Wednesday, October 25, 2017

दोन टोकं

सकाळी ९ ची वेळ. कॅफे एकदम रिकामं होतं. संध्याकाळी तरुणाईच्या गर्दीनं फुलून जाणारं ठिकाण ते. सकाळी मात्र साफ सफाई करणारा मुलगा आणि तयारी करणारी मुलगी सोडलं तर सामसूम होतं. ती एका कोपऱ्यात आपलं पुस्तक घेऊन बसली होती. एका हातात कॉफीचा मग घेऊन मन लावून पुस्तक वाचत होती. 'Excuse me'! तिने आवाजाच्या दिशेनं आपल्या चष्म्यातून तिरप्या नजरेनं वर पाहिलं. एकदम फॉर्मल कपड्यात, चकाचक यावरून आलेला तो उभा होता. तिच्या प्रश्नार्थक चेहऱ्याला त्याने उत्तर दिलं,"सॉरी इथे तुमच्या टेबलवर बसलो तर चालेल का?" . 
तिने त्याच चेहऱ्याने पूर्ण कॅफेवर नजर फेकली. 
"मला माहितेय आक्ख्खा कॅफे रिकामा असताना तुम्हाला त्रास देतोय. माझा इंटरव्ह्यू आहे थोड्या वेळाने."
ती,"मग?". 
"खूप टेन्शन आहे. दोन तास लवकर येऊन बसलोय, ट्रॅफिकमध्ये अडकायला नको म्हणून. तुमच्यासमोर बसलो तर जरा विचार कमी होतील डोक्यातले.", त्याने स्पष्टीकरण दिलं. 
"बसा", ती नाईलाजाने म्हणाली आणि पुन्हा डोकं पुस्तकात खुपसलं. 
"कुठलं पुस्तक वाचताय?",त्याने विचारलं. 
तिने पुस्तकाचं कव्हर दाखवलं आणि पुस्तक वाचत राहिली. त्याने पुन्हा एकदा 'Excuse me'! केलं. तिने पुन्हा रागाने वर पाहिलं. 
"मी कॉफी मागवणार होतो, तुम्ही घेणार का?", त्याने विचारलं. तिने मान हलवली आणि त्याने 'दोन कॉफी' असं त्या पोराला सांगितलं. 
कॉफी येईपर्यंत तो पुन्हा इकडे तिकडे पाहात राहिला. कॉफी आली आणि तिने नाईलाजाने पुस्तक बाजूला ठेवलं. त्याने आपलं नाव सांगितलं,"मी चैतन्य, तुमचं नाव?"
"इरा", तिने सांगितलं. 
"एकदम जुन्या स्टाइलचं नाव वाटतंय नाही, इरावती वगैरे?", त्याने गमतीनं विचारलं. ती अजून वैतागली. 
"असू दे तुम्हाला काय? कॉफी प्या तुमची.", ती चिडली. 
"चिडताय काय, असंच टेन्शन मध्ये आहे ना? म्हणून काहीतरी बोलत आहे. जाऊ दे,मी गप्प बसतो.", तो बोलला. 
"इट्स ओके. कुठल्या कंपनीत आहे इंटरव्यू?", तिने शांत होत विचारलं. 
"जवळच प्रायव्हेट कंपनी आहे एक, मार्केटिंग चा जॉब आहे.", तो बोलला. 
"मग हे असं घाबरून बोलून कसं चालेल?", ती म्हणाली,"जरा कॉन्फिडन्सने बोललं पाहिजे ना?". 
त्याने मान हलवली. ते बोलत राहिले. बऱ्याच वेळाने ती म्हणाली, "तुम्हाला जायचं होतं ना?". 
"अरे हो, वेळेचं भानच नाही राहिलं. निघतो मी. थँक्स हा !", तो बोलला. 
"थँक्स फॉर द कॉफी. ऑल द बेस्ट." ,ती म्हणाली. 
तो हसून 'बाय' करून  निघून गेला. ती अजूनही त्याच्या परफ्यूमच्या आणि गोड हसण्याच्या अमलात होती. त्याची पाठमोरी आकृती कितीतरी वेळ बघत राहिली, तो दूर जाईपर्यंत. 
-------------------------------------------------------
दुपारी मॉलमध्ये कपडे बघत ती उगाचच फिरत होती. त्याने मागून येऊन 'हाय' केलं. 
"ओळखलं का मला?", त्याने विचारलं. 
ती दोन क्षण उगाचच आठवल्यासारखं करून 'हो ना' म्हणाली. 
"मला एक ड्रेस घ्यायला मदत करा ना?", त्याने विनवलं. 
"मला.... जायचं होतं..", ती. 
"मला हे ड्रेसचं माप कळत नाही.",तो. 
ती 'बरं' म्हणाली. 
'किती उंची', ती. 
"तुमच्या इतकीच असेल", तो म्हणाला तिच्याकडे बघत. 
"रुंदी, जाडी?", तिने पुढे विचारलं. 
"तुमच्याइतकीच असेल", तो. 
"बरं रंग, आवड काहीतरी सांगा ना. नाहीतर घेणार कसा ड्रेस?", सर्व ती विचारत राहिली आणि तो सांगत राहिला. त्याच्या प्रत्येक उत्तरासोबत तिचं मन उगाचच जड होत राहिलं. त्याच्यासोबत जाऊन तिने चार-पाच ड्रेसेस काढले. 
आता प्रत्येक ड्रेस ती त्याला घालून दाखवू लागली. त्यानेही प्रत्येकवेळी तिच्याकडे तितक्याच मन लावून पाहत ड्रेस कसा दिसतोय ते सांगितलं. पुढे मग त्याने स्वतःसाठीही दोन टीशर्ट घेतले. अर्थात तिचं मत तो विचारत होताच. 
दोन ड्रेस आणि टीशर्ट घेऊन निघताना त्याने तिला विचारलं,"सोबत कॉफी घेणार?". 
तिने घड्याळाकडे पाहिलं उगाचच. जायचं तर तिलाही होतं. 
"आता तुम्ही इतकी मदत केलीत तर निदान मला तुमच्यासाठी कॉफी तर घेऊ दे", तो म्हणाला. 
तिने 'बरं' म्हणत त्याच्यासोबत गेली कॉफी शॉपमध्ये. 
कॉफी घेत बोलत असतानाच तिचा फोन वाजला आणि त्याचा चेहरा थोडा दुःखी झाला. ती पुढे काही बोलणार तेव्हढ्यात तो 'इट्स ओके' म्हणाला. 
तिने कॉफी पटकन संपवली आणि त्याला 'बाय' केलं. 
तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे तो कितीतरी वेळ बघत राहिला, उदास मनाने. 
-------------------------------------
थिएटरच्या बाहेर ती कितीतरी वेळ एकटी उभी होती. तो समोर दिसला आणि तिचा राग मावळला. 
"अरे कुणाची वाट बघताय?", त्याने विचारलं. 
"फ्रेंड येणार होता एक. आलाच नाहीये. तिकिटं पण काढून ठेवली मी उगाच. " ती वैतागून बोलली. 
"हा त्यादिवशी आपण सोबत गेलो तेंव्हाचा ड्रेस आहे ना?" , त्याने विचारलं. 
"हो, मला खूप आवडला होता, मग नंतर जाऊन घेऊन आले.", ती लाजून म्हणाली. 
"बरं झालं घेतला, मी सांगणारच होतो तुम्हाला खूप छान दिसतोय म्हणून तो ड्रेस.",तो. 
"हा टीशर्ट पण त्यादिवशीचाच आहे ना?",ती. 
"हो ना, ते दोन टीशर्ट एकदम भारी आहेत, खूप आवडले मला. आजकाल तेच घालतोय.",तो हसून म्हणाला. 
"चला मी निघते. जाऊ दे मुव्ही. ",ती निघू लागली. 
"का? आमच्यासोबत चला ना? एक तिकीट गेलं आहेच, दुसरं कशाला? तुमचं ते दुसरं तिकीट मी विकत घेतो. माझ्यासोबत पाहिला मुव्ही तर चालेल ना?", त्याने विचारलं. 
ती हसली. 
इंटरव्हल मध्ये त्याने तिने समोशाची ऑर्डर दिली. ते गरम गरम सामोसे तोंडात भरत असताना तो तिच्याकडे पहात राहिला. 
"तुम्ही किती मन लावून खाता?",तो. 
"मग? नाहीतर कसं खायचं?",ती. 
"जाऊ दे तुम्ही बोलू नका, खात राहा",तो. 
ती खात राहिली आणि तो बघत राहिला. 
मुव्ही संपल्यावर तिला हळूच डोळे पुसताना पाहून तो हसला जोरजोरात. तिने त्याला पाठीत एक बुक्का मारला, रागाने. 
"कुठे जायचं आहे तुम्हाला?",थिएटर मधून पार्किंग मध्ये येताना त्याने विचारलं. 
"नाही नको, मी जाते.",ती. 
"अच्छा म्हणजे माझ्यासोबत मुव्ही पाहिलेला चालतो, पण गाडीवरून लिफ्ट नको का?" तो. 
"हे अहो जाओ बंद करा हो?", ती वैतागली. 
"बरं", तो म्हणाला. 
ती तशीच उभी राहिली. 
"चल मी सोडतोय  गाडीवर बैस", तो हक्काने बोलला आणि तिचा हात धरून तिला मागे बसायला लावलं. 
ती मुकाट्याने बसली. त्याने तिला घराजवळ सोडलं आणि तिला बोलायची संधी न देता 'बाय' करून गाडी परत फिरवली. 
ती त्याला गाडीवरून जाताना बघत राहिली, बराच वेळ. 

--------------------------
मोठ्या फाईव्ह स्टार हॉटेलच्या लॉबीमध्ये तो तिची वाट बघत उभा होता. ती आली, साडी नेसून, केस मोकळे सोडून, छान आवरून. आज चष्माही काढून लेन्स घालून आली होती. त्याच्या चेहऱ्यावर हसू उमटलं. तिचा हात धरून तो तिला लिफ्टमधून टेरेसवर घेऊन गेला. त्यानेही तिने गिफ्ट दिलेला सूट घातला होता. टेरेसवर फक्त एकच टेबल होतं त्यांचं. त्याने तिला तिच्या खुर्चीत बसवलं आणि स्वतःही बसला, तिचा हात हातात धरून बराच वेळ. दोघेही काहीही न बोलता मागे लागलेलं गाणं ऐकत शांत बसून राहिले. 
"किती छान गाणं आहे ना?",ती. 
"कितीही ऐकलं तरी समाधान होत नाही",तो. 
टेबलवरची गुलाबाची दोनच फुलं ती निरखत राहिली. आणि तो तिच्याकडे बघत राहिला. 
"हे असं तयार होऊन आलीस की किती सुंदर दिसतेस तू",तो. 
"ह्म्म्म पण हे असं नटायला तासनतास जातात, शिवाय पैसे वेगळेच",ती. 
"तू कधी ना खूप प्रॅक्टिकल बोलतेस",तो वैतागला. 
"बरं बाबा, सॉरी. होईन तयार अशीच छान नेहमी, बास?",ती. 
"बास म्हणजे काय? तुला नाही का वाटत माझ्यासाठी काहीतरी करावंसं? मी नेहमी विचार करतो तुझ्या आवडीचा. ",तो चिडला. 
 "अरे पण आता आलेय ना तुझ्याचसाठी? चिडतोस काय? शांत हो बरं", तिने समजावलं. 
तो गप्प बसला. दोघे मुकाट्यानेच जेवले. वेटरला काहीही न सांगताही तिच्या आणि त्याच्या आवडीचे सर्व पदार्थ एकेक करत येत राहिले होते. थोडं पोट भरल्यावर ती हसली. आणि तिला असं खूष बघून तोही. 
डिझर्ट येईपर्यंत दोघे उठले आणि टेरेसवर फिरत राहिले. त्याने तिचा हात हातात धरला. तिने सोडवायचा केलेला प्रयत्न व्यर्थ होता. 
थंडी वाटू लागली तसे त्याने त्याचे दोन्ही हात तिच्याभोवती टाकले. ती काही बोलणार इतक्यात त्याने तिचा किस घेण्यासाठी ओठ पुढे केले आणि ती चिडली. 
"जरा स्थळ काळ बघत  जा ना?", ती ओरडली. 
"मला कळत नाही या ठिकाणी आपण दोघेच असताना तुला काय प्रॉब्लेम आहे?",तो. 
"आपण घरी आहोत का? ",ती. 
"नसू दे ना. पण एकमेकांचे तर आहोत ना?",तो. 
"मला हे असं पब्लिकमध्ये नाही आवडत कितीवेळा सांगितलं मी?",ती. 
"तू ना कधी बदलणार नाहीस, कितीही प्रेम तुझ्यावर उधळलं ना तरीही?",तो. 
"हे बघ हे असंच प्रेमाचं प्रदर्शन असतं तुझं, कायम. करायचंय ना प्रेम मग नाही अपेक्षा ठेवायची, आपल्याला जे जमेल तेव्हढंच करायचं. मी करतो म्हणून तूही कर का म्हणायचं?", ती बोलत राहिली. 
तो तुटत राहिला. 
"चल निघू आपण",तो म्हणाला. 
"चल.",म्हणत तिने पर्स उचलली. 
लिफ्टमध्ये तो तिच्याकडे बघत राहिला काहीही न बोलता. हॉटेलच्या खाली आल्यावर 'टॅक्सी' ला हात केला. 
दार उघडून तिला बसवून,"बाय इरा" इतकंच बोलला. तिला घेऊन टॅक्सी निघाली आणि तो तिथेच उभा राहिला कितीतरी वेळ. 

----------------------------------------------
सकाळी डोळे चोळत त्याने फोन उघडला. रात्री कधीतरी झोप लागून गेली होती. मेल बॉक्समध्ये तिची मेल आलेली होती. 
"तू आणि मी... किती वेगळे. म्हणजे दोन टोकं म्हणण्यासाठीही मध्ये काहीतरी हवं ना? मला नेहमी आश्चर्य वाटत राहिलं की काय म्हणून आपण जवळ आलो असू? काहीतरी असायलाच हवं ना? त्याशिवाय का आपण भेटत राहिलो दर थोड्या दिवसांनतर, ते ही परत तोंडही पहायचं नाही असं ठरवून. हां, नाही म्हणायला मला एक वाटायचं, आपण दोघेही जरा वेडे होतोच. सुरुवातीला एकमेकांसाठी आणि नंतर..... 
       ते सुरुवातीचे स्वप्नातले दिवस सोडले तर बाकी काय होतं सांग ना? आपल्या आवडी-निवडी, स्वभाव सगळंच वेगवेगळं होतं. तरीही किती विचित्र असतं ना माणसाचं मन? दरवेळी त्या मंतरलेल्या दिवसांच्या मागे मागे धावून पुन्हा तुझ्याकडे यायचे आणि तूही माझ्याकडे. मग थोडे दिवस पुन्हा तो खेळ, जुने क्षण पुन्हा पुन्हा जगण्याचा. एका हव्या असलेल्या, हरवलेल्या स्वप्नाला नवीन जोमाने एकमेकांत शोधायचा. साहजिकच तीच भांडणं, तोच अपेक्षाभंग आणि तेच अजूनच दुखावलेलं मन. पुन्हा एकदा वेगळं होणं, थोड्या दिवसांनी हरवलेल्या स्वप्नांचा शोध घेत परत येण्यासाठी.
      मला तुझ्या आधीच कळला हा खेळ. तेव्हापासून तर तुझी चिडचिड अजूनच वाढली माझा तटस्थपणा बघून.तुला काय त्रास होत असेल चांगलंच कळत होतं मला, पण मी तरी काय करणार होते? तुला समजावणं अवघड होतं रे, हे असं धावणं किती व्यर्थ आहे. पण काल रात्री निघाले तेव्हा, तुझ्या डोळ्यांत तो शोध थांबलेला दिसला आणि किती बरं वाटलं, माझ्यासाठी नव्हे, तुझा त्रास, छळ अखेर संपला म्हणून.
पण खरं सांगू? काल रात्री झोप लागली नाही मला. शेवटी दोन टोकं जोडणारा धागा तुटला होता. बाय चैतू.
इरा."


विद्या भुतकर.
https://www.facebook.com/VidyaBhutkar1/

Tuesday, October 24, 2017

पोस्ट दिवाळी डीटॉक्स

डिस्क्लेमर: या पोस्टमध्ये 'पोस्ट दिवाळी डीटॉक्स' बद्दल कुठलेही शॉर्टकट मिळणार नाहीत. पण दिवाळीनंतर एकदम हॉट टॉपिक असल्याने त्याचं नाव हे दिलंय. तितकेच कुणी वाचेल तर चांगलेच आहे. :) 

तर सांगायचं कारण काय तर दिवाळी रविवारी संपली. यावेळी तर जास्तच धावपळ झाली होती. फराळ बनवणे, खाणे, छान कपडे घालून पार्टीला जाणे, फोटोशोषण करणे(माझे फोटो अन पोरांचे व नवऱ्याचे शोषण) आणि लगेच दिवाळी संपायच्या आत ते फोटो लगेच पोस्ट करणे वगैरे महत्वाची कामे तत्परतेने केल्याने सोमवारी खूपच दमायला झालं होतं. जरा कुठे ऑफिसमध्ये बसून आराम करायला मिळेल म्हटलं तर लोकांचे भराभरा प्रश्न आणि पोस्ट्स, शेयर्स दिसू लागले होते. कशाचे तर, या पोस्ट दिवाळी डीटॉक्सचे. हो त्यात आपल्या ऋजुता दिवेकरचे पोस्टही एकदम ढिगाने फॉलो आणि शेयर झाले होते. मीही दोन चार वाचून घेतले. असो. 

       मला पडलेला प्रश्न हा आहे की दरवेळी दिवाळी संपली किंवा न्यू इयर पार्टी झाली की लगेचच लोकांना हे असे प्रश्न का पडतात? इथेही जानेवारीच्या पहिल्या आठवड्यातच सर्व दुकानांत स्पोर्टच्या कपड्यांवर सूट असते, जिम मेम्बरशिप वर डिस्काऊंट असतो आणि जानेवारीत जिममध्येही खच्चून गर्दी असते. या सगळ्यांतून एकच गोष्ट दिसते ती म्हणजे सणांमध्ये खाणे, पिणे याकडे केलेलं दुर्लक्ष आणि त्यातून येणारा अपराधीपणा. त्या अपराधी भावनेतूनच बरेचसे लोक असे तत्परतेने वजन कमी करायच्या मागे लागतात. दिवाळीच्या आधी किंवा बाकी वर्षभरात का या गोष्टीकडे लक्ष दिलं जात नाही? वजन कमी करणे हे दरवेळी शॉर्ट टर्म गोल का असते? 

         प्रत्येकाला अचानक जाणवतं की माझं वजन वाढलंय. आपण वर्षभर आपल्या तब्येतीकडे दुर्लक्ष करतोय हे का कळत नाही कुणाला? बरं, या वागण्यातही एकच ध्येयअसते, वजन कमी करणे. किंवा बारीक होणे. कुणीच असं म्हणत नाही की मला 'फिट' किंवा 'सशक्त' व्हायचं आहे. एखादं काम करण्यासाठी माझी शारीरिक क्षमता वाढवायची आहे. मला जरा चालताना दम  लागतो, ते कमी करायचं आहे किंवा मुलांसोबत खेळता यायला हवं इतकं फिट व्हायचं आहे? का ते सर्व सोडून आपण एका नंबरच्या आणि वजन काट्याच्या मागे लागतो. वजन कमी करणे हे ध्येय असू शकतं पण केवळ तेव्हढेच ध्येय ठेवल्याने आणि तेही थोड्याच काळापुरते ठेवल्याने, पुढच्या दिवाळीतही पुन्हा आपण तिथेच असतो. 

         बरं या खाण्यात किंवा झटकन वजन कमी करून घेण्याच्या प्लॅनमधेही लोकांचे इतके गैरसमज असतात. मी तर इतक्या वेळा इतक्या लोकांकडून ऐकलं आहे आणि तेही कुत्सितपणे,"मला नाही बाबा ते भाजीपाला खायला जमत" किंवा "मला अजिबात उपाशी राहायला जमत नाही". म्हणजे वजन कमी करण्यासाठी सॅलड खावं लागतं किंवा उपाशी राहावं लागतं हा अगदी सर्वसामान्य गैरसमज आहे. उलट जर आपण झटकन वजन कमी करण्याच्या नादाला लागलो नाही आणि रोजच्या जेवणात सर्व पदार्थांचा आणि योग्य प्रमाणात समावेश केला तर ते जास्त योग्य आहे. किती लोक Carb, Protein, fiber या सर्व बाबींचा जेवणात समावेश आहे की नाही पाहतात? आपल्याला दिवसांत किती protein लागतं आणि त्यातील किती आपल्या जेवणातून मिळतं हे किती लोकांनी पाहिलेलं असतं? उपाशी राहणे किंवा सॅलड खाणे या पेक्षा नीट विचार करून असा चौफेर आहार ठरवणे आणि तो बनवणे हे अधिक कष्टाचं काम आहे. आणि ते फक्त स्वतःसाठीच नाही तर आपल्या पूर्ण कुटुंबासाठी उपयुक्त आहे. 

         आपलं शरीर जितकं काम करतं त्यापेक्षा जास्त खाल्लं की वजन वाढणारच हे नक्की. तात्पुरत्या डाएट प्लॅनने ते बदलणार नाहीये. रोज शरीराला थोडा का होईना व्यायाम पाहिजेच. साधं जिना चढून जाणे किंवा एखादी गोष्ट घ्यायला पटकन उठणे किंवा निदान अर्धा तास तरी व्यायाम करणे या गोष्टी जाणीवपूर्वक केल्या पाहिजेत. आळसावलेलं शरीर असेल तर ते या छोट्या गोष्टींतही त्रास देतं. त्या आळसातून बाहेर पडून स्वतःला वळण लावणे हे जास्त महत्वाचं आहे. चार दिवस व्यायाम केला नाही तर अस्वस्थ वाटलं की समजायचं की कुठल्याही डाएटची गरज नाहीये. :) अनेकदा माझ्या सासूबाई किंवा सासरे जरा जास्त जेवण झालं सकाळी की रात्री सरळ जेवण टाळतात. का तर सवय नाही. रोजच्या ठराविक आहाराची सवय पडली की थोडं जास्त खाल्लं तर शरीरच आपल्याला सांगेल थांबायला. दिनचर्येत असा बदल होणं जास्त योग्य आहे. नाहीतर कधी ना कधी आपलं शरीर साथ देणं सोडणारच आहे. 

         मी अनेकवेळा अनेक लोकांना विचारते किंवा म्हणते की व्यायाम करा, सुरुवात करा आणि नियमित करा. तेव्हा मला अनेक कारणं ऐकायला मिळतात. कारण 'व्यायाम करणे म्हणजे केवळ जिममध्ये जाणे' हाही गैरसमज आहे. रोज घरातच योगासने करणे, पोटाचे, पाठीचे, पायाचे व्यायाम करणे हे सहजपणे होऊ शकते. त्याचबरोबर बाहेर निदान ३० मिनिटे जास्त वेगाने चालणेही चांगला व्यायाम आहे. तसाच जिना चढणेही. या सर्व वेगवेगळ्या व्यायामाचा एकत्र परिणाम पाहिला तर नक्कीच फरक जाणवेल. आणि मुख्य म्हणजे 'जिममध्ये जायलाच जमत नाही' हे कारण दिलं जाणार नाही. 
       
        अजून एक गैरसमज म्हणजे 'मी घरची इतकी कामे करते वजन कमी होत नाही'. मी नेहमी पाहिलं आहे की मी जेंव्हा घरून ऑफिसचं काम करते तेव्हा माझं चालणं अतिशय कमी होतं  आणि ऑफिसमध्ये जाते तेंव्हा नाही म्हटलं तरी १-२ किमी सहज चाललं जातं. तात्पर्य काय की घरात राहून स्वयंपाक करणे किंवा अजून काही कामं केली तरी तेव्हढा व्यायाम शरीराला पुरेसा नाहीये. त्यात अतिशय मर्यादित हालचाल होते आणि तीही शरीराच्या सर्व अवयवांची होत नाही. त्यामुळे घरातली कितीही कामे केली तरी जरा चार पावलं धावलं तर तुम्हाला दम लागणारच कारण हृदयाला तेव्हढ्या वेगाची सवयच राहात नाही. त्यामुळे बाकीची कामे असली तरी आवर्जून वेळ काढून पूर्ण शरीराचे व्यायाम केलेच पाहिजेत. असो. 

         एकूण काय, अनेक गैरसमजुतीतून बाहेर येऊन आपल्याला नक्की काय करायला हवं याचा विचार केला पाहिजे . माझं म्हणणं इतकंच की हे असे दिवाळी किंवा न्यू इयर नंतर येणाऱ्या अपराधीपणापेक्षा, आपल्या दिनचर्येत किंवा रोजच्या खाण्याच्या सवयीत बदल करून घेणे आवश्यक आहे. आणि तो केला तर दोन चार दिवस जरासं जास्त खाल्लं तर काही फरक पडणार नाहीये. जोवर हे लक्षात येत नाही तोवर पोस्ट दिवाळी डीटॉक्स चालूच राहणार. आता दिवाळीच्या निमित्ताने सुरुवात करणार असेल कुणी तर काहीच हरकत नाही, पण ती सुरुवात असावी, पुढच्या कायमस्वरूपी सकारात्मक बदलांची.  

विद्या भुतकर. 

Wednesday, October 18, 2017

रांगोळी

      गेल्या आठवड्याभरात भरपूर कामे होती. एकेक करत फराळ बनवायचा होता, त्यात पणत्या रंगवणे वगैरे चालूच होते. त्यामुळे दिवाळी सुरु झाली तरी घर अजून सजलं नव्हतं. उद्या लक्ष्मीपूजनाची मुलांना शाळेलाही सुट्टी आहे तर संध्याकाळीच सुरुवात करावी म्हटलं, रांगोळी आणि दिव्यांच्या माळा लावून. 
        रांगोळी म्हटलं की दिवाळीची पहाटच आठवते. आमच्या घराच्या पुढच्या आणि मागच्या अंगणात रांगोळी काढायची असायची. त्यात आम्ही कधी लवकर उठणारे नव्हतोच. तरीही दारात रांगोळी काढायला मिळेल या आमिषाने उठायचेच. आमची आई सुंदर रांगोळ्या काढते. त्यामुळे दिवाळीला पुढच्या अंगणात तिचीच रांगोळी असायची, असते. पण मला ते अजिबात पटायचं नाही. मोठी होऊ लागले तशी आईशी वाद घालायचे की मला तू मागच्या अंगणात रांगोळी काढायला लावतेस आणि स्वतः पुढे काढतेस म्हणून. कारण काय तर अर्थातच माझी रांगोळी पाहायला मागच्या अंगणात कुणी येणार नसायचं. आता वाटतं थंडीत लवकर उठून रांगोळी काढायचा मला तरी किती अट्टाहास. 
          कितीही कुडकुडत असले तरी सकाळी उठून रांगोळी काढायचेच. कधी ठिपक्यांची तर कधी फुलांची नक्षी. तेव्हा कॅमेरा असता तर फोटोही काढले असते. आता फक्त त्याच्या पुसत आठवणी आहेत. ठिपक्यांच्या रांगोळीत अनेकवेळा ठिपके कधी तिरके जायचे तर कधी रेषा जोडताना काहीतरी चूक व्हायची. मग त्यात खाडाखोड झाली की ते छान वाटायचं नाही. नक्षी काढताना रेषा तितक्या सुबक यायच्या नाहीत. तरीही ती पूर्ण करण्याचा आग्रह असायचा. तासभर बसून रांगोळी पूर्ण करेपर्यंत उजाडलेलं असायचं आणि सर्वांचे फटाके वाजले तरी आमच्या आंघोळी अजून बाकीच असायच्या. पण ती पूर्ण झालेली रांगोळी बघताना जे समाधान असायचं ते आजही मिळालं. 
          आज संध्याकाळी ऑफिसमधून आल्यावर सुरुवात केली. अंधार आणि थंडी अगदी घरी असायची तशीच, तिकडे पहाट असायची तो भाग वेगळा. पण मी सुरुवात केल्या केल्या मुलं हट्ट करू लागली. त्यात सान्वीला बाजूला कुठे रांगोळी काढायची नव्हती. वाटलं, माझीच लेक ती, माझ्यावरच गेलीय. :) मग तिला माझ्या शेजारीच खडूने फुले काढून दिली आणि रंग भरायला सांगितले. मुलांनी दोघांनी मिळून ते पूर्ण केलं. माझी मात्र रांगोळी बराच वेळ चालली. पूर्ण होईपर्यंत थंडीने बोटे वाकडी झाली होती आणि पाठ मोडलेली. पण उभे राहून पुन्हा पुन्हा पूर्ण झालेल्या रांगोळीकडे पाहायचे समाधान मात्र खूप दिवसांनी मिळालं. आणि हो, रंग आणि रांगोळी यावेळी भारतातून येताना आईचेच ढापून आणले होते. :) तिला आता यावेळी नवे घ्यावे लागले असणार. :) 
        इथे पहाटे उठणे, उटणं लावून अंघोळी, फटाके वगैरे काही करणं जमत नाही. पण मुलांना आमच्यासारख्या काही आठवणी मिळाव्यात म्हणून जमेल तेव्हा, जमेल तितकं करत राहतो, इतकंच. :) 
तुम्हा सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा !!




विद्या भुतकर. 

Sunday, October 08, 2017

पण सुरुवात करायला हवी....

     आज सकाळी बॉस्टन हाफ मॅरेथॉन झाली. या वर्षातील शेवटची रेस. मागच्यावर्षी प्रमाणे, यावेळीही ३ रेस केल्या, ५ कि.मी., १० कि.मी. आणि २१ कि. मी. आजची ! या वर्षीची ही शेवटची रेस खास होती एका कारणासाठी. ते म्हणजे ही माझी पाचवी हाफ मॅरेथॉन होती. २०१२ मध्ये स्वनिक चार महिन्यांचा असताना या प्रवासाला सुरुवात केली होती. तेंव्हा केवळ पुन्हा मूळच्या वजनाला यायचं हे एक ध्येय होतंच पण सर्व सर्वात जास्त मला स्वतःला वेळ देण्याची गरज वाटत होती. नोकरी, मुलं, घर आणि बाकी सर्व जे काही चालू होतं त्यातून स्वतःला वेळ काढायचा होता, कितीही अवघड असलं तरी. त्या रेसच्या निमित्ताने हे झालं होतं. 
      त्यानंतर रनिंग हे माझ्याच नाही तर आमच्या घरात नियमित झालं. पुण्यात असताना ५ किमी, १० किमी रेस पळाले मैत्रिणींसोबत. आणि सोबत नवऱ्याचीही पळण्याची सुरुवात झाली होती. तिथून पुढे आम्ही जवळजवळ सर्वच रेस सोबत गेलो आहे. अशा वेळी मुलांचं कुणीतरी बघणं आवश्यक असतंच. प्रत्येकवेळी घरातलं कुणीतरी किंवा मित्र-मैत्रिणी यांच्याकडे मुले आनंदाने राहतात. अशा वेळी आपण किती नशीबवान आहोत हे जाणवत राहतं. आमच्या दिनचर्येत पळणं अविभाज्य घटक झाल्याने मुलांनीही ते आता स्वीकारलं आहे. आणि आम्हाला त्यांच्याकडून प्रोत्साहन देत राहतात. कधी आम्ही मेडल्स घेऊन घरी आल्यावर ते गळ्यात घालून मिरवूनही. 
    मी सुरुवात केली होती तेंव्हा एकटीच पळत होते. मग हळूहळू नवरा, मित्र-मैत्रिणी सोबत आले. आवडीनुसार त्यातील अनेकांनी कधी रेसमध्ये सहभाग घेतला, काहींनी जिममध्ये. इथे बॉस्टनमध्येही दर रविवारी पळायला जाताना एकेक करत मित्र-मैत्रिणी सोबत येऊ लागले आहेत आणि हा सहभाग असाच वाढावा ही इच्छाही आहेच.  एकेक करत पाच मोठ्या रेस झाल्यावर जाणवत आहे की हे इथंच थांबणार नाहीये. 
     पहिल्या रेसच्या वेळी खूप काळजीत होते, आजूबाजूच्या लोकांना बघून आपण किती नवखे आहोत हे जाणवत राहायचं. ते अजूनही वाटतंच. पण तेव्हा एक पुस्तक वाचलं होतं. त्यात लिहिलं होतं की तुम्ही दिवसातून १५ मिनिट पळत असाल किंवा चालत असाल, तुम्ही ते करताय ते पुरेसं आहे स्वतःला 'रनर' म्हणवून घेण्यासाठी. तोच युक्तिवाद मी माझ्या ब्लॉग साठीही वापरला पुढे मग. अगदी नसेल मी मोठी लेखिका, पण नियमित लिहितेय ना? मग आहे मी लेखक. :) 
     तेच मी सर्वांनाही इथे सांगू इच्छिते, ज्यांना खरंच काहीतरी प्रयत्न करायचे आहेत किंवा ज्यांना कुठूनतरी सुरुवात करायची आहे. आपण एखादी गोष्ट जी नियमित करतो ती तेव्हा कितीही लहान वाटू दे, पण ती नियमित केल्याने त्यातूनच एक कारकीर्द बनते. मग ते रोजचा व्यायाम असो, एखादा आहारातील बदल असो किंवा एखादी लावलेली चांगली सवय असो. :) पण सुरुवात करायला हवी आजच!
पाच वर्षांच्या निमित्ताने सर्व मेडल्स सोबत घेतलेला एक फोटो. :)

विद्या भुतकर. 
https://www.facebook.com/VidyaBhutkar1/