शनिवारी दुपारी चकोल्या केल्या. चकोल्या/वरणफळं किंवा दालढोकळी जे काय म्हणायचं ते म्हणा. दुपारी सर्व बनवून जेवायला दीडेक वाजला. मग मस्तपैकी ताणून दिली दोन तास. खरंतर त्या दिवशी दुपारी झोपले नसते तर ही पोस्ट तेंव्हाच लिहिली असती. पण शनिवार दुपारची झोप नाही म्हणजे काय? असो.
तर चकोल्या. कोरेगावात आमची रोजची शाळा ११-५ ते असायची. शनिवारी फक्त सकाळी ८-१२.३० पर्यंत. असंही ११ वाजता शाळेत वेळेत जायची बोंब. मग शनिवारी तर काय बोलूच नका. त्यामुळे सकाळी काही खाऊन जाणे किंवा डबा नेणे वगैरे नाहीच. शाळेतून परत येताना जोरदार भूक लागलेली असायची. घरी आलं की पहिला प्रश्न, जेवायला काय आहे? आणि आईचं ठरलेलं उत्तर, चकुल्या. आता शनिवारी चकुल्याच करायच्या हे आई-दादांचं कधी कसं ठरलं वगैरे काय माहित नाही. पण मला आठवतं तसं शनिवारचा मेन्यू फिक्स होता.
त्याचंही नाटक कमी नाही. त्यासाठी लागणारी कणिक घट्टच मळलेली हवी. नाहीतर मग त्या वरणात घट्ट गोळा होतात. कणकेत मीठ नसेल तर खाताना ते जाणवत राहतं. मग त्या लाट्या लाटून कागदावर पसरून एकेक करून शंकरपाळीच्या आकारात कापायच्या. मला त्या कापण्यासाठी मी केलेला हट्टही आठवतो. आईच्या कशा सरसर कापल्या जातात, माझ्या नाहीत अशी माझी तक्रार असायची. पण एकदा लाट्या झाल्या की बाकी काम पटकन व्हायचं. आईची लसणाची फोडणी मस्त बसते त्यांना. चकुल्यासोबत अनेकदा आई पापड वगैरे तळायची आणि कधीतरी भरलेली मिरचीही. दादाही शाळेतून यायचे साधारण त्याच वेळेत. गरम चकुल्या, भात वरून लिंबू हे सर्व वरपून खाऊन मस्त झोप आलेली असायची. साधारण चारपर्यंत झोप काढायची. मला तर वाटतं मला दुपारी झोपायची सवय तेंव्हाच लागली असावी. :)
झोपेतून उठलं की संध्याकाळचा दूरदर्शनवर हिंदी सिनेमा असायचा. तो बघत घरच्या भुईमुगाच्या शेंगा फोडून त्यातून दाणे काढायचे. दादांचा शनिवारी उपवास, त्यामुळे सकाळी चकोल्या तसं रात्री खिचडी ठरलेली. ते सोललेले शेंगदाणे रात्रीच्या खिचडीसाठी वापरायचे. सिनेमा संपला की हिंदी बातम्या, एखादी ९ वाजताची सिरीयल आणि पुन्हा झोप. याच्या अधेमधे आजोबांची एखादी शिकवणी असायची. ते हमखास स्पेलिंग टेस्ट घ्यायचे शनिवारी. रात्री जमलं तर थोडासा अभ्यास. शनिवार संपला.
परवा शनिवारी चकोल्या केल्यावर पुन्हा हे सर्व आठवलं. अगदी जसंच्या तसं. तेंव्हा अनेकदा आईचं उत्तर ऐकून चिडचिड व्हायची की नेहमीच तेच काय खायचं. पण आता वाटतं म्हणूनच तर ती गोष्ट इतकी आठवणीत राहिली. तसंच आपणही पोरांना एखादी ठराविक वस्तू, ठराविक पदार्थ नियमित एकाच दिवशी करून द्यावा असा विचार करतेय. पोरांनाही माझा असा एखादा पदार्थ असावा ज्यावरून त्यांच्याही अशाच एखाद्या दिवसाच्या सगळ्या आठवणी जाग्या होतील. त्याचे सारे संदर्भ, वास त्यांच्या कायम मनात राहतील. मी तर म्हणतेय, चकुल्याच कराव्यात. :) तेही 'इंडियन पास्ता इन लेंटिल सूप' म्हणून खातील.
-विद्या भुतकर.