Saturday, July 21, 2018

अँड वी ट्विस्ट

आज भर उन्हाचं,  आठ मैल चालले, दोन तास पाच मिनिटं २३ सेकंद वगैरे, मोजून. त्यात विशेष सांगायची गोष्ट म्हणजे गेल्या कित्येक दिवसांपासून प्रयत्न करत होते वेग वाढवण्याचा. पूर्वी प्रत्येक मैल साधारण १३ मिनिटांत पूर्ण व्हायचा. मग पाठीच्या दुखण्यानंतर सगळं मागं पडलं. काही दिवस झाले प्रयत्न करत होते निदान १६ मिनिटांच्या आत तरी एक मैल पूर्ण करावा पण तेही जमत नव्हतं. आज ते जमलं. कसं ते माहित नाही. खरंतर नवऱ्याचा वेग माझ्या दुप्पट. म्हणजे जे अंतर मी १६ मिनिटात पार करते तो ते ८-९ मिनिटांत करतो. पण माझी तुलना त्याच्याशी नसतेच. हा विजय माझा, माझ्यापुरताच, आजच्या पुरताच. उद्या तिथे नवीन काहीतरी असेल. ते नवीन काहीतरी असेपर्यंत, या छोट्या विजयाचा आनंद का मानायचा नाही मी? असो.
       तर आजची पोस्ट चालण्याबद्दलची. हे वरचं उगाच आपलं शायनिंग मारण्यासाठी. :) कधी तुम्ही एकटे चाललाय? एकटं म्हणजे एकटं. ते तसं चालायला मिळणं यासारखी चैन नाही. हो खरंच. आज सलग एकटी चालले तसं, माझ्यासोबतच. अर्थात आज काही पहिल्यांदा नाहीये हे. उलट आता त्याचं व्यसन लागलंय म्हणायला हवं. हां तर चैन. चालण्यासाठी तेव्हढा वेळ, वेग, शारीरिक क्षमता, जागा, वातावरण आणि मनस्थिती सर्व एकत्र असणं ही चैन नाहीतर काय आहे? आजूबाजूच्या छोट्यामोठ्या गोष्टी, वस्तू, व्यक्ती यांना पाहात, एकसलग पडणाऱ्या आपल्या पावलांची जाणीवही न होता सलग चालत राहणं.
       रोज सतत हातात फोन, टीव्ही, आजूबाजूला बोलायला असणाऱ्या अनेक व्यक्ती, करावी लागणारी कामं, एखाद्या गोष्टीवरून नाराज असलेलं मन, कशामुळे तरी वाटणारी काळजी, दुःख, आनंद हे सगळं गर्दीत चालू असतं. त्या सगळ्यातून स्वतःला बाहेर काढून कुठून तरी कुठेवर तरी चालत राहणं. त्यात मग आपलेच आपल्याशीच होणारे संवाद, आपल्या प्रिय व्यक्त्तींशी त्यांच्या परस्पर होणारे संवाद, कुणासोबत तरी चालण्याच्या जुन्या आठवणी चाळवत असताना समोर दिसणाऱ्या छोट्या चायनीज मुलाची त्याच्या आजोबांसोबत पाहिल्याची नवीन आठवणही कुठेतरी मनात बसून जाते. एखादं गाणं कानात चालू असताना त्यावर नकळत वाढलेला पावलांचा वेग आणि 'अँड वी ट्विस्ट' गाण्यावर जागच्या जागीच केलेला ट्विस्ट. हे सर्व कधी अनुभवलंय?
       बरं हे चालत असताना डोक्यातले विचार काही कमी असतात का? त्या प्रत्येक विचाराला सामोरं जाणं. एकटं वाटत असताना एकटं चालून अजूनच एकटं वाटून घेणं तरीही त्या एकटेपणाला सामोरं जाणं. किंवा आयुष्यात त्या त्या वेळी चाललेले संघर्ष, व्याप यांचा परत परत विचार करणं. 'त्यातून उपाय काय?' हा निरर्थक विचारही करणं आणि विचारातून काही हाती लागलं नाहीच तर, शेजारून जाणाऱ्या सायकलिस्टला पाहून लाईन मारणं. असे कितीतरी तास चाललेय मी अनेकदा, त्या त्या वेळी चालू असलेल्या घटना, विचार, संघर्ष आणि गाणी घेऊन.
        आता हे चालणं काही केवळ व्यायाम म्हणून सांगत नाहीये मी. वेगवेगळ्या चालण्याच्या जुन्या आठवणीही आहेत. एक ठराविक एकटं चालण्याची आठवण म्हणजे, मला पहिली नोकरी मिळाली हे फोनवरून कळलं आणि ते मित्र-मैत्रिणींना सांगण्यासाठी पळत सुटलेली एकटी मी. त्या चालण्याचा वेग, उड्या मारणारं मन आणि केवळ एखादा किलोमीटर असलेलं अंतर. ते तितकंच अंतर पण स्वतःसोबत चाललेलं ते अविस्मरणीय अंतर आहे, आजतागायत. टोरांटो, न्यू जर्सीच्या बस स्टॉपपासून रूमपर्यंत थंडीत, अंधारात, भीतीने चाललेलं मोजकं अंतरही असंच लक्षात राहणारं. अगदी सध्याही ट्रेन स्टेशनपासून ऑफिसपर्यंत एकटीने पार केलेलं थोडंसं अंतर. पुण्याच्या चांदणी चौकातून पुढे जाऊन फुटपाथवर भाजीवाल्यांच्या शेजारून चाललेलं किंवा पुण्यात घराजवळ चालताना इतक्या सकाळी कुणी कुत्रं मागं लागणार नाही ना? या भीतीने दबकत चाललेलं अंतरही आहेच. कितीतरी विचार, कितीतरी घटना, कितीतरी भावना. सर्व माझंच, माझ्यापुरतं, माझ्या पावलांसोबत. 
       घरी परत आल्यावर दमलेल्या पायांची जाणीव होते, आपण माणसात आलोय हे लक्षात येतं. पण तोवर आपल्यासोबत घालवलेला आपला तो वेळ मनाला कायमचा चिकटून गेलेला असतो. नवीन एखादा निर्णय घेऊन झालेला असतो, प्रश्नाचं उत्तर मिळालं नाही तरी त्याला सामोरं जाण्याचं बळ मिळालेलं असतं. काही नाही तरी कुणी आयतं बनवून दिलेलं जेवण जेवून मस्त ताणून देण्याइतके तरी दमलेले असतो. तशी झोप झाल्यावर अजूनच भारी वाटणार असतं. निदान त्या भारी वाटण्यासाठी का होईना एकटं चाललं पाहिजे. 

विद्या भुतकर.

Sunday, July 08, 2018

दोन रुमालावरून

         काल खूप दिवसांनी हाताने कपडे धुतले. म्हणजे खरंच स्वयंपाकघरातले रूमाल हाताने धुतले. (उगाच आपलं.) तर होतं काय? आता मी उगाच छोट्या गोष्टींचा बाऊ करून माझं दुःख किती मोठं वगैरे लिहीत नाहीये. फक्त जे झालं किंवा होतं ते सांगते. तर, वॉशिंग मशीन मध्ये बाकी कपड्यांसोबत हे रुमाल धुवायला टाकता येत नाही. म्हणजे येतात, पण मला आवडत नाही. मग दोन रुमाल, (हो, रुमाल म्हणजे नॅपकिन्स बरं का. ) मशीनमध्ये फिरवण्यासाठी कोण धुवायला टाकणार? हाताने धुवायचे तर ते नेहमी विसरून जातं. शेवटी परवा रात्री, साबणाच्या पाण्यात ते रुमाल भिजत घातले आणि काल दुपारी ते बाथटब मध्ये बसून खसाखसा हाताने धुतले. अगदी बदडून वगैरे. आणि बऱ्याच आठवणी जाग्या झाल्या. 
       कोरेगावला अनेकदा उन्हाळ्यात नळाला पाणी नसायचं पुरेसं. दारात विहीर होती पण अजून त्यावर मोटार बसवली नव्हती. दारातल्या शेताच्या पलीकडेच एक ओढा वाहायचा. आई मग ओढ्याला कपडे घेऊन जायची धुवायला. आम्हाला पण आवडायचं ओढ्याला जायला. पण आईला ते आवडायचं नाही. एकदा मला आठवतंय, स्कॉलरशिपच्या गणिताच्या चाचणीचा अभ्यास देऊन आई ओढ्याला गेली होती आणि मला अभ्यास करायला लागतो म्हणून राग आला होता. आता वाईट वाटलं आठवून. आई परत येईपर्यंत पार दमलेली असायची आणि आम्हाला कपडे वाळत घालायला सांगितले तरी आम्ही आळस करायचो. आता सानूला मला उलटी उत्तरं देताना पाहून वाटतं, माझ्याच पापाची फळं भोगतीय. दुसरं काय? तर ओढ्यावर पाण्यात पाय बुचकळायला, आईच्या सोबत अजून एक मैत्रीण यायची तिची, त्यांच्या मुलीसोबत खेळायला मजा यायची. कपडे धुण्यासाठी, एक त्यातल्या त्यात चांगला दगड असलेली जागा पकडायची चढाओढही आठवते, अंधुकशी.
      पाण्यावरून आठवलं, आमच्या दारात सरकारी नळ बसायच्या आधी रस्ता ओलांडून एका कॉमन नळावरून पाणी भरून आणायचो, प्यायचं फक्त. पण शाळा सुरु होण्याआधी मुलं दारातून जाताना दिसू लागली की मला घरातल्या अवतारात पाणी घेऊन यायची लाज वाटायची. आंघोळीला मात्र आम्ही विहिरीचं पाणी घ्यायचो. दादा खोल विहिरीत बदली टाकून आढ्याला ओढून भरलेली बादली वर काढायचे. प्रचंड जोर लागतो अशी बादली वर ओढायला. दोन लोक असतील तर दोघांचा ताळमेळही जमावा लागतो. आम्हांला शक्यतो ही कामं करून दिली नाहीत. तर त्या भरलेल्या बादल्या विहिरीवरून घराच्या मागच्या बाजूच्या मोरीत नेईपर्यंत हातांची वाट लागायची. नंतर दारात नळ आला, विहिरीवर मोटर लागली. बाथरूमच्या छतावर टाकीही आली. अनेक वर्षं दारातला तांब्याचा बंब मात्र चालू होता अगदी गेल्या एक दोन वर्षांपर्यंत. थंडीत त्या बंबात दादा काटक्या टाकून पेटवत असतांना आम्ही बाजूला उभे राहून शेकोटी करायचो.आमची शाळा ११-५ असायची. शनिवारी मात्र ८ ला शाळेत जायला जीवावर यायचं. अशा थंडीत इतक्या लवकर उठून त्या शेकोटीजवळ बसायची आणि आईने आवरण्यासाठी केलेली आरडाओरड आठवते. 
     हां तर कपडे. नंतर कधीतरी आमच्या घरी कपडे, भांडी या सर्वांसाठी बाई येऊ लागली. बहुतेक मी कॉलेजला सांगलीला गेले तेंव्हापासून असेल. कारण तिचं अस्तित्व फक्त मला ओझरतंच आठवतं. असं पहिली ओळख वगैरे काही आठवत नाही. त्यावरून आठवलं, मी पहिल्या वर्षी सांगलीला गेले कॉलेजला तेव्हा पहिले १५ दिवसांतच घराची ओढ लागली. मग एका शुक्रवारी दुपारी दांडी मारून आम्ही मैत्रिणी घरी जायचं ठरवलं. शुक्रवारी जाण्यात विशेष काय? खरंतर शनिवारी ट्रेनने गेले तर पॅसेंजरला बरंच कमी तिकीट असायचं, २० रुपये. तरीही न राहवून मी शुक्रवारी बसने गेले, तिकीट ५७ रुपये सातारा पर्यंत, पुढे कोरेगांव १०-१२ रु असेल. दुपारी घरी पोचले तर बाहेर आजोबांकडे शिकवणीला मुलं आलेली. आणि ओसरीवर ही बाई फरशी पुसत होती. मी रिक्षातून बाहेर पडून आबांच्या शिकवणीच्या मुलांमधून पळत, पुसत असलेल्या फरशीवरुन पळत जाऊन आईला मिठी मारली होती आणि खूप जोरात रडले होते. 
      तर कपडे. कॉलेजमध्ये मोजकेच ड्रेसेस होते. पहिले दोनेक वर्ष तर आठवड्याचे ५-६ च ड्रेस आणि घरी घालायचे कपडे. मग दर रविवारी ते भिजवून, धुवून, सुकवून घेणे हे मोठं कामच असायचं. एखाद्या रविवारी हे चुकलं की पुन्हा तेच कपडे रिपीट, म्हणजे बाकीच्यांना त्रास. :) त्यासाठी घरी गेलेलं परवडायचं. धुवून, अगदी इस्त्रीलाही देता यायचे. पुढचे दोन वर्षं अजून २-४ जास्त कपड्यांची भर पडली असावी पण एकूण ते ८-१० ड्रेस धुवेपर्यंत वाट लागायची. कपडे धुवायच्या दिवशी मी चुडीदारची पॅन्ट आणि एखादा टीशर्ट घालायचे. नंतर तीच फॅशन 'जब वी मेट' मध्ये करीनाची होती. तेव्हा वाटलं अरे आम्ही हे तर आधीच शोधलं होतं. या कॉलेजच्या दिवसांमध्ये माझ्या रूममध्ये मार्क वॉ आणि स्टीव्ह वॉचं पीटर इंग्लंडच्या जाहिरातीचं पोस्टर मी लावलेलं होतं. एकतर दोघे चिकणे होते म्हणून आणि मी म्हणायचे, माझ्या नवऱ्याचा वार्डरोब असा असेल तर माझा कसा असेल? असा वार्डरोब पाहिजे. आता कपडे आहेत, पण कपाट अजून थोडं मोठं हवंय असं वाटतंय. :)  
       मला कॉटनच्या, खादीच्या ड्रेसेसचं फार आकर्षण. नोकरी लागल्यावर मग सर्व कॉटनचे चुडीदार शिवून घेतले. आता हे धुणे म्हणजे मोठं जिकिरीचं काम. अनेकदा रंग जाऊ नये म्हणून दोन कपडे सुटे भिजवावे लागायचे. कुणी म्हणायचं, रंग जाऊन नये म्हणून मिठाच्या पाण्यात भिजवायचे. पण ते सर्व साफ खोटं. थोडे दिवस धुवून इस्त्रीही धोब्याकडेच करून घ्यायचे चोचलेही केले. पण ते काही टिकले नाही जास्त दिवस. मुंबईत, लखनवी कॉटनचे ६-७ ड्रेस होते. ते ड्रेस, त्यांच्या ओढण्या धुणे नाजूक काम असायचं. एकदा माझा एक ड्रेस दुसऱ्या ड्रेसचा रंग लागून खराब झाला. आजही तो आठवला तर प्रचंड वाईट वाटतं. मुंबईतून अमेरिका, कॅनडा वगैरे सुरु झाल्यावर मात्र एकूणच हाताने कपडे धुणे बंदच झालं. सान्वी झाल्यावर थोडे दिवस आईने तिचे कपडे धुतले होते. साड्या वगैरे मात्र जास्त काही हाताने धुतलं जात नाही. बरेचसे कपडे मशीनमध्येच धुतले जातात त्यामुळे फारतर वर्षातून अशी वेळ येत असावी.
         आता कधी कधी स्वतःच्या कपड्यांकडे पाहून आपण कुठून कुठे आलोय वगैरे फिलिंग येते. पण ती क्षणांपुरतीच. कारण पुढच्याच मिनिटाला, अजून नवीन काय काय घ्यायचं आहे याची आठवण होते आणि मग नव्याने खरेदीला जाते. :) आज हे सर्व त्या दोन रुमाल धुण्यावरून आठवलं. पुढच्या वेळी ते मशीनमध्येच टाकलेलं बरं. 

विद्या भुतकर.

Wednesday, July 04, 2018

स्वातंत्र्य सेलिब्रेट करावं म्हणतेय

चार जुलै ! आज अमेरिकेचा स्वातंत्र्यदिन.
बरंय, इंग्रजांमुळे भारत, अमेरिका, पाकिस्तान सारख्या आपल्या देशांना  मिळाला, स्वातंत्र्यदिन.
एक हक्काची सुट्टी.
स्वातंत्र्य, इतक्या सर्व लोकांना, एकदम, एकेदिवशी. कुणापासून? कशापासून?
म्हणजे भारतातल्या लाईट नसलेल्या एका खेड्यातल्या माणसाला त्या दिवशी कळलं असेल, आपण स्वतंत्र झालो म्हणून?
तर स्वातंत्र्यदिन नसेल तर काय? इंग्रज काय सेलिब्रेट करत असतील? त्यांच्या साठी तर हे सर्व दिवस म्हणजे एक हारच. असो. काहीतरी करतच असतील तेही.
बाय द वे, स्वातंत्र्य म्हणजे तरी काय?
आज इथे सहा महिन्यांच्या थंडीनंतर  कडकडीत ऊन पडलेलं आहे. बीचवर भल्या पहाटे आठपासूनच गर्दी. सुट्टीच्या दिवशी इतक्या लवकर कुणी उठून आवरून जातं का?
तर चार दिवस मिळणाऱ्या या उन्हाच्या झळा अंगावर घेण्यासाठी शक्य होईल तितके तोकडे कपडे घातलेल्या  पोरी.
स्वातंत्र्य म्हणजे काय?
आजूबाजूला छोट्या छोट्या मुलांचे हात धरून त्यांना आनंदात पाण्यात घेऊन जाणारे त्यांचे आईवडील. एखादी गरोदर बाई. तिच्या पोटात वाढणारं मूल. ते बाहेर येण्याआधी स्वतंत्र की बाहेर आल्यावर? ते बाहेर पडलं की बाई  'सुटली' असं आपल्याकडे म्हणतात. तर ते बाहेर आल्यावर बाई सुटली की अजून अडकली?
बीचवर वाळूत ओळीने लावलेले, विखुरलेले तंबू, त्यात रोवलेल्या खुर्च्या. आणि त्यांना पाण्यापर्यंत जोडणारी वाळू !
एक जोडपं मात्र अगदी पाण्याच्या आतपर्यंत खुर्च्या घेऊन बसलंय. पायांच्या वरपर्यंत येणारं पाणी. याच दोघांना बाकीच्यांसारखं दूर खुर्च्या टाकून बसावं का वाटलं नाही? न आखलेल्या रेषेच्या पलीकडे जाऊन का खुर्च्या टाकल्या त्यांनी?
विचारांच्या चौकटीतून बाहेर पडायचं स्वातंत्र्य आहे हे तरी कुठे माहित असतं आपल्याला?
माझ्यासारखे भारतीयही दिसत आहे आजूबाजूला, आपल्या कपड्यांच्या तुरुंगात अडकलेले. आपल्या सवयीचे कपडे घालणं स्वातंत्र्य की त्या सवयीत अडकणं म्हणजे तुरुंग?
जावं का आपणही सगळे कपडे उतरवून पाण्यात? मग विचार येतातच की, नवरा, बायको, मुलं, अगदी आजच भेटलेले मित्राचे आई वडीलही काय म्हणतील वगैरे.
स्वातंत्र्य !
पाण्यातून किनाऱ्याने चालताना पाणी एकदम थंड लागलं सुरुवातीला. सहा महिन्याचं बर्फ, थंडी पोटात घेऊन बसलेला समुद्र तो. थंड असणारच ना? पहिलं पाऊल ठेवलं तर करंट बसला. मग हळूहळू आत जाऊ तसं पायांना नवीन ठिकाणी नव्या थंडपणाच्या संवेदना. काही क्षणांतच त्याही कमी होतात. सवय होतेच माणसाला, सगळ्याचीच. अगदी किनाऱ्याकडे येणारं पाणीही उन्हासोबत जरासं तापायला लागतं.
हळूहळू किनारा धरून चालताना, बारीकशी लाट येतेय आतलं थंड पाणी घेऊन.
किनाऱ्यावरचं कोमट पाणी आणि आतून येणारं थंड पाणी, दोन्ही कुठेतरी मिसळतंय. त्यांना वेगळं करून पाहता येईल का? कुठलं थंड, कुठलं गरम? डाव्या पायाला लागेलेलं गरम, उजव्याला थंड?
शुभ्र पाण्यासोबत घरंगळत वाळू आत सरकत चाललीय पायाखालून. मधूनमधून ती सरकल्याची संवेदनाही तळपायांना. इतकं स्वच्छ पाणी आणि इतकी सुंदर वाळू. सोबत असूनही आपापलं अस्तित्व टिकवून राहणारे.
फक्त कुणी बोट टेकवण्याचा अवकाश, गढूळ करायला.
स्वातंत्र्य.
आत गेल्यावर मात्र सर्वच एकसारखं, त्या समुद्राला. समुद्राला असेल का स्वातंत्र्य? इतकं अजस्त्र असल्यावर कुठलं आलंय स्वातंत्र्य? उद्या आपल्या लाटा घेऊन कुठे निघून जायचं म्हटलं तरी कुठे जाणार तो? जितके मोठेपण जास्त तितकं अडकून पडणं. नाही का?
ते ऑस्ट्रेलियाच्या किनाऱ्यावर कॅप्टन कुक उतरला तेव्हा तिथले भटके लोक त्यांनी तिथे पाहिले. त्याने लिहिलं त्यांच्याबद्दल. त्यांची भटकंती इतकी की एखादी गुहा शोधून राहण्याचेही कष्ट घ्यायचे नाहीत. झोपडी बांधायचं तर राहूच दे. जितका व्याप कमी तितकी भटकंती सोपी.
स्वातंत्र्य.
तर या लोकांची मुलंही आईच्या दुधावर वाढायची ३-४ वर्षापर्यंत. का तर, असं भटकतांना लहान मुलाला पचणारं जेवण कुठे मिळणार? एखादं लुळं-पांगळं असेल, म्हातारा, आजारी असेल तर त्यालाही मागंच ठेवायचं.
इतक्या सहज सोडता येतं सगळं?
घर, गाडी, मुलं, नाती गोती, नोकऱ्या आणि काय काय.
विचंवासारखं पाठीवर घर घेऊन फिरता यायला हवं. पण मग भटकायचंच आहे तर घराची हाव तरी कशाला?
म्हणे स्वातंत्र्य, डोंबल.
हां, एक आहे. मी इथे असताना मनाने दुसरीकडे जाण्याचं स्वातंत्र्य. समोर सर्व असताना आतून एकटं असण्याचं किंवा एकटं असतानाही सोबत कुणीतरी असण्याचं.
विचार करायचं स्वातंत्र्य, मनातल्या मनात. पण ते मांडता येण्याचं? आणि लोकांची पर्वा नाही केली स्वतःच्याच आखलेल्या चौकटींचं काय?
स्वातंत्र्य, मर्यादित स्वातंत्र्य.
आज इथे सगळे ग्रिलिंग, बारबेक्यू करतायंत. सोबत कलिंगड. आपल्याकडे जिलेबी आणि मठ्ठा. पाकिस्तानात काय असेल? असो.
मीही स्वातंत्र्य सेलिब्रेट करावं म्हणतेय. आपल्या मर्यादित स्वातंत्र्यात हे लिहिता येतंय हे तरी कमी आहे का?

विद्या भुतकर. 

Monday, July 02, 2018

आठवणी-साठवणी

मी सहावी/सातवीत असताना एकदा वाढदिवसाला वर्गात मुलांना द्यायला कुठल्या तरी लिमलेटच्या गोळ्या आणल्या होत्या. मोठं पाकीट होतं. शाळेत देऊन उरलेलं घरी घेऊन आले. आईने ते एका कपाटावर ठेवलं. आम्हांला ते माहित असल्याने आम्ही बहिणी रोज एक दोन करत बऱ्याच खाऊन  गेलो. आईने एक दिवस आम्हालाच देण्यासाठी ते काढलं तर जवळ जवळ संपलेलंच. आधी वैतागली मग म्हणाली जाऊ दे, आता काय परत मिळणार नाहीत. म्हणून आहेत त्याही संपवून टाकल्या.
आज सकाळी पोरांचा डबा भरण्यासाठी फ्रिजमधून चेरी टोमॅटोचा बॉक्स काढला. गेल्या दोन तीन दिवसांत सानूने एकेक करत जवळ जवळ संपवले होते. मोजून ८-१० राहिलेले. संदीपने ते दाखवलं तेव्हा आईची आणि त्या गोळ्यांची आठवण झाली. म्हटलं, "जाऊ दे. उरलेले स्वनिकला देऊन टाक."
माझ्या गोळयांपेक्षा हिचे टोमॅटोच बरे ना? :)

विद्या.

Sunday, July 01, 2018

चरम सुख

      परवा नेटफ्लिक्स वर 'लस्ट स्टोरीज'  पाहिला/पाहिल्या. होय, पाहिल्या आणि आवडल्याही. त्यावर लिहायचं होतं, पण मग नेहमीसारखं, 'लोक काय म्हणतील?' सारखे फडतूस विचार येतात. त्यामुळेच हे लिहायलाही ८-१० दिवस गेले. आता पोस्ट करायचं की नाही हा विचार करायला अजून काही. असो. तर लस्ट स्टोरीज, आवडल्या. चारही ! वेगवेगळ्या कारणांसाठी. बांधलेल्या नात्यांतून बाहेर पडून सुख शोधण्याच्या प्रयत्न करणाऱ्या, जीवाची तगमग दाखवून देणाऱ्या. त्यात 'लस्ट' कुठे दिसलीच नाही. उलट एकेक जीवाला चटका लावणारी.
      तर त्या स्टोरीतली, त्यातली सर्वात शेवटची होती ती टिपिकल लग्नातल्या जोडप्याची. करण जोहरची. तसं पाहिलं तर बाकीच्या तीन मला जास्त आवडल्या. चौकटीतल्या नात्यांना डावलून असलेल्या. ही त्यामानाने टिपिकलंच. आणि शिवाय 'वीरें दी वेडिंग' मधल्या स्वरा भास्करच्या 'चरम सुख' चा सीनही चर्चा करून झालेला. त्यानंतर पुन्हा त्याच विषयांवर असलेली ही गोष्ट पाहण्यात विशेष काही वाटलं नाही. आपणही बोलणं किंवा लिहिणं गरजेचं आहे का असं  वाटलं. पण खाज, दुसरं काय. 
     तर असतं काय या गोष्टीत, विकी कौशल, आपला साधा भोळा भारतीय पुरुष. बायको एकदम सुंदर. सुहाग-रात च्या वेळी जो त्याचा रतीब सुरु होतो, तो इतर नवीन जोडप्यांप्रमाणे मजेत चालू असतो. बायको बिचारी हातांची पाच बोटं मोजेपर्यंत याचं काम झालेलं. त्याचं काम झालं की हा झोपणार डाराडूर. बायको समजावण्याचा प्रयत्न करते, पण याला कुठे काय समजतंय? शिवाय हा बायकोला म्हणतो, "तुझी पण मजा चालूय". इकडे बायको फ्रस्ट्रेटेड. तर एकूण सर्व प्रकार बघायला एकदम मजेशीर. खूप हसले बघताना. पण मूळ मुद्दा जरा जास्त गंभीर आहेच. 
      संभोग! आपल्याकडे यात किती स्त्रियांना यात भोग मिळतो? सुख मिळतं? पुरुषांचं बरं आहे, समोर दिसतोही पुरावा. शिवाय नसेलंच बाई किंवा बायको तरीही सेल्फ हेल्प वगैरे असतेच. आपला हात. पण बाईचं काय? तिलाही या सुखाची इच्छा असते. ती तितकीशी सहज समजण्याइतकी सोपी नाही, पण आयुष्याचा साथीदार म्हणून ते समजून घ्यायची काही गरज वाटते की नाही? अगदी, लग्नाआधी एकमेकांचे चांगले मित्र असले तरीही नवरा बायको या विषयावर स्पष्टपणे बोलतात की नाही मला शंका आहे. आता शंका म्हणतेय, कारण मी काही कुणाला विचारायला गेले नाही. (अर्थात तसा सर्व्हे करून बघायला हरकत नाही. ) 
       तर मला वाटतं की दोघांनी एकमेकांशी स्पष्टपणे या विषयावर बोलण्याची, संवाद साधायची गरज असते. गरज आहे. आपण, स्त्रियांना समान हक्क वगैरे साठी लढतो. पण माणसाच्या या मूलभूत गरजांमध्येच नवरा-बायकोत संवाद नसेल तर काय उपयोग? मी तर म्हणते, प्रत्येक बाईने भांडायला हवं आपल्या या हक्कासाठी. नाहीतर, असा दानधर्म किती दिवस करत राहणार? आणि त्यामुळेच मला वाटतं की एकदा मुलं झाली की संभोगातला भारतीय स्त्रियांचा रस अजून कमी होत असावा. त्या स्टोरी मध्ये सासू म्हणते तसं,"जब हो जाये बरकत, क्यों करनी कसरत". जाम हसले या वाक्यावर. पण ज्या कामात आपल्याला काही मिळतंच नाही ते करणार तरी किती दिवस? तर माझं म्हणणं इतकंच, आजवर कधी बायको म्हणून नवऱ्याला पुढे होऊन आपल्याला संभोगात काय हवं हे सांगितलं नसेल तर सांगावं आणि नवरा म्हणून एखाद्याने विचारलं नसेल तर त्याने स्वतःहून विचारावं. कारण नाही म्हटलं तरी, प्रत्येक नात्यात देवाण घेवाण ही असतेच. मग ती अशी नीट बोलून होत असेल तर का नको?
आणि हो, बाकी लस्ट स्टोरीज बद्दल पुन्हा कधीतरी. 
विद्या भुतकर.