ख़रंतर मेघना आणि अभिजीतच्या Woman's Day च्या पोस्ट वाचल्या आणि बरेच दिवस जे चालू आहे त्याबद्दल लिहायची इच्छा पेपरवर उतरत आहे. तुमच्या लेखांशी याचा काही संबंध नसेलही आणि असल्यास तुम्ही तो जोडून घ्यावा. :-)
मला ना नेहमी असं वाटतं की मी आयुष्यात खूप मारामारया केलेल्या आहेत आणि उगाचच मी खूप ग्रेट आहे असं वाटतं. तर या अश्या वाटण्यामुळेच मी जेव्हा प्रेग्नंट होते (गरोदर हा शब्द कसातरीच वाटतो ना?मी बाई वगैरे झाल्यासारखा... ) तेव्हा म्हटलं की जाऊ दे ना आता इतके ( सहा-सात वर्षे ... ) नोकरी केली थोडा आराम करावा. आणि Being a woman मी घरी राहू शकले. मुलांना नसते अशी सवलत? असो, मला काय? तर मी मस्त नऊ महिने घरी आराम केला आणि तो दिवस उजाडला डॉक्टरकडे जाण्याचा.मुलगी झाली. आई नंतर हसून सांगत होती की बाहेर बातमी कळल्यावर एकदम मला रडू आले तर दादा विचारत होते 'मुलगी झाली' म्हणून रडते आहेस का? आई म्हणे मी कशाला रडू त्याबद्दल. आपली पोरगी 'सुअखरूप सुटली' याचं समाधान होतं ते बहुतेक.
हॉस्पिटल मधून घरी येऊन २ दिवसही झाली नाहीत आणि मला आपण घरी राहिल्याचा पश्चात्ताप होऊ लागला. सानूचं सगळं करण्यातच दिवस जायचा आणि वाटू लागलं की माझं आयुष्यं संपलं. आता मी कधीच परत नोकरी करू शकणार नाही. कसं शक्य आहे? बरं सानूचा तरी काय दोष त्यात? ती कधी ओठी होणार आणि मग मी नोकरी करणार? आणि समजा २/३ वर्ष ब्रेक घेतला तर परत कोण मला विचारणार. सोबत आई दादा होते तोवर ठीक होतं तेही गेल्यावर घर खायला उठलं. बरं नवराही काही असा नाही की जो बायको घरी आहे म्हणून तिनेच स्वयंपाक करावा, मी काही करणार नाही असं म्हणेल. त्याला माझ्या अवस्थेची पुरेपूर कल्पना होती आणि तशी त्याने मला साथही दिली.
कसेबस ४ महिने झाले आणि मला वाटलं की आपण resume तरी बनवावा. लिहायला बसले आणि मी वर्षापूर्वी काय करत होते हेच आठवत नव्हतं. आणि ते आठवून काहीतरी फायनल व्हायला दोन महिने गेले. आता अमेरिकेत नोकरी मिळवण्याचे दोन-तीन प्रयत्न केले. पण मंदीमुळे, माझ्या गॅपमुळे काही कुठे झाले नाही. त्यातही दो-चार वेळा फोन आले तेव्हा सानू नेमका झोपेतून उठली आणि फोनवर बोलायचं का तिला घ्यायचं काही कळत नव्हतं. तेव्हा पहिल्यांदा अपराधी वाटलं की खरंच मी नोकरी करायची गरज आहे का? पण रात्र झाली की मनात विचार यायला लागायचे की मी किती दिवस अशी राहू. खरं सांगायचं तर २८ वर्षात अशी वेळच आली नवती की मी काहीच करत नाहीये. शाळा, कॉलेज मग लगेच एका महिन्यात नोकरी, की लगेच दुसरी नोकरी. माझं डोकं सैतानाचं घर झालं होतं. संदिपला ही कळलं होतं की काहीतरी करावं लागणार आहे.
मग आम्ही विचार केला की जाऊ दे इथे नाही मिळत नोकरी तर भारतात जाऊन प्रयत्न करू. असेही इकडे राहून बरेच वर्षे झाली होती. मला नोकरी मिळाली आणिमी सेटला झाले की तोही इकडेनोकरी शोधून मग कायमचे इथेच राहायचे असा प्लॅन ठरला. पण भारतात सॉफ्टवेअर कंपन्यांची अवस्था तर माहीतच आहे. लोक कधीच ९ ते ६ काम करत नाहीत. उलट प्रत्येकाकडून जास्त कामाची अपेक्षा असते आणि त्यावरच तुमचे रेटींग ठरणार. म्हणजे मी ८-९ तासांत किती चांगले काम करते यापेक्षा मी किती तासा ऑफिसात थांबते यावर सर्व ठरतं. माझ्या प्रोफाइलसाठी तर ९-६ पेक्षाही जास्त काम करावं लागलं असतं. मग म्हणालो चला प्रोफाइल थोडा बदलून काहीतरी करू जिथे कमी ताण असेल. त्यासाठी अभ्यास सुरू केला. इकडे पुण्यात बहिणीने जिथे रेझुमे पाठवला होता तिथे काहीतरी हालचाल सुरू झाली होती> आणि चक्क मी जाण्याआधी माझा एक इण्टरव्हू फिक्स झाला होता. भारतात आले आणि सगळ्यांचे सानूला भेटून होईपर्यंत माझे २/३ ठिकाणी interviews झाले. पण खरंतर माझा आत्मविश्वास खूपच कमी झाला होता आणि तो कुणी एक शब्द झरी बोलला तर अजून ढासळत होता. त्यात आणि नको असलेल्या प्रोफाइलसाठी बोलायचे म्हणजे अजून कमी. संदीप माझ्यासोबत येऊन राहून परत गेला आणि माझी हिंमत कमी कमी होऊ लागली.
मी पुण्यात बहिणींसोबत राहत होते. त्या धोघीही माझ्याहून लहान आणि पुण्यातच नोकरी करतात. नोकरी शोधण्यासाठी तिथे राहून मग माझ्या interviewच्या वेळी कुणीतरी सानूला सांभाळायचे आणि मी जाऊन यायचे. एकूण ५/६ ठिकाणी जाऊन आले आणि मला परत सुखाची ओढ लागली. वाटलं जाऊ दे न कशाला हा सर्व व्याप. पुण्यात राहूनहई दोन महीने झाले होते. त्यात सानूला सांभाळायला संदीपची मदतही नसल्याने अजूनच हेक्टिक होत असे. बहिणी सर्व मदत तर करत होत्याच. पण मीच आई असूनही इतकी थकून जायचे की त्यांच्याकडून किती अपेक्षा ठेवणार. त्यात मग प्रत्येकाचा वाढलेला ताण, आम्ही सोबत राहूनही कित्येक वर्षे झाली होती त्यामुळे ती गॅप, यातून भांडणं तर व्हायचची. वाटायचं की आपण मनात मांडलेलं जग किती वेगळं होतं आणि परिस्थितीत किती अवघड.
बरं interview ला काही कॉल आले तरी त्यांना सांगितले की मी एक वर्षं काम करत नव्हते की बोलणं तिथेच संपायचं. काहीजण म्हणाले सहा महिने वगैरे ठीक आहे हो पण एक वर्षं खूप होतं. म्हणजे बाईने बाळंतही होऊ नये का? एकदा वाटलं आपण वेगळ्या प्रोफाइलसाठी कशाला नोकरी शोधायची? जे येतं, जे आवडतं ते करावं ना? मग पुन्हा उजळणी सुरू, पण मनाला एक उभारी मिळाली, जे आवडतं ते करण्यासाठी अभ्यअसाची.एकदा का मोठ्या कंपनीचा फोन आला की तुमचा कॉल आहे शनिवारी, या तिथे. मी रांगेत उभी राहून तिथे पोचले. त्या माणसाने मला एक टेक्निकल प्रश्न विचारला आणि मी संपून गेले. पुढचे १० मिनिट मी एकच उत्तर देते होते, I dont remember. तो जाताना मला म्हणाला 'Gap बराच झालेला दिसतोय. ' म्हटलं हम्म्म....
एकदा एक मजेशीर किस्साही झाला. एका कंपनीच्या walk-in interview ला गेले. ही २००० लोकांची रांग. म्हटलं आता कधी संपणार आपली ही पायपीट? जाऊ दे बाकीचे २००० होतेच ना? मी ही त्यातच. आता पहिला round बराच लवकर उरकला. त्यांनी मला थांबायला सांगितले. माझ्याशेजार एक गोड मुलगी बसली होती. म्हणाली मला पण थांबायला सांगितले आहे. बोलताना कळले की ती मुंबईला नोकरी करते आणि नवरा पुण्यात असतो. म्हणून इथे कडमडत आली होती दोन दिवसांसाठी. बिचारी शुक्रवारी ऑफिसकरून शनिवारी interview ला आली आता रविवारी परत जाऊन परत सोमवारी सुरू, तेही जोवर इकडे नोकरी मिळत नाही तोवर.आम्ही वाट पाहून तासेक झाला तिला म्हटलं बाई गं मी जरा जाऊनच येते माझे नाव पुकारले तर आल्यावर सांग मला. ती हो म्हणाली. मी धावत रेस्टरूमला जाऊन पळत परत आले. तिला विचारलं आला का माझा नंबर? नाही म्हणाली. परत तिने मला विचारलं, तुझं नाव ओळखीचं वाटतंय, तू blog लिहितेस का? म्हटलं हो, तर म्हणे अगं मी नेहमी वाचते मी तुझा blog. त्या क्षणी लई भारी वाटलं. अगदी कुणीतरी माझी स्वाक्षरी मागितल्यासारखं. And I didnt get the job but still I felt great. :-) असो.
त्यानंतर एका ठिकाणी बोलावणं आलं. हो, ते आल्याशिवाय आजकाल आतही येऊ देत नाही कुणी. कडमडत लवकर उठून ७ ची गाडी पकडून हिंजेवाडीला गेले. तिथे त्यांनी सांगितलं की interview घेणारे लोकच नाहीयेत तुझ्या प्रोफाइलसाठी आज तर नंतर या. आता शनिवारी सकाळी ९.३० ला हिंजेवाडीत काय करायचे. एका मैत्रिणीला फोन केला ती त्याच कंपनीत काम करते. तीम्हणे मी आज आलेलीच आहे कामाला, ये भेटायला. चला, ते तरी काम झालं. ३ महिन्यात एकदाही न भेटता आलेली मैत्रीण एकदाची भेटली मला. तिला पाहून गळाभेट घ्यायची इच्छा झाली पण आजूबाजूला पाहून आवरतं घेतलं. ती म्हणे तू तर काहीच बदलली नाहीयेस. मूल झाल्यानण्तर अशी compliment मिळाली की बायकांना अजून काय हवं? असो. तर तिला ना गालाला एक गाठ आली होती, म्हटलं काय झालं गं? तर म्हणाली अगं जायचं ही गाठ काढायला पण सुट्टीच मिळत नाहीये. तिचीही मुलगी एक वर्षाची असल्याने तिच्याही बऱ्याचं सुट्ट्या संपून गेल्या होत्या आणि कामही खूप आहे.एकतर ९.३० तास थांबायलाच लागतं, प्रवासाचे २ तास, मुलीसोबत राहायलाच मिळत नाही. म्हटलं असं करू नकोसजाऊन ये तब्येत महत्त्वाची. तिला भेटून मी घरी परत आले. परत रविवार एक कंपनी, मोठ्या रांगा आणि मी.... पण बहुदा तो दिवस वेगळाच होता. 'माझा' होता.
चक्कं तिथे मुलींची वेगळी रांग होती (इथेही segregation :) )आणि त्यामुळे माझा नंबर लवकर आला. interview सुरू झाला आणि मी सांगायला सुरुवात केली. इथे आल्यापासून पहिल्यांदा मला बरं वाटलं कारण मी जेव्हा सांगितलं की मी वर्षभर नोकरी करत नव्हते because I had a baby. तो माणूस म्हणाला its ok. 'ITS OK?' :-) मग पुढे सर्व सुरळित झालं. दुसरा round ही नीट झाला. They gave me an offer. I came home happy. पण अजून एका आठवड्यात ते कळवणार होते. माझं परतीचं तिकीट होतं आणि लवकर काही कळलं नाही तर मला जावं लागणार होतं. मी मग आईकडे जाऊन राहिले.त्या कंपनीकडून काही उत्तर येतं नव्हतं .मला येऊन ३-४ महीने झाले आणि अजूनही नोकरी मिळत नाही म्हटल्यावर काही भुवया उंचावल्याही की खरंच हिला नोकरी करायचीही आहे की नाही, इ. इ. आणि असाही मला एकटीला मारामारी करायचा कंटाळा आला होता. म्हटलं जाऊ दे, बाकी पोरी राहतातच ना घरी.आणि माझं जाणं जवळजवळ निश्चित झालं होतं.
पण आपण एक ठरवलं ना नियतीला दुसरंच करायचं असतं. I got the call........ :-) पहिल्यांदा नोकरी लागल्यावरही मला इतका आनंद झाला नव्हता जेव्हढा यावेळी झाला. मी परत जाण्याच्या फक्त ८ दिवस आधी हे सर्व घडलं. बऱ्याच लोकांना कळत नव्हतं की मला खरंच नोकरीची काय गरज होती. तेही नवरा परदेशात एकटा राहतोय आणि मी इकडे कशी राहतेय आणि मग कद्गी एकत्र राहणार, मुलीचं काय करणार, इ, इ. हेच सर्व प्रश्न मलाही पडले होते. पण स्वतःसाठी काहीतरी जिद्दीनं मिळवण्यात काय आनंद असतो ते ज्याचा त्यालाच माहीत.
या प्रोसेसमध्ये मला नवरा, सासरचे, घरचे सर्वांचा सपोर्ट मिळाला. ज्यांना तो मिळत नाही त्यांचं काय? काय माहीत. पण मला तरी नोकरी मिळाली होती. कुणाला वाटेल की चला मिळाली बाई हिला एकदाची नोकरी पण ही तर फक्त सुरुवात होती....
To be continued...
Tuesday, May 11, 2010
Subscribe to:
Posts (Atom)