दिवाळीचा फराळ खाऊन कंटाळा आला. म्हणजे तसे दुपारीच जेवणानंतर दोन लाडू, तीन वाजता तिखट शंकरपाळी आणि लोणचं , चहानंतर तिखट हवं म्हणून चकली वगैरे झाली. मग कंटाळा आला. त्यामुळे संध्याकाळच्या जेवणाला तिखट जाळ चिकन रस्सा बनवायचं ठरवलं. चिकन बनवून झालं. म्हटलं नवऱ्याने ताजी कोथिंबीर आणलीय ती चिरून टाकावी वरुन. कोथिंम्बीर चिरायला घेतली आणि नेहमीचा विचार परत डोक्यात आला. तर प्रश्न असा की, 'तुम्हाला छान कोथिंबीर चिरता येते का?'. बरं, कोथिंबीर चिरतात, कापत नाहीत. गळा कापतात. :) असं नवऱ्याला ऐकवूनही झालंय. तर तुम्हाला छान कोथिंबीर चिरता येते का? मला येत नाही. कितीही ताजी, कोवळी जुडी आणली तरी ती पटकन धुवून चिरेपर्यंत ती ओली असल्याने त्यावर काळे वण उठतात. नवऱ्याला चीर म्हणावं तर त्याच्या हातून तर तिचा खूनच बाकी असतो.
पण अनेकांकडे मी छान धुवून, सुकलेली, एकसारखी चिरलेली पानं भाजीवर पाहते तेंव्हा मला फार मत्सर वाटतो. खिचडीवर, ढोकळ्याच्या फोडणीतली, सुरळीच्या वडीवरची, मसालेभातावरची कोथिंबीर पाहिली की किती छान वाटतं. पण कदाचित इंग्लिश मध्ये म्हणतात तसं, I am not a कोथिंबीर person. मुळात ती कला माझ्यात नसावीच. कारण अनेक वर्षं तर आणलेली कोथिंबीर वाया जाईपर्यंत फ्रिजमध्ये तशीच राहायची. मी कधीकधी वाया जाऊ नये म्हणून खोबरं- कोथिंबीरचं वाटण करुन ठेवायचे. तरीही कधी वेळेला पोह्यांवर पेरायला कोथिंबीर आहे असं झालं नाही. आणि असली तरी ते खाल्ल्यानंतर माझं लक्षात येई की अरे कोथिंबीर राहिलीच. अगदी काल कढीवरही राहूनच गेली.
एकूणच माझ्या आवड आणि आळस या दोन्ही मध्ये तडजोड म्हणून मी मागच्या वर्षी, नवीन वर्षाचा संकल्प केला की यावर्षी कमीत कमी कोथिंबीर वाया घालवायची. माझ्या संकल्पासाठी नवऱ्यानेच जुडी आणली की त्यातलं पाणी उडेपर्यंत कागदावर पसरुन ठेवायला सुरुवात केली. मग त्यानेच तिचे देठही खुडून छान डब्यातही ठेवली. माझं काम फक्त वेळेत वापरायचं. :) (असो आईही म्हणतेच की फार लाडावलेय मी.) तर एकूण या संकल्पाचा या वर्षी कोविड मध्ये फायदा झाला. जवळजवळ तीन आठवडे वाया न घालवता कोथिंबीर वापरली मी!! आहे कुठं? त्याची पुढची पायरी म्हणजे ही कोथिंबीर चिरण्याची कला. ती कधी शिकणार काय माहित? कदाचित त्यासाठी सुगरणच असायला हवं. तुमच्याकडे टिप्स असतील तर त्याही सांगा.
तर प्रत्येकवेळी कोथिंबीर चिरताना हे विचार डोक्यात येत राहतात. आज लिहूनच टाकले. कधी कधी वाटतं आयुष्य असल्या फुटकळ विचारातच जायचं. असो. :) आज चिकनवर मस्त पेरलीय कोथिंबीर. खाऊन घेते. :)
विद्या भुतकर.