Friday, May 15, 2009

काय करावं?

परवा ना खूप दिवसांनी online radio वर दिल चाहता हॆ मधलं तनहाई गाणं लागलं होतं. अर्थात गाणी चालूही असली तरी प्रत्यक्षात त्यात मन अडकलंय असं आजकाल फार कमीच होतं. त्यातही गायकाचा आवाज ऎकून त्याचं कौतुक करावंसं वाटावं किंवा शब्दांनी उदास/आनंदी व्हावं हे अजूनच दुर्मिळ. असो. पण DCH मधला एकटा फिरणारा आमीर आठवला आणि पुन्हा एकदा त्याची लवस्टोरी बघावी असं वाटलं. मग म्हटलं राहूच दे. आजपर्यंत एकदाही असं झालं नाहीये की DCH पाहिलाय आणि उदास झाले नाहीये. खरंतर त्याचा शेवट किती सुखदायी आहे अगदी positive ...त्यातली अवखळ प्रीति झिंटा,उनाड आमीर, विचारी अक्षय आणि मजेशीर सैफ आणि त्यांची ती निखळ मैत्री...सगळंच कसं हवंहवसं...पण पण तरीही मनाला कसली खंत लागून राहते तो पाहिल्यावर माहीत नाही. विशेषत: रविवारी संध्याकाळी तर तो अजिबात पाहू नये. बरं झालं आज लिहिलंच याबद्दल ते. परत राहून गेलं असतं.
घाई करायचं कारण म्हणजे परवा संदीप २९ वर्षाचा झाला, लवकरच मीही होईन. मग वाटलं कशाला वेळच मिळत नाहीये किंवा मीच कुठल्यातरी तंद्रीत असते आणि खूप काही राहूनच जातय. बघताबघता सानू दोन महिन्यांची झाली. तिचे थोड्या दिवसांपूर्वीचे फोटो पाहून वाटलं अरे ही किती मोठी झाली, तिला सारखं बघत राहिलं पाहिजे, नाहीतर वर्षभराची होईल आणि तिला मनभरून पाहिलंच नाही असं वाटेल. बरं आपण मोठे होतोय म्हणजे आई-दादाही वयस्कर होताहेत. दम लागणारी आई आणि गोळ्या घेणारे दादा पाहिलं की पोटात कालवतं. वाटतं कुणीच मोठं नको व्हायला. मीही आणि तेही.
आमची ३री anniversary झाली मागच्या महिन्यात.बघता बघता इतकी वर्षे निघून गेली. ८ वर्षापूर्वीचा तो अजूनही डोळ्य़ांसमोरून जात नाही. त्याचं ते हसू संसारात हरवून जाण्याआधी त्याच्याबरोबर आपणही हसलं पाहिजे.
सानुसाठी आई-दादा घर सोडून इतके दिवस इथे राहिले, त्यांच्याबरोबर बोललं पाहिजे, फिरून सर्व दाखवलं पाहिजे. उद्या जातो म्हणतील तर काय करू? TV,laptop सर्व बंद करून नुसतं समोर बसून राहिलं पाहिजे त्यांच्या. आईच्या हातचं खाल्लं पाहिजे त्यात चुका न काढता...... सकाळी लवकर उठलं पाहिजे आणि रात्री उशीरा झोपलं पाहिजे. अगदी आला आला म्हणता संपून जाणारा वीकेन्ड थांबवला पाहिजे. काय करावं काही सुचत नाहिय़े.कुणीतरी थांबवता का रे हे संपणारे दिवस?
-विद्या.