Wednesday, November 13, 2013

मी कुठली ?

       मोठ्या उत्साहाने पुण्यात  आले. तिथल्या अनेक आठवणी होत्याच पण स्वत:चं घरही होतं. पंधरा-वीस दिवस झाले आणि मला शिकागोची आठवण येऊ लागली. तिथल्या सगळ्याच गोष्टींची, घर, गाडी , ऑफिस, फ्रेंडस, हॉटेल्स, आवडत्या खायच्या गोष्टी, कपड्यांची दुकानं आणि पुणं आपलं वाटेनासं झालं. कारणं बरीच होती, संदीपला  यायला होणारा उशीर , मग एकट्याने संध्याकाळी केलेली धावपळ, इथे बरेच मित्र असले तरी गाडीअभावी शून्य झालेलं 'सोशल लाईफ'. 
         एकदा कुठेतरी वाचलं होतं की एखादी जागा, शहर आपलं वाटणं म्हणजे तरी काय? तिथे एखादं रुटीन असणं, एखादं ऑफिस जिथे एक दिवस नाही गेलं तर कुणी विचारेल 'सगळं ठीक?' , एखादं हॉटेल जिथे महिन्यातून एकदा का होईना जायचंच आणि गेल्यावर तिथे कुणी ना कुणी ओळखेल, एखादी भाजी, फळ जे तिथल्या ठराविक ऋतूमध्येच मिळतं आणि एखादा ऋतू जो सुरु होण्याची चाहूल लागताच त्या ऋतूच्या कित्येक वर्षाच्या आठवणी जाग्या होतील. हे सगळं मला आठवत होतं पण शिकागो मधलं.
        म्हटलं बघावं तरी पुण्यात सुरुवात करून. आता आठ वर्षं एका ठिकाणी राहिल्यावर असं होणारंच. इथेही प्रयत्न करून पाहायला हवा.  म्हणून शुक्रवारी घराजवळच्या डॉमिनोज मध्ये मुलांना घेऊन चालत गेले बरेचदा. पण तिथल्या थंड प्रतिसादाने परत जायची इच्छा होईना त्यात पावसाळा लागून गेला मग तेही राहीलं. एक दिवस मी ऑफिसमधून निघाले आणि कोपऱ्यावर एक रिक्षावाला म्हणाला 'मैडम वारजे ना?' . पुढे मग दोन तीन वेळा तोच आला.  मला वाटले अरे वा हे रुटीन चांगल आहे. पण नंतर नंतर मला कळले की त्याला तिकडे यायचेच नहिये. म्हटले जाऊ दे. आम्ही पूर्वी एका हॉटेल मध्ये जायचो म्हटले चल जाऊ तिकडे एकदा. तिथे गेल्यावर जुन्या आठवणी जाग्या झाल्या पण पहिल्याच भेटीमध्ये मला जाणवलं की तिथल्या खाण्यामध्ये किती रंग मिसळला होता ते. मुलीच्या ड्रेसवर सूप सांडलं तर त्याचा नारंगी डाग दिसू लागला. आणि  खाण्यावरून मन उडालं. 
      अशातच गणपती आले. मस्त वाटलं सणाला इथे राहायला, खूप दिवसांनी अनुभवायला. सोसायटी मध्ये अनेक कार्यक्रम झाले मुलांना मजा आली. आम्ही पण उत्साहाने फोटो काढण्याची जबाबदारी घेतली. पाच दिवसात फोटो संपले आणि सर्व पुन्हा आपल्या मार्गाला लागले. तिथल्या आपापसात होणाऱ्या गप्पांमध्ये आपण परके वाटतोय याची जाणीव असायची.  सहा महिने होऊन गेले तरी मला पुणं आपलंसं वाटत नव्हतं. अशातच शिकागोला महिनाभर जायचा प्लान ठरला आणि मला लक्षात आले की मी परत जायला जास्त उत्सुक होते. लगेच मैत्रीणीना फोन करून सांगितले कि मी येतेय त्यांनीही आनंद व्यक्त केला. काही लागलं तर सांग म्हणाल्या. मीही निर्धास्त होते. काही लागलेच तर निदान बाहेर जाऊन घेऊन यायला दुकाने तरी माहीत होती. मुलांच्या शाळेतूनही होकार आला एक महिना ठेऊन घ्यायला. तेही वाट बघत होते मुलांना भेटायला. 
       शिकागोला पोचल्यावर अजूनच भारी वाटलं अगदी घरी परत आल्यासारखं. कशाची काळजी नाही, एकटेपणा नाही की कंटाळा नाही. अगदी ऑफिसमधेही सर्वांनी उत्साहाने स्वागत केले. जेवणं ठरली, भेटायच्या वेळा ठरल्या, कार्यक्रमाची आमंत्रणं आली. गेले सहा महिने इथे नव्हतो असं वाटतच नव्हतं. अगदी रोजच्यासारखे रुटिन होते. पहिले दोन आठवडे तर नुसत्या भेटि घेण्यातच गेले. शॉपिंग, बाहेर खाणे, संध्याकाळी घरी लवकर परत येणे , मुलांना वेळ देणे, आणि सोशल लाईफ सर्व परत मिळालं होतं. मनात कणभरही शंका राहिली नाही की दोन वर्षांनी आपण परत इकडे यायचेच.
        तिसऱ्या आठवड्यात मुलाचा वाढदिवस होता तेव्हा मात्र घराची आठवण झाली. वाटलं त्याला आजी-आजोबा, मामा-मावश्या पाहिजेत लाड करायला. थोडाफार साजरा करून तो दिवस असाच निघून गेला. तिथल्या Organized social gathering च्या मर्यादा जाणवल्या. एखाद्याने आपल्या रोजच्या रुटिन मधून बाहेर काही करणं किती दुर्मिळ आहे असं वाटलं. ऑफिसच्या दिवशीही २०-२५ किमी प्रवास करून भाच्यांना भेटायला येणाऱ्या मामा-मावशीची आठवण झाली. दोन दिवसात दिवाळीही आली. तेव्हा गणपतीला केलेल्या सोसायटीमधील कार्यक्रमाची आठवण झाली. लोकांचा उत्साह आठवला. शिकागोमध्ये करून करून  काय करणार तर  मुलांना तयार करून पूजा करणार, मंदिरात जाणार आणि पॉटलक करून लोकांना भेटणार. एखादा सण साजरा करण्यासाठी तिथे असलेली केवळ चार भिंतीची मर्यादा अजून एकदा जाणवली. वाटलं पुण्यात असायला हवं होतं. 
          अशातच तिथे थंडी अजून वाढली आणि दे-लाईट सेविंग मुळे वेळही बदलली. संध्याकाळी ५ वाजता बाहेर पडले आणि एकदम अंधार दिसला. रस्त्यावर लोकांचं दर्शन दुर्मिळ झालं. घरी येऊन मुलांना थंडीत बाहेर नेणंही जमत नव्हतं . तेव्हा मला माझ्या पुण्याच्या रुटीनची आठवण झाली. पाच वाजता बाहेर पडलं की रहदारी, लोकांचा, गाड्यांचा आवाज, घरी गेलं की नेहेमी दार उघडं असलेले शेजारी, मग संध्याकाळी मुलांना खाली खेळायला नेणं, हे सर्व आठवलं. पुण्यातल्या घराचीही आठवण येऊ लागली होति. शनिवार-रविवारी मिळणारा निवांतपणा, घरात येणारं ऊन, उजेड, वारा, त्यांच्या सोबतीला चहा. कामाला येणाऱ्या मावशींच्या मदतीने सुखकारक होणारा सुट्टीचा दिवस, शनिवारी भाज्या आणणं, त्याही ठराविक व्यक्तीकडूनच. मग त्यांनी मुलांना खायला हातात दिलेले  वाटाणे, यांची आठवण येत होती. शेवटचा आठवडा वाट पहाण्यात संपून गेला. 
           घरी परत आले आणि कसं मस्त वाटलं. मुलांना आजी-आबा, काका-काकू, मामा भेटले. त्यांच्याकडे पाहून कळत होते कि त्यांनाही सर्वांची आठवण येत होती. कामाला येणाऱ्या मावशीही अगदी वेळेत आल्या आम्ही आल्यावर. घर छान स्वच्छ करून दिलं. दुसऱ्या दिवशी ऑफिसला गेले तर तिथेही सर्वांनी चौकशी केली, आठवण काढली. बिल्डींगमध्ये सर्वांनी प्रेमाने विचारपूस केली. मुलांना 'मिस' केलं म्हणाले दिवाळीला. अगदी सोसायटीच्या दिवाळीच्या कार्यक्रमात फोटो काढायलाही आमची आठवण झाली म्हणे. :) पहिल्या दिवशी ऑफिसमधून परत येताना नवीन रोजचा रिक्षावाला उभा होता. मी आले कोपऱ्यावर की तो सीट झटकून रिक्षा सुरु करून थांबला. मला कुठे जायचंय हे सांगायची गरजही नव्हती. :) मी पुण्याची होतेय हे तिथून बाहेर गेल्यावर कळलं होतं. :)
 
विद्या. 

Friday, November 08, 2013

आय टी ची लॉटरी

      एक १५-१६ वर्षापूर्वी, मी आणि माझी आई स्वयंपाकघरात  बसलो होतो. तिचा स्वयंपाक आणि माझा गृहपाठ चालू होता. मध्येच आम्ही लॉटरीवरून गप्पा मारू लागलो. आपल्याला एका लाख रुपयाची लॉटरी लागली तर काय काय करता येईल, विकत घेता येईल  याचा विचार करत होतो. त्यात मग रंगीत टीव्ही, फोन, फ्रीज, इ गोष्टी होत्या. चार चाकी एखादी गाडी घ्यावी असं काही वाटलं नाही. ती आमच्या स्वप्नातही नव्हती. ती लॉटरी काही आम्हाला लागली नाही, पण थोड्या वर्षात एक वेगळीच लॉटरी लागली, ती म्हणजे I T ची. हो, त्याला लॉटरीच म्हणावी लागेल कारण बारावी नंतर केवळ डॉक्टर किंवा वकील नको व्हायला म्हणून मी इंजिनीयर झाले. मी कॉलेजमध्ये जाईपर्यंत मी कोरेगावात एकही इंजिनीयर पाहीला नव्हता. त्यामुळे केवळ एका काल्पनिक पात्राकडे एक करियर म्हणून पाहणे आणि तो निर्णय योग्य ठरणे ही लॉटरीच नव्हे काय?
         तर मी इंजिनीयर होण्यामागे अजून एक हेतू होता, तो म्हणजे स्त्रियांसाठी हे क्षेत्र खूप चांगलं होतं म्हणे. एक तर लगेच नोकरी मिळत असल्याने गुंतवणुकीवर लगेच परतफेड मिळत होती आणि पुढे व्यवसायासाठी लागणारे भांडवल इ एका मुलीला कोण देणार होते? त्यापेक्षा करा नोकरी आयुष्यभर. त्यात कामही बैठे, म्हणजे शारिरीक त्रास कमी. १५-२० वर्षापूर्वी मी केवळ ठराविक क्षेत्रातच स्त्रिया पहिल्या होत्या. एक तर शाळेत मास्तर म्हणून, थोड्याफार वकिली करणाऱ्या होत्या पण त्यांची मिळकत किती असेल याची कल्पना नाही. मग त्यातल्या त्यात सुरक्षित नोकरी म्हणजे सरकारी, बँकेत किंवा टेलिफोन खात्यात, कुठे कचेरीत क्लार्क म्हणून. आणि खूपच पुढे गेलेल्या म्हणजे राजकारणात. आज काल मी बरेच स्त्रियांना पोलिसाच्या वेशात पाहिलंय, काही ट्राफिक पोलिस पाहिल्या, एक तर बसमध्ये कंडक्टर पण पाहिली. हे सर्व मी लहानपणी पाहिलं नाही हे नक्की. असो, एकूण माझा कॉम्पुटर इंजिनीयर व्हायचा निर्णय योग्य ठरला कारण माझ्यासोबत आपल्या देशालाही ही I T ची लॉटरी लागली होती.
           भारतात एक तर पहिल्यापासून गणित, शास्त्र आणि इंग्रजी या तीन विषयांवर शाळांमध्ये भर दिला जातो. त्यामुळे या तीन विषयांचे ज्ञान असलेला आणि बऱ्यापैकी कळेल असे इंग्रजी बोलणारा आणि स्वस्त असा मोठा कामगार वर्ग परकीयांना इथे मिळाला. अर्थात त्याच वेळी भारताची अर्थव्यवस्थाही जगाला नुकतीच खुली झाली होती आणि त्यामुळे परकीय गुंतवणूक थोडी वाढतही होती. त्याचसोबत इथल्या कामगार वर्गाची ओळखही होत होती. अर्थात Outsourcing हे काही नवीन नव्हते, तोवर आपण वेगवेगळ्या manufacturing कपन्यांसाठी काम करतच होतो पण या पांढरपेशा व्यवसायात पाय ठेवणे नवीनच होते. त्यात वाढ होण्यासाठी वेगवेगळ्या भारतीय कापन्यांची मदतही झालीच. TCS, WIPRO, INFOSYS सारख्या  कपन्यांनी वेगवेगळे प्रोजेक्ट भारतात कसे आणता येतील यासाठी बरीच मेहनत घेतली. त्याचसोबत त्यासाठी लागणारे योग्य लोकंही त्यांनी इंजिनियरींग कॉलेजमध्ये जाऊन शोधून आणले.
         साधारण २००० सालच्या दरम्यान एका वेगळ्याच प्रश्नामुळे या लोकांसाठीची मागणी अजून वाढली. तो म्हणजे Y२K चा प्रॉब्लेम. तोपर्यंत बऱ्याचशा वित्तीय संस्थांमध्ये जे काही प्रोग्रामिंग केले गेले होते त्यात तारीख लिहिताना वर्ष हे 'YY' या दोन अंकात लिहिले जात होते. त्यामुळे २००० साली त्या सर्व प्रोग्राम मध्ये दोन तारखांची वजाबाकी करताना ००-९९ अशी वजाबाकी झाली असती आणि सर्व गणित चुकले असते. तर या अशा प्रोग्राम मध्ये दुरुस्ती करण्यासाठी बऱ्याच कंपन्यांची धावपळ उडाली. कोणी संगणकात थोडे फार ज्ञान असलेला माणूसही 'रिसोर्स' म्हणून कामाला लावला गेला. त्यामुळे मागणी वाढली की त्यासाठी पैसाही जास्त मागितला गेला. २००१ मध्ये अमेरिकेत झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे थोडी मंदी आली होती पण तोवर जगाला भारताची I T व्यावसायिकांचा देश म्हणून ओळख झाली होती त्यामुळे आर्थिक मंदी कमी झाल्यावर पुन्हा एकदा हा व्यवसाय वाढतच राहिला.
          लोक आपल्या मुलांना इंजिनीयर बनवत होते आणि भारतीय कंपन्या त्यांचे परदेशातील वास्तव्य आणि प्रस्त वाढवत होते. त्याच वेळी भारतीय सरकारलाही या क्षेत्राचे महत्व लक्षात आले होते आणि त्यांनी वेगवेगळे उपक्रम आणि सवलती सुरु केले. सर्वात पहिले म्हणजे Information Tehcnology साठी एक स्वतंत्र खाते बनवले गेले. (अर्थात त्यात फायदा त्यांचाच होता, तेव्हढाच एक नवीन मंत्री आणि तेव्हढेच त्याचे मान-पान.)  २००० साली, Information Technology Act २००० प्रस्थापित केला. इलेक्ट्रोनिक स्वरुपात दिलेल्या- पाठवलेल्या माहितीला कायद्याने मान्यता मिळाली. सायबर गुन्ह्यांसाठी वेग-वेगळे नियम लागू करण्यात आले. या खात्याची वेगळी वेबसाईट ही आहे, http://deity.gov.in/.
संगणकीय मालावारील आयात कर कमी करण्यात आला आणि परकीय कंपन्यांच्या गुंतवणुकीवर सवलती देण्यात आल्या. त्याचबरोबर निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी सोफ्टवेअर टेक्नोलॉजि पार्क आणि स्पेशल इकोनॉमी झोन या योजना राबवण्यात आल्या (STPI  आणि SEZ ).STPI मधून होणारी निर्यात अनेक पटींनी वाढली. २००८-०९ मध्ये STPI मध्ये नोंदवलेल्या कंपन्यांची निर्यात एकूण भारतीय निर्यातीच्या ९०% होती. अर्थातच  सरकारने त्यासाठी २०११ पर्यंत या कंपन्यांना कर सुट्टीच(Tax Holiday) दिली होती. तसेच सोफ्टवेअरशी संबंधित आयातीवरील करातही सवलती देण्यात आल्या. २००५ मध्ये वित्तीय आणि दळणवळण खात्याने खास झोनची स्थापना केली, SEZ,  स्पेशल इकोनॉमी झोन. आंतरराष्ट्रीय दर्जाचे पायाभूत घटक भारतातही असले पाहिजेत या मूळ कल्पनेतून हे झोन बनवले गेले. त्यातून ही निर्यात जास्तीत जास्त सुरळीत आणि सोपी झाली. STPI आणि SEZ मध्ये मूळ फरक म्हणजे करातील सवलत सेझ मध्ये कमी करण्यात आली. पहिले पाच वर्षं, १००%, पुढचे पाच ५०% आणि त्यानंतर चे ५०% नफा आरक्षित साठ्यामध्ये ठेवण्याच्या अटीवर. या सर्व योजना अवाढव्य वाढणाऱ्या उद्योगासाठी नक्कीच फायदेशीर होता.
      दुर्दैव म्हणजे, या सवलती दिल्यामुळे जो पैसा सरकारला मिळाला असता आणि त्यातून पुढे जे आधुनिकीकरण करता आले असते ते काही झाले नाही.  पैसा मिळतो म्हणून बाकी क्षेत्रातील बरेचसे हुशार लोक इथे/परदेशात याच क्षेत्रात अडकून गेले. शिवाय इतके लोक सर्व परकीय कंपन्यासाठी काम करत असल्याने, भारतीय कार्यक्रमाना चांगले लोक मिळणे अवघड झाले. कित्येक बँका, सरकारी खात्यांच्या वेबसाईट इतक्या फालतू आणि हळू असतात की त्यावर जाणेच नको वाटते, अगदी आपली रेल्वेची साईट, पासपोर्टची साईट सुद्धा. म्हणावे तसे बाकी खात्यांचे संगणकीकरणही झाले नाही, ज्यामुळे अनेक लोकांचे कष्ट, पैसा आणि वेळ वाचला असता.
       अनेक सवलती आणि योजनामुळे या व्यवसायाला भरभराटीचे दिवस आले. त्याचा फायदा माझ्यासारख्या मध्यमवर्गीयांना अधिक झाला. जिथे एका शिक्षकाला १० हजार रुपये मिळवण्यासाठी कित्येक वर्षे खर्च करावी लागत होती तिथे पहिल्याच महिन्यात त्याच्या मुलाला १०-१५ हजार सहज मिळू लागले.  त्यातूनच पुढे परदेशातही जाण्याची संधी मिळू लागली. जिथे मराठी माणूस कधी उत्साहाने फिरायला म्हणून जात नव्हता तिथे मुले घेऊन जाऊ लागली. लोकांनी आयुष्यभर पैसा जमवून घर उभं करावं तेच आता कर्ज घेऊन का होईना तरुणपणीच घेण्याची हिम्मत होऊ लागली. अर्थात हि हिम्मत करायलाही थोडा वेळ गेलाच. कारण सरकारी नोकरीतील स्थिरतेमधुन बाहेर पडून प्रायोजित कंपनीत नोकरी करायची हे पटायला वेळ लागलाच. त्याचसोबत धनसंचय न करता न तो स्वत:साठी खर्च करण्याची पाश्चात्य देशातील मानसिकताही हळूहळू तरुण पिढीत आली.
         आपल्या गुंतवणुकीवर परतफेड इतल्या लवकर होत आहे हे पाहून लोकांनी जसे मुलांना अभियांत्रिकी विद्यालयात घालण्यासाठी वाट्टेल ते पैसे देण्याची हिम्मत केली तसेच वेळोवेळी फी वाढवणारी आणि पैसा बळकावणारी विद्यालये सुरु होऊ लागली. काळा पैसा तर या अशा संस्थांमधून पांढरा होऊ लागला. मुलाला ५०% मार्क असले तरी कितीही फी देऊन त्याला इंजिनियरच करायचे हे मात्र नक्की. त्यात मग आधीच घोकंपट्टीला बढावा देणारी शिक्षणसंस्था अजूनच मजबूत झाली. नुसती महाविद्यालये कशाला? त्यासाठी सुरुवातीपासूनच इंग्रजी माध्यमातून शिकवणाऱ्या शाळाही सुरु झाल्याच. International School म्हणून जिथे मुलाला घालतो ते खरेच आंतरराष्ट्रीय दर्जाचे आहे का? हा विचार किती पालक करत असतील?
          या सगळ्या महागड्या शाळांमध्ये मुलांना घालण्यासाठी पालकही कष्ट करतच होते की. घरासाठी कर्ज, मुलासाठी कर्ज, हे सगळं फेडायचं म्हणजे कितीही त्रास झाला तरी नोकरी सोडता येत नाही ना. मग नवरा-बायको दोघांची नोकरी गरजेची. त्यासाठी आख्खं घर घड्याळाला टांगलेलं. नोकरीवर जायची घाई, यायची घाई, मुलांना शाळेत सोडायची घाई, आणायची घाई, अभ्यासाची, जेवायची आणि परत झोपयचीही घाईच. त्यात नोकरीतील तणावाचा नवरा बायको यांच्या संबंधांवर होणारा परिणाम आणि त्याचा मुलांवर होणार परिणाम हे वेगळेच. माझे बाबा शिक्षक होते. ते रोज ५.४५ पर्यंत घरी आले नाहीत की आम्ही सगळे दारात उभे अजून आले नाहीत का पाहायला. एखाद्या दिवशी ते गावाला गेले तर ते येईपर्यंत आम्ही गाडीवर पडून असलो तरी ते आल्यावरच झोप लागायची. त्यांच्यासोबत खेळणं, बोलणं इतकं होत नसेलही पण ते घरी होते न? अशा वेळी रात्री ८ वाजेपर्यंत आई-बाबांची वाट असणाऱ्या मुलांकडे पाहून खूप वाईट वाटतं.
         माझी आई तरी घरी होती. माझ्यासारख्या नोकरी करणाऱ्या मुलींचे आयुष्य तर कायमचे बदलून गेले. स्त्री-पुरुषांना बरोबरीने वागणूक देणे मिळणे, सर्व मान्य. पण त्यासाठी मुलं -बाळ संसार सर्व टांगून ठेवायला लागू लागला. बर हे क्षेत्र सुरक्षित, चांगला पगार, स्थैर्य हे सर्व आहे म्हणून कित्येक मुली यात आल्या. मग हळू हळू BPO सुरु झाले, अमेरीका, इंग्लंड वेळेतील शिफ्ट सुरु झाल्या. त्यासाठी ने-आण करायला ट्रान्स्पोर्ट कंपन्यांनी अजून सुरक्षितता आणण्याचा प्रयत्न केला. तरीही समाजाची मानसिकता पूर्णपणे बदलत नाहीच ना? त्यामुळे लग्नासाठीही बघायला आलेले , 'मुलगी BPO , कॉल सेंटर मध्ये काम करते?  म्हणून  आधीच नाक मुरडू लागली आणि त्याहून त्यांचे आई-वडील. हे सर्व असले तरी आपणही स्वावलंबी होऊ शकतो हा विश्वास मुलींमध्ये हळूहळू येऊ लागला. मुलगीही मुलाइतकाच पगार मिळवू शकते, परदेशात जाऊ शकते, एकटी फिरू शकते याचा आई-वडिलानाही अभिमान वाटू लागला. बायकोसाठी नवराही थोडी घरची कामे करू लागला. तरीही ओढाताण होऊ लागली ती मुलं होताना. घराची जबाबदारी स्वीकारून, नोकरी आणि दमलेल शरीर हा सर्व मेळ घालणं अवघड होऊ लागलं. एक आई म्हणून मुलाला लोकांकडे सोडून  राहणं हे मानसिक ताण-तणावाचेच ना?
      सगळ्यासोबत अजून एक वेगळाच ग्रुप झाला तो म्हणजे अस्थायिक भारतीयांचा. त्यांच्याही मनाची अशीच परवड, फक्त भारतात राहायचे की परदेशात म्हणून. तिथल्या सोई-समृद्धी बघून तिथे स्थावर होणाऱ्या लोकांची संख्या वाढली. त्याचसोबत मुलांचे संगोपनाचे प्रश्नही. आता नको, थोड्या दिवसांनी जाऊ म्हणून कायम तिथे राहणारे आणि खरंच परत आले तरी इथे समाधान न मिळणारे असेही लोक त्यात आलेच. त्यांच्या सोबत त्यांच्या घराच्या लोकांचीही परवड. मुलाला भेटायला कधीतरीच तिकडे जायचे की तिथेच राहायचे? ज्या वयात मुलांनी-नातवांनी सोबत करावी त्यात एकटं राहणे हा वनवासच. आणि गेले तिकडे तरी आयुष्यभराचे नाते-गोटे सोडून तिकडे जायचे, तोही त्रासच.
       या क्षेत्राबाद्दला अजून म्हणजे लवकरच बाकीही देश स्पर्धेत येत आहेत. आपल्या सध्याच्या पिढीने थोडा जरी आळस केला तर चीन सारख्या कष्टाळू देशाने आपल्याला मागे टाकायला वेळ लागणार नाही. त्यामुळे स्पर्धेत टिकून राहण्यासाठी आपली मानसिकता, शिक्षणसंस्था  बदलण्याची गरज आहेच. घरासोबत बाहेरही बरेच बदल झालेत. परकीय संस्कृतीची अजून जास्त ओळख पटत आहे. बाजारपेठेत नाव-नवीन वस्तू पाहायला आणि त्या घ्यायलाही जमत आहे. तिथे पाहून आलेली, आवडलेली, खाल्लेली एखादी पाककृती आता घरीही बनत आहे. त्यासाठी लागणाऱ्या वस्तूही बाजारात सहजपणे मिळत आहेत.त्याचबरोबर आपण आपल्या संस्कृतीपासून दूर तर जात नाहीये न हे ही पहिले पाहिजे. एकूण काय की या क्षेत्रामुळे भारत जगाच्या नकाशावर आला. खूप चांगल्या गोष्टीतर घडल्याच,  पण त्याची किंमतही आपल्याला द्यावी लागली आहे . शेतीप्रधान देशातील सर्व लोक शहरांकडे वळू लागले आहेत, त्यामुळे शेतीमध्ये काम करणाऱ्या लोकांची संख्या रोडावत आहेच. पण उद्या IT ला मंदी आल्यावर लोक कुठे जातील आणि काय व्यवसाय करतील याची योजना वेळीच केली नाही तर काय होईल माहित नाही. लवकरच याला पर्याय शोधणे आवश्यक आहे, आपल्या आणि मुलांच्या भविष्यासाठीही.
  आय टी
-विद्या