत. प्रत्येकवेळी, समोरचा माणूस रडत असो, टेन्शन मध्ये असो किंवा झोपेत, आपण हसत राहायचं, मुलं असतील तर त्यांच्याशी अजून.... गोड बोलायचं आणि आपलं काम करायचं. कसं करत असतील हे या नर्सेस? दोन्ही पोरांच्या डिलिव्हरी मध्ये सर्वात मोठा त्रास यांचा होता. का? तर इथे समोर आलेल्या पोराचं काय करायचं, झोपायचं कधी, जेवायचं काय असे महत्वाचे प्रश्न समोर असताना मध्यरात्री तीन वाजता आलेली नर्सही छान बोलत राहते. असं वाटायचं की जरा ब्रेक द्याना माझ्या तोंडालाही. किती वेळ हसणार मी हे असं तोंड वासून? त्यातल्या काहीजणी इतक्या पेशन्स वाल्या होत्या. बाळाला फीड कसं करायचं पासून डायपर पर्यंत छान समजावून सांगणाऱ्या. 

     हे असे अनुभव आले की भारतातल्या सर्व डॉकटर व्हिजिट्स आठवतात आणि त्यात आठवते ती म्हणजे 'लक्षात राहणारी नर्स' नसणं !! शक्य होईल तितका निर्विकार, रुक्ष चेहरा, हातात दिलेलं काम चुकूनही तोंडातून ब्र न काढता करून रुममधून निघून जाणं. चुकून काही प्रश्न विचारला तरी त्याचं उत्तर न देणं किंवा एका शब्दात देणं, वगैरे पाहिलं आहे. समोर माणूस २० तास उभा असला तरी त्याच्याबद्दल कणभर दया न येणाऱ्या अनेक नर्स पाहिल्या. वाटतं, त्यांना कसं जमत असेल असं निर्विकार राहणं, किंवा कणभर रागीटपणाकडेच झुकणारं वागणं? अर्थात त्यात त्यांचे शैक्षिणक, आर्थिक स्तर त्याला कारणीभूत असेल का? त्यात त्यांच्याशी अजूनच तुसडेपणाने बोलणारे डॉक्टरही पाहिलेत. त्यांच्या वागण्याने या अशा शांत राहात असतील का? माहित नाही. 
     अजून या कामासाठी अयोग्य असूनही नोकरी करणाऱ्या आणि चक्क रुग्णाकडे दुर्लक्ष करणारे महाभाग निराळेच. त्यांना नोकरीवर ठेवणारे बेजबाबदार डॉक्टर तर अजून डेंजर. तो जरा जास्तच गंभीर विषय आहे. असो. 
     मुलाच्या जन्माच्यावेळी हॅलोविन होता. तेंव्हा रात्री १२ वाजता घाबरवणारा मेकअप करुनही तितक्याच उत्साहाने मदत करणाऱ्या नर्स मी पाहिल्या आहेत. अशा वेळी कितीही नाही म्हटलं तरी तुलना होणं साहजिकच आहे. रोज तेच काम करावं लागणं हा ज्याच्या त्याच्या नोकरीचा अनिवार्य भाग आहे. पण ते आपण कशारितीने करतो यालाच महत्व आहे. नाही का? 

विद्या भुतकर. 

Sunday, September 24, 2017

मान्यता ....

हे पोस्ट करावं की नाही विचार कर होते. मग म्हटलं का करायचा विचार? कशाला हवी कुणाची मान्यता किंवा कुणाच्या मान्यतेचा विचारही,प्रत्येकवेळी.का लागते मला मान्यता ?
तुझी, प्रत्येक पावलागणिक
अगदी जन्मल्यापासून मरेपर्यंत
उठताना, बसताना
चालताना, झोपतानाही
घरातून बाहेर जाताना,
स्वतःच्याच घरात परत येताना,
अगदी भाजी आणताना
'कशी झालीय?' विचारताना
तर कधी 'कशी दिसतेय?' विचारताना
साडी नेसल्यावर पोट उघडं ठेवताना
पदर घेताना, पदर पडताना
मन मोडताना, मन जोडताना
तोंड सोडताना आणि आवरताना
श्वास घेताना अन सोडतानाही
बरं तो 'तू' कायम असतोसच
त्याचं रुप फक्त बदलत राहतं
कधी समाज म्हणून
कधी सहकारी म्हणून
कधी मित्र-मैत्रीण म्हणून
कधी नवरा, कधी आई
कधी सासू कधी बाप
कधी मुलगा किंवा मुलगी म्हणूनही.
या सर्वांच्या मान्यतेसाठी झगडत
आयुष्य कुठंवर काढायचं?

विद्या भुतकर. 

Monday, September 18, 2017

धपाटा

ती घरी आली. दमलेली, वैतागलेली.

तो: काय गं? काय झालं?

ती: तेच नाटक रे पुन्हा. कितीही काम केलं तरी पुरे होत नाहीच.

तो: जाऊ दे तू नको विचार करुस. जे काही आहे ते सरळ सांगून टाकायचं.

ती: ह्म्म्म... पण मग उगाच बाऊ होतो त्याचा. त्यापेक्षा सोडून देते.

तो: मी काय म्हणतो, तू मेलच कर मॅनेजरला सरळ. सगळं ऑफिशियल असलेलं बरं असतं. म्हणजे उद्या कुणी
विचारलं तरी तुझ्याकडे पुरावा राहील.

ती: बघते. काहीतरी करायलाच लागेल पण. नाहीतर हे असं घरावरही परिणाम होतो त्याचा. उगाच चिडचिड होते मग.

तो: हो. तुला ना ब्लॉक करायला जमत नाही. बाहेरचं काम बाहेरच सोडून यायचं. डोक्यात, मनात ठेवून यायचं नाही बघ.

ती: करते अरे प्रयत्न पण नाही जमत. जाऊ दे चल जरा स्वयंपाकाचं बघू.

तो: काय करायचं?

ती: करू रे काहीतरी....

तो: मी कांदा चिरायला घेतो.

ती: हम्म घे.

तो: किती घेऊ?

तो: काय?

ती: अगं कुठे लक्ष आहे? कांदे किती चिरायचे आहेत?

ती: अरे बघ ना तू. चार लोकांच्या भाजीला किती लागतात?

तो: बरं, दोन घेतोय. कसा चिरू?

ती:....

तो: टोमॅटो हवेत का? दोन चालतील?

ती: घे रे किती पाहिजे तितके. मला नको विचारूस. इथे एकतर वैताग आलाय त्यात तुझे प्रश्न. काही नको विचारूस.

तो: हे बघ हे असं असतं. तुला जरा ऑफिसात त्रास झाला की हे असे वाद सुरु होतात.

ती: अरे नाहीये माझं लक्ष तर तू बघ ना जरा. सगळं मीच पाहिलं का? एक दिवस तू स्वतः ठरव ना काय करायचं ?

तो: तुला ना काही बोलण्यात अर्थच नाहीये.

मना: बाबा, हे गणित सांगा ना कसं करायचं?
बाबा SSSSS बाबा SSSSS सांगा ना?

तो: (ओरडून) काय आहे? कालच सांगितलंय तुला? किती वेळा तेच तेच गणित सांगायचं? तुझं तू कर ना जरा? आणि हे काय? पेन्सिल नीट धर. किती वेळा तेच तेच सांगू?

ती: काय गं? डबा तसाच आणलास परत? काही अर्थ नाहीये या पोरांसाठी खपण्यात. सकाळ-सकाळी मी उठून डबा करून देते आणि ही पोरं असं सगळं न खाता आणतात.
(त्याला उद्देशून) अरे बघ ना जरा ती काय विचारतेय. आता त्यालाही मीच उत्तर देऊ का?

तो: दिलंय उत्तर मी तिला. तू कशाला आता माझ्यावर चिडतेयस?

मना: आई, मी टीव्ही लावू का?

ती आणि तो: ना SSSSSS ही !!

तरीही मनीने टीव्ही लावला आणि तिला धपाटा बसला ........

हिरमुसून ती निघून गेली....रडत रडत..

तिला अजूनही कळत नव्हतं, ऑफिस असो की घर, कशावरूनही आई-बाबा भांडतात तेंव्हा आपल्याला धपाटा कसा बसतो?

विद्या भुतकर.
https://www.facebook.com/VidyaBhutkar1/

Wednesday, September 13, 2017

एकदा काय झालं? (लघुतम् कथा)

     तो सकाळी उठला, डोळ्यांवर अजूनही ग्लानी होती. वर पंखा जोरजोरात फिरत होता. त्याचं वारं अंगाला झोंबत होतं. अंग जड झालं होतं. थोडा वेळ तो तसाच पडून राहिला पण तगमग होत होती. नाईलाजाने घड्याळाकडे पाहून त्याने अंगावरचं पांघरूण काढलं. अंग तापानं फणफणत होतं. तसंच बाथरूममध्ये जाऊन त्याने कसंबसं आवरलं. आंघोळ करावीच लागणार होती. इतक्या  उकाड्याचं असंच राहणं शक्यच नव्हतं. अंगावर पाण्याचे थेम्ब पडले तसा तो शहारला. दोन चार मिनिटांतच उरकून तो कडमडत बाहेर आला. कपडे इस्त्री करणं शक्य नव्हतंच. त्यातला त्यात बरा ती-शर्ट, पॅन्ट घालून तो तयार झाला.

       आता सगळ्यांत कठीण काम होतं. इतक्या उन्हाचं गाडीवरून इतक्या दूर जायचं. स्वतःला सांभाळत त्याने गाडी काढली. गाडीवर बसेपर्यंतच त्याला दम लागला होता. जीव सांभाळत, गाडीचा तोल सांभाळत गर्दीतून रस्ता काढत तो पुढे जात राहिला. डोळ्यांसमोर अंधारी आल्यावर त्याला काही सुचत नव्हतं. पार्किंग मध्ये पोचल्यावर त्याला हुश्श झालं. आता तिथून लिफ्टमधून जागेवर पोहोचेपर्यंत चक्कर येऊ नये इतकीच प्रार्थना करत चालत राहिला.

      हातातलं सामान जागेवर ठेवून दोन चार मिनिट खुर्चीत बसून राहिला. थोडं बरं वाटल्यावर त्याने आजूबाजूला पाहिलं, घड्याळ्याकडे बघत त्याने कॉफीचा कप घेऊन गाळून गेलेले त्राण गोळा केले आणि ब्रेकरूमकडे चालत राहिला. पोहोचत असतानाच त्याला तीआत पाठमोरी उभी दिसली. तिला पाठमोरं पाहूनही त्याला क्षणभर बरं वाटलं. शेजारच्या भिंतीला डोकं टेकवून थोडा वेळ उभा राहिला. ती दिसणार या कल्पनेनं त्याचं मन सुखावलं. आत जाऊन तो तिच्यासमोर उभा राहिला.

"हाय", ती हसून म्हणाली.

त्यानेही 'हाय' केलं.

"काय रे बरं वाटत नाहीये का तुला?", तिने काळजीनं विचारलं.

"हां जरा कणकण आहे.", तो हळू आवाजात बोलला.

"मग आलास कशाला? सुट्टी घ्यायची ना?", ती.

तो नुसताच हसला.

"ते काही नाही, घरी जा बरं. मी मॅनेजरला सांगते." ती हक्कानं बोलली.

तो तिच्यासोबत जागेवर परतताना त्याला चालवत नव्हतं.

"हे बघ कसा जाशील घरी? चल मीच येते सोडायला.", म्हणून ती डेस्कवरून गाडीची किल्ली घ्य्यायला गेली.

तो तिच्याकडे बघत राहिला. त्याच्या चेहऱ्यावर हसू पसरलं होतं आणि भीतीही होती आपण काय करतोय याची.
तिची ओढ त्याला आज इतक्या दूर घेऊन आली होती.

विद्या भुतकर.
https://www.facebook.com/VidyaBhutkar1/

Monday, September 11, 2017

थँक्यू बायको !

    या वर्षी उन्हाळ्याच्या सुट्टीत भारतात जायचं होतं. नुकतीच नवी नोकरी लागल्याने मला जास्त रजा मिळणार नव्हतीच. पण मुलं कंटाळली होती आणि त्यांना केव्हा एकदा भारतात जाऊ असं झालं होतं. असेच एक दिवस नवऱ्याला म्हटले तुम्ही तिघे पुढे गेला आणि मी १५ दिवसांनी आले तर? गंमत म्हणून बोललेला हा विचार पुढे प्रत्यक्षात आला. मुलं आणि संदीप पुढे जाणार आणि मी नंतर जाणार असं ठरलं. अर्थात हे सोप्पं नव्हतंच. 

      मुळात दोन मुलांना घेऊन ३०-३२ तास एकट्याने प्रवास करणे अतिशय कंटाळवाणं आणि त्रासदायक काम आहे. त्यात एअरपोर्टच्या सिक्युरिटी, सामान, विचित्र वेळा, बेचव जेवण वगैरे सर्व आलंच. मी एका चांगल्या बायकोचं कर्तव्य करत नवऱ्याच्या कार्यक्षमतेवर संशय घेतला, त्याला ढिगाने सूचना  दिल्या आणि पोरांना बाय करताना ढसाढसा रडलेही. सर्वजण नीट घरी पोचले, आठवडाभर राहिलेही पुण्यात. मीही न राहवून १५ ऐवजी ७च दिवसात पळून गेले. 

     आता या सात दिवसांत मी इकडे दुःखात सतत टीव्ही बघत, अजिबात स्वयंपाक वगैरे न करता दिवस काढत होते तर तिकडे नवऱ्याला ढिगाने मदत होती. सासू-सासरे, दीर-जाऊ, घरी कामाला येणाऱ्या मावशी, एकदा तर माझ्या मैत्रिणीही त्यांच्यासाठी डबा घेऊन गेल्या होत्या. आता हे सगळं सांगण्याचं कारण म्हणजे ही काही पहिली वेळ नाही मला असा अनुभव येण्याची. याआधीही मी एक दोनदा ऑफिसच्या कामासाठी बाहेर गेले असताना नवऱ्याची काळजी करणारे लोक पाहिले आहेत. शिवाय सासूबाईंना वाटणारे मुलाचे कौतुक आहेच. त्याच ठिकाणी मी असते तर? आणि इथेच आजच्या पोस्टचा मुद्दा आहे. 

      लाखो-करोडो नवरे नोकऱ्यांसाठी परगावी असताना अनेकींना घर, नोकरी आणि मुलं सर्व सांभाळावं लागतं. खरंतर कुणासाठीही हे अतिशय अवघड काम आहे. पण नवऱ्याने एकट्याने मुलांना सांभाळणे, घर पाहणे या सर्वांचा इतका बाऊ अजूनही का केला जातो? उलट त्याला जी सहानभूती आणि मदत मिळते ती बाईला मिळाली तर बिचारी अजून काम करेल. खरं सांगायचं तर मी तर म्हणते,"Its not rocket science". ऑफिसमध्ये अनेक मोठं मोठी कामे करणाऱ्या नवऱ्याला पोरांच्या जेवायच्या वेळा पाळणं, झोपवणे वगैरे काही अवघड नाहीये. तरीही अशी परिस्थिती इतक्या कमी वेळा का पाहायला मिळते. असो. 

      बरं, नुसते बाकीचे लोक मदत करतात असे नाही, बायकांनाही आपल्या नवऱ्याचे कोण कौतुक वाटते. (अर्थात मलाही वाटले कारण मला एकटीला पोरांना सांभाळणे झेपणार नाही. लै ताप देतात. असो.) अनेकदा मी फेसबुक वगैरे वर मुलींचे पोस्ट पाहते, 'मी नसताना मुलांचे सर्व नीट करणाऱ्या' नवऱ्याचे कौतुक करणारे, Thank you for holding fort वगैरे. थँक्यू काय? तुमचाच नवरा आहे ना? आणि मुलं त्याचीही आहेत ना? मग थँक्यू कशाला? आणि तेही पब्लिकसमोर? हे कौतुक का? अर्थात अगदी 'नवऱ्याने आज मॅगी बनवून दिली' म्हणूनही कौतुक करणारे कमी नाहीत. माझं काय म्हणणं की असे किती पोस्ट्स आपण नवऱ्याचे पाहतो? बायकोने मॅगी बनवली म्हणून? उलट 'बघा नवऱ्याला मॅगी करून घालते' म्हणून बोलणारे कमी मिळणार नाहीत. असो. 

      अगदी परगावी जायचे राहू दे, मुलं आजारी असतानाही बायकोनेच कशाला सुट्टी घेतली पाहिजे? पोराला किती औषध द्यायचंय, काय खायला द्यायचं वगैरे बेसिक गोष्टी माहित असल्या म्हणजे झालं. महिन्या-दोन महिन्यात पोरं आजारी पडतात, सर्दी-खोकला ताप वगैरे. त्यासाठी 'त्याला आईच लागते' म्हणून आपणच का काम सोडून घरी बसायचे? करियर बद्दल मी बोलत नाहीयेच. माझं म्हणणं इतकंच की वडीलही मुलाची तितकीच काळजी घेऊ शकतात आणि प्रेम देऊ शकतात. 

     अर्थात आपण इतकाही विश्वास का दाखवू शकत नाही? समजा त्याने नाही दिलं पोटभर जेवायला किंवा मागे लागून नाही भरवलं तरी काय बिघडणारेय? भूक लागल्यावर येतीलच ना मागे,'खायला द्या' म्हणून? का मग आया मुलांना वडिलांकडे सोडत नाहीत? प्रत्येकवेळी आपलं आईपण सिद्ध करायची काय गरज आहे? मी जेव्हा एक आठवडा आधी निघून गेले तेंव्हा अनेकांनीआश्चर्य व्यक्त केलं. जणू मुलांना असं पुढे पाठवणारी आई म्हणजे इतकी इमोशनल कशी काय म्हणून. अशा लोकांना किंवा विचारांना घाबरून कुणी राहात असेल तर चूकच ते. कारण आई म्हणून तुम्ही मुलांसाठी काय करता ते चूक का बरोबर हे बाकी लोक कोण ठरवणारे? 

     मला वाटतं की अशा अनेक परिस्थितींमध्ये, कौतुकच करायचं असेल तर दोघांचं करा, मदत करायची तर दोघांची करा आणि दोघांनी करा. आजपर्यंत मी कुणा नवऱ्याचे पोस्ट पाहिले नाहीयेत,'थँक्यू बायको' वाले. यायचेच तर तेही दिसावेत अशी अपेक्षा. असो. :) 

विद्या भुतकर. 
https://www.facebook.com/VidyaBhutkar1/

Wednesday, September 06, 2017

बायकांचा घोळका आणि घोळक्यातल्या बायका......

     आज एक मिटिंग होती ऑफिसमध्ये आणि मध्यभागी एक डिरेक्टर बसलेला होता. मी पोचले तोवर बाकी बऱ्याच खुर्च्यांवर लोक बसले होते पण त्याच्या शेजारची एक खुर्ची रिकामी होती आणि दुसऱ्या बाजूला एक पुरुष बसलेला होता. मी जाऊन त्याच्याशेजारच्या खुर्चीत बसले. हे सांगण्याचं कारण म्हणजे ही काही पहिली वेळ नाही मी असं काहीतरी पाहण्याची. अर्थात शाळेत असताना, कॉलेजमध्ये दंगा करण्यासाठी पुढच्या खुर्च्या सोडून मागे बसून मजा केली आहे. पण त्याला वेगळं कारण असायचं. पुढे पुढे ऑफिसमध्येही हे पाहिलंय आणि वाटलं, का? का आपल्याला अशा मीटिंगमध्ये मोठ्या कुणा शेजारी तरी बसायची भीती असते किंवा तिथे बसताना क्षणभर विचार केला जातो. 

       नुसतं मीटिंगमध्येच नाही तर एखादी मोठी कॉन्फरन्स म्हणा. थोड्या दिवसांपूर्वी मी अशाच एका कॉन्फरंसला गेले होते. तिथं फारसं कुणी माझ्या ओळखीचं नव्हतं. आजूबाजूला पाहिलं आणि एक मधली रिकामी खुर्ची पाहून बसून घेतलं. ओळखीचं कुणी असेल, मित्र-मैत्रीण असेल तरी समजू शकतो. पण मी अनेकवेळा असं पाहिलंय की अनेक जणी बाजूला कुणी स्त्री असेल तर तिच्याजवळ जाऊन बसतात, ती ओळखीची असायलाच पाहिजे असं नाही. किंवा असंही असतं की दोन चार जणी एक कोपरा धरून बसतात. यात मी फक्त ऑफिसमधला संदर्भ देत आहे. मला प्रश्न पडतो की का प्रत्येक स्रीला असं घोळका करून बसायची गरज वाटत असेल? कितीही मोठ्या पदावर ती असू देत, मॅनेजर असो की अजून कुणी, अशा जमावामध्ये स्त्रियांची ठराविक वागणूक मी पाहिली आहे. बरं ती केवळ भारतीयच स्त्री नाही, अगदी इथे अमेरिकनही. 

       हे झालं फक्त बसण्याबद्दल. अशा एखाद्या ठिकाणी मीटिंगमध्ये, कॉन्फरन्स तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे किंवा एखादा वादाचा मुद्दा पुढे आणायचा आहे, अशा वेळी तर हा सहभाग अजून कमी दिसतो. अशा किती मिटिंग किंवा जमाव असतील जिथे पहिला प्रश्न एका स्त्रीने विचारला आहे. कदाचित पत्रकार वगैरे असेल एखादी पण एखाद्या ऑफिसमध्ये किंवा अगदी पालक सभेमध्येही एखादी स्त्री उभी राहून पहिला प्रश्न विचारताना पाहिली नाहीये. ऑफिसमध्ये अनेक मुली, मैत्रिणी मोठ्या पदांवर पाहते. त्या आपलं काम उत्तमरीतीने करतात पण अशा कार्यक्रम, मिटिंग मध्ये त्यांचा सहभाग खूपच कमी जाणवतो. 

      ऑफिसच्या कामात वगैरे तरी ठीक आहे, पुढे जाऊन एखाद्या ऑफिसच्या पार्टीला जायचं असेल तर अनेक जणी नकार देतात किंवा जाण्याचं टाळतात. त्यातली कारणं, 'अरे कुणी ओळखीचं नाहीये तिथे', 'संध्याकाळी आहे, घरी स्वयंपाक करायचा आहे', 'रात्री घरी सोडायला कुणी नाहीये', 'मी ड्रिंक्स घेत नाही',.... अशी एक ना अनेक कारणं. त्या पार्टीमध्ये माझ्या कुणी ओळखीचं नाहीये म्हणून काय झालं? नवरा गेलाच असता ना? मग स्त्री म्हणून अशा ठिकाणी माघार का घेतात? मध्ये अशाच एका पार्टीमध्ये गेले होते, कुणीच ओळखीचं नव्हतं. आधी वाटलं उगाच आले. पण मग स्वतःच ओळख करून घेतली लोकांशी. अगदी २-४ मिनिट बोलले असेलएकेकाशी, पण ऑफिसमध्ये सर्व कामांत पुढे असताना अशा पार्टीमध्ये मागे का राहायचे? काय होतंय स्वतः ओळख करून घेतली तर? एखादा विषय काढून विश्वासाने लोकांशी बोललं तर? 

       या सर्व गोष्टी झाल्या ऑफिसमधल्या. भारतात किंवा अमेरिकेतही अनेक भारतीय ग्रुपमधील पार्ट्याना अनेक अनुभव आले ते अगदी एकसारखे होते. उदा: एखाद्या घरी कार्यक्रम आहे. एक जोडपं घरात येतं. पुढच्या पाच मिनिटांत त्यातून बाई वेगळी होऊन बायकांच्या घोळक्यात गेलेली असते. अगदी बाकीचे तिचे मित्र तिथे असले तरीही. मी अशाही ग्रुपमध्ये गेलेले आहे जिथे फक्त मी आणि नवराच सोबत आहे, बाकी सर्व अनोळखी तरीही नवऱ्याचा हात सोडून बायकांच्या घोळक्यात जायला होतं कारण सर्व जणी एकत्र बसलेल्या आहेत. कितीतरी वेळा विचार करते सर्वच जण एकत्र का बसत नाहीयेत. स्वयंपाकघरात सगळ्याजणी आणि बाहेर पुरुष. भारतात तर हे अगदीच सर्वत्र बघायला मिळेल. पण अमेरिकेत समवयस्क मित्र-मैत्रिणी असूनही हे असे घोळके बघते. 

       मग हळूहळू मी त्या घोळक्यात थोडा वेळ काढून पुन्हा दुसऱ्या घोळक्यात सहभाग घेऊ लागले. कारण अनेक वेळा सोफ्यावर बसून सर्व पुरुष एखाद्या विषयावर चर्चा करत आहेत आणि त्यात स्त्रिया काहीच भाग घेत नाहीयेत असं पाहिलंय. सर्व विषयांमध्ये ज्ञान असूनही अशा ठिकाणी वाद घालणं किंवा चर्चेत सहभाग घेणं बायका टाळतात. का? आपलं मत सर्वांसमोर ठामपणे मांडता आलं पाहिजे. अर्थात हे सोप्प नाहीये. अनेक वेळा मी 'mansplaning' पाहिलं आहे. म्हणजे काय? तर मला माहित असलेली गोष्टी एखाद्या पुरुषाने विस्ताराने समजवणे अगदी सोप्या भाषेत. का? तर हिला तेही माहित नसेल म्हणून. किंवा 'आम्ही काय बोलतोय आणि ही काय बोलतेय' अशा नजराही पाहिल्या आहेत मी. माझं म्हणणं काय आहे? प्रत्येकाला प्रत्येक गोष्ट माहित नसतेच. म्हणून आपण त्या चर्चेत सहभाग का नाही घ्यायचा? विचारायचा एखादा प्रश्न, काय बिघडलं? हसणारे हसतील, त्यांचे दात दिसतील. 

      एखादा कार्यक्रम किंवा लग्न घेऊ, रात्री सर्वजण गप्पा मारत बसलेत. बायका एक एक करून निघून गेल्यात झोपायला. अशा किती स्त्रिया असतील ज्या 'मला नाही झोप येत' म्हणून बाहेर येऊन गप्पा मारतात? 'पाहुणे काय म्हणतील' हा विचार केला जातोच. बिचारी ती मागे राहिलेलीही जाऊन झोपून जाते. का नाही बसत बाहेर येऊन? आपलेच नातेवाईक आणि पाहुणे असूनही? या अशा गोष्टींची सुरुवात शाळेतच झालेली असते खरंतर. मैत्रीण नाही म्हणून मी हा क्लास घेत नाही, पिक्चर पाहायचा आहे पण मैत्रीण नाहीये एकही. बाकी सर्व मुलेच आहेत, इ. अनेक गोष्टींचा विचार केला जातो. मी माझ्या पहिल्या नोकरीत असताना सर्वांसोबत सिंहगडला गेले होते. त्यात एकही मुलगी आली नव्हती. त्यावर नंतर चर्चा झाल्याचं मला कळलंच होतं. पण मला कळत नाही की बाकीच्या येत नाहीयेत म्हणून मी का मन मारायचं? 

        सहभाग घेण्याबद्दल अजून एक निरीक्षण. सर्वजण एकत्र बसलेत, कुठेही पार्टी असेल किंवा ऑफिसचा ग्रुप असेल किंवा अजून काही. कुणी म्हणालं,'तू गाणं म्हण ना?'. हा आग्रह एका मुलाला केला आणि मुलीला केला तर कुणी ते म्हणण्याची शक्यता जास्त वाटते? एखादीचा आवाज सुंदर असूनही का ती नकार देते? परवा गणपती विसर्जनाला बिल्डींगभोवतीच मिरवणूक काढली होती. लहान मुले मुली, मोठी माणसे नाचत होती. मला तर गणपती डान्सच येतो फक्त. पण अशा अनेक ठिकाणी मी पाहिलं आहे की नाचायची इच्छा असूनही कुठली स्त्री स्वतः पुढाकार घेत नाही. कुणीतरी तिला ओढून आणायचं, किंवा एखादी सुरुवात करणार, मग हळूहळू सगळ्याजणी येणार, तेही वेगवेगळं नाही, एका घोळक्यात नाचायचं? का? कसली भीती असते, लाज असते? इच्छा आहे ना नाचायची, मग घ्यायचं नाचून? अगदी अमेरिकेत अनेक भारतीय लहान मुलांच्या वाढदिवसाला  शेवटी असणाऱ्या डीजेच्या गाण्यांवरही कुणी नाचायला तयार होत नाही. 

         एखाद्या कार्यक्रमात पंगत बसणार म्हटलं तरी सर्वात पहिलं ताट घ्यायला बाई धजावत नाही. काय होतंय? म्हणेल कुणी काहीही, भूक लागलीय ना? ताट घ्यायचं आणि जेवायला बसायचं! कुणी ना कुणी घेणार असतंच ना? आपण व्हायचं पहिलं. या अशा अनेक गोष्टी मी अनेक वेळा वर्षानुवर्षं पाहात आले आहे. अनेक ठिकाणी मी आता पुढाकार घेते, कधी नाचायला,  कधी ताट वाढून घ्यायला, बाहेर बसलेल्या पुरुषांच्या घोळक्यात वाद घालायला. किंवा ऑफिसमध्ये एखादा अगदी बावळट प्रश्न का होईना विचारायला. 

        वाटतं, का मागं राहायचं? कशाची भीती बाळगायची? का लोकांचा विचार करायचा? आपल्याला बरोबरी हवी आहे ना? मग हे असं बारीक सारीक गोष्टींमध्ये मागे राहणं सोडून दिलं पाहिजे. मग ती एखादी गृहिणी असो किंवा मोठी मॅनेजर. आणि हो, समजा नसेल आपल्याला पडायचं घोळक्यातून बाहेर, निदान जी पडतेय तिला नावं ठेवणं तरी बंद केलं पाहिजे. पुरुषांनाही या अशा ठिकाणी कसं वागावं, त्या पुढे येणाऱ्या स्त्रीला सामावून कसं घ्यावं याची समज आली पाहिजे. तिला नावं ठेवण्यामध्ये आपण पुढाकार घेत नाहीये ना हे पाहिलं पाहिजे. 

       अनेक वेळा या विषयावर लिहायचं मनात यायचं पण राहून जात होतं. यातून कुणाच्या भावना दुखवायच्या नसून, स्वतःचं निरीक्षण करण्याचा विचार मांडायचा आहे. उलट कुणी असा विचार करून मागे राहत असेल तर तिला पुढे जाण्याचा सल्ला देण्याचा आहे. आपलं शिक्षण, आपली प्रतिभा आणि शक्ती सर्व असतानाही केवळ आत्मविश्वास कमी असल्याने किंवा लोक काय म्हणतील याचा विचार केल्याने अनेकजणी  घोळक्यात अडकून राहतात. मग तो घरातला एखाद्या कार्यक्रमाचा असो किंवा ऑफिसमध्ये एखाद्या कॉन्फरन्सचा. मी काही खूप बंड वगैरे करायचं म्हणत नाहीये, पण या छोट्या गोष्टीतून बदल जरूर घडवू शकतो स्वतःमधे. तुमचं मत जरूर सांगा या विषयावर.

विद्या भुतकर. 
https://www.facebook.com/VidyaBhutkar1/

Tuesday, September 05, 2017

ब्रेक के बाद

गेले काही दिवस झाले पेजवर एक शब्दही लिहिला नाही. काहींनी आवर्जून मेसेज करून विचारलंही कुठे आहे म्हणून. वाटलं, चला इथे लोक आपली वाट बघतात, चांगलंच आहे. :) महिनाभर भारतात होते, त्यात गणपती-१५ ऑगस्ट, ऑफिसचं काम, खरेदी, परत यायची तयारी, अशी अनेक कामं होती. पहिले काही दिवस वेळ काढून लिहिलं पण जसे सणाचे दिवस आले, अगदीच वेळ मिळेनासा झाला. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे, बॉस्टनमध्ये रात्री मुलं झोपल्यावर निवांत लिहायला वेळ मिळत होता. भारतातून रात्री ऑफिसचं काम असल्याने लिहिण्यासाठीचा ठरलेला वेळ मिळेना. त्यामुळे एकूणच लिहिणं झालं नाही. 
      अनेकवेळा अशा वेळी मी अट्टाहासाने कुठून तरी वेळ काढून लिहिते, पण यावेळी वाटलं की लिहिणं कितीही आवडीचं असलं तरी त्या क्षणी भारतातील कार्यक्रमांची मजा घेणं महत्वाचं होतं. त्यामुळे उगाच ओढाताण न करता लिहिण्याला थोडा आराम दिला. वीकेंडला बॉस्टनमध्ये पोचले आणि कळत होतं की सोमवारपासून लिहायचं आहे. पण पुन्हा एकदा उगाच घाई न करता आराम करून घेतला आणि आज पहिला दिवस मिळाला लिहायला की लगेच लॅपटॉप घेऊन बसले. 
     कधी कधी वाटतं की इतकं काय महत्वाचं आहे रोजच लिहिणं? असंही काही ग्रेट लिहीत नाही आणि मी न लिहिण्याने कुणाचं काही अडतही नाही. एखादा दिवस राहिलं तर चालतंय की. पण लिहिण्याचा अट्टाहास करण्याचं एक कारण आहे. ४ चे १० होतात आणि १० दिवसांचे १० महिने कधी होतात कळतही नाही. मी माझा ब्लॉग लिहायला सुरु केला त्याला १० वर्षं होऊन गेली. आणि त्यात अनेक वेळा असं झालंय की एखादा छोटा ब्रेक वाढून दोन वर्षं झालाय आणि पुन्हा लिखाण सुरु करायलाही तितकाच वेळ निघून गेला. यावेळी तसं होऊ द्यायचं नाही असं ठरवल्याने ही घाई. 
      तर हे असं ठरवून पुन्हा सुरु करणं खूप गरजेचं आहे असं मला वाटतं. कारण लिखाणासारख्या अनेक गोष्टी आहेत ज्या केवळ थोडे दिवस ब्रेक घेऊ म्हणून बाजूला राहतात आणि अनेक वर्षं लोटून जातात. सर्वात कॉमन उदाहरण म्हणजे 'व्यायाम आणि आहार' (खूपच शुद्ध मराठी होतंय ना?), 'डाएट आणि एक्सरसाइज'. अनेक वेळा नियमित व्यायाम आणि आहार चालू असतो, एखादा सण येतो आणि त्यात खंड पडतो. गणपती नंतर दसरा जातो, दिवाळी आणि न्यू ईयर पार्टीही होऊन जाते आणि तो खंड पडला होता हे विसरूनही जातो. पुन्हा एकदा त्या जुन्या रुटीनमध्ये जाण्यासाठी अशीच दोन वर्ष निघून जातात. 
      तीच गोष्ट एखाद्या आवडीची, हौसेची. एखादं पुस्तक वाचायची, चित्र काढायची, गाणं ऐकायची. अशा गोष्टी मागे पडून गेल्यावर त्या आपल्या आयुष्याचा भाग होत्या हे विसरून जातो. त्या क्षणाचा तो ब्रेक आठवणीने मोडून पुन्हा एकदा ती हौस टिकवणं, एखादी गोष्ट सुरु करणं हे त्या वेळीच करणं खूप गरजेचं आहे. कारण सवय का कशाचीही होतेच. पण ती होऊ देणं किंवा न होऊ देणं आपल्याच हातात आहे. :) तेही 

विद्या भुतकर. 

Wednesday, August 16, 2017

पारंब्या

     वीकेंडला घरी गेले होते, कोरेगावला. तशी तर मागच्या वर्षी पण गेले होते, यावेळी जरा निवांत. जाताना रस्त्यात नवीन होत असलेल्या फ्लायओव्हर आणि वाढलेले टोल यावर बोलणं झालंच. घरी श्रावणातली सत्यनारायणची पूजा होती. घरी आयतं पोळ्याचं जेवण करून  डाराडूर झोपले. म्हणजे अगदी नेहमी घरी गेल्यावर झोपते तसंच.
      संध्याकाळी पूजेला काही मोजकी का होईना लोकं येऊन गेली. त्या सर्वांना भेटताना  जाणवलं कोरेगांव मध्ये काही गोष्टी अजूनही बदलल्या नाहीयेत आणि तरीही बरेच काही बदलून गेलंय. आम्ही शाळेत असताना सर्व शिक्षकांना आवर्जून आमंत्रण द्यायचो. घराजवळ सर्वांना घरी जाऊन आमंत्रण द्यायचो आणि तीर्थ-प्रसाद घ्यायला सर्वजण यायच्या आधी  छान आवरून तयार राहायचो. सर्वजण येऊन जाईपर्यंत नऊ वाजून जायचे, आम्ही सर्वजण कंटाळलेले असायचो. 
      यावेळी गेले तर आईनेच फोनवर काही लोकांना आमंत्रण दिले होते. त्यातील काही जण येऊन गेले. ठराविक लोक बसून, गप्पा मारून आमची चौकशी करून गेले. लहानपणी असायचा तो उत्साह दिसला नाही तरी काही ठरलेली वाक्य मात्र यावेळीही ऐकली,'अरे तुमचा फोन आला म्हणजे येणारच', 'हो मिळाला ना निरोप, तुमचा फोन डायरेकट आला नाही तरी चालतंय', 'प्रसाद घेऊन जा घरच्यांना', 'थांबा पुडीत बांधून देते', 'काय म्हणताय? बराय ना सगळं?',इ. इ. हे सर्व जितकं परिचयाचं होतं तितकेच वय झालेले सर, मोठी झालेली मुलं, त्यांची लग्नं, छोटी मुलं हे सगळं तितकंच नवीन होतं.
     हे झालं सत्यनारायणाचं. घराभोवती सकाळी पारिजाताखाली पडलेला सडा अजूनही तसाच होता आणि चिंचेच्या झाडावर उड्या मारणारी माकडंही, सीताफळांनी भरलेलं झाडही. इतकं असलं तरी मोगऱ्याचे जुने दोन वेल कधीतरी काढून टाकलेले. त्या वेलीवरच्या फुलांचे एकेकाळी मोठमोठे गजरे डोक्यात माळलेले होते. दारातील बंब काढून पाणी तापवायला गीझर लावलेला. जुन्या अनेक इमारती पडून नवीन बांधलेल्याही पाहिल्या.  शाळेबद्दल विचारलं तर अनेक बदल झालेत. गाडीत हवा भरायला थांबलो तर त्या दुकानाच्या मालकाला ओळखलंही नाही. अगदी नंतर आठवलं 'अरे हा तर आजोबांकडे शिकवणीला यायचा'. अशा अनेक गोष्टी मनात घेऊन पुण्यात परत आले.
      आता कुणी म्हणेल हे आताच का जाणवलं. आता जाणवलं नाही पण त्याबद्दल लिहिलं मात्र नव्हतं अजून. हे सर्व लिहिण्याचं कारण असं की अनेक देशांत -गावांत फिरताना मनात खात्री असायचीच की आपलं मूळ
अजूनही त्या गावातच आहे जिथे आपण वाढलो. पण त्या गावातले बदल पाहताना, जुन्या लोकांची ओळख पटायला वेळ लागतो तेव्हा वाटतं, 'अरे खरंच आपण हे सर्व विसरत चाललोय का?'.  त्याच वेळी ओळखीच्या जागा, लोक आणि प्रथा पाहून अजूनही आपण त्या गावचेच आहोत हा आधारही वाटतो.
       गावातून निघताना रस्त्यात वडाची अनेक झाडं दिसतात, माझी आवडती एकदम. यावेळी आवर्जून त्यांचा फोटो काढला. त्या वडाच्या पारंब्यांसारखेच आम्हीही पसरत, विस्तारत राहतो. पण कितीही दूर गेलं तरी मूळे मात्र अजून तिथेच असतात.

विद्या भुतकर. 

Sunday, August 13, 2017

सोडून दे :)

       थोड्या दिवसांपूर्वी फेसबुकवर एका बाईने एका ग्रुपवर प्रश्न टाकला होता,"थोड्या दिवसांसाठी माझे सासू सासरे अमेरिकेत आमच्या सोबत राहायला आले आहेत. सासुबाई छोट्या छोट्या गोष्टींतून भेदभाव करतात. त्याबद्दल  त्यांच्याशी बोलावं की नाही?". बिचारी खूपच त्रासलेली वाटली. तसं पाहिलं तर मीही फटकळच. कधी कधी पटकन बोललं जातं. त्यात आवाजही खूप काही गोड नाही. उलट जरा जास्तच मोठाही आहे. तिला उत्तर देताना खरं तर मी लिहिलंही असतं की "सांगून टाकायचं ना मग?  त्रास करून घेतेस" वगैरे. तिथे असेही काही लोक होते जे सासू किंवा तत्सम नातेवाईक सुनांना कसे त्रास देतात इ. इ. यावर वाद घालत होते. पण माझं उत्तर जरा वेगळं होतं आणि त्याला कारण माझ्या सासूबाईच आहेत.
       गेल्या १२-१४ वर्षांपासून मी त्यांना ओळखते. त्यांच्याकडून मी इतक्या वर्षात हे शिकले की नाती जपायची असतील तर काही गोष्टी सोडून द्याव्या लागतात. त्या वागायला, बोलायला एकदम साध्या आणि कष्टाळू आहेतच. पण सुना, जावा, सासू-सासरे आणि अनेक नातेवाईकांचे अनुभव त्यांच्यापाशी आहेत. त्यातल्या त्यात सुना म्हणून आम्हाला जे अनुभव येतात ते अजून जवळचे. माझ्यासारख्या फटकळ मुलीलाही त्यांनी सामाऊन घेतलं किंवा आपलंस केलं ते त्यांच्या स्वभावानेच. उदा: मला किंवा नवऱ्याला त्यांनी स्वतःचं बंधन घातलं नाही. स्वतः उपवास करतात पण आम्ही करत नाही तर त्याबद्दल जबरदस्ती केली नाही. हे फक्त उदाहरण झालं.  छोट्या गोष्टींमधून मला जाणवत राहतं की आपल्याला एखादं नातं जपायचं असेल तर काही गोष्टी दुय्यम आहेत.
         एखाद्याची काही गोष्ट पटली नाही म्हणून तो माणूस वाईट होत नाही ना?  कधी कुणी उगाचच एखादा टोमणा मारून जातं. म्हणून त्याच्याशी बोलणं बंद करायचं का? You have to choose your battles. कधी कधी वाटतं की स्वत्व जपण्याच्या नावाखाली आपण बरेच संबंध सहज तोडून टाकत आहे. अनेक लोक असतात ज्यांच्या काही गोष्टी पटत नाहीत. पण म्हणून उगाच वाद घालून ते नातं गमवण्यात अर्थ नसतो.  नातेवाईकच नाहीत तर आपले मित्र-मैत्रिणीही असतात. असतो एखादा वल्ली, पण त्याच्या बारीक सारीक गोष्टींसाठी नाराज होणं योग्य नाही. मग तो असाच बोलतो, असंच वागतो. तो त्याचा स्वभावच आहे म्हणायचं आणि त्या माणसाच्या चांगल्या गोष्टींकडे बघायचं. एकच करायचं,"सोडून द्यायचं". कदाचित आपण न बोलण्याने समोरच्या व्यक्तीमध्येही फरक पडेल जसा माझ्यात  झाला(थोडा का होईना) सासूबाईंच्या समजूतदार स्वभावामुळे.
         अर्थात सगळीच नाती जपलीच पाहिजेत असं नाही आणि त्यात आपला अपमान करून घेऊन सहन करणंही योग्य नाही. पण आपल्याला नक्की काय हवंय याचा विचार जरूर केला पाहिजे. मी काही अलका कुबल टाईप्स नाहीये आणि कुणी व्हावं असं म्हणणारही नाही. पण बोलताना/वागताना एकदा विचार जरूर करावा. आणि हो हा लेख सर्वानाच उद्देशून आहे. स्त्री-पुरुष सर्वांसाठी. नाहीतर आजकाल उगाचच बायकांनीच कसे नाती जपण्यासाठी चांगलं वागलं पाहिजे यावर अनेक लेख येत असतात. असो. त्याबद्दल पुन्हा कधीतरी. :)
         तर मी वर सांगितलेल्या किश्श्यामध्ये मी उत्तर दिलं की,"असंही सासू सासरे महिनाभरच आहेत सोबत, पुन्हा भारतात जाणारच आहेत.  कशाला वाद घालून त्रास  घेतेस आणि त्यांनाही त्रास देतेस? सोडून दे." अर्थात तिने पुढे काय केलं माहित नाही पण त्यातून मला एक कळलं होतं की माझ्या मनात या 'सोडून दे ' वृत्तीने घर केलं आहे.

विद्या भुतकर. 

Tuesday, August 01, 2017

माझ्या नकळत

पाऊस सुरु झाल्यावर कवितांचा भरही येऊन जातोच. मी मात्र पुण्यात उशिरा आल्याने यावेळी पावसाची कविताही उशिराच. :)


Monday, July 31, 2017

कारण काय? तर मुलं !

         मागच्या आठवड्यात मुलं आणि नवरा भारतात आले आणि मी एकटीच बॉस्टनमध्ये. दोन आठवड्यानी मी येणारच होते. सुरुवातीला हे असं बुकींग केलं तेंव्हा मनात बरेच मनोरे रचले होते. आता 'आई' म्हणून ते समोर मांडले की त्यावर टीकाही होऊ शकते पण दोन आठवडे एकटीच असताना भरपूर टीव्ही पाहायचा, मनोसक्त आराम करायचा आणि बरेच लिखाण पूर्ण करायचे असं ठरवलं होतं. मुलं घरातून गेली आणि घर एकदम शांत झालं. रविवारी बरीचशी कामे पूर्ण केली. तरीही भरपूर वेळ उरला. पण लिहिण्याची मात्र अजिबात इच्छा होत नव्हती. मन एकदम सुन्न झालं होतं. तिसऱ्याच दिवशी तिकीट बदलून घेतलं आणि चार दिवसांत घरी पोचले.
         मुलांच्या शाळा, क्लास आणि सर्व असूनही मी नियमित लिखाण करत होते आणि रनिंग वगैरेही. ते नसताना मात्र टीव्ही किंवा आळसात खूप वेळ घालवला आणि कामाचं असं काहीच केलं नाही. अगदी आम्ही दोघे असतानाही पूर्वी असंच व्हायचं. धक्का मारायला कुणीही नसल्याने सर्व कामं रेंगाळत व्हायची. आता हे सांगायचं कारण असं की अनेकदा आपल्याला वाटतं की मुलांच्या मुळे अनेक गोष्टींना वेळ मिळत नाही. साध्या साध्या गोष्टी म्हणजे, एखाद्या मैत्रिणीला अनेक दिवस किंवा महिन्यांत फोन होत नाही. कारण काय? तर मुलं ! एखाद्याला म्हणावं की 'अरे ये भेटायला' तर नकार, कारण काय तर, मुलगा. तो खूप धडपड करतो, त्याला बरंच नाहीये किंवा अजून काही.
       अर्थात हे कारण मीही काही वेळा सांगितलं आहे. पण खरंच इतका मोठा बाऊ का केला जातो? आपली जवळची मैत्रीण आहे ना? मग पाच मिनिट बोलायला वेळ काढू नाही शकत? एखाद्या ट्रिप ला जायचं आहे. पण ती आजारीच पडेल ना किंवा अजून काही तत्सम कारण. अगदी साधं कार्यक्रमाला उशिरा पोहोचल्यावरही हेच कारण ऐकायला मिळतं. व्यायाम करायला वेळ मिळत नाही किंवा एखादी कला जोपासायला वेळ मिळत नाही. कारण? मुलं !! कधी वाटतं आपण त्या गोष्टीची सवय तर लावून घेत नाहीये ना हे पुन्हा एकदा प्रत्येकाने चेक केलं पाहिजे.
        मुलं सोबत असल्यावर आपण बरीचशी कामे पटकन उरकून घेतो असं मला वाटतं. साधं उदाहरण देते. मी भाज्या आणायला ग्रोसरी स्टोरला जाते. मुलांच्या सोबत गेलं की ज्या वस्तू घ्यायच्या आहेत त्या मनात किंवा पेपरवर यादी करून ठेवलेल्याच असतात. पटकन त्या त्या ठिकाणी जायचं आणि पटकन घरी यायचं. नाहीतर दोघे मिळून दुकानात काही ना काही मागत बसतात त्यामुळे जास्तीत जास्त १५-२० मिनिटांत हवं ते सामान घेऊन मी घरी आलेली असते. याउलट मी एकटी गेले की एकदम भरकटल्यासारखं होतं. उगाच नको असलेल्या वस्तूही घेऊन येते. कुणीही मागे कटकट करत नसल्याने उगाच फिरलं जातं आणि एक तास फिरूनही बरेच वेळा हवी असलेली वस्तू घ्यायची राहूनच जाते.
        सुट्टीच्या दिवशीही पूर्वी तासनतास रात्री जागत बसायचो आणि उशिरा उठून काहीही प्रोडक्टीव्ह केलं जायचं नाही. आता मात्र सकाळी ते दोघे उठतात त्यामुळे नाईलाजाने उठावं लागतच. त्यांचे क्लास असतील काही तर बाहेर जावं लागतंच. त्यामुळे मग उगाच फालतू जागरण न करता सकाळी उठून पळायला जाणं इ होऊन  जातं. अशा एक ना अनेक गोष्टी किंवा घटना आहेत. अगदी बाहेर पडायच्या वेळी कपडे काय घालायचे. यासाठीही उगाच तासभर विचार केला जायचा. आता घाईत आवरायचं म्हणून तेच काम ५ मिनिटांत होतं.
       एकूण काय की मुलांना आपल्या आवडत्या गोष्टी न करण्याचं कारण बनवायचं थांबवलं पाहिजे. मुलांसोबत बराचसा वेळ जात असल्याने उलट उरलेल्या वेळेचा जास्तीत जास्त सदुपयोग करून घेतला पाहिजे. आपण एखादी गोष्ट करत नसू तर त्याचं कारण केवळ आपण स्वतः आहे. बाकी कुणीही नाही. याचा नुकताच ताजा अनुभव येऊन गेल्याने आवर्जून लिहिले आहे. :) तुम्हाला काय वाटतं?

विद्या भुतकर.
       

Thursday, July 27, 2017

गिलहरियां....

       मला निसर्ग कविता फार कमी आवडतात. कदाचित सर्व प्रकारच्या उपमा प्रत्येक गोष्टीला आणि व्यक्तीला देऊन झाल्याने नवीन काही शिल्लक आहे असं आता वाटत नाही. सिलसिलाच्या 'ये पत्तियों की है सरसराहट....' वाल्या डायलॉग ला लै भारी वाटते हो अजूनही. आणि तितकीच लहान असताना 'हिरवे हिरवे गार गालिचे' आवडली होती. ती आता इतकी आवडते की नाही माहित नाही. मध्ये 'जिंदगी ना मिलेगी दोबारा' मधलं एक गाणं ऐकलं होतं,'सूरज की बाहो में'. अगदीच बोर वाटलं होतं. त्यामुळे दंगल मधलं हे गाणं ऐकलं तेव्हा एक वेगळाच आनंद मिळाला.
       आता याला कवितेचं रसग्रहण म्हटलं तरी चालेल. पण त्यातलं काय काय आवडलं हे इथे लिहितेय. एकतर त्या गाण्यात 'जॉनीता गांधी' चा आवाज इतका सुंदर आहे आणि तितकंच संगीतही सुरेल. त्यामुळे त्यात दिसत राहतात ते शब्द. प्रत्येक शब्दाचा अर्थ लक्षात येत राहतो. आणि एकदा ठेका धरला की गाणं तोंडात घोळत राहतं. ऐकताना हे गाणं कुणा मुलीनं मुलाच्या प्रेमात पडल्यावर म्हटलेलं वाटतं. पण प्रत्यक्षात ते पाहून अजून आनंद झाला. कारण घराच्या बाहेर पडून नवं विश्व अनुभवणारी ती मुलगी इतकी छान वाटते. वाटतं आपणही कॉलेजला जाऊन येतोय तिच्या सोबत. जीवनाच्या, तिच्या स्वातंत्र्याच्या आणि स्वतःच्या प्रेमात आहे ती मुलगी. त्याचं सादरकरणही सुंदर केलंच आहे. एकूणच ते गाणं बघायला आणि ऐकायला एक सुखद अनुभव आहे.
         आता राहिले शब्द. इथे तो निसर्ग कवितेचा संदर्भ येतो. उन्हाचं, गुलमोहराचं, जमीन आणि आकाश यांचे संदर्भ इतके छान दिले आहेत. माझं मत या शब्दांबद्दल काय आहे हे मांडत आहे. कदाचित तुम्हाला हे वाचायला कंटाळवाणं वाटेल. पण या गाण्यातल्या प्रत्येक ओळीचा अर्थच इतका सुंदर आहे की तो शब्दात मांडायचाच होता मला. असो. हे गाणं तुम्हीही पुढच्या वेळी ऐकाल तेव्हा जरूर लक्ष द्या.  अर्थात ते चुकीचं असूही शकतं. पण त्यातुन येणारा अनुभव नक्कीच खोटा नाहीये. असो. मी मुद्दाम त्याचे शब्द इथे देत आहे.
"रंग बदल बदल के क्यों चहक रही है
दिन दुपहरियां"
या शब्दांनी दुपारचं उन्हंही अगदी सुखद वाटायला लागतं. दुपार जणू 'सकाळ' झाली आहे. आणि पहाटेच्या पक्षांसारखं चिवचिवाट करत आहे. किती सुंदर.
"क्यूँ फुदक फुदक के धड़कनो की
चल रही गिलहरियां
मैं जानू ना जानू ना जानू ना"
सध्या इतक्या खारुताई बघत असते घरापाशी. हे वाचून तर खरंच माझंही मन त्या खारीसारखं उड्या मारू लागतं. 'धड़कनो की गिलहरियां' किती सुंदर उपमा आहे. खूप आवडली मला.
"क्यूँ ज़रा सा मौसम सरफिरा है
या मेरा मूड मसखरा है
मसखरा है
जो ज़ायका मन -मानियो का है
बोल कैसा रस भरा है"
मनाप्रमाणे वागायला मिळत आहे या विचारानेच ती किती खूष झाली आहे. तिचा मूड एकदम बदलला आहे या सगळ्या नव्या अनुभवाने.
"एक नयी सी दोस्ती आसमां से हो गयी
ज़मीन मुझसे जलके
मुँह बना के बोली
तू बिगड़ रही है"
या नव्या विश्वात ती जणू आकाशात तरंगत आहे आणि त्यामुळे जमीन तिच्यावर चिडलीय.  गंमत वाटते ना या विचाराची? आणि नुसती चिडली नाहीये तर तिला सांगतेय तू बिघडली आहेस म्हणून. 
"ज़िन्दगी भी आज कल
गिनतियों से ऊब के
गणित के आंकड़ों
के साथ एक आधा
शेर पढ़ रही है"
त्या जुन्या आयुष्याला, गणिताला त्यातल्या रुक्षपणाला ती कंटाळली आहेच. पण म्हणून 'एक आधा शेर"?  कमी शब्दांत किती जास्त व्यक्त होतं.  रुक्षपणाकडून काव्यात्मक आयुश्याकडे तिचं होणारं स्थित्यन्तर.
याच्या पुढच्या ओळी माझ्या सर्वात आवडत्या आहेत.
"मैं सही ग़लत के पीछे
छोड़ के चली कचहरियांं"
खरंच, वाटतं कॉलेजमध्ये असताना मनाप्रमाणे वागताना कोण काय बोलतंय याचा विचार केलाच नाही. तो 'योग्य-अयोग्य' विचार मागे टाकता येणं किती आनंददायी असतं? तिलाही तसंच वाटत आहे. 
"क्यूँ हज़ारो गुलमोहर सी
भर गयी है ख्वाहिशों की टहनियाँ
मैं जानू ना जानू ना जानू ना"
आणि नुसतं ती योग्य अयोग्य विचार मागे टाकत नाहीये तर तिच्या मनात अजून नव्या आकांक्षा निर्माण झाल्या आहेत. आणि त्याला त्या 'गुलमोहराच्या बहरलेल्या फाद्यांची' दिलेली उपमा तर मला खूप आवडली.
हे गाण्याचं शेवटचं कडवं. ते संपेपर्यंत आपणही तिच्यासोबत तिच्या स्वप्नाच्या गावात हरवून जातो.
नक्की ऐकून बघा. 
विद्या भुतकर.
https://www.facebook.com/VidyaBhutkar1/

Tuesday, July 25, 2017

दिसतं तसं नसतंच.... पण किती???

डिस्क्लेमर: लिहिताना माणूस कुठल्या टोन मध्ये बोलत आहे हे कळत नसल्याने अनेक गैरसमज होऊ शकतात. तसे झाले तरी ते स्वतःजवळच ठेवावेत. या पोस्टमधून कुणालाही दुखवण्याचा काडीमात्रही हेतू नाहीये. माझ्या चिकित्सक स्वभावामुळे पडणारे प्रश्न मोठया व्यासपीठावर मांडण्याचा हा छोटा प्रयत्न आहे इतकंच. 

       आयुष्यात (मला एकदा माझ्या किती पोस्ट 'आयुष्य' या शब्दाने सुरु होतात ते पाहिलं पाहिजे. असो. पुन्हा कधीतरी.) तर सामान्य माणूस म्हणून माझ्या आयुष्यात अनेक गैरसमज होते. त्यात अनेक वेळा प्रसारमाध्यमं टिव्ही किंवा सिनेमा यांनी भरच घातली होती. ते हळूहळू दूर होत राहिले.  काही अजूनही प्रश्न म्हणून डोक्यात येत राहतातच. त्यातले अनेक गैरसमज 'झोपण्याबद्दल' आहेत. म्हणजे झोपणे या क्रियेबद्दल. उगाच त्यात गैरसमज नको. 

       मला नेहमी वाटायचं की चित्रात, सिनेमात एक प्रेमी जोडपं एकमेकांना किती छान गुरफटून झोपलं आहे. अगदी चादरही दोघांच्या अंगावर कशी समान वाटलेली आहे. इथे एक पांघरूण पुरत नाही. आणि मुळात एखाद्याला कमी जाड दुसऱ्याला जास्त जाड हवं असेल तर?  बरं, घेतलं अगदी एकच आणि खूप मोठं असलं ते तरी, एकाला तोंडावर हवं असतं, तर दुसऱ्याला हाताखाली. मग काय करायचं? त्यात पोरं असली तर ती मध्ये येऊन त्याच पांघरुणावर झोपली की बोंबच. दोन्ही बाजूला आम्ही काकडणारे. अर्थात मी माझं पांघरूण कितीही केलं तरी सोडत नाही असं मला अनेकवेळा सांगितलं आहे. त्यामुळे मी तरी सुटले. बिचारा नवरा. 

       ते झालं पांघरुणाचं. दोघांनी अगदी ठरवलं की नाहीच येऊ द्यायचं पोरांना किंवा समजा नसतील मुलं. पण त्या घोरण्याचं काय? दोघांपैकी एखादा तरी घोरणारा नक्की असतोच. मग दुसऱ्याने काय, कानांत बोळे घालून झोपायचं? शिवाय, विक्स, झेंडूबाम यांचे वास असतातच. मुळात मला तरी वाटतं की हे असं इतक्या जवळ झोपून एकाच्या नाकातून बाहेर पडणारा कार्बन डाय ऑकसाईड दुसऱ्याच्या नाकात नसेल का जात? माझं जीवनशास्त्र एकदम पक्कं असल्याने मला असे प्रश्न पडत असतील कदाचित. 

        पुढचा मुद्दा म्हणजे या केसांचा. 'आपकी जुल्फोंकी छाँव' म्हणे. डोंबल. आता सर्वांचेच केस लांब नसतात, मग बाकीच्यांचं काय? आणि समजा बायकोचे केस कितीही मोठे लांब , सुंदर आणि दाट असले तरी तिच्या केसांना गोंजारत बसणारा कुणी भेटला तर मला बघायचा आहे. एकतर त्यात तिचे केस किती तुटतील याची चिंता मला असतेच. शिवाय त्याला तसं झोपून दम घुसमटत नाही का? हाही प्रश्न पडतो. आणि हो एखादा त्याच्या तोंडात गेला तर? ईईईई... जाऊ दे. बायकोने अगदी साईडला ठेवून दिले केस त्याला झोपण्यासाठी तर सकाळी उठेपर्यंत त्यातले किती तिच्या डोक्यावर असतील आणि किती गळलेले काय माहित. आहे ते केस जागेवर ठेवायला किती कष्ट करावे लागतात. त्यामुळे एखादीच्या डोक्याला मेंदीचा, अंडयाच्या, दही, आणि अनेक प्रकारची तेलं या सर्वांचे वास असतीलच. ते येणार नाहीत का त्याला? 

      बरं आता केस आणि मिठी हे सर्व धरून दोघे झोपले प्रेमाने. सकाळी त्यातला एकजण उठून दुसऱ्याच्या चेहऱ्याकडे बघत बसत असेल यावर माझा काडीभरही विश्वास नाहीये. उलट मी तर म्हणते दुसरा उठेपर्यंत आपणही झोपायचं सोंग करणारे अनेक जण असतील. कोण पहिलं उठून आंघोळ करणार सांगा? आणि हे असं चेहऱ्याकडे बघत बसायला आपलं तोंड तरी असतं तसं? पिक्चर मध्ये एकदम आताच मेकअप रूममधून बाहेर आलेल्या हिरोईन बेडवर पडलेल्या असतात. त्यांच्याशी आपली काही तुलना तरी आहे का? उगाच म्हणजे तोंड बघत बसायचं. इतका अवतार असतो की त्याने ते बघत बसावं असं मी मुळी सांगणारही नाही. असो. 

      हे हिरो लोक नुसते गर्लफ्रेंडकडे बघत नाहीत, स्वतः उठून ब्रेकफास्ट बनवून बेडमध्ये आणून देणारेही असतात. मला आजपर्यंत कळले नाहीये की हे असं बेडमध्ये ब्रेकफास्ट करण्याचं प्रयोजन काय? एकतर सकाळी उठून आधी तोंड धुतलं पाहिजे. निदान बाथरूमला तरी जावंच लागणार ना? म्हणजे तेही नाही करायचं? डायरेकट खायचंच? त्यातही मला ते असे काटे, चमचे, दूध, कॉफी, ज्यूस गादीवर म्हणजे डेंजरच वाटतं. नाही का? उगाच जरा धक्का लागायचा आणि आख्खी गादी चिकट. म्हणजे काही सांडलं तर एकतर घाईत उठलं पाहिजे, बेडशीट काढून घ्यायचं. त्याच्यावरच राहिलं तर ठीक. ते धुता तरी येतं. गादीमध्ये आत गेल्यावर काय? ती कशी धुणार? 

      एकूण काय तर दिसतं तसं नसतंच पण किती खोटं? काय मर्यादा आहे की नाही? अजून बरेच मुद्दे आहेत ज्यावर मला असे अनेक प्रश्न पडतात. सुरुवात केली तेंव्हा सर्वच लिहिणार होते. पण झोपेचेच इतके मुद्दे होते की बाकी लिहायला वेगळा लेख लिहावा लागेल. :) तोवर तुम्हीही तुमचे मुद्दे सांगून ठेवा. :) 

विद्या भुतकर.
https://www.facebook.com/VidyaBhutkar1/

Tuesday, July 18, 2017

बात निकलेगी तो.....

      खूप दिवसांनी काल रात्री जगजीत सिंगच्या गझल ऐकत बसले होते. आजकाल त्या वळणावर जायचं टाळतेच. एकदा का नाद लागला की मग थांबत नाही. वाटतं सर्व काम सोडून फक्त ऐकत बसावं. मग घरात काय चाललंय, पोरांना काय हवंय, स्वयंपाक, आवरणं सगळं मागे पडतं आणि कान फक्त त्याच्या आवाजाकडे लागून राहतात. शेवटी नाईलाजाने सर्व बंद करून झोपले. सकाळी मात्र गाडीत बसल्यावर लगेचच सुरु केली आणि एका पाठोपाठ गाणी सुरु झाली. कितीही वर्ष झाली असू दे ऐकून, गाणं सुरु झालं की आपोआप शब्द ओठांत येऊ लागतात आणि ते भाव मनात. त्यात आज पाऊसही होता सोबतीला. मग काय आहाच....

        यावेळी एक गोष्ट लक्षात आली जी याच्या आधी कधी डोक्यात नव्हती ती म्हणजे या सर्व गजलांचे कवी कोण असतील. खरंतर व्हायचं काय की जगजीत सिंगच्या आवाजात ते शब्द इतके पक्के डोक्यात बसायचे की हे मुळात लिहिलं कुणी असेल असा विचार करायला सवडच मिळायची नाही. यावेळी मात्र एकेक गझल उचलून त्यांच्या कवींची नावं इंटरनेट वर शोधायला सुरुवात केली. आणि मग त्या नादात कितीतरी वेळ गेला. आपण हे सगळं आधी कसं दुर्लक्षित केलं या विचाराने स्वतःवरच रागही आला.

       तर त्यातली पहिली गझल म्हणजे 'बात निकलेगी तो दूर तलख़ जायेगी'. माझी एकदम आवडती. मी नेटवर त्या कवींची माहिती शोधू लागले. "कफ़ील आज़र अमरोहवी" या नावाच्या कवींबद्दल मी कधीच ऐकलं नव्हतं. खूप शोधूनही अगदी थोडकीच माहिती मिळाली. तेही त्यांच्या अजून काही गझल आहेत त्याबद्दलच. त्यांची वैयक्तिक माहिती कुठेच मिळाली नाही. 

         मग पुढे शोधलं ते म्हणजे "मैं नशें में हूँ' या गझल बद्दल. 'शाहिद कबीर' असं त्या कवींचं नाव. त्यांच्या बद्दल थोडी माहिती वाचायला मिळाली आणि कळलं की ते महाराष्ट्रातील एक उर्दू कवी होते. एक मराठी व्यक्ती असूनही मला अशा कवींबद्दल काहीच माहित नाही हे वाईटच ना? तर त्यांना महाराष्ट्रातील उर्दू अकेडमी चा पुरस्कारही मिळालेला आहे. त्यांचा जन्म नागपूरचा. केंद्र सरकारच्या नोकरीत दिल्ली मध्ये असताना त्यांची ओळख तिथे काही कवींशी झाली आणि त्यांनी गजल लिहायला सुरुवात केली अशी माहिती वाचली. त्यांच्या अनेक गझल मान्यवर गायकांनी गायिलेल्या आहेत. अर्थात हे सर्व केवळ नेटवर मिळालेल्या माहितीमधून सांगत आहे. या प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्याबद्दल आणि त्यांचं काम हे सर्व वाचलं पाहिजे, समजलं पाहिजे असं खूप वाटलं आज.

        पुढची गझल म्हणजे 'कोई ये कैसें बतायें के वो तनहा क्यों है'. या गाण्यांत जे शब्द आहेत ना त्याने ते एकदम मनाचा ठाव घेतं.
"तुम मसर्रत का कहो या इसे ग़म का रिश्ता 
कहते हैं प्यार का रिश्ता हैं जनम का रिश्ता 
हैं जनम का जो ये रिश्ता तो बदलता क्यों है ? " 

किती सरळ प्रश्न आहे? जे प्रेम इतकं जवळचं होतं, कायमचं आहे असं एकेकाळी वाटलं होतं, ते बदलू शकतं? या ओळींच्या कवीचा शोध मला 'कैफी आझमी' यांच्यापर्यंत घेऊन गेला. चला निदान मी त्यांचं नाव तरी ऐकलेलं होतं. त्यांच्यावर माहिती वाचताना त्यांचा स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर भारतातील कारकिर्दीची माहितीही मिळाली. त्यांची मुलगी म्हणजे 'शबाना आझमी' मुळे त्यांचं नाव जास्त लक्षात राहिलं असेल. त्यांच्यावर अख्खी एक वेबसाईट आहे आणि बरंच काही वाचण्यासारखं. त्यांच्या बाकी गझलही मला समजून घ्यायच्या आहेत. पण मला आज अनेक लोकांवर माहिती हवी होती त्यामुळे थांबणं शक्य नव्हतं.

      'हजारों ख्वाहिशें ऐसी' या गझलने मात्र जीवाचा ठावच घेतला आहे. जगजीत सिंगच्या आवाजात 'ख्वाहिशें' हा शब्द जरी ऐकला तरी खरंच 'जीव ओवाळून टाकावा' असं वाटतं. मी या गझलेचं लाईव्ह शो मधील रेकॉर्डिंग ऐकलं आहे आणि त्यात त्यातील एकेक मिसरा त्यांच्या शब्दांत समजून घेतानाही खूप छान वाटत होतं. अर्थात या सगळ्या गझल मी याआधीही खूप वेळा ऐकल्यात आणि तरीही त्या नव्याने ऐकत राहते. या गझलेचे कवी म्हणजे 'मिर्झा गालिब'. गालिबचे अनेक शेर अनेक हिंदी चित्रपटांतून ऐकले आहेत. पण त्यांच्याबद्दल माहिती वाचण्यासाठी कधी प्रयत्न केले नव्हते. मुघलांच्या काळातील उर्दू आणि पर्शियन कवी ते. मला सर्वात जास्त आवडलेली त्यांच्याबद्दलची माहिती म्हणजे ते चांगले पत्र-लेखकही होते. 

       खरं सांगायचं तर जावेद अख्तर आणि गुलज़ार या दोघांचीच गीतं आणि गझल इतक्या वेळा ऐकले आहेत की बाकी कवींची कधी ओळख करूनच घेतली नाही. विचार करा, वर मांडलेल्या सर्व कवींच्या अशा अनेक गझल, कविता असतील. जगजीत सिंगमुळे, त्यांच्या आवाजामुळे या सर्व लोकांचे मोजके का होईना शब्द कानावर पडले. या सर्व कवींबद्दल जर खरंच वाचायला, शिकायला आणि त्यांचं कार्य समजून घ्यायला मिळालं तर किती मोठा खजिना मिळेल. मला कधी कधी खूप भारी वाटतं, आपण इतके नशीबवान आहोत याचं. केवळ जगजीत सिंग ऐकायला मिळावं हेच मुळात नशीब, पुढे जाऊन त्या गझलेचा अर्थ समजावा, तो मनात रुतावा यासारखं सुख काय? माझ्या मुलांना कदाचित ही संधी नाही मिळणार.मला हे करायला मिळतंय हे कमी आहे का? 
        मला तर पुन्हा एका कॉलेज मध्ये जाऊन हिंदी आणि उर्दू शिकण्यासाठी ३ वर्षं तरी घालवावी असं वाटू लागलं आहे. माझे आजोबा संस्कृत शिकवत. त्यांना कालिदासाचं शाकुंतल इतकं का प्रिय होतं आणि एखादा नवीन श्लोक शिकल्यावर आनंद का व्हायचा हे आज मला जाणवत आहे. माझे आजोबा, वडील यांनी वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर अनेक गोष्टींचं शिक्षण घेतलं आहे. मलाही आता ते करावंसं वाटत आहे.त्याची सुरुवात केली ती म्हणजे या सर्व गाण्यांच्या मागे जाऊन त्यांचे कवी कोण हे शोधून. आता पुढचा टप्पा, त्यांच्या अजून गझल वाचणे...... :) तुम्ही कुणी या गझलांचा खोलवर जाऊन अभ्यास केला आहे का? कुणी केला असेल तर जरूर सांगा माहिती. 

विद्या भुतकर.
https://www.facebook.com/VidyaBhutkar1/

Monday, July 10, 2017

आयुष्यात एक इरफान खान हवा

        काही दिवसांपूर्वी 'हिंदी मिडीयम' पाहिला. खूप आवडला. त्याचा शेवट कसा असला पाहिजे वगैरे मुद्दे सोडून अगदी नुसत्या इरफान खान साठी आवडला. त्यातला तो बारका पोरगा होता ना सुरुवातीला त्या मुलीसाठी तिच्या आवडीचा ड्रेस शिवणारा तोही आवडला. आजकाल होतं काय? कुठलेही चित्रपट पाहिले तरी त्यात तो व्यक्ती दिसत राहतो. म्हणजे शाहरुख खान, सलमान किंवा अक्षय कुमार वगैरे. कथा कशीही असो त्यात कथेतला नायक दिसत नाही, फक्त 'हिरो' दिसत राहतो. आणि त्या गोष्टीचा मला भयंकर कंटाळा आला आहे. 
        तर या हिंदी मिडीयम मध्ये इरफान आवडला तो त्याच्या ऍक्टिंग पेक्षा एक व्यक्ती म्हणून. एक सामान्य माणूस आपल्या बायकोच्या खुशीसाठी अगदी जमेल ते करायला तयार आहे. आणि ते दाखवण्यासाठी कुठेही एक्सट्रा प्रयत्न करून शॉट्स घेतले नाहीयेत. म्हणजे याच मूव्हीमध्ये शारुख असता तर त्याचे गट्टे पडलेले हात एकदम झूम करून, मग हिरोईन त्याच्या हातावर फुंकर मारणार, मग तो तिच्याकडे प्रेमाने बघणार, तेही एकदम झूम करून. किंवा सलमान असता तर हिरोईन ला त्रास होतोय म्हणून उगाच तिला उचलून वगैरे धरणार, हे सगळं अतिरंजित बघायला लागलं असतं. नवरा संडासातून ओरडत आहे म्हणून पाणी शोधणारी ती आणि दमलेला पाय तिच्या पायावर टाकून झोपणारा तो, किती साधे तरीही गोड. उगाच त्यासाठी तिने त्याचे पाय चेपलेच पाहिजेत असं नाही. 
        तर मला वाटतं आपल्यासारख्या सामान्य आयुष्यातही हे असे सामान्यच प्रसंग घडत असतात. त्यात कुठेही झूम करायला किंवा पाय चेपायला, उचलून धरायला कुणी नसतं. १४ फेब ला गुलाबाची फुलं देऊन त्याचे फोटो 'विथ माय लव्ह' असे टायटल टाकून अपलोड करणारा नवराच हवा असं नाही. पाहुणे गेल्यावर तीही दमलीय तर स्वतःच पटापट आवरून घेणारा किंवा अगदी वाढदिवसाला हॉटेलमध्ये जाणं परवडत नसलं तरीही घरी येताना फॅमिली पॅक आईस्क्रीम आणणारा पाहिजे. 'मी बसतो नंतर, तू आधी खाऊन घे' म्हणत पोराला हातात धरणारा पाहिजे. तसंच मंगळसूत्र, जोडव्या घातल्या नाहीत तरी पदोपदी त्याच्यासोबत उभी राहणारी बायको हवी.प्रेम अनेक गोष्टीतून दाखवता येतं आणि दिसणाऱ्याला ते कळतंही. रोजचं आयुष्य इतकं सामान्य असतं की  त्यात या अनेक छोट्या गोष्टीही एकदम हिरो सारख्या वाटू लागतात. 
         आता ही केवळ उदाहरणं आहेत. अशी अनेक सांगता येतील. पण उगाच 'मदर्स डे' किंवा 'ऍनिव्हर्सरी' लाच प्रेम उफाळून येणाऱ्या लोकांपेक्षा रोज कुठेही नोंद न करता आपल्या वाट्याचं काम मन लावून करणाऱ्या साऱ्या नवऱ्यांना माझा सलाम. मला तरी दिखाव्याच्या शाहरुखपेक्षा तो इरफानच आवडला बाबा. :) 

विद्या भुतकर.
https://www.facebook.com/VidyaBhutkar1/

Thursday, June 29, 2017

हुरहूर

       हुरहूर, किती खास शब्द आहे ना? इंग्रजी किंवा इतर कुठल्या भाषेत ती भावना व्यक्त करणारा असा शब्द असेल तरी का नाही अशी शंका वाटते. इतका योग्य शब्द आहे एका ठराविक मनस्थितीसाठी तो. तो नुसता लिहून चालत नाही, अनुभवायलाच हवा. आणि माझ्यासारखा सर्वांनाच त्याचा अनुभव येतंही असेल. 
      परवा पहाटे ४ वाजेपर्यंत जागून मित्राच्या घरी सर्वांसोबत गप्पा मारल्या, दंगा घातला आणि नाईलाजाने पहाटेच ड्राईव्ह करून घरी परतलो. अवघी दोनेक तासांची झोप घेऊन पुन्हा ऑफिसलाही गेले. तर झालं असं होतं, वीकेंडला जवळचे जुने मित्र सहकुटुंब शहरात आले होते आणि आमच्याच एका मित्राकडे राहात होते. त्यांच्यासोबत फिरायला जाणं, घरी बोलावणं, गप्पा, पॉट दुखेपर्यंत हसणं, सगळं केलं. जेवायचं काय, मुलांचं काय याच्या पलीकडे जाऊन मजा चालू होती. त्या सर्वांना सोडून जेव्हा घरी आलो तेव्हा जड मनाने दोघं गाडीत बसलो. गेले तीन दिवस कसे गेले होते कळलंच नाही. संध्याकाळी घरी परतूनही पहिले काही मिनिटं जरा शांततेतच गेले. We were already missing them.
     
       हळूहळू सर्वजण आपापल्या घरी सुखरूप पोचले. सर्वांची कामं पुन्हा सुरु झाली. आम्हीही, मी आणि संदीप घरातल्या मागे पडलेल्या कामांबद्दल, आराम करण्याबद्दल बोललो. दोन दिवसातले फोटोही पुन्हा पाहून झाले. त्यावर व्हाट्स अँप वर बोलून झालं. सगळं नेहमीसारखं असूनही पुढचे दोन दिवस अजून शांततेत गेले. तसं हे नेहमीचंच. एखाद्या चांगल्या मित्राची, मैत्रिणीची एक दिवसाची भेट असो की ४-५ दिवसांची ट्रीप. मित्र-मैत्रिणींना भेटल्यावर सर्व विसरून रमून गेलेले आम्ही परतीच्या प्रवासात जणू गेल्या दिवसांचा आढावा घेत राहतो. काहीतरी विषय काढून मन रमवण्याचा प्रयत्न करतो पण तोही व्यर्थ ठरतो. 
     
       एखाद्या ट्रीपला गेल्यावर विसरलेल्या घराचीही ओढ लागायला लागते. पण त्या ओढीतही कसली तरी हुरहूर असते. कदाचित 'परत तेच रुटीन' असा नकोसा वाटणारा विचार असेल किंवा आता त्याच लोकांना परत कधी भेटणार याची हुरहूर? की चला इतके दिवस धावपळ करून केलेली ही ट्रिप संपली, तीही सुरक्षितपणे आणि आता धावपळ नाही याचं समाधान? नक्की काय असतं माहीत नाही पण गाडीत बसल्यावर म्हणा किंवा परतीच्या प्रवासाला लागल्यावर म्हणा, ती पहिली पाच मिनिटं दोघंही शांत असतो. एकेक विचार मनातल्या मनात करत आणि गेलेले क्षण डॊक्यात बंद करत. आमच्या घरी तर आई-दादा दोघंच, ते किती गोष्टींचा असा विचार करत असतील नाही? असो.
   
     बरं हे ट्रिपचच असं नाही. इकडे असताना माझे आई-वडील, सासू सासरे राहून भारतात परत गेले की एअरपोर्टपासूनच एक प्रकारची उदासी मनावर यायला लागलेली असते. घरी येऊन सगळं आवरायचं पडलेलं असतं. ते मुकाट्याने करत राहतो, पण तेही यंत्रवत. किंवा भारतातून परत येताना अख्खा प्रवास आणि घरी येऊनही मनावर असलेलं उदासीचं सावट.

      तीच गोष्ट एखाद्या कार्यक्रमाचीही. एखादा मोठा साजरा केलेला वाढदिवस किंवा कार्यक्रम पार पडला की सर्व पाहुणे निघून गेलेले असतात. एखा-दुसरा जवळचा माणूस मागे थांबलेला असतो, मदतीसाठी.
घरातलं आवरत आवरत आम्ही बोलत राहतो,' तरी बरेच लोक आले, नाही? ५०-६० तरी असतील.'
मग कुणी म्हणतं,' बरं झालं सर्वांनी मदत केली ते, नाहीतर सफाई करून वेळेत हॉल परत देणं अवघड होतं'.
तर एकजण, 'सही झाला बरंका आजचा कार्यक्रम.'.

      तर कार्यक्रम संपल्यावर मागे राहिलेल्या लोकांच्या तोंडून बाहेर पडणारी ही नेहमीची वाक्य. त्यात सर्व नीट झालं याचं समाधान असतं पण एक प्रकारची हुरहूरही. 
      या सगळ्या तर अगदीच छोट्या छोट्या गोष्टी झाल्या. विचार करा लग्न घरात कसं होतं ते. विशेषत: मुलीकडे. वर्र्हाड गेल्यावर एका कार्यालयच्या कुठल्यातरी एका खोलीत त्या पांढऱ्या गादय़ांवर पडलेल्या अक्षता, फुलांच्या पाकळ्या, आणि आहेराचं आलेलं सामान, त्यासर्वांच्या मधे सर्व मंडळी बसलेली असतात. त्यात जरा जास्त चांगली नटलेली पण रडण्याने डॊळे सुजलेली ती मुलीची आई कुणाशी तरी बोलत असते, 'बाळ ने काही खाल्लं की नाही?'
तर हा 'बाळ' त्या लग्नात अगदी सर्व कामे पार पाडणारा मुलीचा कष्टकरी भाऊ असतो. त्याला कुणीतरी ताट लावून देतं. मग जेवता-जेवताच तो लोकांना काय-काय कसं आवरायचं, कार्यालय कधी सोडायचं, फुलं वाल्याला किती पैसे द्यायचे हे सांगत असतो.आणि मधेच एखादी मामी/ काकू बोलते, 'तो सूट मधे आलेला माणूस कोणं होता ओ?, त्याची बायकॊ पण अगदी भारी साडी नेसून आली होती'.
कुणाला आहेर चांगला झाला की नाही यावर बोलायचं असतं तर कुणाला मुलाच्या खडूस, भांडखोर काकाबद्दल.
एखादा मामा मधेच बोलतो,'त्या मुलाचा काका जेवताना नाटकच करायला लागला होता. त्याला म्हणे जिलेबी हवी होती आणि कुणी पटकन आणली नाही. बरं झालं शेवटी शांतपणे निस्तरलं. माझं डॊकंच फिरलं होतं. कुणा-कुणाचं बघायचं इथे?'.
तर अशा शंभर गोष्टी. गप्पा मारत-मारत तास-दोन तास कधीच निघून जातात. आणि शे-पाचशे लोकांनी भरलेलं कार्यालय एकदम भकास झालेलं असतं. आता घरी जाऊन बरीच कामंही निस्तरायची असतात त्यांची आठवण यायला लागते. सगळ्या गोंधळात का होईना शेवटी लग्न छान झालं ना याचं, तर कधी, पोरगी चांगल्या घरात गेली हो! याचं समाधान मनात असतं.सगळं झाल्यावरही, पोरीचा घरी पोचल्यावर फोन येईल ना याची हुरहूर असतेच...

बऱ्याच दिवसांनी अशीच हुरहूर मनात दाटून आली सर्व जुन्या मित्रांना भेटून. कदाचित इथे लिहून तरी थोडी कमी होते का बघते. त्यासाठी एकच उपाय असतो पुन्हा एकदा रोजच्या कामात गुंतून जाणं. मग त्यात इथे लिहिणंही आलंच. :)

-विद्या भुतकर.

Tuesday, June 27, 2017

तुलना......स्वतःची स्वतःशी

       या वर्षीच्या ठरवलेल्या ३ रेसपैकी दुसरी रेस रविवारी झाली. १० किलोमीटरची रेस होती. बऱ्यापैकी सराव झाल्यामुळे तसे रेसचे टेन्शन नव्हते. मुलांचीही सोय घरीच झाल्याने सकाळी जास्त लवकरही उठायचे नव्हते. एकूण नेहमीपेक्षा थोडे निवांतच होतो. मला वाटते एखाद्या गोष्टीचा नीट सराव झाला किंवा ती अंगवळणी पडली की त्यांचं विशेष काही वाटत नाही. तसंच काहीसं झालं होतं. अशावेळी त्यात एकसुरेपणा येऊ शकतो. किंवा कधी कंटाळाही येऊ शकतो. 
       तर यावेळी रेसमध्ये मला माझ्या आधीच्या वेळेपेक्षा कमी वेळात ही रेस पूर्ण करायची होती. अगदी सराव करतानाही मी अनेकवेळा आधीच्या वेळेपेक्षा कमी वेळात ती पूर्ण केली होती. पण माझे १ तास १५ मिनिटांचे एक जुने पर्सनल रेकॉर्ड होते जे काही पार होते नव्हते. तर या रेसला जिद्दीने ते पूर्ण करायचं ठरवलं आणि झालंही. १० किमीची रेस १ तास ११ मिनिटांत पूर्ण केली. अर्थात ती १ तास १० मिनिटांत व्हायला हवी होती. :) पण सांगण्याचा मुद्दा असा की एखादे टार्गेट पूर्ण केले तरी त्याच कामात आपण नवीन ध्येय ठेवून ते प्राप्त करण्याचा प्रयत्न करू शकतो. आणि त्यानेच ते काम अजून जास्त आवडीचे होऊ शकते. 
       अनेकवेळा अनेक मैत्रिणींना मी आग्रह करत असते काहीतरी व्यायाम सुरु करण्याचा. पण काही ना काही कारण ऐकायला मिळतेच. 'तुझ्याइतके आम्हाला जमणार नाही' वगैरेही सांगितलं जातं. तर माझं म्हणणं असतं की प्रत्येक गोष्टीची सुरुवात कुठून तरी होते. जोवर आपण करत आहोत त्या कामात प्रगती आहे तोवर बाकी लोकांचा किंवा मोठ्या टार्गेटचा विचार करायची गरजच नाही. एखादं जवळचं टार्गेट ठेवायचं. म्हणजे उदा: दिवसातून फक्त १५ मिनिटंच काहीतरी व्यायाम करायचा. किंवा आठवड्यातून तीनच दिवस १५-२० मिनिट चालायचं. याने काय होतं की कारण सांगण्यापेक्षा कुठून तरी सुरुवात होते. सुरुवात झाली की मग टारगेट बदलायचं. माझीही सुरुवात अशीच छोट्या टारगेटने झाली होती जिथून आता बरेच पुढे आले आहे. 
       आज सकाळी ऑफिसमध्येअजून एका पळणाऱ्या मैत्रिणीशी बोलत होते. तर ती म्हणाली,"मला यावेळी अजून फास्ट पळायचे होते." म्हटले किती? तर म्हणाली,"४५ मिनिटांत पूर्ण केली मी रेस ! मला केव्हापासून करायची होती इतकया फास्ट, शेवटी झाली एकदाची. ". तेव्हा माझ्या लक्षात आले की हे एक न संपणारं काम आहे. माझ्यापेक्षा, संदीपपेक्षाही जोरात पळणाऱ्या तिलाही काहीतरी अजून जास्त करायचं होतंच. मी माझी तुलना तिच्याशी करू शकत नाही. पण स्वतःची स्वतःशी तरी करू शकते? तेच प्रत्येकाने करावं असं वाटतं. आज आपण शून्य मिनिट व्यायाम करत असू तर ५ मिनिटानी सुरुवात करावी आणि पुढे ते वाढवत न्यावं. पण 'मला तिच्यासारखं ४५ मिनिटांत जमणारच नाही' म्हणून सोडून देण्यात काही अर्थ नाही. तर तुम्हीही जरुर करून पहा हा प्रयोग. 

विद्या भुतकर.  

Thursday, June 22, 2017

मनाचे खेळ- भाग २

आरती घरी आली तरी डोक्यातून विचार जातंच नव्हते. 
आल्या आल्या अमितने विचारलंच,"काय गं इतका उशीर झाला आज?". 

"अरे ते क्वार्टरली रिपोर्ट रिव्ह्यू चालू आहे ना म्हणून. अमु कुठेय?" तिने स्वतःला सावरत विचारलं. 

"झोपली ती मघाशी. "

"काय अरे शी. इतका उशीर झाला. सॉरी."

"इट्स ओके. झालंय तिचं नीट जेवण, होमवर्क. चल जेवून घेऊ.", म्हणत त्याने दोघांचं ताट वाढून घेतलं. 
तिचं जेवणात लक्षही नव्हतंच. कसंबसं जेवण उरकून तिने पुन्हा लॅपटॉप सुरु केला. 
अमितच्या चेहऱ्यावर जरा आठ्या पडल्याच. 

"इतक्या उशिरा येऊनही अजून काम आहेच?", त्याने विचारलं. 

"ह्म्म्म अरे जरा चेक करायचे आहे. थोडा वेळ बसते. तू काय करणार आहेस? जागा आहेस का झोपतोयस?" तिने विचारलं. 

"आहे मी जागा, बैस जरा वेळ." म्हणत त्याने टीव्ही सुरु केला. 

टीव्हीच्या आवाजात लक्ष लागेना म्हणून बेडरूममध्ये जाऊन बसली. घोळ छोटा नव्हता. लाखो रुपयांचा होता. आणि तोही फक्त ३ महिन्यातला. म्हणजे याच्या आधी किती असेल काय माहित? तिने तीही माहिती काढायचा प्रयत्न केला. पण मागच्या क्वार्टरची माहित तिला मिळत नव्हती. अमित आत येऊन तिच्याकडे पाहून तिच्याशेजारी बसला. 

"काय झालं सांगशील का? किती टेन्शन मध्ये आहेस? सगळं ठीक आहे ना?" त्याने काळजीने विचारलं. 

"अरे मी हे मनोजचे रिपोर्ट चेक करत होते."....मनोज म्हटल्यावर त्याचा चेहरा थोडा उरतलाच होता. ती पुढे बोलू लागली. 

".....तर त्यात काहीतरी घोळ वाटतोय. तू बसतोस का जरा शेजारी? एकदा टॅली करून बघू." 
त्याने मग तिला मदत केली बराच वेळ आणि नक्की किती रुपयांचा घोळ आहे तेही दोघांनी लिहून काढलं. 
त्याने कॉफी बनवली. बाहेर कॉफी घेत दोघेही विचार करत बसले होते. 

"मी तुला सांगतो मला हा मनोज कधी पटलाच नाही. एकतर नको इतका आगाऊ वाटतो मला तो." अमितने विषय काढला. तिला बोलायचे त्राण नव्हतेच. तो बोलत राहिला. 

"तू इतकी मारामारी करतेस रेव्हेन्यू साठी, नवीन क्लाएंट मिळवण्यासाठी हे मी पाहिलंय. हा बाबा आपला नेहमी पुढे असतोच, शिवाय बाकी ऐश चालूच असते त्याची. काहीतरी घोळ घालतच असणार आहे. नाहीतर तू सांग एकट्याच्या पगारात इतकं भागतं का?", त्याच्या या प्रश्नावर तिने दचकून त्याच्याकडे पाहिलं. तिने कधी विचारच केला नव्हता मनोज असं करू शकतो. एखाद्या गोष्टीत कामचुकारपणा करणे वेगळं आणि हे असे घोटाळे वेगळे. आपला मित्र, एकेकाळी आवडणारा व्यक्ती असा असू शकतो? ती विचार करत होती. 

"तुला सांगतो आरती, मला तर शंका आहे त्याच्या मनातून तू अजूनही गेली नाहीयेस. मी पाहतो ना कसा तुझ्याकडे पाहतो तो." त्याने पुढे बोलणं चालूच ठेवलं. 

"हे बघ आता या विषयावर बोलायलाच हवं का? आमच्यात काही नाहीये हे तुला सांगायची मला गरज वाटत नाही. उगाच कशाला तिकडे जायचं परत?", तिने वैतागून विचारलं. 

"तसं नाही ग. माझं म्हणणंय की त्याला वाटत असेल तुही त्याची मैत्रीण आहेस तर या अशा चुका कुणाला सांगणार नाहीस. नाहीतर त्याने तुला हे असं एकटं सोडलंच नसतं. तुला सांगतोय तू आपलं रिपोर्ट करून टाक. उद्या काही बाहेर आलं तर त्याला मदत केली म्हणून तुही आत जाशील." हे मात्र त्याचं म्हणणं बरोबर होतं. 

आपण आताही विचार करतच आहे की त्याला रिपोर्ट कसं करणार याचा? उद्या त्याला साथ दिली म्हणून मलाही बाहेर काढतीलच की. झोपायला गेलं तरी विचार कमी होत नव्हते. ती तशीच बेडवर पडून राहिली. कधीतरी तिची झोप लागून गेली. 
----------------------------------------

सकाळी ती लवकर आवरून निघाली. गेल्या गेल्याच तिने मनोजला कॉन्फरन्स रूममध्ये बोलावून घेतलं. त्याच्यासमोर तिने सर्व हिशोब मांडला आणि जाबही विचारला. 

"असं कसं करू शकतोस मनोज तू? तुला माहित आहे कंपनी पॉलिसी. जेल होईल तुला क्लाएंटला असं खोटं बिल केल्याबद्दल. तुझ्याकडून अशी अजिबात अपेक्षा नव्हती. एखादी चूक समजू शकतो पण हा तर घोटाळा आहे मोठा.", आरती. 

मनोजला काय बोलायचं कळत नव्हतं. चोरी पकडली गेली होती. ती त्याच्याकडे आली म्हणजे अजून बॉसकडे गेली नाहीये इतकं नक्की होतं. 

"आरती सॉरी चूक झाली."

"चूक?सॉरी? हे या सगळ्याच्या पलीकडे आहे. चूक म्हणजे एखादी एंट्री तू विसरून गेलास तर. पण हे तरी फसवणूक आहे क्लाएंटची. उद्या त्यांना आणि बाकी क्लाएंटला कळलं तर कंपनी बुडीत जाईल. मला तर कळत नाहीये काय करायचं?"

"म्हणजे? हे बघ मी तुला माझा शब्द देतो यापुढे नाही असं होणार. हा क्वार्टर माफ कर प्लिज."

"हा क्वार्टर म्हणजे? या आधी केलं असशील तर? आज केलं म्हणजे कालही केलं असणारच ना? तू हे सॉरी कशाला म्हणतोयस? तुला माहित आहे तुला रिपोर्ट केलं नाही तर माझी नोकरीही जाऊ शकते."

"हो मान्य आहे मला. मी कुठे म्हणतोय उद्या हे असं होईल. प्लिज यावेळी सोडून दे, पुढच्या वेळी असं होणार नाही, मी शब्द देतो तुला."

"हे बघ मी आता काहीच सांगू शकत नाहीये. तू सुटलास असं तर अजिबात समजू नकोस. मला मिटिंग आहेत आता, दुपारी बोलते." असं म्हणून आरती पुन्हा डेस्कवर गेली. 
दुपारी जेवायच्या वेळी मनोज स्वतःच तिला घेऊन कॅंटीनमध्ये गेला. कितीतरी वेळ ती गप्पच होती. शेवटी तिने न राहवून विचारलं,"का असं केलंस? काय गरज काय होती?"

"आता तू गरज म्हणतेस पण त्या क्षणाला फ्रस्टेटेड होतो. वेगवेगळ्या नव्या क्लाएंटशी बोलूनही नवीन बिझनेस येत नव्हता. आता नवीन नाही आला तर निदान जुन्या क्लाएंटचं बिलिंग तरी तेव्हढं राहायला पाहिजे ना? तेही कमीच होत आहे. म्हटलं असतो एखादा  क्वार्टर. पुढच्या क्वार्टरला करू काहीतरी. आता हे क्वार्टर प्रमोशन्स पण आहेत. सगळंच एकदम आलंय. पुढच्या क्वार्टरमध्ये करतो ना काहीतरी. नाही मिळालं काही तर नाही दाखवणार. मला वाटलं नव्हतं इतकं वाढेल प्रकरण. आता मला काही तुला अडकवायचं नव्हतं. बॉसने तुला करायला दिलं रिव्ह्यू तर मी काय करू? तुला योग्य वाटेल ते कर. पण उगाच तुला त्रास नको माझ्यामुळे. " त्याचं बोलणं ऐकून ती जरा शांत झाली. 

"जाऊ दे अमु काय म्हणतेय? कशी आहे?" त्याने विषय  बदलला. 

"ठीक आहे. काल रात्री उशीर झाला तर झोपून गेली होती." तिने सांगितलं. 

"हां जरा जास्तच उशीर झाला माझ्यामुळे. सॉरी. ",मनोज. 

"इट्स ओके. अमितने केलं होतं सर्व. ती झोपली होती. जेवणही त्यानेच वाढलं काल मलाही.", तिने अमितचं कौतुक केलं तसा त्याचा चेहरा थोडा मावळला. 

"चांगलं आहे तुला मदत आहे घरी. मला काही जमत नाही बाबा यातलं." त्याने प्रकरण स्वतःवर ओढवून घेतलं. 

थोडा विचार करून त्याने पुढे तिला विचारलं,"आरती मला एक सांग, काल माझ्या प्रोजेक्टबद्दल काही बोललीस का त्याला तू?"

"हो आधी सांगितलं नव्हतं. पण त्याला माहित होतं तुझा रिव्ह्यू करतेय ते. मी बराच वेळ बसले तेव्हा काय झालं म्हणून विचारलं. त्यामुळे सांगितलं." आपल्या वागण्याचं स्पष्टीकरण आपण त्याला का देतोय हे तिला कळत नव्हतं आणि चोरी तिने थोडीच केली होती?

"कशाला सांगितलंस उगाच? तू पण ना?", त्याने विचारलं. 

"अरे पण त्याला सांगणारच ना? रात्री १-२ वाजेपर्यंत बसून काम करत होते तेही टेन्शनमध्ये." ती बोलली. 

"तसं नाही. तुला सांगू का? मला वाटतं तो अजूनही माझ्याकडे शंकेनेच बघतो.", मनोज बोलला. 

"कसली शंका?", ती. 

"कसली म्हणजे? हेच की आपलं अफेअर आहे की काय अशी?",त्याने अडखळत सांगितलं. 
"अरे असं काही नाहीये. उगाच फालतू शंका आणू नकोस." ती बोलली. 

"हे बघ मला माहितेय तो माझ्याकडे कसा पाहतो ते. त्यात तू रात्री माझ्यासोबत इतका उशीर थांब्लीस. "

"हे बघ उगाच फालतू शंका मनात आणू नकोस. मनाने खूप चांगला आहे तो. त्याच्यामुळेच मी आज इतक्या पुढे जाऊ शकलेय." 

"ते असेल गं. पण एका पुरुषाचा स्वभाव तू बदलू शकत नाहीस. निदान या बाबतीत तरी. जाऊ दे तुला नाही कळणार. पण एक सांगू. आपल्या दोघांचं नातं अमित किंवा रुचापेक्षा कितीतरी जुनं आहे. त्यामुळे तो किंवा ती काय म्हणते याने आपल्या नात्यात फरक पडू देत नाही. तूही तो पडू देऊ नकोस. किती वर्ष झाली आपण ओळखतोय एकमेकांना?"

तिने पुन्हा गणित केलं. 

"किती बावळट होतो ना आपण जॉईन झालो तेंव्हा?"तिला आठवून हसू आलं. 

"आता ही नवीन पोरं नोकरीला लागली की मला आपलीच आठवण होते. किती सुखाचे दिवस होते ते...." आरती पुन्हा एकदा भूतकाळात रमली होती. 
फोनवरच्या रिमांईंडरने तिची तंद्री भंगली. 

"चल जाते मी मिटिंग आहे बॉसबरोबर", तिने घाईने जेवण उरकलं आणि मीटिंगला गेली. 
मनोजशी बोलताना पुन्हा एकदा तिला हलकं वाटू लागलं होतं. अर्थात काय करायचं हा प्रश्न अजूनही होताच. 
----------------------------------

बॉससोबत बाकी चर्चा झाल्या पण हा विषय कसा काढायचा तिला कळत नव्हतं. 
शेवटी तिने विचारलं, "सर ते रिव्ह्यू चं काम कधी करू कळत नाहीये. बराच बॅकलॉग राहिलाय माझाच. यावेळी दुसऱ्या कुणाला जमणार नाही का?"

"ओह मला वाटलं तुला असेल वेळ. सॉरी. उलट मागच्या वेळी भेटलो तर मनोजच म्हणाला, बाकी सर्व बिझी आहेत आरतीला आहे थोडा वेळ म्हणून........" 

कितीतरी वेळ मनात अडकलेल्या तिच्या प्रश्नाचं उत्तर बॉसने दिलं होतं. संध्याकाळी ती पुन्हा बॉसकडे जाऊन आली होती, रिपोर्ट करायला. 

मनोजशी ती एकच वाक्य बोलली होती,"तू मला गृहीत धरायला नको होतंस". 

समाप्त. 

विद्या भुतकर. 

Wednesday, June 21, 2017

मनाचे खेळ - भाग १

कॉन्फरन्स रूममधून जोरजोरात हसण्याचा आवाज येत होता. आरती आणि मनोज सध्या तिच्या टीमसाठी काही जणांचे इंटरव्यू घेत होते.

ती बोलत होती,"'अरे मॅगी करता येतं का?' हा काय प्रश्न आहे का कॅन्डीडेटला विचारायचा?".

"अगं पण तो बघ की? म्हणे माझा व्हिसा आहे तर ऑनसाईट कधी जायला मिळेल? इथे नोकरीचा पत्ता नाही अजून आणि डायरेकट ऑनसाईट? मग म्हटलं विचारावं तिथे जाऊन जेवण बनवता येईल की नाही ते. बरोबर ना? निदान सर्व्हायव्हल स्किल्स तरी पाहिजेत का नको?", मनोज. 

"बिचारा किती विचार करत होता काय सांगायचं म्हणून. मग एनीवे हा पण नको का?", आरतीने विचारलं. 

"हो कटाप. बघू पुढचं कोण आहे?", मनोजचा निर्णय झाला होता. 

"नेहा नाव आहे. ७-८ वर्षाच्या अनुभव आहे असं लिहिलंय.",आरती. 

"वा चला. नेहा म्हणजे कशी एकदम सिन्सियर वाटते.", मनोज नाव ऐकून खुश झाला होता. 

"हो का? मुली म्हटलं की म्हणणारच तू. त्या पोराला इतका पिडलास. आता या मुलीला न विचारताच घेशील. बरोबर ना?", तिने विचारलं. 

"हे बघ आरती, तुला खरं सांगतो. तुम्ही सगळ्या मुली ना खरंच सिन्सियर असता कामामध्ये. आता तूच बघ ना? किती सिरियसली काम करतेस? म्हणजे निदान माझ्यापेक्षा तरी जास्तच.", मनोजने हे मात्र याच्या आधीही तिला अनेकदा सांगितलं होतं. आणि खरंच त्याच्या प्रोजेक्टमध्ये बाकीच्या तुलनेत मुली जास्त होत्याही. 

"काय करणार? करावं लागतं बाबा. आम्हाला रात्री बॉस बरोबर पार्ट्याना जाणं जमत नाही ना? मग त्याची भरपाई अशी करावी लागते.", तिची दुखरी नस होती ती. 

"हे बघ आता तू टोमणे मारू नकोस हां.",मनोज बोलला. 

"टोमणा काय? खरंच आहे की नाही? मीच नाही, मॅनेजमेंट मध्ये यायचं म्हटलं की आम्हाला जरा जास्तच कष्ट घ्यावे लागतात.",ती. 

"ह्म्म्म मी काय करू सांग मग? उलट मी तर तयार असतो मुलींना प्रोजेक्ट मध्ये घ्यायला. एकदम व्यवस्थित काम करतात. उलट ती पोरं माझ्यासारखी कामचुकार असतात.", त्याने हार मानली. 

"जाऊ दे. चल नेहा बघू कशी आहे ते." म्हणत आरतीने तिला फोन लावला.

इंटरव्यू संपले. दोन चार कँडिडेट निवडून त्यांनी आजचं काम उरकलं होतं. ते बाहेर पडताना पाहून आजूबाजूच्या दोन-चार लोकांनी खुसपूस केली होतीच.

     आरती आणि मनोज याच कंपनीत गेले १७-१८ वर्षे काम करत होते. दोघे एकाच वेळी कंपनीत  नोकरीला लागले होते. इतक्या वर्षात दोघेही वेगवेगळ्या नात्यातून, अनुभवातून आणि भावनिक गुंतवणुकीतून गेले होते. सुरुवातीला मैत्री, मग प्रेम, ब्रेक-अप, राग, द्वेष आणि दोघांची लग्नं (आपापल्या पार्टनरशी) अशा अनेक तुकड्यातून ते फिरून आले होते. आता आयुष्याच्या या टप्प्यावर झालं ते सर्व मागे टाकून जवळचे मित्र आणि ऑफिसमध्ये सिनियर म्हणून वागू शकत होते. अर्थात या सगळ्याचा इतिहास लोकांना सांगायची, स्पष्टीकरण द्यायची गरजही त्यांना वाटत नव्हती. नोकरीत ठराविक एका पदावर पोचल्यावर त्यांना एकटेपण जाणवत होतं. त्यात एकमेकांची सोबत कामी येत होती. अगदी दुपारी जेवायलाही दोघेच सोबत असत.
       त्यादिवशी दुपारीही दोघे जेवायला बसले अन त्यांचं बोलणं सुरु झालं.

"काय गं डबा कुठे आहे? " त्याने विचारलं.

"रात्री खूप वेळ गेला कामात मग बाहेरच जेवलो आम्ही. त्यामुळे आजचा सकाळचा डबाही नाहीच. तुझं बरंय रे. बायको अगदी चार कप्प्यांचा डबा भरून देते."

"ह्म्म्म म्हणूनच हे पोट असं सुटलंय."

"पण काय रे? जरा मदत करत जा की बायकोला? किती वर्ष असा लहान पोरासारखा सांभाळणार बायको तुला?"

"हे बघ आता उगाच परत तेच लेक्चर नको देऊस. माहितेय तुझा नवरा खूप मदत करतो ते."

"हो, करतो बिचारा. म्हणून तर आज इतकं सगळं करू शकतेय. नाहीतर बसले असते घरी....."
त्याने वर बघून वाक्य पूर्ण केलं,"माझ्या बायकोसारखी. बरोबर ना?"

"हे बघ आता उगाच तू माझ्या बोलण्याचा अर्थ काढत बसू नकोस. पण तुलाही माहितेय की एकट्याच्या जीवावर सर्व जमत नाही. दोघांनी केलं तरच होतं करियर, निदान बायकांचं तरी. जाऊ दे ना. तू जेव. बघ उलट नशीब समज मी तुला नाही म्हटलं. नाहीतर आयुष्यभर ऐकावं लागलं असतं माझं आणि हे कँटीनचं जेवण. "
त्यावर मनोज कसंबसं हसला. कितीतरी वेळा बोलणं या मुद्द्यावर येऊन बंद पडायचं. 

पुढचे पाच मिनिट शांतता होती. एकदम आठवून मनोज म्हणाला,"ते राजीवने क्वार्टरली रिपोर्ट रिव्ह्यू करायला सांगितले आहेत. संध्याकाळी बसशील का जरा वेळ?"

"हां माझे त्यांनी त्या रेड्डीला दिले आहेत. तो अजून चुका काढत बसेल. बरंय तुझं, तू सुटतोस नेहमीच."

"म्हणजे? मी काय चुका करतो का? तुला सांभाळाव्या लागतात ते?"

"तसं नाही, पण फरक पडतो ना? नाहीतर एक काम कर तू माझा तपास, तुझा रेड्डीला दे." आरतीने आयडिया दिली. 

"नको बाबा तो रेड्डी. नुसते व्याप लावतो मागे. माणसानं किती चिकट असावं? जरा स्पेलिंग चुकलं तरी बदल म्हणतो. आकडेवारी चार पैशानी चुकली तर फाशीच चढवेल तो.", मनोजला रेड्डी नको होता. 

संध्याकाळी दोघेही मग कामं उरकून रिपोर्ट बघायला बसले. अगदी कॅल्क्युलेटर घेऊन गहन चर्चा सुरु झाली. नेहमीप्रमाणे लोकांनी 'यांचं चालू दे' म्हणून निरोप घेतलाच. मनोज बराच वेळ तिला समजावत होता काय प्रोजेक्ट होते, किती लोक, त्यांचे कामाचे तास, इ सर्व.  पण काहीतरी गडबड वाटत होती. तो कितीही समजावून सांगत असला तरी ताळमेळ लागत नव्हता. 

"अरे तो नवीन आलेला मुलगा, रवी, तो सुट्टीवर होता ना दोन महिने? आणि ती प्रेग्नन्ट बाई पण? काय यांची नावं मला आठवत नाहीयेत पटकन. पण त्यांच्या सुट्ट्या दिसत नाहीयेत यात?" आरतीने विचारलं. 

मनोजने अशीच टोलवाटोलवीची उत्तरं दिली. तिने मग नाद सोडून दिला. 

ती म्हणाली,"एक काम करूया का? मी घरी जाऊन बघू का? उशीर पण झालाय."

"नंतर कशाला? आताच बघ ना? जाऊ उरकून. मला पण उद्या सकाळी मेल करावा लागेल. तू आताच अप्रूव्ह करून टाक ना?", मनोजला जरा जास्तच घाई होती. पण जास्त बोललो तर आरती अजूनच चिडेल हे त्याला माहित होतं. तिच्या कामात कणभरही चूक चालायची नाही तिला. 

तिने सर्व फाईल्स मेल करून घेतल्या आणि त्याला 'बाय' म्हणून ती घरी निघाली होती. कितीतरी वेळ गाडी चालवण्याकडे तिचं लक्षच नव्हतं. मनोजच्या रिपोर्टमध्ये तिला काहीतरी मोठ्ठा घोळ दिसत होता. आता हे कसं, कुणाला सांगायचं ते तिला कळत नव्हतं. 

क्रमश: 

विद्या भुतकर.