Saturday, April 14, 2018

स्विमिंग

     आज या सिझनची पहिली रेस, ५K. माझी नाही, मी बरी असते तर माझीही. संदीप गेला रेसला, कधीतरी पहाटे एकटाच. आणि इतक्या दिवसांत आपल्याला पळता येत नसल्याचा सर्वात जास्त त्रास झाला. आयुष्यात काय गमावलं हे कळलं की जास्त त्रास होतो. तर एरवी आम्ही दोघेही जाणार असू तर ही रेस म्हणजे नुसतं पळणं नसतं. आदल्या दिवशी ठरवून ठराविक एक भाजी, पोळी, वरण भात जेवायला बनवणं, रेसचे बिब उद्या घालायच्या कापडयांना लावून ठेवणं, मुलांचं काय करायचं त्यानुसार त्यांना कुणाकडे सोडून येणं आणि तिथे रेसच्या जागेपर्यंत पोहोचणं हाच एक मोठा प्रवास आणि प्रत्येकाने एकदा तरी घ्यावाच असा अनुभव असतो. हे सगळं करु शकत नाहीये याचं वाईट वाटतंय. बाहेर हजारो लोक पळत असतील आता. संदीप पळायला गेला आणि मी घरात निवांत झोपलीय, यात काय मजा? असो. 
         गेल्या काही दिवसात बाहेरची थंडी कमी व्हायला लागली आणि माझ्या पायाला खाज सुटायला लागली. बाहेर पळणारे लोक पाहून आपणही क्षणात शूज घालून, जोरात पळत सुटावं असं वाटू लागलं. जीव तोडून, धाप लागेपर्यंत, श्वास थांबेपर्यंत  पळावं वाटू लागलं. पण तीन महिन्यापूर्वीची अजून एक गोष्ट आठवली. जेव्हा काहीच जमत नव्हतं, तेव्हा वाटायचं 'फक्त नीट चालता येऊ दे'. बाकी काही नाही जमलं तरी चालेल. पण मग मिळालंय त्यात समाधान मानलं तर माणूस काय ना? असो, हाफ मॅरॅथॉन नाही तर निदान १० किमी तरी नक्की जाईन पुढच्या वर्षीपर्यंत असं ठरवलंय. बघू काय होतं. 
          या दरम्यान अजून एक गोष्ट सुरु झाली. डॉक्टरांनी पाठीसाठी पोहायला जायला सांगितले. मी पोहायला वयाच्या २६ नंतर शिकले. गावात कधी शिकायचं प्रश्नच आला नाही. जेव्हा शिकले तेव्हाही खूप काही चांगलं येत नव्हतंच. मग पुण्यात असताना एका ठिकाणी क्लास लावला. रोज सकाळी ५.३० चा क्लास. एकतर उठणं अवघड आणि त्यात जाऊन थंड पाण्यात डुंबायचं म्हणजे अजून चिडचिड. पण सलग २१ दिवस एकही क्लास न बुडवता जेव्हा तिथे गेले तेव्हा पोहायला येण्यापेक्षा आपण रोज तिथे पोहोचलो याचंच कौतुक जास्त होतं. तर पोहायला पुण्यात परत शिकले. मजा आली होती. 
        त्या शिकण्याचा आता फायदा झाला. खूप भारी नाही निदान कामापुरतं तरंगता येतं. पाठीच्या सर्जरीनंतर पायातली ताकद जवळजवळ गेलीच होती. एरवी १० किलोमीटर निवांत पळू शकणारी मी १ किमी नंतरच दमत होते. साधं चालताही येत नव्हतं इतकं सलग. त्यामुळे परत पायातली ताकद वाढवण्यासाठी पोहायला जात आहे गेले काही दिवस. आणि माझ्या एक गोष्ट लक्षात आली. ती म्हणजे, केवळ पळणंच असं नाही, मला हे पोहोतानाही खूप भारी वाटत होतं. दोन-तीन वेळा वॉटर ऐरोबिक्स च्या क्लासला गेले होते. सगळ्या ६० वर्षाच्या पुढील स्त्रिया तिथे होत्या. त्या क्लासमध्येही खूप मजा आली होती. एकतर मोठ्याने लावलेली गाणी आणि त्या आवाजात केलेला व्यायाम. आणि सर्वात मुख्य म्हणजे घरात सोफ्यावर बसून टीव्ही न बघता आणि इथे चार लोकांसोबत येऊन त्या ग्रुपचा एक हिस्सा बनलोय हे जास्त आवडलं होतं. 
        पहिल्या आठवड्यात पायाची वाट लागली होती. अगदी साधे व्यायाम केले पोहोण्याचे तरी पायांना ते झेपत नव्हतं. हळूहळू करत पायांची हालचाल वाढली, अंतर वाढवत आता पूर्ण लॅप सलग पोहता येऊ लागलंय. धाप लागते, हात पाय दुखतात, घरी आल्यावर दमायला होतं. पण आपण तिथे जातोय आणि जे काही आपल्याला जमत नाहीये त्यासाठी प्रयत्न करत राहतोय ही कल्पना खूप भारी वाटते. रोज काहीतरी नवीन ध्येय असतं पुढे पोहचण्याचं. आणि ते पार पडलं की आपण जग जिंकल्याचा आनंद होतो. याच पोहोण्यातून बरं होऊन परत पळायला लागायचंय. आपल्या त्रासाच्या दिवसांत याच स्विमिंगने मदत केली होती हे विसरणार नाही. :) बरेच दिवस लिहायचं होतं. आज रेसच्या निमित्ताने जमलं. :) 
तुमचं रोजचं ध्येय काय असतं? 

विद्या भुतकर. 
https://www.facebook.com/VidyaBhutkar1/

Wednesday, April 11, 2018

बॉस्टन

आजूबाजूला पाहिलं की जाणवतं सगळं रिलेटिव्ह आहे. रिलेटिव्हला मराठी शब्द आठवत नाहीये आज. तर म्हणत होते, रिलेटिव्ह म्हणजे काय, की प्रत्येक वस्तू, व्यक्ती, जागा, यांत खरं काय असतं? समजा, समोर संत्रं धरलं, आंबा धरु, आजकाल पुण्यात आंब्याचे जोक खूप एक्स्पोर्ट होऊन इकडे येत आहेत. तर एक आंबा हातात धरुन म्हटलं की 'हा आंबा आहे' . ते सत्य. पण ती वस्तुस्थिती सोडली तर बाकी सगळं संदर्भावर असतं. त्याचे गुणधर्म वगैरे ठीक आहे. पण तो कधी खाल्ला, कुणासोबत खाल्ला, त्याने काय झालं याच्या गमती जमती यात सगळं असतं, नाही का? 
        गेल्या १४ वर्षात वेगवेगळे देश आणि तिथली शहरं पाहिली. काही जवळून तर काही दुरूनच. गेले तीन वर्षं झाली मुक्काम बॉस्टनमध्ये आहे. खरंतर पुण्यात दोन वर्षं राहून इकडे आल्यावर सुरुवातीला इथलं काहीच आवडत नव्हतं. ऑफिससाठी रोज करावा लागणारा लांबचा प्रवास, बस-ट्रेनमधून जाणे, त्यासाठी होणारी पळापळ, त्यात थंडीत बर्फ आणि उन्हाळ्यात दमट वातावरण. एकूणच कंटाळवाणं वाटायचं. मध्ये थोडे दिवस घराजवळच ऑफिसला जात होते. आता सोमवारपासून नवीन नोकरी सुरु झाली. पुन्हा एकदा बॉस्टन डाउनटाउनला जायला सुरुवात केली आणि खूप काही जाणवलं. एखादं शहर आपल्याला आपलंसं कधी करुन घेतं कळत नाही, खरंच.
         सोमवारी सकाळी मुलांना शाळेत सोडून स्टेशनकडे जायला निघालो आणि नेहमीच्या गर्दीची जाणीव झाली. त्यातून काढायचा रस्ता, डोळ्यांवर येणारं ऊन आणि एकाच ठिकाणावरुन दिसणारी बॉस्टनची स्कायलाईन. ट्रेनमध्ये बसण्यासाठी जिन्यावरुन पळत जाणं. तिथेच कुठलं ना कुठलं वाद्य वाजवत असलेला माणूस. ट्रेनच्या अनाऊन्समेंट आणि आत बसल्यावर तिथले सीट, त्यांच्यावर बसणारे लोक, त्यांचे निरनिराळे वास, त्यांच्या हातातील फोन्स, कानाला लावलेल्या वायरी, हातातले पेपर, किंडल्स, पुस्तकं तर कुणाच्या हातात कधीतरी दिसणारं भरतकाम-विणकामही. आपणही मग आपल्या कानांत गाणी अडकवून बसणं, पायात बॅग, डब्याची पिशवी सांभाळणं. हे सगळं सोमवारच्या एका दिवसांत डोळ्यांसमोर आलं. 
         सगळ्यांत महत्वाचं म्हणजे एका स्टेशनवरुन दिसणारी केम्ब्रिज आणि बॉस्टनची स्कायलाईन. १६०० साली कधीतरी ब्रिटिशांनी हे गाव वसवलं. त्याच्याशेजारचेच केम्ब्रिजही. या दोन शहरांना वेगळं करते ती मध्ये असलेली चार्ल्स नदी. नदीवरच्या पुलावरुन ट्रेन जाताना दोन्ही बाजूला ही शहरं दिसतात. त्या स्टेशनवर आल्यावर आपण इतके दिवस काय मिस करत होतो हे जाणवलं आणि तो व्ह्यू पाहून दिवस सुखावला एकदम. पुलावरच बाजूला पादचारी मार्ग आणि गाड्यांचाही रस्ता आहे. त्या पादचारी मार्गावरुन हमखास कुणी ना कुणी पळत असतंच. ते आणखी एक खास वैशिष्ट्य. कितीही थंडी, पाऊस असो असा पळतांना कुणी पाहिला की आपणही पळायची इच्छा होते. इथे आल्यापासून अनेकदा, बर्फ, थंडीमध्ये लोकांना बाहेर पळतांना पाहिलंय. कदाचित त्यामुळेही हे शहर जास्त आवडलं असेल. जिथे तिथे दिसणारे पार्क्स आणि त्यातून पळणारे लोक. असो. 
        स्टेशनमधून बाहेर पडल्यावरही बॉस्टन कॉमन्सचं पार्क किंवा ठराविक साच्यातल्या जुन्या इमारती, त्यांत असलेली छोटी छोटी रेस्टॉरंट्स आणि ऑफिसच्या कपड्यांमध्ये झपाझप एका वेगाने जाणारी गर्दी. त्यातून येणारे कॉफीचे वास. हे सगळं पाहून सकाळचा आपलाही वेग आपोआप वाढतो. हीच गर्दी दुपारी निरनिराळ्या फूड ट्रक्सवर जेवताना दिसते. ते फूड ट्रक्सही खासच, रोज वेगवेगळे. कधी कधी ऑफिसमध्ये असताना दुपारी मी उगाच खिडकीतून बाहेर बघत बसायचे, अजूनही बसते. या शहराचं रूप बघायला. ऊन, बर्फात तर कधी पावसांत. प्रत्येकवेळी निराळं. 
         तर हे असं सगळं रिलेटिव्ह. 'बॉस्टन' नावाचं एक शहर आहे ही वस्तुस्तिथी झाली. पण त्यातून मला काय दिसतं, वाटतं, त्या काळात मी कुठलं गाणं ऐकते, कुठे बसून मी काय जेवते, तिथे कोण माझे मित्र मैत्रिणी आहेत, तिथल्या थंडीत कुठले कपडे घालते, इथे राहताना मी कुठल्या महत्वाच्या घटनांतून जाते आणि हे सगळं करत असताना हे शहर मला कसं दिसतं यावर माझ्यासाठी 'बॉस्टन' म्हणजे काय ते ठरतं. अर्थात प्रत्येक गावाचं तसंच असतं म्हणा, आज या निमित्ताने तेही लक्षात झालं. 

विद्या भुतकर. 
https://www.facebook.com/VidyaBhutkar1/

Tuesday, April 03, 2018

प्रेमपरीक्षा

'हजारो ख्वाहिशें ऐसी......'. माणसाच्या आयुष्यात अनेक अधुरी स्वप्नं, आकांक्षा असतात, काही पूर्ण होतात तर काही अस्तित्वात आहेत हेही आपल्याला माहित नसतं. मागच्या वर्षी मी 'प्रेमपरीक्षा' ही पत्रमालिका लिहायला सुरुवात केली. तेव्हा फक्त एकच इच्छा होती, कुणाला तरी पत्रं लिहायची. पण ती इच्छा हळूहळू एक कुतूहल आणि मग एक आव्हान बनली. कारण पत्रातून एक आयुष्य उभं करायचं. त्या पात्राच्या अवतीभवती होणाऱ्या सर्व गोष्टी पत्रातूनच व्यक्त करायच्या आणि तरीही कथानक कुठेही थांबू द्यायचं नाही, हे आव्हान. जेव्हा पत्रमालिका संपली तेव्हा एक सुंदर गोष्ट बनली होती. 
        तरीही हे कुणाला पुस्तक म्हणून वाचायची इच्छा असेल असं कधी वाटलं नव्हतं. विक्रमनी जेव्हा मला विचारलं पुस्तकाबद्दल मी अजूनही साशंक होते, हो म्हणाले तरीही. पण ज्या दिवशी या पुस्तकाचं कव्हर मला दिसलं, त्यावर कथेचं नाव आणि खाली माझं, माझ्या लक्षात आलं की मनात कुठेतरी ही इच्छाही होतीच. आपलं एखादं पुस्तक प्रकाशित करण्याची. आणि ती किती तीव्र इच्छा होती हे ते कव्हर पाहिल्यावर जाणवलं. आज हे पुस्तक तुम्हासर्वांसमोर सादर करताना खूप आनंद होत आहे. ही पत्रमालिका प्रसिद्ध केल्याबद्दल आणि मला कायम साथ देत राहिल्याबद्दल 'न लिहिलेली पत्रे' (https://www.facebook.com/NaLihileliPatre/)  चे अनेक आभार. 

"प्रेमपरीक्षा" !! तुम्हां सर्व वाचकांचे खूप खूप आभार, मला आजवर इतकं प्रेम दिल्याबद्दल. पुस्तकाच्या भारतातील आणि अमेरिकेतील लिंक देत आहे. तुम्हांला आवडेल अशी अपेक्षा. 

भारतातील लिंक:  https://www.amazon.in/%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%AE-%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%BE-Prem-Pariksha-Marathi-ebook/dp/B07BVPFLJC/ref=sr_1_1?s=digital-text&ie=UTF8&qid=1522760643&sr=1-1

अमेरिकेत: https://www.amazon.com/dp/B07BVPFLJC/ref=cm_cr_ryp_prd_ttl_sol_0


धन्यवाद, 
विद्या भुतकर.