Wednesday, December 05, 2012

बेमालूम मिश्रण

       झोपायला जाता जाता फेसबुक वर चिन्मयने टाकलेली कमेंट वाचली. माझ्यासाठीच होती ती. तो म्हणे,'विद्या, हम लोग खाना खाने जायेंगे, मुव्ही जायेंगे'. :) आता खरं तर त्या वाक्याचा रेफरन्स मला आठवतही नाहीये नीट. पण कधीतरी एकदा मुंबईत असताना उत्साहात बोललेलं वाक्य ते. ते हि माझ्या तेव्हाच्या नाकातून बोललेल्या मराठी हिंदीमध्ये. पण माझ्यापेक्षा लोकांनाच जास्त लक्षात ते. परवा एकदा असेच एकाने एका फोटोवर कमेंट टाकली,'अल्फरोजी रॉक्स'  म्हणून. मग तेव्हा आठवले अरे हो, मी तेव्हा पुणेरी स्टाईल मध्ये तोंडाला रुमाल बांधून फिरायचे त्रिवेंद्रम मध्ये म्हणून पडलेलं हे नाव. मी विसरलेच होते ते. पण बाकी लोकांना मात्र या गोष्टी कशा लक्षात राहिल्या? 
        फक्त हेच नाही जेव्हा केंव्हा रश्मी, आरती अगदी शुभांगीशी बोलते तेंव्हा माझा सांगलीत असणारा माझा तो टोन आपोआप तोंडात येतो. म्हणजे मला बोलताना विचारही करावा लागत नाही आणि माझा टोन आपोआप आलेला असतो. मग तीच बोलण्याची पद्धत, तसेच जोरजोरात हसणे, तेच जुने लोकांचे विषय आणि आपल्या लक्षात राहिलेल्या त्यांच्या आपल्या बद्दलच्या आठवणी. त्या आठवणी मधली मी आणि मुंबईच्या ग्रुपमधल्या लोकांच्या आठवणीतली मी किती वेगळ्या ना? मग वाटले एकदा ना पल्लवी आणि शगुफ्ता त्यांना भेटले पाहिजे पण बहुतेक त्यांच्याशी बोलताना माझा तो कोरेगाव मधला टोन येईल की नाही माहित नाही. आणि त्यांच्या आठवणीमधली मी कशी असेन काय माहित. 
        परवा पुण्यातल्या संदीपच्या एका मित्राने मेल मध्ये लिहिले होते की विद्या अजूनही 'च्या मारी' म्हणत असेल का? तर 'हो, मी अजूनही म्हणतेच' पण त्याच्या आठवणीतली विद्या म्हणजे 'च्या मारी'. कित्येक दिवसांनी ब्लॉग वर आले तेंव्हा मग जुन्या लोकांचे जे ब्लॉग वाचायचे तिथे गेले आणि मग माझ्या या ब्लॉग मध्ये येणारी 'विद्या' त्या लोकांच्या आठवणीतली असेल का? 
       बरं, जर माझ्या बद्दल असे वाटते, तर मी तरी काय असेन? म्हणजे मीही बाकीच्या लोकांच्या आठवणीनीनी बनलेली असेन का? म्हणजे कुणाच्या बोलण्याच्या पद्धती, त्याचं हसणं, वागणं या सगळ्यांचं एक वेगळच मिश्रण म्हणजे मी का? आणि वेगवेगळ्या वेळी मी ज्या ज्या लोकांना भेटले ती, त्या वेळेपर्यंत भेटलेल्या सर्व लोकांचं मिश्रण होय ना? इन्टरेस्टिग वाटला तो विचार मला. आणि मला ज्या वेळेला जे लोक भेटले तेही त्यांना तोवर भेटलेल्या लोकांचं मिश्रण, बरोबर? आणि मला भेटून ते पुढे बाकी लोकांना भेटायला गेले तेव्हा त्यांच्यात मीही आहेच त्यांच्या नकळत. :) पण म्हणजे लोक जेंव्हा आपल्याला भेटल्यावर म्हणतात, 'अरे तू अजिबात बदलली नाहीयेस'. तर ते बरोबरही आणि चूकही. कारण आपण बदललेले तर असतो पण ती जुनी व्यक्ती समोर आल्यावर परत त्याच जुन्या मिश्रणात जातो बहुतेक. ह्म्म्म... :) तर असे आपण सगळेच एक बेमालूम मिश्रण आहोत आणि युनिकही, कारण दुसरं कुणीही आपल्यासारखं नसणारच. अगदी सख्खे बहिण भाऊही. :) असो, झोपावं आता. उगाचच मी सध्या कुठल्या लोकांचं मिश्रण असेन याचा विचार येतोय. म्हणजे नको असणाऱ्या शेजाऱ्यांचही का? :)

-विद्या.
 

1 comment:

भानस said...

हाहा... एकदम इंटरेस्टिंग विचार आहे बरं! आवडेश !:) वाचता वाचता आठवतेय की मीही कोणाकोणाच्या.... :D