Tuesday, April 16, 2013

पोटभरून प्रेम

          पोचले एकदाची, म्हणजे भारतात. गेल्या कित्येक महिन्याची तयारी, कामाचा ताण, सामानाची बांधाबांध सर्व करून, पोरांना घेऊन सुखरूप पोचलो. त्या गेल्या काही दिवसात आम्हीच नाही, इकडे बाकी लोकांची तयारीही चालूच होती. आईने लगेच तुला तुरीची डाळ, उडीद डाळ, गहू, तांदूळ वर्षाला किती लागते याची चौकशी सुरु केली. आता रोज लागेल तसे सामान आणून ठेवणाऱ्या आमच्यासारख्या कामगार वर्गाला काय माहित किती किलो भात लागतो वर्षाला ते? त्यात मग म्हणे अगं, हरभऱ्याची पण लागते जास्त, बेसन गिरणीत करून आणतो ना? किती हे किचकट प्रश्न.
          एक दिवस आईचा फोन,'अगं, मामीकडे गेले तेव्हा मेतकुट होतं तिथे छान. तुला आवडतं म्हणून मामीने आहे तेव्हढ तरी घेऊन जा म्हणून बांधून दिलं'.
माझ्या मामीला मी गेल्या कित्येक वर्षात, १-२ तासापेक्षा जास्त भेटले नसेन, पण तरी मी येणार म्हटल्यावर तिने दुकानात चौकशी केली, नाही मिळत तर आहे ते तरी घेऊन जा म्हणून सांगिलते. मला वाटलं,काय धागा असतो या लोकांच्या मनात प्रेमाचा? जो कितीही वर्षं झाली तरी तसाच टिकून असतो. अजिबात झिजत नाही कि तुटत नाही. मग पुढचा प्रश्न आला मनात. हे असं प्रेम नेहमी खाण्यातूनच कसं दिसतं? म्हणजे अगदी जगभरात सगळीकडेच.हे खाण्यातून, वाढण्यातून, पोट भरून खायला घालण्यातून दिसणारं प्रेम कसलं?
         आम्ही परत येणार म्हटल्यावर तिथे ऑफिसमधले लोकही म्हणाले,'We should go for lunch sometime'. वेगवेगळ्या लोकांच्या, कधी घरी, कधी बाहेर जेवण सुरु झाले. आता भेटायचेच तर नुसते चहा पाणी करूनही भेटता येतेच की. मग जेवणच का? त्यातही मग तुला जे आवडते तेच करते इ. ऑफिसमधले सगळेजण बाहेर जेवायला जातानाही मला जे आवडते तेच ठिकाण बघू इ. विषय. मला लाड करून घ्यायला काहीच प्रोब्लेम नाहीये. :) पण सांगायची गोष्ट म्हणजे, रित एकच, मग ते भारतीय असो, अमेरिकन किंवा व्हिएतनामि.  अगदी मी पुण्यातील कंपनीतून जाताना 'काका हलवाई चे पेढे' आणण्यातले आणि शिकागोतील आपल्या आईकडून खास माझ्यासाठी केक बनवून घेण्यातही तेच प्रेम.
         या झाल्या नेहमीच्या रिति. अगदी नवरा बायकोमधेही प्रेम हे असंच व्यक्त होतं ना. नवीन लग्न झाल्यावर काहीतरी वेगळं, आवडीचं करून वाढायची इच्छा, मग ते कसं झालंय हे पाहण्याची उत्सुकता आणि पोटभरून खाल्ल्यावर मिळणारा आनंद हे सर्वच कसं गोड. ते मग अगदी म्हातारे झाल्यावर पोळी मोडायला त्रास होतो म्हणून तूप लावून गुंडाळून झाकून ठेवण्यापर्यंत कायम चालूच राहतं. आता आजकाल पोरांच्या आवडी निवडीची त्यात भर पडली आहे. नुसत्या उकडलेल्या भाज्या आवडतात म्हणून त्या देण्यापासून पालक पनीर पर्यंत सर्व केलं मी. आणि त्यांनी पोटभर खाल्लं की आपलंच पोट भरल्याचा आनंद.
         माझं जाऊ दे, मुलांनाही इकडे आल्यापासून मिळाले नाही म्हणून, त्यांच्या मावशी, मामाने पास्ता आणून दिला, अंडी करून खायला घातली भेटल्यावर. आणि किती आवडीने खात आहेत हे पहात राहीले. :) काल आई परत आली भेटायला, तर येताना घरून थालीपिठ घेऊन आली. म्हटलं, 'अगं दही नाहीये सायीचं'. तर म्हणे, 'तेही घेऊन आलेय'. :) म्हणजे मुलं लहान असली काय आणि मोठी काय, हौस तीच.आता जरा मिळतेच आहे संधी तर लाड करूनच घेते थोडे दिवस तरी. आणि हे असं पोटभरून प्रेमही करवून घेते सर्वांकडून.  :) बाकी शिकागो ते पुणे प्रवासाबद्दल पुढच्या वेळी.
-विद्या.

7 comments:

Nandan said...

नवीन जागा आणि पुढील प्रवासासाठी मनःपूर्वक शुभेच्छा! विशेषतः आज्यांच्या बाबतीत खाणं हे प्रेम व्यक्त करण्याचं साधन आहे, हे विशेषकरून जाणवायचं. पण लेखात म्हटल्याप्रमाणे, हे वैश्विक आहे हे खरंच. गेल्याच महिन्यात, याबद्दल रेडिओवर ऐकलं होतं (थोड्या निराळ्या संदर्भात) - http://www.npr.org/blogs/thesalt/2013/03/01/173245261/how-did-our-brains-evolve-to-equate-food-with-love

Vidya Bhutkar said...

Thanks Nandan. Nice to see your comment afte a long time. Hows it going with you? Thanks for sharing that article too. :)
-Vidya.

अपर्णा said...

>>नुसत्या उकडलेल्या भाज्या आवडतात म्हणून त्या देण्यापासून पालक पनीर पर्यंत सर्व केलं मी. आणि त्यांनी पोटभर खाल्लं की आपलंच पोट भरल्याचा आनंद.
हे जाम आवडलं … :)

शिकागो पुणे प्रवासाबद्दल नक्की लिहा पुलेशु

भानस said...

मायदेशात स्वागत आहे. :) पोटातूनच मनं जिंकायचा मार्ग जातो असं काहीतरी आजीने सांगितल्याचं आठवतय गं.:D तू मज्जा करून घे. ( सध्या मीही तेच करतेय नं :) )

Sneha Kulkarni said...

We should go for lunch sometime. :P

Sneha Kulkarni said...

We should go for lunch sometime. :P

Anonymous said...

sahhee lihila aahes. aattaa pahaate 4:46 la Officemadhe basUn vaachala he aani jaam bhUk laagalee ekadam!

- Yashodharaa