Tuesday, October 16, 2012

पाच किलोमीटर आणि बरेच काही...

            बाप रे. मी गेले २ वर्षे गायब झाले आणि परत येऊन बघते तर किती ती सुधारणा झाली आहे मराठी टायपिंग मध्ये. :) जर मला  असते कि मराठी लिहिणे इतके सोपे झाले आहे आतापर्यंत खूप काही लिहून पण झाले असते. असो. आता सुरु करतेय हे महत्वाचे.  माझ्या शेवटच्या पोस्त मध्ये मी लिहित होते कि कसे मला दुसरी नोकरी मिळाली. पण संदीप अमेरिकेत, मी पुण्यात असे काही चालणार नव्हते. आमच्या नशिबाने मला पुन्हा एकदा एकाच कंपनीत नोकरी मिळाली आणि मी शिकागो ला परतले. इथे येऊन सानुला सांभाळून नोकरी करेपर्यंतच इतकी पुरेवाट झाली कि लिहिणे डोक्यात पण येत नव्हते. गेल्या वर्षी ऑक्टोबर मध्ये स्वनिक झाला. आणि अजूनच धावपळ सुरु झाली. त्याला सोडून कामावर येणे खूपच अवघड होते. पण हळूहळू तेहि जमत आहे.
           स्वनिक चार महिन्याचा झाल्यावर जरा मनावर घेतले वजन कमी करायचे. आधी आमचे मस्त चालू होते, दुपारी घरी जायचे जेवायला. जमले तर कधी स्वनिक ला भेटायला. पण सर्व सुखासुखी होतय आणि मी निवांत बसलेय  असे कसे शक्य आहे ना? आमच्या ऑफिस मधेच जिम आहे ते एक सोयीचे होते. म्हटले दुपारी घरी न जाता जिमला जावे. पण तेही सहजपणे जमणारे नव्हते. एकतर दोन पोरांना घेऊन एरवी न मिळणारा, दुपारचा निवांत वेळ  जाणार  होता आणि कधी जेवायला काही नसेल तर थोडे बनवून घ्यायचे घरी तेही खायला काही मिळणार नव्हते. मग रात्रीच जास्त पोळ्या करून डबा भरून ठेवायला लागणार होता. कुणाला वाटेल त्यात काय एव्हढे मोठे काम? पण जिथे ५ मिनिटं पण वेळ काढणे अवघड होते तिथे ३० कुठून आणणार असे झाले. तरी म्हटले जायचेच. मी दिडेक वर्षानी काहीतरी करणार होते.
              डिलिव्हरी  नंतर हाडांचा खुळखुळा झाला आहे असे वाटले सुरुवातीला. पण हळूहळू पळायला सुरुवात केली. आधी तर वाटले १ मैल पळणेही किती अवघड आहे. तेंव्हाच Chase Corporate Challenge म्हणून एका रेसबद्दल नोटीस आली ऑफिसमध्ये. ती फक्त ५किलोमिटरची होती. आयुष्यात कुठलीही गोष्ट परिक्षेशिवाय केली नाहीये त्यामुले म्हटले यात भाग घेतला तर  जरा सराव तरी करेंन  रोज . म्हणून मी 24 मे ला होंणारया 5K(म्हणजे 5 KM ) मधे भाग घेतला . रोजचा सराव मी 2-2.5 मैलापर्यंत  नेला . मी भाग घेताना लिहीले होते की साधारण 35 मिनिटामधे पूर्ण करू शकते . कितीही मारामारी करून तेव्हढा वेग काही वाढत नव्हता . 35 मिनिटात 5km म्हणजे 7 मिनिटात 1 Km कसे शक्य होते? मी वेग वाढवायला गाण्यांचा आधार घेतला . कित्येक वर्षात मी अशी निवांत गाणी ऐकली नव्हती .  साध्या गोष्टी पण त्याही किती दुर्मिळ झाल्या होत्या असे वाटले . नेहमीप्रमाणे संगीताने साथ दिलीच . गाण्याचा वेग वाढला तसा माझाही . नंतर समजत नव्हते की पळण्यासाठी गाणे ऐकतेय का गाणे ऐकण्यासाठी  पळते आहे .
             कितीही सराव केला तरी मी बाहेर पळत नव्हते अजून . एक दिवस म्हटले बाहेर जाऊन तर  बघावे? पहिल्या फेरीतच वाटले  कि गुढगे गेले कायमचे . आणि धुळीत पळल्यामुले सर्दी होउन तीन दिवस घरी बसले ते निराळेच . शेवटी 24 तारीख उजाडली. मी उगाचच अगदी मोठी परीक्षा असल्यासारखी वागत होते . सकाळी ओफिसमधे कामात लक्षही लागत नव्हते . आमची 4 वाजता ओफिसमधुन बस निघाली . आमच्या ग्रुपमधल्या एका मुलीजवळ जाऊन बसले . ती मस्तपैकी तयार होऊन आली होती . तिलाही एक वर्षाची  मुलगी आहे. आता शिकागो च्या वाहतुकीत आम्हाला २ तास तरी लागणार होते. म्हणून  मी आपली बोलत होते. म्हणले बरे आहे न जरा पळून वजनही कमी होतय. तर ती म्हणे,'हम्म, मला डिलिव्हरी नंतर लगेचच ९ मैलाची स्पर्धा होती त्यामुळे मी २ महिन्यात सुरु केले होते. म्हटले, मी एक महिन्यात बाहेर पडले तर आई म्हणे काय हे,  काही काळजी आहे की नाही? आणि २ महिन्यात पळायचे? Impossible !!! :) मग दुसऱ्या एकीशी बोलले, ती तर तिच्या हातातल्या घड्याळ्या बद्दल सांगत होती.  म्हणे मी मग पळताना त्यात किती अंतर झाले आणि किती वेळात झाले ही  सर्व माहिती यात ठेवली जाते आणि मग नंतर मला त्याचा उपयोग होतो माझा वेग बघायला इ. इ. तिसरा एक जण   त्याच्या भारी shoes बद्दल सांगत  होता. आणि परीक्षेत अभ्यास न केल्यावर एखादा प्रश्न कुणी विचारला कि कसा चेहरा होतो तसा करून मी सर्वांकडे बघत होते. एखाच्या हाताला बेल्ट होता त्यात त्याने त्याचा फोन अडकवला होता. सर्वाचे काळे चष्मे तर भारीच. म्हणे इ-फोन वर एक App आहे जिथे आपला रेस नंबर टाकला  की  किती वेळात अंतर कापले ते कळते शेवटी. मी पण माझा फोन उघडला पण आयुष्यात कुठले App download केले असेल तर ना. कसे  तरी करून ते केले आणि मग कानात बोळे घालून झोपून गेले.
             संध्याकाळी ७ वाजता रेस सुरु होणार होती आणि आम्ही ६.४५ ला पोचलो बसने. आमच्या कंपनीचा तंबू एका ठिकाणी ठोकला होता. तिथे जाऊन पाणी पिऊन जरा 'जाऊन' यावे म्हणून गेले तर भली मोठी रांग होती. :( शेवटी ती रांग सोडून पळायला जाऊन उभी राहिले. २६ हजार लोक त्यादिवशी पळणार होते, त्यात मी काय? माझा फोन पण तंबूत राहिला होता. म्हटले जाऊदे पळू तसेच. पण तो दिवसच एकूण कंटाळवाणा होता.दुपारी ४ पर्यंत काम, मग २.५ तास प्रवास आणि प्रचंड दमट वातावरण. धाकधुक करत पळायला सुरुवात केली. पहिला मैल झाला आणि मला एक मुलगी रस्त्यात चक्कर येऊन पडलेली दिसली. मला संदीपचे वाक्य आठवले, काही कर पण कुठे पडून येऊ नकोस. तो दोन पोरांना घेऊन घरी एकटाच होता. माझा वेग मग कमीच झाला. खूप वेळ पळून पाहिले तर फक्त ३ Km झाले होते. माझा टार्गेट वेग कधीच मागे पडला होता. पण लोकांना  पळताना बघून आणि रस्त्याकडच्या उत्साही लोकांना बघून मी कसेतरी माझे ५ किलोमीटर पूर्ण केले होते. ४१ मिनिटात ! :( दमून भागून  मी आमच्या तंबूत परतले. तिथे सर्व लोकांचे किती वेळात पूर्ण झाले हे ऐकून आपण नापासच झालो असे वाटत होते मला. पण भूक लागली होती. जेवण केले, एक फोटो काढला. आयुष्यात पहिल्यांदा खेळात काहीतरी केलं होतं मी. एकदा कब्बड्डी मध्ये भाग घेतला होता ५वीत , पण समोरच्या जाड्या मुलीने पाय असा पकडला  की मी तिथे गार झाले होते. :)
             थोड्या वेळात घरी यायला बस मध्ये बसून गेले. संदीपने सांगितले पोरांचे जेवण झाले, झोपत आहेत. गाडीत बसलो तोवर आभाळ स्वच्छ झाले होते. मस्त थंड हवा येत होती . मी कानात पुन्हा एकदा गाणी टाकली आणि रस्त्यावरच्या पिवळ्या दिव्यांच्या खांबांकडे बघत पोरं काय करत असतील याचा विचार करत बसले. उगाचच एक मोठं पदक घेऊन घरी जात आहे असं वाटत होतें आणि मग डोळ्यांत पाणी येणं भागच !

क्रमश:
-विद्या .










4 comments:

Meghana Bhuskute said...

किती दिवसांनी! वेलकम ब्याक! :)
असल्या फिजिकल ऍक्टिव्हिटीत भाग घेणार्‍या लोकांबद्दल मला एकदम आदरच वाटतो. मी शेवटची कधी पळाले होते बरं? जाऊ दे, नाही सांगत!
सहीये...
बाकी - पोस्ट असं अर्ध्यात सोडू नये, पाप लागतं!

Avani said...

hey..
kitee diwasanee..
gayabch zalelis ekadam..

mast watala wachun pan.. :)

Vidya Bhutkar said...

Thank you Meghana and Avani. Ajunahi lakshaat aahe mi hech khup aahe. :) Aata ha ek anubhav tari purn lihaycha praytn kartey.
-Vidya.

महेंद्र said...

:) मी इन्स्पायर झालो आहे हे वाचून. :)