मी जेंव्हा http://www.manogat.com/ या साइट वर दाखल झाले, सर्वात पहिला शव्द मला आवडला तो म्हणजे, 'परवलीचा शब्द', म्हणजे 'पासवर्ड'. आजपर्य़ंत पासवर्ड या शब्दाचे मला कधी आकर्षण वाटले नाही पण 'परवलीचा शब्द' मला भावला. माझा आणि त्याचा स्नेह तसा जुना.६-७ वर्षांपूर्वी मी माझे पहिले खाते उघडले, याहू!! वर. तिथे लिहिलेला,वापरलेला पहिला परवलीचा शब्द. त्याकाळी( खूप जुनी गोष्ट सांगितल्या सारखे वाटते ना?), तर त्या काळी आम्ही अगदी प्रयोगशाळेत या टोकापासून त्या टोकापर्य़ंत ओरडायचो, 'अग या मशिनचा पासवर्ड काय आहे? '. कधी न सांगताच बदलायचोही, उगाच त्रास देण्यासाठी. :-) तेंव्हा त्याचं महत्त्व जाणवलंच नाही. तो खेळ खेळ नाही राहीला.दिवसेंदिवस या छोट्याशा शब्दाचे महत्त्व वाढतंच गेले. तुमचे बैंक खाते,वैयक्तिक पत्रव्यवहार खाते, कामाचे पत्र खाते, क्रेडिट कार्डचे खाते,अगदी इथे लिहिण्यासाठीचे पण खाते. :-) अशी महत्त्वाची माहिती असलेली खातई फक्त या परवलीच्या किल्लीने उघडतात. जेवढ्या सुविधा तेवढी मोठी यादी.
तर प्रत्येक नवीन खात्याबरोबर नवीन शब्दाचा शोध सुरु होतो.बरं सगळीकडेच एकच शब्द टाकावा तरी पंचाईत, आणि नाही टाकावा तर....??? डाबर च्यवनप्राश वापरा, स्मरणशक्ती वाढवण्यासाठी. :-)) माझ्या कार्यालयात, ७-८ दिवसांच्या सुट्टीनंतर लोक परत आल्यानंतर प्रशासकाच्या कामाचा व्याप वाढलेला असतो. कारण बरेच जण आपला पासवर्ड विसरलेले असतात. आता तुम्ही म्हणाल असा कसा विसरतात? पुन्हा एकदा ....च्यवनप्राश हेच उत्तर. :-) तर, मग काही लोक नवीन शब्द टाकतात तर काहींना जुना शब्द सापडून जातो. आता नवीन शब्द सुचणे तरी सोपे काम आहे का? काही साधा-सुधा असून चालत नाही.किती तरी नियम. ५-८ अक्शरी असावा,नुसते 'अबकड' टाका आणि पहा,तो संगणक नक्की रडेल. बरं त्याला हेही कळत की मागच्या वेळी तुम्ही हाच शब्द टाकला होता का.वैतागून कुणी जन्मतारीख टाकतो तर कुणी आपल्या प्रिय 'मैत्रिणीचे' उपनाम. ;-) कधी दुसरया-समोर टाइप करायची वेळ आली की मग गाल कसे लाल होतात पाहिलंय? शेवटी कसाबसा हा पासवर्ड चालून जातो आणि आपल्या खात्याचे कुलुप उघडते.
जरा कुठे हुश्श्य... होतंय तर संगणकाची सूचना येऊ लागते, थोड्या दिवसात आपला पासवर्ड मरणार आहे( एक्स्पायर होणार आहे) ,कृपया बदला.अहॊ माणसाच्या कल्पनाशक्तीला पण काही मर्यादा असतेच की !!पुन्हा एकद माझी आणि शब्दांची मारामारी सुरू होते. कधी वाटतं सर्व एका ठिकाणी लिहून ठेवावेत. तसं करणं म्हणजे चोराच्या हातात तिजोरीची किल्ली देणं आहे. बरोबर ना? वेगवेगळ्या ठिकाणी लिहावेत तर धोतराला बांधलेल्या गाठीसारखे. कुठली गाठ कशासाठी बांधली हेच आठवणार नाही. मी अजून एक विसरलेच होते, कायदे, पासवर्ड वापरण्याचे.मोठे मोठे घोटाळे झाले आहेत या छोट्याशा शब्दाने. कितीतरी लोक आपल्या नोकरीस मुकले असतील या पासवर्डचा चुकीचा उपयोग केल्याने. एखादा तीळ ७ जणांत वाटता येईल पण पासवर्ड नाही. अजून काय सांगनार मी बापडी या शब्दाबद्दल.त्याची मूर्ती लहान पण कीर्ति महान. मीच त्याच्या जाळ्यामधे अडकलेली छोटीशी माशी. जेव्हढे लिहीन ते थोडेच.
माझे हे पासवर्ड-पुराण मी इथेच थांबवते कारण तिकडे एक संगणक कुलुप लावून बसला आहे. त्याला उघडण्याचा प्रताप चालू आहे.आता तर असं वाटतंय की तो संगणक जोरजोरात हसतोय माझ्यावर. :-((... म्हणतोय, "आता सांग, काय करणार. नवीन शद्ब कसा शोधणार?"..... तसं माझं शब्दांशी काही वाकडं नाही हो, पण त्या संगणकाचे आहे ना. त्याला वाकडेच शब्द रुचतात. त्यामुळेच तर सुरू झाली माझी ही आजची कहाणी. :-)
-विद्या.