Thursday, February 22, 2007

२४ x ७

मी जर प्रश्न विचारला की तुम्हाला एक आख्खा दिवस दिलाय फक्त तुमच्यासाठी. बाकी घरी एकटच राहायचं आहे, भेटायला, बोलायला जवळ कोणीही नाहीये पण त्याचबरोबर कसले काम,चिंता किंवा कसली घाईही नाहीये. अशा एखादा दिवस तुम्हाला मिळाला तर काय कराल? मला जर असा एखादा दिवस मिळाला तर काय करू आणि काय नको असे होईल. झोप तर काय माझी आवडती गोष्ट. सकाळी आरामात १० वाजता उठून,निवांत गाणी ऎकत आवरून, गरम गरम चहा हातात घ्यावा आणि खूप दिवसांपासून अर्धवट राहिलेली एखादी कादंबरी वाचत बसावं. किंवा खूप दिवस झाले पाव-भाजी किंवा गरम-गरम पिठले-भात( वरतून तूप पण) घेऊन खाल्लेच नाहीये असे वाटल्यावर सामान आणण्यापासून तयारी असली तरी मग मी सामान आणून का होईना पण बनवून खाईनच.त्यात एकटीसाठी कुठे बनवणार असा विचारही करणार नाही.

पण माझ्या आईला जर मी हाच प्रश्न विचारला तर ती मला किती तरी गोष्टी सांगेल, अगं ती वरची माळ्यावरची भांडी बरेच दिवस पडली आहेत, ती साफ करावी म्हणते. ताईच्या चं बारसं आहे काहीतरी आणीन म्हणते....आणि अशी बरीच....पण त्यातलं एक तरी तिचं स्वत:साठी असेल का? मला नाही वाटत. हवी ती गाणी ऎकणे, चित्र काढणे, पुस्तक वाचणे, खाणे,मनसोक्त लोळत पडणे, आणि अश्याच कितीतरी छोट्यामोठ्या गोष्टी आपल्या आवडीच्या होत्या, त्यातली एखादी आज करावी वगैरे असले विचार त्यांच्या ध्यानीमनी पण येत नाहीत. का? आता आई आपल्यासाठी सर्व त्याग करते, आपल्याला वाढवते, आजारपणे काढते आणि बरंच काही करते. आपणही मग तिला थोर, महान असल्या उपाध्या लावून आपले कर्तव्य करतो. पण आपण बाहेर पडल्यावर त्यांचं इतके दिवस कष्टात जाणारं आयुष्य थांबून जातं, मग देवधर्म, शेजारी, नातेवाईक यामध्ये ती स्वत:ला गुंतवू लागते. असो. मला आईवर काही लिहायचं नाहीये आज.

मी परदेशात आल्यापासून बरीच भारतीय कुटुंबे पाहिली. एखाद्या पार्टीमध्ये किंवा सणावाराला भेटिगाठी होतं तेव्हा कुणी ओळख करून देताना विचारलं की तुम्ही काय करता की कुठल्याही ग्रुहिणीचे उत्तर काय? "काही नाही!' बस्स?? काही नाही?? म्हणजे दिवसातून ८-१० तास काम करणारी स्त्री 'नोकरी' करते हे अभिमानाने सांगते आणि २४ तास काही ना काही काम करत राहणारी स्त्री कसंनुसं 'काही नाही' हे उत्तर देते. त्यातही बरीचशी कामं करणं हा नाईलाज म्हणून, शिवाय़ नवरा नोकरी करत असताना घरी एकटं राहणं, नाहीतर मुलांचं एकट्यानेच सर्व करणं आणि कधी-कधी का होईना, 'तू काय दिवसभर घरीच असतेस की तरी कामं कशी संपत नाही', हे ऎकणं.मला फार अस्वस्थ वाटलं. पण या गोष्टी मी अधिक जवळून पाहताना वाटलं की एक नुकतंच लग्न झालेली मुलगी ते अशी एक गृहिणी यामध्ये होणाया बदलास बाकी लोकांइतकीच ती स्वत: पण जबाबदार असते. हे कसं?

लग्नानंतर नविन घरात सामावून जाणं, सासरच्या लोकांशी जुळवून घेणं,नंतर मुले,त्यांची शिक्षणं या सगळ्या जबाबदा र्या स्वीकारून त्या पार पाडणं कष्टाचं काम आहे हे कबूल. पण त्या सगळ्यांत आपण स्वत्व तर गमावत नाहीये ना हे ही पाहणं गरजेचं नाही का? मला वाटतं की माणूस घरी असला की त्याला गृहीत धरलं जाणं हे स्वाभाविक आहे, पण त्यांना ते तसं न करू देणं ही प्रत्येक स्त्री ची जबाबदारी नाही का? जसे घरात प्रत्येकाला आपापल्या कामासाठी वेळ ठरलेली असते उदा. शाळेत जाण्यासाठी,नोकरीवर जाण्यासाठी, किंवा एखादे काम संपवण्यासाठीही.ती पाळण्यासाठी प्रत्येकाची घाई चाललेली असते.मी बरेच वेळा पाहिले आहे की बरेच आजी-आजोबा पूजेची,मंदिरात जाण्याची किंवा फिरण्याची वेळ ठरवून ठेवतात आणि ती वेळ न चुकता पाळतात. काही लोक तर अगदी या वेळेला मला हाक मारू नका, डिस्टर्ब करू नका असेही सांगतात.तसेच मग घरी असणार्या गृहिणीनेही आपल्याला आवडणार्या गोष्टीसाठी/आपल्या एखाद्या छंदासाठी वेळ ठरवायला हवी आणि ती प्रत्येकाने पाळण्याचे बंधन घालायला हवे.

आता कुणी म्हणेल मुलांना, पतीराजांना समजावणे हे काही इतके सोपे नाही. हो हे अवघड आहे जर तुम्ही अचानक ५-१० वर्षांनी सांगाल तर. पण पहिल्यापासूनच अशा गोष्टी वळणात बसल्या तर मग पुढे अवघड जात नाही. उदा. लग्नानंतरही तुम्ही एखादा छंद जोपासत असाल आणि आपल्या पती कडून त्याला प्रोत्साहन मिळवले तर मग पुढे मुलांनाही हे माहित होते की आईची ही वेळ तिच्या कामाची आहे.माझी आई रोज सकाळी कितीही घाई असली १० मिनीट पेपर वाचण्यासाठी काढत असे. मला आठवतं की मला शाळेला उशीर होतं असेल तर माझी चिडचिड व्हायची कधीकदधी. पण आज विचार करता वाटतं की किती चांगलं करत होती ती. दिवस भरात कामातून सवड मिळणार नाही म्हणून ते १० मिनीट का होईना वाचण्यात घालविणं याला म्हणता येईल 'स्वत्व' जपणं.

बरं, यात अजून एक मुद्दा येतो,तो म्हणजे 'छंद' म्हणजे नक्की काय? आता, वेगवेगळ्या पाककॄतींवर चर्चा करणे,'किटी पार्टिज' अटेंड करणे, मैत्रिणींशी 'चौकशा' करणे नाहीतर मग घर,मुले,नवरा यांच्याबाबत गप्पा.... असे बरेच प्रकार नेहमीच्या असतात की जे मी ही पाहिले आहेत. पण या सर्वांमध्ये तुमची करमणूक ही दुसया व्यक्तींवर अवलंबून आहे असे वाटत नाही का? माझा सगळ्यात पहिला प्रश्न होता की एकटं असताना तुम्ही काय कराल? जिथे कुणीही बोलण्यास नाहिय़े,फक्त तुम्ही आहात.माझं असं म्हणणं आहे की असा एखादा 'छंद' असावा जो फक्त स्वत:च्या आनंदासाठी आहे आणि जो कुणावरही अवलंबून नाहीये.

काय होतं असेल अशा छंदाने की जो फक्त आपल्यासाठीच आहे? एकतर त्यातून आपल्याला आनंद मिळतो काही तरी आवडीचं केल्याचा आणि घरातल्या रोजच्या अडचणींना सामोर जाण्याची शक्तीही.मन गुंतून राहीलं की बाकी सगळ्या विचारातून सुटका होते आणि आयुष्य नव्या जोमाने जगण्याची इच्छा ही होते.आपली घरात एक वेगळी, स्वतंत्र व्यक्ती म्हणून प्रतिमाही.मग अशी एखादी गृहिणीही म्हणू शकेल की मी एक कलाकार आहे जी चित्र काढते किंवा सजावटिच्या/कलाकुसरीच्या वस्तू बनविते, आणि हो जर पाककलाच तुमचा छंद असेल तर अभिमानाने सांगावं की मी एक उत्तम स्वैपाकीण आहे म्हणून. कारण एखादं चांगलं चित्र काढून पूर्ण झाल्याचा, एखादा पदार्थ मस्त बनल्याचा किंवा आपल्या आवडीचं गाणं किंवा पुस्तक वाचल्याचा, काहीतरी केल्याचा, यश मिळाल्याचा जो आनंद असतो तो बाकी कशातूनच मिळणार नाही.

मला असं वाटतं की सुरुवातीला वेळं मिळत नाही म्हणून आणि नंतर वेळ मिळाला तरी 'आता वय नाही राहीलं, उत्साह नाही पूर्वीसारखा' अशी कारणं देऊन स्त्री आपल्यातल्या युवतीला, कलाकाराला किंवा काही वेगळं करण्याच्या उत्सुकतेला मारून टाकते. त्यामुळे बरेच वेळा नवरा प्रोत्साहन देत असला तरी कंटाळा करून एखादी गोष्ट टाळण्याची वृत्ती निर्माण होते. तर अशा या वृत्तीला आळा घालण्याचं काम आपलंच नाही का? का आपण मुले,संसार,घर अशी कारणं द्यायची? कुणी जेव्हा नोकरी करते तेव्हा 'पैसे' हा हेतू असला तरी नोकरीतही आपल्याला आवडणारे काम करण्याचाच आपण प्रयत्न करतो ना? तेव्हा जर दिवसातले ८ तास देता येत असतील कुणाला तर मग घरी असताना आपल्यासाठी तासभर का नाही देता येणार? म्हणून मला वाटतं की आपल्या २४ बाय ७ च्या या रकान्यातून सुटका करणं हे आपल्याच हातात असतं.

वेळ मिळेल तेव्हा करू असं म्हणून आयुष्य निघून जातं आणि शेवटी फक्त एकांत उरतो.मी अशी कितीतरी घरं पाहिलीत जिथं स्त्रि लग्नाआधी एक उत्तम कलाकार होती पण संसार सुरु झाला आणि सगळं संपलं.संसार हा एकाचा शेवट आणि एकाची सुरुवात नसून ती दोघांच्या आयुष्याची जोडीनं,जोमानं केलेली सुरुवात असते. आयुष्याच्या शेवटी असं कधी वाटू नये की अरे मी कशी होते आणि कशी झाले. हे करायचं जमलं नाही, ते करायचं राहीलं....आपल्या आवडीच्या गोष्टं असं सोडून देण्यासाठी हे आयुष्य खूप छोटं आहे...तसंच केवळ इतरांसाठी जगण्यासाठी खूप मोठं...मुलांना वाढवणं,घर चालविणं हे प्रत्येक स्त्रीचं कर्तव्य असतं जे ती आपापल्या परीन करत असते. पण आयुष्याच्या शेवटी तीच मुलं आपापलं घरटं बांधतात तेव्हा आपल्या घरट्यातलं घरपण आपणच जपायचं असतं आपल्यातल्या 'व्यक्तिमत्वानं' ,बरोबर ना?

-विद्या.

1 comment:

Abhijit said...

Few of your posts have brought forward a new perspective Vidya - Paradigm shift for sure.