Thursday, April 06, 2017

अविस्मरणीय प्रसंग

कधी कधी एकदम साधेच पण अविस्मरणीय प्रसंग घडतात. आज असाच एक किस्सा पुन्हा डोक्यात आला, साधारण तीनेक वर्षांपूर्वी घडलेला. 
     रात्रीचे अकरा वाजलेले, रविवारी रात्री आम्ही पुण्यात वारजे पुलाखालून सर्व्हिस रोडने घराकडे येत होतो. रस्ता तसा बऱ्यापैकी सुनसान झालेला. मुलंही पेंगुळलेली. त्यात पाऊस जोरदार चालू होता, नेहमीपेक्षा जरा जास्तच. सर्व्हिस रोड तेव्हा छोटाच होता. आता थोडा वाढवलेला आहे. तर त्या रस्त्यावरून गाड्याच पाण्यातून इतक्या वेगाने जातात. तिथे चालायचे म्हणजे तारांबळच. अशातच आम्हाला एक वयस्कर जोडपे त्या रस्त्यावरून चालत जाताना दिसले. काकांच्या हातात बॅग आणि काकूंची पर्स असेल. दोघेही छत्री घेऊन कसेबसे पाण्यातून वाट काढत चालले होते. 
       त्या पुलापासूनच्या सर्व्हिस रोड पासून जवळच्या सोसायटींमध्ये जायला रिक्षावाले नाही म्हणतातच. हो म्हणाले तर एक-दोन किलोमीटर साठी खूप पैसे मागतात. त्यात असे सामान घेऊन असले लोक तर परगावचे आहेत ओळखून अजून जास्त. हे आम्हाला माहित होतेच. आता या दोघांकडे लक्ष जाण्याचे कारण म्हणजे, त्यांच्याकडे, त्यांच्या पेहरावाकडे पाहून एकदम संदीपचे आई-बाबा, म्हणजे माझे सासू सासरे वाटावे इतके साम्य होते. त्यांच्या वयात, कपड्यात, इ. मुख्य म्हणजे तेही असेच गावाहून येताना उतरले की रिक्षा करणार नाहीत. बसची वाट बघतात, तिथून स्टॉप पासून चालत येतात. त्यामुळे या दोघांना बघून आम्हाला कळले की हेही असेच रिक्षाला नाही म्हणून चालत आले असणार. 
      आम्ही त्यांचा विचार करत त्यांना क्रॉस केले. त्यांच्या बद्दल बोलतच 'थांबवूया का?' असा विचार करून लगेचच गाडी थांबवली. मागे येऊन त्यांना विचारले,'तुम्हाला कुठे जायचे आहे? सोडतो म्हणून'. तर काका म्हणाले,'अरे नाही तुमची गाडी ओली होईल'. आजही ते वाक्य आठवलं की खूप विचित्र वाटतं. माणसे इतकी साधीही असू शकतात? म्हटले,'असू द्या हो काका'. मग मी काकांना कारमध्ये पुढच्या सीटवर बसवून मागे आले. मागच्या सीटवर मुलांच्या कारसीट लावलेल्या होत्या. त्यामुळे मागे ३ च लोकांना बसता येत होते. मुलाला मांडीवर घेऊन मीच त्याच्या कारसीट मध्ये बसले. म्हटलं, ५-१० मिनिटांचा तर प्रश्न आहे. त्यांना जिथे जायचे ती सोसायटी घरापासून ५ मिनिटेच पुढे होती. त्यांना सोडून मागे यायचे म्हटले तर त्यांना तेही वाईट वाटत होते की आम्हाला मागे फिरून यावे लागेल. काय लोक असतात ना? 
     आत बसल्यावर आम्हाला वाटले तेच त्यांनी सांगितले, रिक्षावाले कसे नाटक करतात, यायला तयार होत नाहीत,इ. त्यांच्या बोलण्यावरून शंका आली म्हणून विचारले तर ते धुळ्याचे होते, म्हणजे संदीपला अजून जवळचे. त्याने त्यांना विचारले नाव काय? त्यांनी आडनाव सांगितले तर, तो म्हणाला, याच आडनावाचा माझा एक मित्र होता कॉलेजला. त्याचं नाव त्याने सांगितलं तर कळलं, ते त्या मित्राचेच आई-वडील होते... काय योगायोग ना? आता कॉलजला परगावी असल्यावर प्रत्येकाचे आई-वडील माहीत असतातच असं नाही. त्यामुळे ते ओळखीचे नसणे शक्य होतं. पण ते असे या पद्धतीने भेटणं? योगायोगच होता तो. त्यांना त्यांच्या सोसायटीमध्ये सोडलं तर म्हणाले मुलगा अमेरिकेतच असतो, आम्ही राहतो इथे कधी कधी या सोसायटीमध्ये. 
       त्यांना सोडून परत येताना विचार करत होतो, पैसे हा प्रश्न नसतोच मुळी. मुलगा, ते सुस्थितीत असूनही  कुणीतरी ज्यादा पैसे रिक्षासाठी घेत आहे ते त्यांना पटत नव्हतं. त्यासाठी मग पावसात भिजत यायला लागलं तरी चालेल. तसेच माझ्या घरी, संदीपच्या घरी छोटया छोट्या गोष्टींवरून ही अशी तत्त्वं पाहिली आहेत. वाटले, या अशा छोट्या छोट्या कितीतरी गोष्टी त्यांच्या पिढीच्या पुढे पास होतील का? आपण हे रिक्षाचे दर पटत नाही म्हणून भिजत चालत येऊ का? आणि दुसरं म्हणजे, आपल्या पिढीला आई-वडिलांनी शिकवलं म्हणून त्यादिवशी त्या काका काकूंना विचारण्यासाठी थांबलो, गाडीत घेऊन आलो. त्यामुळेच आपल्या मित्राच्या आई-बाबांना मदत केल्याचं समाधान लाभलं. यापुढच्या पिढीकडे ते गुण येतील का? 

खरंच काही किस्से असे अविस्मरणीय असतात. :) 

विद्या भुतकर.

No comments: