Tuesday, July 10, 2007

माझं तुझ्यावर प्रेम आहेच...पण....

            तू जाणार हे फायनल झालं तर. म्हणजे तू सगळ्यात पहिल्यांदा मलाच सांगितलं होतं आणि सांगायलाही हवं होतंच. शेवटी, आपण दोघे गेले वर्षभर एकाच प्रोजेक्टमध्ये राहिलो होतो आणि आनंदाने राहिलो होतो. आता तू असल्यावर मी काम कसली करतेय. :-) त्यामुळे माझं आरामातंच चाललं होतं. पण तुला जाणं गरजेचं होतं. महत्वाकांक्षा, करियरसारख्या गोष्टी होत्याच की विचार करायला. मग हो नाही करत, आज-उद्या करत शेवटचा दिवस आला. शुक्रवारी माझ्याकडेच सर्व वस्तू दिल्यास परत करायला. आणि हो, तू सर्वांचा निरोप घेत असतानाही मी सोबतच होते. मला फार कसंतरी वाटत होतं. वाटलं, रोज शेजारी बसायचो, जेवायला-बोलायला सोबत, अगदी त्या बोअरींग मिटींगमध्ये पण सोबत असायचो. वाटलं दिवसभर तुझ्याशिवाय रहायचं. आणि प्रत्येकजण तुला 'बाय' म्हणताना जणू मलाच एक प्रश्न विचारत होता नजरेनं की 'तुझं कसं होणार?'. मी अगदी मोठ्या तोंडाने सांगितलं की तुझ्या जागी येईल कुणीतरी लवकरच... पण 'तुझी जागा घेणं'?..... अवघड होतं.......आपण संध्याकाळी भेटूच हे माहीत असूनसुद्धा...सकाळपासून संध्याकाळपर्यंत भेटायचं नाही....?
         सोमवार उजाडल्यावर डोक्यात पहिला विचार तोच आला. आज एकटंच ऑफिसला जायचं. सोमवार तसा नेहमीप्रमाणे कंटाळवाणाच होता. पण अगदी आकाश भरून वगैरे काही आलं नव्हतं.चक्क लखलखीत उन पडलं होतं. हवं तसं निवांत आवरून बाहेर पडले. कधीतरी स्वत:साठीच आवरून खूष होण्यातही मजा असते नाही? :-) वाटलं गाडीत बसून एकटंच जाताना तरी थोडं वाईट वाटेल. उलट आज आवडत्या जुन्या गाण्य़ांची सिडी उत्साहाने लावलई. तसा तुला मी कुठलीही गाणी लावली तरी फारसा फरक नाही पडायचा. पण आज एकटंच गाणी ऎकत जाण्यात वेगळंच सुख होतं. अगदी 'आपकी याद आती रही रातभर.....' गाणं ऎकतानाही गाण्याकडेच लक्ष होतं.
          ऑफिसमध्ये गेल्यावर तुझ्या खुर्चीकडे नजर टाकायलाही उसंत मिळाली नाही की कामाचा भडीमार झाला. आधी वाटलं होतं की तू नाहीस म्हटल्यावर सगळी जबाबदारी माझ्यावरच...:-( काही चुकलं तर? पण अंगावर पडल्यावर माणूस आपोआप काम करतोच. मग उलट जरा बरंच वाटलं की चला ब़ऱ्याच दिवसांनी स्वत:चं डोकं लावलं कुठेतरी. त्यानंतर मग जरा गूगलवर गप्पा आणि मेल,इ. मी आधीही हे करायचेच, मी असं नाही म्हणणार की तू चौकीदारी करत असायचास. स्वत: जरा काम केल्यावर थोडा टाईमपास करायला बरं वाटतं होतं. I deserved it. :-) तुला माहीतेय, मला गूगलवर,मेलवरही सगळ्यांनी हाच प्रश्न विचारला,'कसं वाटतंय मग तुला आज? तो नाहीये तर एकटं वाटत असेल ना?'. त्यांना कसं सांगणार की मी काही अगदीच दु:खात नाहीये. लोकांना जे अपेक्षित होतं तेच उत्तर दिलं मी. काय करणार ना?
         दुपारच्या जेवणासाठीही बदल म्हणून दुसऱ्या लोकांसोबत, दुसऱ्या विषयांवर बोलणं चांगलं वाटत होतं. जेवणानंतरचं आईसक्रिम खाताना जाणवलं की हे दुखं: वगैरे सगळं विसरायला होतं बघ...मला खायला दिलं की. :-)) गंमत म्हणजे ती मुलगी आहे ना, जिच्याशी माझं फारसं बोलणं होतं नाही बघ?आज तीही चक्क माझ्याशी बोलायला आली होती. तिने तुझ्याबद्दल विचारलं, मग जाता जाता म्हणालीही,' कधी कंटाळा आला तर ये माझ्याकडे गप्पा मारायला'.आपण लोकांबद्दल कसे ग्रह बनवून ठेवतो ना? आणि ते असे मोडले जातात, नकळतपणे. मला बरं वाटलं. त्यानंतर उरलेला दिवस पटकन निघून गेला.संध्याकाळी शेवटच्या अर्ध्यातासात मात्र मला राहवलं गेलं नाही. मी पटापट आपलं दुकान(संगणक) बंद करून बाहेर पडले. ट्रॅफिकमधून गर्दीतून माझी वाट काढताना' तुझसे नाराज नही जिंदगी हैरान हूं मै' चा इफेक्ट (नेहमीप्रमाणेच) जाणवल्याशिवाय राहिला नाही.
          तुला दिवसभरानंतर पाहिल्यावर मला परत एकदा प्रेमात पडावसं वाटलं. :-) तुझा पहिला दिवस कसा गेला वगैरे ठीक आहे रे. पण मला मात्र विचारु नकोस. बाकीच्यांना खोटं सांगायला काही प्रॉब्लेम नाहीये. तुला खरं सांगितल्याशिवाय राहवणार नाही. सांगू? खरं सांगू? .....माझं तुझ्यावर प्रेम आहेच रे...पण....माझं माझ्यावरही खूप प्रेम आहे. :-) आणि एकांतात ते वाढतंच जातं. :-).....

-विद्या.