Thursday, September 29, 2016

दुधात साखर.....

      पुण्यात असताना संध्याकाळी ऑफिसचं काम घरून चालू असायचं. कधी कधी आमच्या सोबत मुलांनाही मग थोडा अभ्यास देऊन जरा कामाला लावायचो. एकदा काम चालू असताना रेडिओवर गाणी लावून ठेवली होती. मग एकाच टेबलच्या आजूबाजूला आम्ही चौघे आणि मध्ये रेडिओचा स्पीकर असे चित्र होते. ते अगदी माझ्या कोरेगावच्या घरातून इथे २५ वर्षांनी कॉपी केल्यासारखे वाटले. दादा पेपर वाचत आहेत, आईचे काही काम चालू आहे. आम्ही अभ्यास करत गाणी ऐकत बसलो आहे. अगदी अगदी असेच. :) एकदा सानू म्हणालीही, 'गाण्यांमुळे माझा अभ्यास फास्ट होत आहे.'  मनात आले, 'एकदम आईवर गेलीय'. :) मीही अनेकदा महत्वाचे काम असेल आणि एकदम लक्षपूर्वक करायचे असेल तर ऑफिसमध्ये सुद्धा कानात गाणी लावून बसते. कधी एखादं गाणं ऐकण्यासाठी काम थांबवते, कधी गाणं थांबवून एखादं वाक्य पूर्ण करते. पण एकूण बरंच काम लवकर होते.
       आजकाल गाना.कॉम वर नियमित गाणी ऐकली जातात. बॉस्टनमध्ये दुसरा कुठला हिंदी रेडिओ नसल्याने तोच एक पर्याय असतो. बरीच गाणी परत परत लागल्यामुळे काही काही गाण्यांचे संगीत सुरु झाले की लगेच स्वनिक सांगतो कुठले गाणे आहे ते. कधी तो त्याच्या आवडीचे गाणे लावायला सांगतो मग सानूच्या आवडीचे गाणे. मधेच एका गाण्याच्या वेळेला स्वनिकला आठवत नाही ते गाणं कुठलं आहे ते. तो फोनवर शोधू लागतो. त्यावर गाण्याचे नाव बघूनच त्याला शान्ती मिळते. :) अशा क्षणी वाटतं आपले जीन्स/गुणसूत्र जे काय असतं कसं बरोबर उतरतं मुलांत, नाही? :)  हे सर्व सांगायचं कारण म्हणजे नियमित गाडीत रेडिओ ऐकायची सवय झाल्याने मुलांमधील आमच्यासारखे काही गुण आम्हाला तर दिसलेच. पण त्यांनाही आपल्याला काय आवडते, कुठले गाणे आवडत नाही याची जाणीव होऊ लागली. कधी 'बेबी को बेस पसंद है' ऐवजी हायवे मधलं 'माही वे' किंवा एक व्हिलन मधलं ''तेरी गलियां' ऐकतात तेव्हा ते संगीताकडेही लक्ष देत आहेत अशी जाणीव होते आणि आनंद होतोच. 
     आजकाल असेही होती की आवडते गाणे पटकन फोनवरून शोधून लगेच बघायचा हट्ट करतात. मी अनेकदा त्याला नकार देते. म्हणते, 'रेडिओ लावला आहे, त्यावर जे गाणे येईल ते ऐकायचे'. त्यावर कुरबुर ऐकू येते. पण मी त्यांना समजावून सांगते की 'जर तुम्ही तेच तेच गाणे ऐकले तर नवीन गाणी कशी कळणार?'. एखादं गाणं चालू असताना मी सोबत गुणगुणायला लागले कि त्यांना आश्चर्य वाटतं मला ते कसं माहित याचं. मग मी सांगते, 'मी अशीच सर्व गाणी ऐकलीत त्यामुळे मला जास्त गाणी माहित झालीत'. 
        आजच घरी परत येताना स्वनिक गाणं बदलायचा हट्ट करत होता. पण मी नाही म्हणाले म्हणून त्याला गप्प बसावं लागलं आणि पुढचं गाणं त्याच्या आवडीचं लागल्याने त्याला प्रचंड आनंद झाला. मी म्हटलं,"पाहिलंस, तू मला गाणं बदलायला लावलं असतं तर तुझं आवडीचं हे गाणं तुला ऐकायला मिळालं असतं का?'. इंटरनेट मुळे हवं ते गाणं ऐकायची कितीही चांगली सोय असली तरी, रेडिओवर आपल्या आवडीचं गाणं अचानक लागल्याचा आनंद वेगळाच असतो, नाही? तो मला आजपर्यंत अनेकदा मिळाला आहे. मग त्यांनाही तो मिळवायला शिकायला नको का? प्रत्येकवेळी आपल्या आवडीचं गाणं लागतंच असं नाही. पण नको असलेलं गाणं ऐकायलाही शिकलेच पाहिजे ना? कोण जाणो तेही आवडीचं बनून जातं किंवा निदान माहित तरी होतं. आणि त्याच्यामध्येच आवडीचं लागलं तर? मग काय दुधात साखरच !!

विद्या भुतकर.

Tuesday, September 27, 2016

पोरं म्हणजे...... उपदव्याप

         काल एकतर सोमवार त्यामुळे ऑफिसमधून घरी येऊन सगळी रोजची कामं करायची या विचारानेच वैतागलेला जीव. त्यात जरा वेळ रनिंग करायचं होतं. सुदैवाने डोशाचे पीठ तयार असल्याने, पळून आल्यावर पटकन पोरांना डोसे करून द्यायचं ठरवलं आणि पळायला घरातून बाहेर पडले. पोरं संदीपसोबत लेगोचे छोटे ब्लॉक्सचा ट्रक बनवत बसले होते. पळायला सुरुवात करून पाच मिनिटं झाली आणि संदीपचा फोन आला. 'इतक्यात काय झालं?' म्हणून मी फोन उचलला तर मागून स्वनिकचा रडण्याचा आवाज येत होता आणि संदीप म्हणाला, 'घरी लवकर परत ये स्वनिकने नाकात लेगो चा ब्लॉक घातलाय'. त्याच्या आवाजानेच मला काही सुचेना. मी जोरात म्हणाले 'कॉल ९११' आणि जमेल तितक्या वेगाने पळत घरी यायला लागले. 
         आता विचार करा, घरापर्यंत पोहचेपर्यंत माझ्या डोक्यात इतके विचार येऊन गेले. त्यात अजूनही पोलीस किंवा ऍम्ब्युलन्सचा आवाज येत नव्हता. पुढचे तीन मिनिटं मी जीव तोडून पळाले. घरी पोचले तर स्वनिकच्या नाकातून रक्त येत होतं आणि तो रडत होता. ऍम्ब्युलन्स आली आणि मग मी त्याला घेऊन आत बसले. संदीप मागून गाडीतून  येऊ लागला. स्वनिक आता थोडा शांत झाला होता. आत आमच्या सोबत असलेल्या पॅरामेडिकला जमेल तशी हळू आवाजात बऱ्यापैकी उत्तरं देत होता. त्याच्यासोबत हॉस्पिटलला पोचले. तिथे 'कसं झालं हे?' या प्रश्नाचं उत्तर द्यायला लागणारच होतं. आता खरंतर स्वनिक बराच समजूतदार मुलगा आहे आणि हे कसं झालं असावं हा आम्हालाही प्रश्नच पडला होता. पण नर्सला जेव्हा उत्तरं द्यायला लागतो तेव्हा असं वाटतं, एक पेरेंट म्हणून ते आपल्याबद्दल काय विचार करत असतील? तिला कसं सांगणार की संदीप तिथे त्यांच्यासोबतच बसला होता तरीही हे असं घडलं? कधीतरी दोन मिनिटात हे घडलं होतं. आपण कितीही सावध असलो तरी एखादी घटना घडून जातेच, नाही का? 
        नर्सने मला विचारलं, 'तुम्ही ९११ का कॉल केला? त्याला श्वास घ्यायला त्रास होत होता का?'.  म्हणजे पेरेंट म्हणून आपण घाईत जरा जास्तच घाईत निर्णय घेतला की काय असेही वाटू लागते. पण त्या क्षणाला आई-वडील म्हणून जी भीती असते त्याच्यापलीकडे कसलाही विचार मनात येत नाही. नंतर कितीही ते योग्य किंवा अयोग्य वाटले तरीही. सान्वीचाही सायकलवरून पडून एकदा हात फ्रॅक्चर झाला होता. तेव्हा मी थोडी शांत राहिले होते की हाताला कास्ट घालतील आणि निघून जाऊ. पण जेव्हा तिला आमच्यासमोर डॉक्टरनी भूल दिली तेव्हा मात्र माझा संयम ढळला होता आणि रडू फुटलं होतं. त्यामुळे कुठलाही प्रसंग कमी लेखायचा नाही हे कळलं होतं. असो. 
      स्वनिकची सर्व माहिती भरून बेड मिळाला. रूममध्ये घेऊन गेले तोवर संदीप आलाच होता मागून. बेडवर बसलेला स्वनिक पाहून वाटत होतं की एरवी 'बिग बॉय' आहेस ना म्हणून त्याच्याकडून मोठेपणाच्या ज्या अपेक्षा आम्ही ठेवतो त्यापेक्षा किती छोटा आहे तो? त्याच्याच बाबतीत नाही, सानूच्या बाबतीतही तिच्याकडे पाहून असंच वाटलं होतं. आपल्या मुलांकडून समजूतदारपणे वागण्याची किती अपेक्षा करतो आपण? अशा संकटप्रसंगी ते किती लहान आहेत ती याची जाणीव होत राहते. नाही का? त्यांच्या घाबरलेल्या किंवा रडून थकलेल्या चेहऱ्याकडून पाहून अजूनच वाईट वाटायला लागतं. त्यात काही खाल्लंही नाही, उपाशी तसेच आहेत म्हणलं की चेहरा अजून छोटा होतो. 
 
       स्वनिकला आम्ही विचारलं कसं काय झालं हे? तर तो म्हणत राहिला की 'चुकून गेला'. अशा वेळी काही जास्त विचारताही येत नाही. पण ब्लॉक्स खेळताना मधेच तो २-३ मिनिट जागेवर नव्हता तर संदीपने त्याला विचारलं,'तू स्वतः ते काढायचा प्रयत्न केलास का?' तर तो 'हो' म्हणाला. म्हणजे आपल्याला रागवायला नको म्हणून त्याने स्वतःच ते काढण्याचा प्रयत्न केला असणार. आता अशा वेळी त्याला कसं सांगणार की 'आम्ही नाही रागावणार तुला, पण तू आधी आई-बाबांना' सांगायचं जे काही झालं असेल ते? बरं त्यासाठी म्हणून मग कायमच प्रेमाने सांगायचं का पोरांना? रागावून सांगायचे प्रसंग येतच असतात. त्यांच्यापासून हे वेगळे कसे करणार? आम्ही त्याला समजावून सांगितलं की तू आमच्याकडे आधी आला असतास तर नसते झाले हे सर्व. त्याच्यासोबत सान्वीलाही समजावले.तीही शांतपणे जमेल तशी मदत करतच होती. 
      साधारण पाऊण-एक तासाने डॉक्टर आले. त्यांनी चेक केले आणि हवेच्या पंपाने तो लेगोचा तुकडा ओढून निघेल असा प्रयत्न करून बघू म्हणून सांगितले. आणि नाही जमले तर एका बारीक वाकलेल्या लांब काडीने आतून ओढून काढायचा प्रयत्न करू असेही सांगितले. आता तेही यशस्वी झाले नाही तर मात्र काय हे विचारायची माझी हिम्मत नव्हती. सानूसमोर हे नको म्हणून मी तिला बाहेर घेऊन गेले. थोड्या वेळाने डॉकटर बाहेर आले आणि त्यांनी सांगितले की तो तुकडा निघाला. तर सक्शन पंपाने ते निघाले नाही म्हणून त्यांनी तार घालून पटकन बाहेर काढले. हे ऐकून मी सुटकेचा निश्वास सोडला. संदीप त्यांच्याशी बोलत असताना, मी स्वनिकशी बोलत होते. तो मला म्हणाला,'मला दुखलं नाकात ते काढत असताना. पण मी रडलो नाही. एकदम ब्रेव्ह बॉय सारखा काढून घेतला.' हे ऐकून मात्र मला रडू फुटलं. खरंच कळत नाही काय करायचं या पोरांचं? 
      आई-वडील म्हणून आपल्यासमोर छोट्या-मोठ्या समस्या येतच असतात. पण अशा प्रसंगी मात्र खरंच कसोटी लागते. नियमितपणे मुलांना योग्य काय, अयोग्य काय हे समजावणे, शिवाय त्यांचा विश्वासही मिळवणे, काही चुकू नये म्हणून त्यांच्यावर लक्ष ठेवणे आणि लक्ष असूनही चुकलंच काही तर घाबरून न जाता योग्य निर्णय घेणे हे म्हणजे अग्निपरीक्षा आहे रोजची. अशा अजून किती असतील काय माहित? आम्ही लवकरच घरी येऊन मुलांना जेवायला देऊन झोपवून टीव्ही बघत बसलो. रुटीन पुन्हा सुरु झालं होतं. आणि आज......पुन्हा एकदा तेच लेगो ब्लॉक्स घेऊन संदीप त्यांच्यासोबत उरलेला ट्रक बनवत आहे. आणि हो, नाकातून बाहेर काढलेला तुकडा डॉक्टरने फेकून का दिला म्हणून स्वनिक कालपासून आमच्याशी वाद घालत आहे. आता काय करायचं? पोरं म्हणजे खरंच उपद्व्याप असतात एकेक.....पण शेवटी झालेल्या गोष्टी मागून टाकून पुढं जायला तर लागतंच..... होय ना? 

विद्या भुतकर.

Monday, September 26, 2016

Sunday, September 25, 2016

बोलायला पैसे पडत नाहीत!

          माझं कामच असं आहे, प्रश्न विचारण्याचं. मी बिझनेस ऍनालिस्ट म्हणून काम करते. त्यात करायचं काय असतं? तर एखाद्या नवीन किंवा जुन्याच सॉफ्टवेरसाठी त्याच्या यूजर्सच्या ज्या काही मागण्या आहेत, अपेक्षा आहेत ते सर्व समजून घ्यायचं, लिहायचं आणि पुढे डेव्हलपर्स आणि टेस्टर्सना समजवायचं. बरं ते तिथे थांबत नाही, पुढे जाऊन आपण जे काही समजून घेतलंय तेच क्लायंटला मिळालं का नाही हे तपासून पाहणे. आता या सर्वात महत्वाची गोष्ट असते ती म्हणजे 'प्रश्न विचारणे'. कुठलीही गोष्ट गृहीत धरून चालत नाही. उदाहरणार्थ, 'अरे आता याला घर हवंय म्हणजे पूर्वेला तोंड असलेलंच बघत असेल'. तर आता पूर्वेला दरवाजा असलेलं घर ही मागणी कितीही कॉमन वाटली तरी विचारलेलं बरं असतं. कोण जाणे एखादा रात्री काम करणारा असेल आणि त्याला सकाळी घरात उजेड नको असेल तर? विचारलेलं बरं ना? त्यामुळे छोट्या छोट्या बाबतीतही प्रश्न विचारणे किंवा एखादी गोष्ट बोलणे, स्पष्ट विचारणे हे महत्वाचं. 
         तर मुद्दा असा की विचारायला पैसे पडत नाहीत. साधी गोष्ट, आता कित्येक कार्यक्रमात असं होतं की शेवटी एखादीच पोळी शिल्लक आहे किंवा थोडीच भाजी शिल्लक आहे, लोक अजूनही जेवतच आहेत. अनेकदा मग बाकी कुणाला हवी असेल म्हणून कुणीच ती थोडी राहिलेली पोळी किंवा भाजी घेत नाही आणि शेवटपर्यंत तशीच राहते. पण तुम्ही विचारू शकता ना,'कुणी घेणार आहे की मी घेऊ?' इतकी छोटीशी गोष्ट, पण विचारायला धजावत नाहीत. लोक काय म्हणतील? आता हे अगदीच घरगुती उदाहरण झालं. पण लहानपणापासूनच शाळेतही कित्येकदा मुलं प्रश्न विचारायला पुढे होत नाहीत. आपला प्रश्न चुकीचा असला तर? कुणी हसले तर? त्यामुळे मला वाटतं की प्रश्न विचारायलाही धाडस लागतं. पण अशावेळी एकच गोष्ट लक्षात ठेवायची, बोलायला पैसे पडत नाहीत, विचारून टाकायचा. जास्तीत जास्त काय होईल? जरा वेळ हसतील किंवा काय प्रश्न विचारतो म्हणतील. पण निदान आपले समाधान तरी ना?
        अनेकदा नात्यातही आपण बऱ्याच गोष्टी गृहीत धरतो. तिला मी आवडतच नाही, मी काहीही केले तरी पटतच नाही इ इ. समजा तुम्ही त्या व्यक्तीला बोलावलंय आणि खरंच काही कारणाने तिला जमले नाही तर? अशावेळी स्पष्टपणे बोलून गैरसमज दूर करणेच योग्य वाटते. उगाच समोरच्याने कुठल्या कारणाने असे वर्तन केले हे गृहीत धरून आपण तसेच वागत राहतो. त्यावेळी वाटतं, काय ते बोलायचं ना सरळ, बोलायला पैसे पडत नाहीत! अनेकदा आपण हेही गृहीत धरतो की आपण कसे आहोत हे समोरच्याला माहित नाही का? आणि म्हणतो, 'मला काय वाटतं ते त्याला कळत नाही का?'.  आता लग्नाच्या १० वर्षात तरी हे नक्कीच कळलंय मला, नाही कळत! 'त्याला कळत नाही का?' असे म्हणून स्वतःला त्रास का करून घ्यायचा? सरळ विचारून टाकायचं. जे काही असेल ते स्पष्ट होऊन जाईल ना? असो.
       माझ्यासारख्या नोकरीत योग्य ठिकाणी योग्य प्रश्न विचारून, जास्तीत जास्त माहिती काढणे यातून पैसे मिळतात ही गोष्ट निराळी. पण, 'बोलायला पैसे पडत नाहीत' हे डोक्यात ठेवलं की अनेक प्रश्न सुटतात. जास्तीत जास्त काय होईल? 'नाही' म्हणतील? वेड्यासारखे प्रश्न विचारू नका म्हणतील. पण निदान आपली शंका तरी दूर होते ना? त्यामुळे मनात न ठेवता, वाटलं तर..... विचारून टाकायचं. :) त्याने माझे तरी बरेच प्रश्न सुटलेले आहेत. :)

विद्या भुतकर.

Thursday, September 22, 2016

दोन फाटे

कधी कधी जवळच्या व्यक्ती नकळत दुरावतात. जसे आपण नवीन आधार शोधतो, तसेच त्यांनाही नवीन कुणीतरी मिळून जातंच. पण म्हणून जुन्या आठवणी इतक्या सहज थोडीच जातात? 
 

दोन फाटे कधी फुटले कळलंच नाही 
एका रस्त्यावरुन जाताना 
अचानक जाणवलं, आपलं काहीतरी हरवलंय 
खूप दूरपर्यंत येताना. 

ते वळणही दिसेनासं झालंय 
मागे वळून पाहताना,
जिथे आपण दुरावलो होतो 
नव्या मार्गावरून जाताना. 

या नव्या गर्दीत 
इव्हढं मात्र नक्की कळलंय,
कुठेतरी, काहीतरी चुकलंय
एकमेकांना समजून घेताना. 

आज असं वाटतंय 
नव्या दिशा, नव्या आशा 
नवे सोबती मिळाले 
नवे अनुभव घेताना. 

 पण हे सर्व अनुभवताना 
कधीतरी आठवण येते 
त्या जुन्या वळणाची,
आपल्या पहिल्या भेटीची. 

प्रश्न पडतो मनाला,
तुला येईल का अशी 
कधी माझी आठवण 
तू इतरांसोबत जाताना?

विद्या भुतकर. 

आज चा सुविचार :)



विद्या भुतकर.

Tuesday, September 20, 2016

Life is a Project

         आयुष्य म्हणजे एक प्रोजेक्टच आहे म्हणायचं. आधी शाळा, कॉलेज, मग नोकरी, मुलं, घर (or vice versa), त्यांची शिक्षणं, त्यांचे प्रोजेक्ट, मग त्यांची कॉलेजं, लग्नं, त्यांची मुलं..... आणि पुढे चालू. असो. इतक्या मोठ्या चक्राबद्दल बोलायला नको. पण जरा थोडे दिवस झाले की पुढे काहीतरी आलेलं असतंच. मुलांच्या शाळा संपल्या म्हणून भारत दौरा झाला, गणपती झाले. आता नवरात्र आले, दिवाळी आली. दोनेक वर्षांपूर्वी दिवाळीला पणत्या आणून घरी रंगवून सर्वांना भेट म्हणून दिल्या होत्या. आता परत तशाच पणत्या घेऊन आलेय. प्रवासात १०० पैकी १० फुटल्या. त्यामानानं बऱ्याच वाचल्या म्हणायच्या. आता दिवाळीच्या आधी त्या रंगवायच्या आहेत. 
          म्हटलं जरा कामाला लागावं तर लक्षात आलं, मागच्या वेळीच बहिणीने छोटे मातीचे फ्लॉवरपॉट आणले होते. मोठया हौसेने मागवले होते. मी स्वतः रंगवणार म्हणून. पण त्याच्या पॅकिंग मधूनही ते बाहेर आले नव्हते. म्हणलं, पणत्या नंतर करू आधी हे फ्लॉवर पॉट पूर्ण करू. त्यासाठी त्यांच्यावर डोक्यात वारली चित्रं काढायचं मनात होतं. घरात एखाद्या टेबलवर त्या फुलदाण्या छान दिसतील वारली चित्र असलेल्या. पण मला वारली चित्रं काढता कुठे येतात? 
         झालं, मग आता पणत्या आणि फुलदाण्या हे दोन्हीही बाजूला राहिले आहे. वारली चित्रकला आधी कागदावर तरी काढून पाहिली पाहिजे म्हणून गूगल वरून छोटी चित्रं पाहून काढायला सुरुवात केली. आधी वाटलं होतं किती सोप्पी आहेत ती. छ्या ! कितीही सोपी वाटली तरी त्यातला तो एकसारखेपणा पेन्सिलनेही काढता येत नाहीये, तर पेन्ट ब्रश दूरच राहिला. परवा दोन तासाच्या मीटिंगमध्ये हाताला चाळा म्हणून ते काढत बसले आणि चिडचिड झाली. त्यामुळे अगदी नीट येइपर्यंत तरी फुलदाण्या रंगणार नाहीत. 
       आता हे सर्व प्रयत्न चालू आहेत त्यातच सानूच्या शाळेतून एक 'कव्हर पिक्चर' काढायची नोटीस आलीय. त्याची मूळ कल्पना आहे, 'Together we can'. तर माझ्या डोक्यात आयडिया आली त्या कव्हरसाठी वारली चित्र काढले तर? वारलीच्या एका चित्रामध्ये एकमेकांच्या हातात हात घातलेले किंवा झाडांना पाणी घालणारे अशी अनेक चित्रं आहेत. यातल्या काही चित्रांचे मिळून एक बनवायचा विचार आहे. आता त्यासाठी साधा कागद वापरावा की कॅनव्हास, कुठले रंग वापरावे असे बाकी हजार विचार. 
        आता वर लिहिलेल्या सर्व गोष्टीतील एक जरी पूर्ण झाली तरी नशीब असं म्हणायला हवं... कारण.. अजून तीन आठवड्यात या वर्षाची हाफ मॅरॅथॉन आहे. आणि गेल्या तीन आठवड्यात काहीच सराव न झाल्याने कुठलाही सरावाचा दिवस टाळता येणार नाही. तर असं आहे एकूण.... :) एखादी गोष्ट करायला घ्यावी आणि त्याला हजार फाटे फुटावे ही काही पहिली वेळ नाही. आणि रोजच आपण अनेक प्लॅन बनवतो, त्याला असेच फाटे फुटतात आणि त्या फाट्याना अजून फाटे.... पण तरीही एका पाठोपाठ एक प्रोजेक्ट आपण करतच राहतो आणि कितीही फाटे फुटले तरी सुरुवातीला म्हणाले तसे एकाच चक्रात सर्वांची आयुष्यं अडकलेली असतात. नाही का? :)

विद्या भुतकर. 

Monday, September 19, 2016

सहयाद्रीच्या रांगा

          ट्रेकींग हा असा अनुभव आहे जो मी केवळ भारतातच घेतला आहे आणि फक्त महाराष्ट्रातच, आपल्या सह्याद्रीतच. आपल्या पावसाची मजा मला बॉस्टन, शिकागोमध्ये कधी आली नाही. पुण्यात येत असतानाच, एक्सप्रेस वे वरून हिरव्यागार डोंगरांचं दर्शन झालं होतं. त्यावरून पडणारे छोटे झरे, रस्त्यांच्या दोन्ही बाजूनी मधेच दिसणाऱ्या दऱ्या आणि त्यांना पटकन झाकणारे धुके. हे अनुभव शब्दांत सांगता येत नाहीत. ते केवळ स्वतः अनुभवावेच लागतात. तर हे सर्व आम्हाला पुन्हा एकदा अनुभवायचं होतंच त्यामुळे एखादा तरी ट्रेक व्हावा अशी इच्छा होती. नशिबाने  यावेळी पुन्हा एका ट्रेकला जायला मिळाले, जुन्या सहकाऱ्यांसोबत तुंग किल्ल्यावर.
        यावेळी ट्रेकची सर्व प्लॅनिंग आयती मिळाल्याने तसा बाकी व्याप नव्हता. त्यामुळे दुसऱ्या दिवशी काय न्यावं बॅगमध्ये हे १० मिनिटांत ठरवून भरून झालं होतं. मळले तरी चालतील असे कपडे, एखादे जॅकेट, एक ज्यादा कपड्यांची जोडी आणि खायचं सामान हे सर्व घेतलं. ठरलेल्या वेळेत निघालेली आणि पोचलेली ट्रिप तुरळकच. तरीही बरेच वेळेत निघालो होतो. सुरुवातीला सर्वजण जरा सेटल होत असतात. आम्ही चहाच्या एका टपरीवर चहा घेऊन गाडीत बसल्यावर गाण्यांच्या भेंड्या सुरु झाल्या. तर ट्रेकच्या बसमध्ये सहसा, खाणारे, गाणारे, ओरडणारे आणि झोपणारे असे निदान चार प्रकारचे तरी लोक असतातच. आणि हो, ट्रेकमध्ये पुढे जात मार्ग दाखवणारे आणि सर्वांना घेऊन येत मागे असणारेही. माझी एक झोपही झाली. हळूहळू आम्ही छोट्या रस्त्यातून, घाटातून किल्ल्याकडे चाललो होतो. तर जसे जसे सह्याद्रीच्यामधून किल्ल्याकडे जात होतो, आम्हाला धुक्यातून दिसणाऱ्या रांगांचे दर्शन होत होते. किल्ल्याच्या पायथ्याशी येऊन लवकरच ट्रेक सुरु झाला.
         ही पोस्ट मी केलेल्या त्या ट्रेक बद्दल नसून आजपर्यंत केलेल्या बऱ्याच ट्रेकची आहे. गड/किल्ला चढताना असणारा सुरुवातीचा उत्साह, कधी रिमझिम पाऊस यातून एक वेगळी प्रसन्नता असते. मिळेल त्या खाचातून पाय ठेवत, समोरून येणाऱ्या माणसांना रस्ता देत, कधी कुणाला लागेल तर हात देत प्रवास सुरु होतो. त्यात फोटो काढायची हौस असतेच, पण सोबत घेतलेलं सामानाचं ओझंही असतंच. आपण कसे उशिरा उठलो, धावत-पळत पोचलो, डब्यात काय घेतलं याच्या गप्पा असतात. जरा थोडं पुढे गेल्यावर जरा दमायला झालेलं असतं, चढही वाढायला लागलेला असतो. जसे वर चढू तसे काही लोकं विखुरले जातात. त्यांना मदत करत वर घेऊन येणारे असतातच. पुढे काय असेल याची उत्सुकता असणारे वेगाने पुढे जात राहतात. जोरात येणारा पाऊस किंवा कधी वाढणारं ऊन यातून प्रवास चालू असतो. एखाद्या ठिकाणी कुणीतरी बिस्किटाचा पुडा बाहेर काढतं आणि तिथेच एक ग्रुप जमा होतो. 
         एखाद्या अवघड ठिकाणी, आपण किती उंचावर आलोय हे जाणवायला लागतं. कुठल्या निमुळत्या रस्त्यावरून, घसरट पायवाटेवरून पुढे जायला भीती वाटायला लागते. एकमेकांना हात देत तो अवघड रस्ता पार केला जातो. खाचखळग्यातून वर जाताना, दोन्ही हात आधाराला लावलेले असताना, कधी वरून पडणाऱ्या पावसात चेहरा पूर्ण ओला होऊन जातो. गडाचा दरवाजा दिसायला लागला की आपणच गड सर केल्यासारखा ऊर भरून येतो. कुठल्याही गडाच्या दरवाज्यात लाखो लोकांनी काढलेले फोटो असतील. पायऱ्या चढत किल्ल्याच्या माचीवर, झेंडा लावलेल्या टोकावर पोचलो की बरेचदा एक पठार दिसतं. एखाद्या कोपऱ्यातल्या विहिरीचे अवशेष असतात, त्यात पावसानं पाणी साठलेलंच असतं. एखादं छोटं मंदिर असतं. बाकी लोक नको म्हणत असताना आपण थोडे पुढे जाऊन काहीतरी विशेष काम करण्याच्या प्रयत्नही केलेला असतो. फोटो काढून काहीतरी मिळवल्याचं समाधान करण्याचा प्रयत्न करतो, पण आपला प्रवास संपला तरी पुढे काहीतरी असावं असं वाटत राहतं. कदाचित शिवाजी महाराजांच्या वाचलेल्या अनेक गोष्टींमधून आपल्यालाही काहीतरी गवसेल अशी अजूनही अपेक्षा असते. 
         तेव्हांच धुक्याच्या पार कुठेतरी दूर एखादं हिरवंगार गाव दिसतं. पाण्याने भरलेले वाफे दिसतात, भाताच्या शेतीच्या रांगा दिसतात, दूरवर सहयाद्रीच्या रांगा दिसतंच राहतात. मान कुठेही फिरवा, उंच त्या डोंगरांकडे पाहून मन आणि छाती भरून येते. त्या डोंगरावर कधी झरे दिसतात, तर ढगांचे लोट. एखादं मंदिरही दिसत राहतं. हे सर्व पाहताना, आपल्या गडावर, किल्ल्यावर आलेलं धुकं गालाला, हातांना लागून ते मऊ, ओलसर होतात. भूक तर जाम लागलेली असते. सर्वांनी आणलेल्या डब्यातलं सर्वच जेवण गोड लागत असतं. प्रत्येकानं जास्त घेऊन आल्यानं, पोट भरून जेवण होतं. डबे, पाण्याच्या बाटल्या संपून ओझं रिकामं होतं आणि परतीचा रस्ता सुरू होतो. 
          खरी मजा तर उतरताना असते. सकाळी धावत चढणारे तेच लोक आता हळूहळू पाय टाकायला लागतात. मोठ मोठ्या पायऱ्यांवरून उतरताना गुढग्यांची वाट लागते. कधी घसरट दगडांवरून एखादा घसरतोही. कधी ज्या दगडाला आधारासाठी हात लावतो तोच निखळून येतो. सकाळी स्वच्छ असलेले पायातले शूज लालसर मातीने आणि पावसाने एकदम ओळखू ही येणार नाही इतके बदललेले असतात. कुणाच्या बाटलीत पाणी आहे का, कुणाकडे खायला काही आहे का असे शोधत, तोंडात टाकत डोंगराच्या पायथ्याशी येऊनही जातो. या छोट्याशा सोबत असणारे, सकाळी अनोळखी असलेले लोकही एकदम ओळखीचे होऊन जातात, एखादा एकदम जवळचा मित्रही होऊन जातो. परतीच्या रस्त्यावरही उत्साह तसाच टिकून असेल तर मात्र मानलंच पाहिजे. काही ढेपाळून झोपून जातात, काही गप्पा मारत बाहेर बघत राहतात, तर काहींच्या भेंड्या अजूनही चालूच असतात. 
         बाहेर बघत तिथलं जग अनुभवताना काही गोष्टी लक्षात येतात. खरंच आपल्या राज्यात अजूनही इतका नयनरम्य निसर्ग आहे? खरंच इतक्या दुर्गम भागात लोक अजूनही मातीच्या घरात राहात आहेत? आणि चुलीवरचं जेवण कितीही आवडीने खाल्लं तरी, ते रोज खायला लागणारे लोक अजूनही तसंच आयुष्य काढत आहेत. अजूनही शाळा सुटलेली मुलं दुरून दुरून आपल्या घरी येताना दिसतात. इतके कष्ट करून त्यांना शाळेत जायला लागत आहे. अजूनही काही ठिकाणी वीज येत नाही. आणि हे सर्व आपल्यासारखे लोक केवळ एक दिवस मजा म्हणून जगत असले तरी, असं रोज आयुष्य कसं असेल? खरंतर मी एका छोट्या गावातच वाढलेय, पण तरीही ही इतकी दुर्गम गावं पाहिली की तिथे आधुनिकीकरण नाहीये म्हणून आनंद मानायचा की दुःख हे कळत नाही. कारण आपल्यासारखे अनेक लोक अजूनही तिथे जाऊन कचरा टाकून, प्लॅस्टिकच्या बाटल्या, चिप्सचे कव्हर तसेच टाकून जाताना दिसतात. त्यापेक्षा मग चुलीवरची भाकरीच बरी म्हणायची का? असो. 

         घर आलं की सकाळपासून संध्याकाळ पर्यंत आपण एका वेगळ्याच जगात होतो याची प्रचिती येते. ते आवाज, धूर, धूळ आणि गर्दी यांचा सहवास नकोसा वाटतो. अशा वेळी उत्तम म्हणजे, गरम पाण्याने अंघोळ करून, जेवण करून पांघरून घेऊन झोपी जाणे. :) डोळे बंद केल्यावरही तेच रम्य दृश्य डोळ्यासमोर दिसत राहतं. कधी झोपेत चुकून दरीत कोसळल्याचा भासही होतो. सकाळी उठल्यावर दुखणाऱ्या पायांनी मात्र जमिनीवर आणलेलं असतं आणि आपण पुन्हा एकदा वर्षभरासाठी सहयाद्रीच्या त्या आठवणीवर पुढच्या ट्रेकची वाट बघत बसतो.
        






विद्या भुतकर.

Sunday, September 18, 2016

ठेच

कॉलेजचं वयच ते, प्रश्नांचं आणि बंडाचं. पुढं त्यातली बरीच उत्तरं मिळाली. आयुष्यात आपण निवडलेली वाट हवी असेल तर त्यावरचे काटेही आपलेच. आणि दुसऱ्याने निवडलेली वाट असेल तर पोहोचलेलं ठिकाणही आपलं नसतं, हेही तितकंच खरं. कुठली निवडायची हे मात्र ती वेळच ठरवते. असो. ही एक कॉलेजमध्ये असताना लिहिलेली कविता....


विद्या भुतकर.
https://www.facebook.com/VidyaBhutkar1/
 

Thursday, September 15, 2016

हट्ट आणि हक्क

        मी पुण्याला जायचे म्हणल्यावर आधीच बऱ्याच मित्र-मैत्रिणींना सांगून ठेवले होते मला काय काय खायचे आहे. त्या यादीमध्ये दुकानातून आणलेले, बाहेर जाऊन खायचे आणि खास घरी बनवलेले  असे सर्व पदार्थ होते. त्यामुळे आम्ही पोचलो त्याच दिवशी सगळ्या भेटायला आल्या तेव्हा माझ्यासाठी जिलेबी आणली होती, वडापाव आणले होते. उगाच भेटल्यावर ही आधी विचारेल 'जिलेबी कुठाय?' म्हणून आधीच सर्व घेऊन आल्या होत्या. :) मग काय पुढचे ५-७ दिवस पुरवून पुरवून खाल्ली. मैत्रिणींशी बोलत असतानाच आमचे अजून एक शेजारी मित्र येऊन गेले. तिथे मग पुण्यात कुठली 'जिलेबी' फेमस आहे यावर चर्चा झाली. दुसऱ्या दिवशी त्यांनी मग त्या 'फेमस' दुकानातून अजून जिलेबी आणि सामोसेही आणले. :) एकूण काय आल्या आल्याच माझी चंगळ चालू झाली होती. :)
      मी आमच्या शेजारच्या काकूंनाही सांगून ठेवले होते की त्यांच्या हातचे चिकन, दाबेली हे सर्व खायचे आहे. श्रावण सुरु होत होता त्यामुळे त्यांनी लवकरच बेत ठरवून चिकन आणि कोंबडीवडे केलेही. मध्ये थोडे दिवस जमले नाही पण त्यांनी स्वतः विचारून दाबेलीचा बेत ठरवून तो पार पाडला. (दाबेली वरून आठवलं, तो मसाला आणायचा राहिलाच ! :( ) असो. तर त्या दिवशी नेमका लाईट गेले होते दिवसभर. पण तरीही जमेल तशी तयारी करून सुरुवात केली आणि नशिबाने लवकरच लाईट आले आणि मस्त दाबेली खायला मिळाली. कुणाकडे पाणीपुरी, चिकन हे सर्व झालेच. एका मैत्रिणीची ईद चुकली होती तर शीरखुर्मा बनवला आणि बिर्यानीही. एका फॅमिली सोबत छोटीशी ट्रिप काढून वडापाव, सँडविचेस हे सर्व खाऊनही झाले. आता हे सर्व लिहायचा हेतू सर्वांना जळवण्याचा नाहीये तर त्या गोष्टी परत परत आठवण्याचा आहे. :)
      कितीही झाले तरी बऱ्याचशा गोष्टी राहूनही गेल्या. त्या आता पुढच्या ट्रिप मध्ये आधी खाऊन घेणार. :) पण खरंच घरात तुम्ही स्वतः जर मुख्य जेवण बनवणारी व्यक्ती असला तर नेहमी असे वाटते, 'स्वतःच्या हातचं खाऊन कंटाळा आलाय'. विशेषतः मला दोन्ही मुलांच्या प्रेग्नसीत वाटायचं, कुणी तरी छान जेवण आयतं बनवून द्यावं. आणि त्यात हट्टाने मागून घेता आलं तर अजूनच उत्तम. पण अशा खूप कमी संधी येतात इथे. अर्थात ज्या मिळतात त्या मी सोडत नाही, तरी...बरं इथेच नाही एकूणच, घरातील मुख्य जेवण बनवणारी व्यक्ती, जी जास्त करून स्त्रीच असते, तिला तिच्या हातचं खाऊन कंटाळा येतोच. अशा वेळी कुणी हक्काची मित्र-मैत्रीण जे असे आपले हट्ट पुरवतील असे असतील तर किती सुख आहे ना?
       मुलांच्या बाबतीत, त्यांना आई-सासू यांच्याकडून नेहमीच कौतुक केलं जातं किंवा आग्रहाने त्यांची आवड पाहिली जाते. शिवाय बायको आहेच. :) पण आपल्याला तसे मर्यादितच पर्याय असतात. माहेरी जेव्हा जाईल तेव्हा मिळणार, सासरी हट्टाने मागून काही करून मिळेल असं सासर असेल तर उत्तमच, पण प्रत्येकालाच ते मिळतं असं नाही. (सासूबाईंनी आमच्यासाठी शेवभाजी करून दिली होती. :) ) हे झाले दोन पर्याय. तिसरा म्हणजे नवरा खुद्द. जेवण बनवता येणारा आणि बनवण्यात पुढाकार घेणारा नवरा असेल तर मग बासच !! पण आजकाल सासर माहेर दोन्हीही जवळ नसेल आणि असले तरी आपल्या जवळच्या मैत्रिणीकडे हक्काने मागणे यात एक वेगळीच आपुलकी असते. नवराही जेवण बनवणारा नसेल तर मग हे असे मित्र मैत्रिणी देवासारखे वाटतात. होय ना? मुख्य म्हणजे हे इतके हक्काने मागण्याइतके सर्वच लोक प्रिय असतात असं नाही. त्यामुळे ज्यांना आपण हक्काने विचारू शकतो ते नक्कीच जवळचे असतात. आणि मला असे मित्र-मैत्रिणी, शेजारी आहेत याचा खूप आनंदही आहे. :) 
       कितीही जुने वाटले तरी मला हे विचार अजूनही पटतात की, कुणासाठी तरी आवडीचे जेवण बनवणे, हक्काने बनवून घेणे किंवा एखादा असा हट्ट पुरवणे ही एक प्रेम व्यक्त करण्याची रीत आहे. आणि आजही ती तितकीच प्रिय आहे. होय ना? आता माझ्या कडून कुणाला हक्काने काही हवं असेल तर तेही बघावं लागेल ही गोष्ट वेगळी. पण मला असं खायला मिळणार असेल तर, मी त्यासाठीही तयार आहे. :)


विद्या भुतकर.

Wednesday, September 14, 2016

सूर्य उगवला, प्रकाश पडला....

          हुश्श ! पोचले एकदाची परत अमेरिकेत. गेले दोनेक आठवडे नुसती धावपळ चालू होती. यायची तयारी, खरेदी आणि त्यात गणपती येणार होते. गणपतीत आमच्या सोसायटीमध्ये जरा जास्तच जोश असतो. त्यामुळे त्यात मी, मुले सर्व झाडून सहभागी होतो. रोज संध्याकाळी प्रत्येकाची प्रॅक्टिस, त्यांच्या वेळा, जागा, त्यातून जेवण मग माझी प्रॅक्टिस, ऑफिस असा सगळा गोंधळ चालू होता. पण मजा आली खूप म्हणजे खूपच. गणपती हाच मुळात सर्वांचा जिव्हाळ्याचा विषय त्यामुळे सर्वजणच जोमाने तयारी करत असतात सोसायटीत. तर असे हे गणपतीचे ५ दिवस संपवून, सगळं बस्तान बांधून परत घरी आले आणि एकदम बोअर व्हायला लागलं. जरा स्थावर होऊन लिहायला घ्यावं म्हटलं. एकतर इतक्या दिवसांचं डोक्यात इतकं साचलेलं. सुरुवात कुठून करावी हा प्रश्नच होता. असो. नमनाला घडाभर तेल झालंच आहे, तर सुरुवातही करते. 
         वेगवेगळ्या व्हॉट्स ऍप ग्रुपवर दिवसांतून निदान ३-४ वेळा तरी बायकांवर वेगवेगळे जोक्स येत असतात. अनेकदा अपमानकारक असतात. कधी उगाच ओढून ताणून आणलेले असतात. बरं, यावर काही बोलायला जावं तर ग्रुपवरची मुलं म्हणणार, " इतकं काय मनाला लावून घेतेस, जोक आहे." म्हणजे बाई म्हणून स्वतःवर केलेला जोक नाही आवडला तरी तेही बोलता येत नाही. त्यात नेहमी येणारा जोक म्हणजे, व्हॉट्स ऍप वर बायका केवळ सामोरासमोर नसतात त्यामुळेच इतका वेळ घालवू शकतात. एका ठिकाणी काहीतरी ध्येय घेऊन सर्वानी मिळून काहीतरी चांगलं काम करणं हे त्या जोकच्या दृष्टीने अशक्य वाटतं. पण सगळ्या जणींनी ठरवलं तर मजा, गप्पा टप्पा करता करता एखादं छान कामही होऊ शकतं याचा अनुभव मी गेल्या काही दिवसातच घेतला.
         तर झालं असं की या वर्षी भारूड करण्यामध्ये मला इंटरेस्ट आहे का अशी शेजारणीने विचारणा केली. जी मैत्रीण ते करणार होती, तिने ते लिहिलं होतंही. त्यामुळे बेसिक स्क्रिप्ट तयार होती. कुणा- कुणाला भाग घ्यायचा आहे ते ग्रुपमध्ये ऍड होत गेले. आणि एकूण १२ जणींचा ग्रुप जमला. तर भारुडची संकल्पना अशी होती की आपल्या रोजच्या वागण्यामुळे पृथ्वीवर त्याचा जो परिणाम होत आहे आणि तो कमी होण्यासाठी आपण काय काय करू शकतो हे थोडक्यात मांडायचं. एकतर त्या मूळ स्क्रिप्ट मध्ये जसे लोक मिळत गेले तसे प्रत्येकीसाठी थोड्या ओळी त्यात ऍड केल्या गेल्या. त्याचसोबत बऱ्याच सुधारणा करत करत स्क्रिप्ट तयार होत गेली. त्याबाबतीत खूप काही मतभेद नव्हतेच. मजा यायची जेव्हा कुणी स्वतःचं वाक्य विसरतेय आणि बाकी सर्व तिच्याकडे बघताहेत. वाक्यरचना, बोलण्याची पध्द्त, तू असं बोल-मग मी असं उत्तर देईन, अशा अनेक गोष्टी घडल्या. आणि एकूण भारूड छान बसलं. 
        खरंतर स्क्रिप्टपेक्षा बाकी अनेक गोष्टीचा जास्त विचार करायला लागत होता. एकतर मुलांच्या प्रॅक्टिसच्या वेळा पाळायच्या असत. त्यात काहींजणी मुलांचे डान्स बसविणाऱ्या होत्या. काहींची मुले अगदीच लहान असल्याने त्यांना स्वतःच त्यांच्यासमोर उभं राहायला लागत होतं. संध्याकाळी ते सर्व उरकून, कुणी ऑफिसमधून उशिरा येणारी असायची तर कुणाचे जेवण करायलाही वेळ मिळत नव्हता. पण रात्री 'वेळेत या गं' म्हणत सर्वजणी एका ठिकाणी जमायचो. मग काय तास-दीडतासापैकी निम्मा वेळ तर 'ह्या ह्या' आणि 'खी खी' करण्यात जायचा. दोन वेळा मोजून सराव आणि मग उरलेला वेळात ड्रेस कुठला घालायचा यावर चर्चा. :) आणि मी म्हणते का करू नये मजा आणि गप्पा? उगाच काय सारखं 'काम- काम' करत बसायचं. जरा जास्त हसलं म्हणून काय बिघडतं? त्यामुळे मला तर वाटतं, मुलांपेक्षा आम्हा मुलींच्या तयारीतच जास्त मजा असते. जिच्याकडे सर्व असेल तिच्याकडे कॉफीही होऊन जायची. 
      आता त्यासाठी 'ड्रेस कुठला घालायचा' हे प्रकरण जरा गंभीर होतं. ड्रेस तसा साधाच हवा होता. पांढरा कुर्ता (जमल्यास लांब बाह्यांचा). पण आमच्या महाराज, म्हणजे भारुडात जी महाराज झाली होती आणि तिनेच हे दिगदर्शित केले, तिच्या म्हणण्यानुसार, आपण आपल्या गरजा कमीत कमी केल्या पाहिजेत. तर मग, एका भारूडासाठी नवीन कुर्ता आणणे योग्य नव्हते. मग काय करायचे? कुणाकडे तरी शोधायचा, मागायचा, भाड्याने आणायचा असे अनेक पर्याय वापरायचे असं ठरलं. अनेक प्रयत्नानंतर बऱ्याच जणींनी आहेत त्यात काम पार पाडले तर काहींनी विकत आणले. पण त्या निमित्ताने, आपण आपल्या गरजा कमी करणं किती अवघड झालं आहे हे लक्षात आलं. तर हे झालं कुर्त्याचं. खाली जीन्स घालायची का काळी लेगिंग यावर दोन दिवस चर्चा झालीच. त्यातून, जीन्स नक्की करण्यात आली होती. बरं, त्यातही किती प्रकार, फिकट निळी का गडद? तर गडद निळी नक्की झाली. पुढे मग कानात काय आणि गळ्यात, हातात काय घालायचं यावरही बरीच चर्चा झाली. अर्थात ८-९ मिनिटाच्या कार्यक्रमात हे दुरून कोण पाहणार होतं? पण प्रत्येक गोष्ट क्लिअर केलेली बरी, हो ना? 
       सगळ्यात शेवटचा मुद्दा होता तो म्हणजे फेटा बांधणे. पुन्हा एकदा नवीन न आणता, बरेच प्रयत्न करून वेगवेगळ्या ठिकाणाहून बरेच फेटे आम्हाला मिळाले. त्यात वेगवगेळ्या रंगाचे असल्याने कुणी कुठला घालावा यावर चर्चा क्रमप्राप्त होतीच. :) तरी एका मैत्रिणीचे भाऊजी फेटे बांधून देणार होते, त्यामुळे कधी, कुठे, कसे हे प्रश्न सुटले होते. बिचाऱ्यानी  १३ जणींचे फेटे बांधून दिले. त्यात कुणाचा फेटा सुळसुळीत तर कुणाचे केस. त्यामुळे दोन चार परत बांधावे लागले. त्यात गणपतीच्या दिवशी सगळ्यांना घरची आरती, बिल्डिंगच्या गणपतीची आरती, प्रसाद हे सर्व होतंच. फेटे झाल्यावर, कपाळावर टिकली लावायची का आणि कुठली यावर बोलणं झालं. त्यात चंद्रकोर लावायची म्हंटल्यावर ज्यांनी फेटे बांधून दिले त्यांनीच सर्वांना छान चंद्रकोरही काढून दिली. बिचारे किती काय काय करणार त्यात आमचा गोंधळ. कुणाचा तुरा कमी तर कुणाचा जास्त. शिवाय सेल्फी, ग्रुप सेल्फी, प्रत्येकीच्या फोनमध्ये फोटो, ग्रुप फोटो हे सर्व प्रकार होतेच. :) 
        पण सर्व करून स्टेजवर सर्वजणी एकत्र आलो, भारूड छानच झालं. त्यातला मंत्र मुलाना, घरच्यांना सोप्या भाषेत सांगायचा होता, तेही केलंच. कुणाला वाटेल, इतक्या सर्व गोंधळात खरंच, मूळ विषयावर काही चर्चा झाली का? तर नुसती चर्चा नाही तर शेवटी प्रत्येकीने जे वाक्य घोषणा म्हणून दिले ते तिने स्वतः पाळायचे असेही ठरविले आहे. त्यातलीच ही काही वाक्यं: 

१. ओला-सुका कचरा वेगळा करू. 
२. प्लास्टिकचा वापर कमीत कमी करू 
३. प्लॅस्टिकच्या भेटवस्तू देणं टाळू. 
४. पाण्याचा वापर कमीत कमी करू. 
५. विजेचा अपव्यय टाळू. 
६. थर्माकोलचा वापर बंद करू. 
७. नदीत कचरा टाकणार नाही. 
८. फिनाईल, शॅम्पू, साबण यांना पर्याय शोधू. 
९. वापरलेलं प्लास्टिक रिसायकल करू.

         एकूण काय तर हा एकूणच अनुभव आम्हा सर्व जणींसाठी एक चांगला पार पाडलेला प्रोजेक्ट्च होता. त्यातून प्रत्येकीला काही ना काही मिळालं. घरचं, मुलांचं, सणासुदीचा सर्व आवरून, नीट पार पडलेला कार्यक्रम तो. तर आमच्या भारुडामध्ये केवळ हसणे-खिदळणे नाही तर अशा विचार प्रवृत्त करणारी बोलणीही झाली आणि त्याने त्या त्या घरातही फरक पडेल. अगदी, गेल्या दोन दिवसांपासून मी बाहेर जेवायला गेल्यावर आपण उगाच ज्यादा घेऊन येत असलेल्या प्लस्टिकच्या चमच्यांचा विचार केला. किंवा डब्यात स्वतःचा चमचा नेला तर कॅफे मधून प्लास्टिकचा चमचा घ्यावा लागणार नाही हाही विचार केला. घरी आम्ही ऑलिव्ह वापरतो, त्याचे एकदम छोटे प्लास्टिकचे कप आणतो. प्रत्येवेळी तो कप टाकून दिला जातो. तर आता मी, बरणीच आणायचं ठरवलं आहे. खरंच चर्चेमुळे आमच्या वागण्यात नक्कीच फरक पडला आहे. तुम्हालाही यातील काही गोष्टी अंमलात आणायचा विचार आला तर अजून उत्तम. :)

         तर मंडळी, अशाच छोट्या छोट्या गोष्टीतून आपण पर्यावरणाचा ऱ्हास टाळू शकतो आणि ही पृथ्वी आपल्या मुलांसाठी जपून ठेवू शकतो. 
'बोला पुंडलीक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय ।।' 

विद्या भुतकर.  

Monday, September 05, 2016

प्रेम, तुझ्या प्रेमावर नसतं


भय, तुझ्या नसण्याचं नसतं,
तुझ्या असून नसण्याचं असतं.

धीर, तुझ्या असण्यानं नसतो
तुझ्या नसून असण्यानं असतो. 

हसू, तुझ्या बोलण्याचं नसतं
तुझ्या स्पर्शाच्या शब्दांचं असतं. 

लाड, तुझ्या हसण्यावर नसतो
तुझ्या वेड्या रुसण्यावर असतो.

प्रेम, तुझ्या प्रेमावर नसतं
तुझ्या त्या अव्यक्तावर असतं.

विद्या भुतकर.
https://www.facebook.com/VidyaBhutkar1/