Monday, July 10, 2017

आयुष्यात एक इरफान खान हवा

        काही दिवसांपूर्वी 'हिंदी मिडीयम' पाहिला. खूप आवडला. त्याचा शेवट कसा असला पाहिजे वगैरे मुद्दे सोडून अगदी नुसत्या इरफान खान साठी आवडला. त्यातला तो बारका पोरगा होता ना सुरुवातीला त्या मुलीसाठी तिच्या आवडीचा ड्रेस शिवणारा तोही आवडला. आजकाल होतं काय? कुठलेही चित्रपट पाहिले तरी त्यात तो व्यक्ती दिसत राहतो. म्हणजे शाहरुख खान, सलमान किंवा अक्षय कुमार वगैरे. कथा कशीही असो त्यात कथेतला नायक दिसत नाही, फक्त 'हिरो' दिसत राहतो. आणि त्या गोष्टीचा मला भयंकर कंटाळा आला आहे. 
        तर या हिंदी मिडीयम मध्ये इरफान आवडला तो त्याच्या ऍक्टिंग पेक्षा एक व्यक्ती म्हणून. एक सामान्य माणूस आपल्या बायकोच्या खुशीसाठी अगदी जमेल ते करायला तयार आहे. आणि ते दाखवण्यासाठी कुठेही एक्सट्रा प्रयत्न करून शॉट्स घेतले नाहीयेत. म्हणजे याच मूव्हीमध्ये शारुख असता तर त्याचे गट्टे पडलेले हात एकदम झूम करून, मग हिरोईन त्याच्या हातावर फुंकर मारणार, मग तो तिच्याकडे प्रेमाने बघणार, तेही एकदम झूम करून. किंवा सलमान असता तर हिरोईन ला त्रास होतोय म्हणून उगाच तिला उचलून वगैरे धरणार, हे सगळं अतिरंजित बघायला लागलं असतं. नवरा संडासातून ओरडत आहे म्हणून पाणी शोधणारी ती आणि दमलेला पाय तिच्या पायावर टाकून झोपणारा तो, किती साधे तरीही गोड. उगाच त्यासाठी तिने त्याचे पाय चेपलेच पाहिजेत असं नाही. 
        तर मला वाटतं आपल्यासारख्या सामान्य आयुष्यातही हे असे सामान्यच प्रसंग घडत असतात. त्यात कुठेही झूम करायला किंवा पाय चेपायला, उचलून धरायला कुणी नसतं. १४ फेब ला गुलाबाची फुलं देऊन त्याचे फोटो 'विथ माय लव्ह' असे टायटल टाकून अपलोड करणारा नवराच हवा असं नाही. पाहुणे गेल्यावर तीही दमलीय तर स्वतःच पटापट आवरून घेणारा किंवा अगदी वाढदिवसाला हॉटेलमध्ये जाणं परवडत नसलं तरीही घरी येताना फॅमिली पॅक आईस्क्रीम आणणारा पाहिजे. 'मी बसतो नंतर, तू आधी खाऊन घे' म्हणत पोराला हातात धरणारा पाहिजे. तसंच मंगळसूत्र, जोडव्या घातल्या नाहीत तरी पदोपदी त्याच्यासोबत उभी राहणारी बायको हवी.प्रेम अनेक गोष्टीतून दाखवता येतं आणि दिसणाऱ्याला ते कळतंही. रोजचं आयुष्य इतकं सामान्य असतं की  त्यात या अनेक छोट्या गोष्टीही एकदम हिरो सारख्या वाटू लागतात. 
         आता ही केवळ उदाहरणं आहेत. अशी अनेक सांगता येतील. पण उगाच 'मदर्स डे' किंवा 'ऍनिव्हर्सरी' लाच प्रेम उफाळून येणाऱ्या लोकांपेक्षा रोज कुठेही नोंद न करता आपल्या वाट्याचं काम मन लावून करणाऱ्या साऱ्या नवऱ्यांना माझा सलाम. मला तरी दिखाव्याच्या शाहरुखपेक्षा तो इरफानच आवडला बाबा. :) 

विद्या भुतकर.
https://www.facebook.com/VidyaBhutkar1/

No comments: