Sunday, May 03, 2020

नक्षी

आज दुपारी छान ऊन पडलेलं म्हणून आम्ही दोघं चकरा मारत होतो. घराजवळ काही रंगीत रानफुलं दिसतात. दगडांवर उगवलेली. त्यांचे रंग फार आवडतात मला. आज त्यांच्याकडे पाहताना मला आठवलं मी शाळेत असताना निरनिराळी फुलं, पाकळ्या, पानं वही-पुस्तकांत ठेवायचे. निरनिराळ्या गुलाबांच्या पाकळ्या, झेनियाची फुलं, वगैरे. अनेकदा त्या सगळ्यांची पुस्तकांत इतकी गर्दी व्हायची की दर चार पानांआड काही ना काही असायचंच. त्यामुळे एक पुस्तक फुगून जाड झालेलं आठवतंय. बरेचदा मग मैत्रिणीसोबत काही पाकळ्यांची, फुलांची अदलाबदल करायचो. 
नवऱ्याला त्याबद्दल सांगताना तो म्हणे,"त्यांचं करायचा काय?". 
मलाही तोच प्रश्न पडला आणि एकदम आठवलं, त्याची ग्रीटिंग्ज बनवायची होती मला. एखादं केल्याचं आठवतंय. पण छान पाकळ्या एकमेकांवर नीट डिंकाने जोडून त्यांचं फूल, मग पानं वगैरे लावून बनवलेलं ग्रीटिंग. त्यालाही मग आठवलं,"हो, आम्ही पिंपळाचं पान ठेवायचो. वडाचं वगैरे मोठं पान असलं की मस्त जाळी तयार होते थोड्या दिवसांनी." 
म्हटलं,"हो मग त्या जाळीवरुन वॉटर कलरने रंग लावून हलकेच ते जाळीदार पान उचललं की सुंदर चित्र तयार होतं कागदावर." 
हे कविता, गाण्यांमध्ये वगैरे म्हणतात ना 'पुस्तकात जपलेलं फूल', वगैरे. प्रेमात ते काही केलं नाही पण त्यापेक्षा शाळेतल्या त्या फुलं, पाकळ्या जपण्याच्या आठवणी जास्त प्रिय वाटल्या. आजकाल करतं का कुणी असं? माझ्या पोरांना तरी नाही माहित हे सर्व. म्हणून मग घराजवळची काही रंगीत फुलं आणली आणि एका जाड, जड पुस्तकात ठेवली. कधी त्याची गुळगुळीत, नाजूक, सुंदर नक्षी बनते बघू. :) सान्वीला कळत नव्हतं आई काय करतेय. तिला ती थोड्या दिवसांनी दाखवायची आहेत. 

विद्या भुतकर.