तो पुन्हा एकदा आला होता
माझ्या विश्वासाला तडा द्यायला
पटलं होतं मला
मी केव्हाच विसरलंय त्याला
आणि शिकलेही होते मी
दु:ख लपवून हसायला
तो पुन्हा एकदा आला होता
हसणं आणि खुलण्यातला
फरक समजावयला.
माझ्या विश्वासाला तडा द्यायला
पटलं होतं मला
मी केव्हाच विसरलंय त्याला
आणि शिकलेही होते मी
दु:ख लपवून हसायला
तो पुन्हा एकदा आला होता
हसणं आणि खुलण्यातला
फरक समजावयला.
भावनांचे सारे दरवाजे मी
बंद केले होते
ओठांनाही मोठे कुलुप लावले होते
तो पुन्हा एकदा आला होता
ते सारे दरवाजे उघडायला
नाहीच उघडले,
तरी थोड्या चिरा पाडायला.
त्याचे-माझे मित्र-मैत्रिणी
केव्हाच दूर गेले होते
अनोळखी लोकांशी नवीन
बंध जोडले होते
तो पुन्हा एकदा आला होता
जुन्या आठवणी काढायला
कोण आता कुठे असतो
हे मलाच विचारायला.
पण तो आला आणि कळलं
की काय हरवलं होतं
कितीही बांधलं तरी
मन तुझ्यामागेच धावत होतं
खूप बोलून घेतलंय, खूप हसून घेतलंय
सारे दरवाजे मोकळे करून
घर प्रकाशाने भरून घेतलंय.
तो आता निघून गेलाय
माझ्यासाठी मोठ्ठं काम सोडून
पुन्हा बांध बांधायचेत
आणि पुन्हा ओठ कसायचेत
मनाला समजून सांगायचंय
पटेपर्य़ंत बोलत राहायचंय
की मी त्याला विसरलेय
मी पुन्हा एकदा
त्याच्यावाचून जगायला शिकतेय.
-विद्या.