आज रिक्षातून जाताना खूप रिकामं वाटत होतं. इतक्या दिवसांचा माझा आणि त्या पुस्तकाचा प्रवास संपला म्हणून. हे असं वाटणं म्हणजेच पुस्तक आवडलं बहुदा. 'झिम्मा' वाचायला घेतलं ते मुळात त्याबद्दलचे दोन रिव्ह्यू वाचल्यामुळे.
विजया मेहता यांनी त्यांच्या मराठी रंगभूमी, सिनेमा, टीव्ही अशा वेगवेगळ्या माध्यमातून केलेल्या कारकिर्दीचे त्यांच्या शब्दातील वर्णन. आत्मचरित्र म्हणता येईल पण त्यापेक्षा त्यांच्या रंगभूमीवरच्या अनुभवांची साठवण म्हणणं जास्त योग्य होईल.
सर्वात आधी सांगायचं म्हणजे माझी अजिबात लायकी नाही या पुस्तकाबद्दल, किंवा अशा मोठ्या व्यक्तीच्या एव्हढ्या मोठ्या कारकिर्दीबद्दल लिहिण्याची किंवा बोलण्याची. पण एक वाचक म्हणून काय वाटलं ते लिहिण्याचा प्रयत्न करतेय. तोही नीट जमत नाहीये, तर एव्हढं मोठं पुस्तक लिहिण्यात किती वेळ, विचार, उर्जा, लागली असेल याची कल्पनाच नको. गेल्या कित्येक वर्षातलं माझं वाचायाला घेतलेलं पहिलं मराठी पुस्तक. रोज दुपारी घरी जाताना रिक्षात २५ -३० मिनिटांचा वेळ तोच काय तो माझा. मग त्यात हे असं मोठं पुस्तक (४५०) वाचून होणार का अशी शंका आलीच मनात पण पुस्तकाने शेवटपर्यंत मला बांधून ठेवले. अर्थात त्यातले प्रसंग/वर्णनही एखादा सोडला तर उद्या वाचला तरी चालेल असा असल्याने ते फक्त रिक्षातच वाचलं गेलं. वेड्यासारखं वाचत सुटून संपवून टाकावं असं झालं नाही. (हे माझं मत. बाकी लोकांचं मत वेगळं असू शकतं असा डिस्क्लेमर आधीच दिलेला बरा.)
तर झिम्मा चार वेगवेगळ्या व्यक्तींच्या रुपात भेटतं. बेबी जयवंत, विजू जयवंत , विजया खोटे आणि विजया मेहेता. सुरुवातीला ते लक्षात राहतं पण जसे जसे कामाचा आवाका आणि कारकीर्द वाढत जाते तसे या रेषा पुसट होत जातात. पहिल्या तिन्ही आयुष्यांबद्दल स्वत:ला तिसऱ्या ठिकाणी ठेवून स्वत:च्या आयुष्याकडे पहाण्याचा दृष्टीकोण मला थोडा खटकला. कदाचित वयाच्या सत्तरीनंतर तो दृष्टीकोण येतही असेल, मला तो उगाच परका वाटला. सुरुवातीची बेबी जयवंत वाचताना तो जास्त खटकला. त्याच सोबत बेबी जयवंत बद्दल पडलेला प्रश्न म्हणजे वयाच्या सत्तरीनंतर पाचव्या वर्षी काय केलं हे आठवू शकतं? की भासच ते? नंतर त्याच्या पलीकडे जाउन वाचायला सुरुवात केली. बेबीच्या आयुष्यातील दोन गोष्टी लक्षात राहिल्या. त्या काळातील एकत्र कुटुंबामुळे बेबीच्या मावशीला जसे जयवंत कुटुंबाने जसे आपले केले तसे एखाद्या अनाथाला आजच्या चौकोनी घरात जागा मिळेल? हा प्रश्न. आणि त्यांनी केलेले कोकणातील त्या काळचे वर्णन. त्या काळातील समाजाची थोडीफार कल्पना ते वाचताना येते. त्याच्याशी एकदम विरोधी मुंबईतील वातावरण. तेव्हाही किती पुढारलेली होती मुंबई हे वाटल्याशिवाय राहत नाही.
विजू जयवंत बद्दल वाचताना फार आश्चर्य वाटलं मला. ८०-९० च्या दशकात एका मुलगी म्हणून मलाही काही बंधनं पाळावी लागली. जरा जास्त कॉलेजच्या गप्पा आईला सांगितल्या की 'हेच करता का तिकडे?' असे टोमणेही ऐकायला लागले. तर मग ५० च्या दशकात नाटकांत भाग घेण्यासाठी परवानगी देणाऱ्या त्यांच्या भावाचे आणि आईचेही कौतुक वाटले. तेव्हा झालेल्या थोड्याफार विरोधाचे संदर्भ येतात अधे मध्ये, पण कडकडून निषेध, विरोध हे कुठे दिसले नाहीत. त्याचवेळेस, इतकी सवलत मिळाल्यानंतर एवढ्या मोठ्या वर्तुळात आत्मविश्वासाने वागणाऱ्या तरीही वाहवत न गेलेल्या विजू जयवंत चे जास्त कौतुक वाटले.
हरीन खोटेशी ओळख, लग्न हे सर्व उत्सुकतेने वाचलं. लोकांच्या पर्सनल आयुष्यात पाहण्याची काय उत्सुकता असते काय माहीत? विजू खोटे होऊन जमशेदपूरला गेल्यावर मलाच टेन्शन. तिथे एक छोटासा का होईना नाटकाचा प्रयोग करण्याचा प्रयत्न वाचून वाटले की खरंच इच्छा असेल तर माणूस काही ना काही करतोच. But she was not meant for it. पुढे बायकोच्या करियरसाठी दोघांनी थोडे दिवस का होईना जमवून घेणे, वेगळे राहणे, हे वाचून वाटले मग आज काल टीव्ही वर दिसतात ते लोक कुठल्या जगात वावरत असतात? आपण तेव्हा जर इतके पुढारलेले होतो तर आज नाहीये का? या सर्व व्यक्तिगत आयुष्यातल्या गोष्टींबद्दल लिहिण्याचं कारण म्हणजे ते पुस्तक वाचताना एक स्त्री म्हणून माझी स्वत:शी, तेव्हाच्या-आताच्या समाजाची तुलना होत होती. हळूहळू त्यांच्या मराठी रंगभूमी वरच्या कार्याला वेग येऊ लागतो आणि ते वाचताना आपणही त्या नाटकाचा, नेपथ्याचा, त्यांच्या अभ्यासाचा एक भाग बनून जातो. 'रंगायन' सारखी इतका विचार करून बनवलेली संस्था, त्याच्यामागचे विचारमंथन, लेखक, त्यांच्याशी झालेल्या चर्चा, एक संस्था म्हणून कार्यरत झाल्यावर आलेल्या अडचणी, त्याना मदत करणारी मंडळी हे वाचून आपल्याला किती उत्कृष्ठ इतिहास लाभलाय याचा अभिमान वाटतो.
पुढे विजू खोटे, विजया मेहेता कशा झाल्या याचा एका ठिकाणी संदर्भ येतो. तोवर पुस्तकात खऱ्या अर्थाने रंगभूमीवरच्या कार्याला वेग आलेला दिसतो. त्यांचे पूर्व जर्मनीतील नाटकांचे प्रयोग, त्या मध्ये भेटलेले वेगवेगळे लोक, त्यांनी युरोपमध्ये केलेला अभ्यास, हे सर्व स्वप्नवतच. एक मराठी स्त्री चांगली नायिका म्हणून चित्रपटात काम करू शकत असताना, दिग्दर्शनात तेही मराठी रंगभूमीवर कशी पडू शकते हे फक्त त्यांनाच माहीत. त्यासाठी लागणारी दृष्टी, एक पूर्ण संकल्पना उभी करण्याचे सामर्थ्य, लोकांशी/ लेखकांशी, संगीतकारांशी , नेपथ्यकारांशी चर्चा हे सर्व कसे केले असेल? हे सर्व फक्त प्रायोगिक नाही तर लोकमान्य रंगभूमीवरही ! एखादी व्यक्ती रोज त्याच उत्साहाने ५० वर्षे काम करू शकते?नाटकातून मराठी सिनेमाकडे जाताना त्यांना आलेले अनुभव, नाटकाचेच सिनेमात रुपांतर केल्यावर त्यात करावे लागलेले बदल, मराठीतून हिंदी सिरियल, शोर्ट फिल्म्स, तिथून पुढे हिंदी चित्रपट, त्यांना मिळालेले पुरस्कार हे वाचायलाही आवडलं. बंगाली, मल्याळी नाटकातून कलातून त्यांना मिळालेले संदर्भ, इंग्रजी नाटकांची भाषांतरित नाटकं, त्याचं भारतीयकरण करण्यासाठी केलेला विचार,एखादी कलाकृती किंवा भूमिका करताना त्यात एकजीव
होण्यासाठी लागलेले प्रयत्न खूप वाचनीय. पुस्तक संपताना उगाच उदास वाटायला लागलं हे सर्व थांबलं आणि आपण त्यातलं एकही नाटक पाहिलंही नाही म्हणून.
आयुष्यात दोनच आत्मचरित्र वाचली, हे त्यातलं एक. शाळेत असताना क्रिकेटच खूप वेड लागलं आणि मग जे दिसेल, मिळेल ते वाचत सुटले. त्यात एक म्हणजे डॉन ब्रॅडमन यांच्या काराकीर्दीवरील मराठी पुस्तक. (ते शाळेच्या लायब्ररीत काय करत होतं हा मोठा प्रश्नच आहे.) ते वाचायला घेताना खूप उत्साह होता. हळूहळू मात्र त्यातील वाचण्याची मजा गेली आणि राहिले ते फक्त आकडे. त्यांनी कुठे किती रन काढल्या, त्यात कसे आउट झाले, इ.इ. (उद्या सचिनने पुस्तक काढलं तर ब्रॅडमन सारखं काढू नये हे नक्की.) तर झिम्मा बद्दलही असंच काहीसं झालंय. म्हणजे बेसिकली विजयाबाईंच्या इतक्या अवाढव्य कारकिर्दीची तुलना मग ब्रॅडमन किंवा सचिनच्या कार्कीर्दीशीच होतेय. पण तरीही हे सर्व प्रत्यक्षात पाहिलं असतं तर सचिनला पहिल्यासारखा आनंद वाटला असता. पण आता सध्या ब्रॅडमन वाचल्यासारखे थोडे थोडे वाटत आहे. मराठी रंगभूमीच्या एव्हढ्या मोठ्या इतिहासाला आपण मुकलो, तरी तो वाचायला चुकलो नाही याचा आनंद आहेच.
-विद्या.
4 comments:
Chan lihila ahes parichay ! Netane pustak purna kelas tar.. :)
@Parag, Thanks. Ho Netane purn karayla shevati shevati jara jast jor lavala lagla. Pan purn kele. :)
Vidya.
Mast vidya. Sahaj sope ani sundar
Thank you Sheetal for visiting. :)
Vidya.
Post a Comment