Wednesday, December 13, 2017

विरूष्का आणि मी

डिस्क्लेमर: 
हे आपलं लिखाण आपणच 'विनोदी'  म्हणवून घ्यायचं म्हणजे भीतीच वाटते. त्यातही संसाराचं रडगाणं लिहिताना, हसावं की रडावं हे कन्फ्युजन असतंच. मी तर म्हणते 'अवघाचि संसार' नावाची अजून एक कॅटेगरी केली पाहिजे हे असल्या पोस्ट लिहायला. असो. तर डिस्क्लेमर हा की, यातील सर्व पात्रे काल्पनिक नसली तरी त्यातील घटनां पूर्णतः काल्पनिक असून त्यांचा लेखिकेच्या आयुष्याशी किंवा स्वभावाशी कुठलाही सुतराम संबंध लावू नये. शिवाय, घरची भांडणे अशी पब्लिकमध्ये मांडण्यावरुन आधीच भांडणे झाल्यामुळे, त्यावर लिहिणे हा अजूनही घरी वादाचाच मुद्दा आहे. 
-------------------------------------------------------------------------------------------------
     तर तुम्हांला सांगते त्या तिकडे विराट आणि अनुष्काचं लग्न तिकडे लागलं आणि आमच्या घरात महायुद्ध पेटलं. एक तर या असल्या बातम्यां बाहेर पडल्या की लगेचच  दिसेल त्या पोर्टल, सोशल मीडिया आणि वेबसाईटवर नको इतकी माहिती येऊलागतात. ढिगाने फोटो, मग त्याचं एकदम भारी लोकेशन, हसणारं जोडपं, त्यांचे पर्फेक्ट ड्रेसेस सगळं आलंच. आणि हो, फॉरवर्ड होणारे तेच तेच जोक्स. 

       मी काही अजून बातमी वाचली नव्हती, त्यात अमेरिकेत रात्र. त्यामुळे अगदी झोपायच्या वेळीच माझ्या एका शाळेतल्या मैत्रिणीने सर्वात पहिले व्हाट्स ऍपवर पाठवलेले व्हिडीओ पाहिले. इतके घरगुती होते ते व्हिडीओ की पहिलं तिला झापलंच. म्हटलं, "युरोप, भूतान वगैरे फिरुन आली होतीस ते ठीक आहे, यांच्या लग्नाला पण? तेही आम्हाला न सांगता ? आमच्या मैत्रीत मेजर ब्रेक अप येणार हे नक्की होतं. इतक्यात तेच व्हिडीओ दुसऱ्या ग्रुपवरही आले आणि ती वाचली. मी आता रात्री १२ वाजता भांडण न करता मुकाट्याने झोपून जाईन  हे पाहून नवऱ्यानेही सुटकेचा श्वास घेतला. हो ना, नाहीतर अनेकवेळा अशा ग्रुपवर एथिक्स  वरून वाद घातल्यावर तर कधी जवळच्या मैत्रिणीसोबत सासरच्या गॉसिपनंतर अनेकवेळा त्याला उठवलं आहे. मग काय? नणंदेनं माझ्याशी कसं वागावं हे मला त्याला त्याचवेळी सांगणं आवश्यकच आहे. असो. त्यावर पुन्हा कधीतरी.

        दुसऱ्या दिवशी उठेपर्यंत सगळीकडे बातमीने वेग धरला होता. लगेचच पुढचे हनीमून फोटो, रिसेप्शनचे इन्व्हिटेशन कार्ड आले होते.  नवऱ्याने लगेच त्यावर,"मी बिझी आहे, तू जाऊन ये" असा फालतू जोक मारुन घेतलाच. पुढचा व्हिडीओ होता, तो म्हणजे,"विराटने अनुष्कासाठी अंगठी शोधायला तीन महिने कसे लावले आणि कशी भारी अंगठी घेतली" यावर. आता हे म्हणजे आमच्या घरी चालू असलेल्या आगीत तेल, तूप आणि बटर सर्व घालण्यासारखं होतं. लग्नातली अंगठी वगैरे ठीक आहे पण गेले दोनेक वर्षं झाली मी नवऱ्याला म्हणतेय, "ते हिऱ्याच्या जाहिरातीत दाखवतात ना? तशी 'हीरा है सदा के लिये' टाईप्स अंगठी घे की!". आता दरवेळी याला 'काय गिफ्ट घ्यायचे' असा मोठा प्रश्न असतो. मी काय हवंय हे स्पष्ट सांगूनही दोन वर्षात काहीही हालचाल झालेली नाहीये. त्यामुळे हा व्हिडीओ पाहून सकाळ-सकाळी आमचं भांडण जुंपलं. दोन वाढदिवस, दोन ऍनिव्हर्सरी आणि दोन ख्रिसमस संपले तरी अंगठी काही मिळाली नाहीये. तुम्ही म्हणाल 'ख्रिसमस का'?  तर? इथे याच वेळेत अशा अंगठ्याच्या जाहिरातींचा भडीमार होतो आणि त्यात हा व्हिडीओ. पोरांना डब्यांत देण्यासाठी गरम गरम पराठे करुन रागारागाने  मी ते डबे आपटले. मग काय ना? इतकी कर्तव्यदक्ष, कष्टाळू बायकोची काही किंमतच नाही!!

          आमचं भांडण झाल्याने दिवसभर बोलणं तर होत नव्हतंच. त्यात पुढे माहिती येतच होती. मीही ऑफिसमध्ये दुसरं काही काम नसल्याने सर्व एकदम फॉलो करत होते. अगदी त्यांच्या डेस्टिनेशन वेडिंग प्लँनर पासून. आता हिच्या नवऱ्याचं नाव काय, तो काय करतो आणि त्यांची स्टोरी पण आम्ही वाचायची. तर त्यांच्या प्लॅनरने म्हणे स्वतःच्याआई-वडिलांनाही सांगितलं नव्हतं ती इटलीला जाऊन आली तरी, की ती कशावर काम करत आहे? म्हटलं, "नसतं कौतुक. आम्ही इथे अमेरिकेत येऊन ढिगाने प्रोजेक्ट केले, आले कधी आणि गेले कधी. आमच्या आई-बाबांनी 'बरे आहात ना?' आणि 'काम कसंय' या पलीकडे एक प्रश्न विचारला नाही.".जाऊ दे. 

        तर त्या दुपारी नवीन आलेल्या फोटोच्या लॉटमध्ये इटलीच्या डेस्टिनेशनचे सुंदर फोटो होते. इतकी चिडचिड झाली सांगू. आजतागायत प्रत्येक वेळी ट्रीपला जायचं म्हणजे नुसता वैताग येतो. एकतर कधी वेळेत ठरवत नाहीच आम्ही, कुठे जायचं ते. वेळेत उठणं, सामान बांधून जिथे जायचं तिथे वेळेत पोहोचणं म्हणजे जीव अर्धमेला झालेला असतो. त्यात पोरांचे खाणे-शी-शू- झोप वगैरे पाहणे आलेच. मग अगदी शेवटी ठरवल्याने अख्खा गाव पोहोचल्याने भयंकर गर्दी झालेली असतेच, ट्राफिक वाढलेली असतेच. एखाद्या ठिकाणी जाऊन खूप मजा केलीय असं नाहीच मुळी. भारतात असताना अगदी त्या मॅप्रो गार्डनला वेळेत गेलो तरी मिळवलं. त्यातही  आम्ही जातो तेंव्हाच ढगफुटी व्हावी तसा पाऊस पडत असतो. वाटलं, मला पण दिवसभर असं एक माणूस पाहिजे हाताशी, प्लॅनर! सर्व कसं टापटीप, वेळेत आणि हो,एकही वस्तू न विसरता जाऊन परत घेऊन येणारा. लै धावपळ होते हो. विचार चालूच होते, इतक्यात जोडप्याचे हनीमूनचे फोटोही आलेच लगेच. मी आपलं दुकान(लॅपटॉप) बंद करुन घरी आले.

         कितीही म्हटलं तरी असली फिल्मी भांडणं विसरुन आपल्या कामाला लागलेलंच बरं असतं, हे मला दीपिका आणि रणबीर, कतरीना आणि रणबीरच्या प्रकरणानंतर कळलं होतंच. तरीही मधेच रणवीर आणि दीपिकाचे फोटो आले की माझे टॉन्ट येत असतातच. ते झेलून नवराही मुकाट्याने सोडून देतो. आता त्यांच्या इतक्या जोड्या बदलल्या तरी आम्ही कसे 'गोइंग स्ट्रॉंग' आहोत यावर नवऱ्याने काही कमेंट केली नाहीये हे माझं नशीबच म्हणायचं. तरीही कधी बोलला तर,"मलाही काही कमी ऑप्शन नव्हते" असा डायलॉग मी तयार ठेवला आहेच. संध्याकाळी आम्ही नेहमीसारखं आवरलं. कांदाही त्यालाच कापायचा असल्याने रडू लपवणे वगैरे प्रकार मला करता आले नसतेच. भांडण करायचं नाहीच असं ठरवून एकदम गप्प बसले. रात्री सर्व काम उकरुन आम्ही आपापले फोन समोर बसलो होतो. तेव्हा मधेच नवरा 'फनी व्हिडीओ' आणि फॉरवर्डेड जोक्स वाचून जोरजोरात हसत होता. सकाळी झालेल्या भांडणाने त्याच्यावर काडीचाही परिणाम झालेला नाहीये हे बघून इतका संताप झाला त्याच्यावर. 

      तेव्हढ्यात 'विराट गिव्हींग बॉयफ्रेंड गोल्स' नावाचा का काहीतरी व्हिडीओ माझ्या फेबुवर सुरु झाला. त्या व्हिडीओ मध्ये विराटने ब्रेकअप झाल्यावरही कसा अनुष्काला सपोर्ट करण्यासाठी जाहीरपणे ट्विट केलं यावर, तर 'वुमन्स डे' ला पोस्ट केलेल्या आई आणि अनुष्काच्या सोबतच्या पोस्टवर छान कमेंट लिहिली होती हे सर्व सर्व काही दिलं होतं. तुम्हाला सांगते, असा राग आला होता माझ्या नवऱ्याचा. इथे बायको भांडून, स्वतःच स्वतःला समजावून पुन्हा नॉर्मल वागायला लागली तरी या नवऱ्याला काहीही फरक पडला नव्हता. त्याचं जोक्स वाचून हसणं चालूच होतं. पुढे जाऊन शिवाय फॅमिली, फास्ट फ्रेंड्स, फ्रेंड्स फॉरेव्हर वगैरे सर्व ग्रुपवर तेच जोक्स फॉरवर्ड करायलाही कमी ठेवली नव्हती. 

आणि जोक तरी काय हो? "फक्त ५० लोक लग्नाला? इतके तर आमच्याकडे लग्नाला रुसतात". 
बरोबर, यांच्या घरचे लोक ना? असणारच तसले. 
इतका झापला त्याला. म्हटलं, "इथं साधं तुझ्या आईसोबत भांडण झालं तरी माझी बाजू घ्यायला नको तुला. कधी कुणी मला काही बोललं म्हणून सांगितलं तर लगेच म्हणतोस, जाऊ दे ना?  कधी बायकोची बाजू घेऊन माहीतच नाही. मग अख्ख्या ट्विटरवर ट्रोलर्सशी भांडण तर जाऊच दे. मेलं, नशीबच फुटकं."

तर म्हणतो कसा? "हुशार आहे तो. तिची बाजू घेऊन बोलला ट्विटरवर म्हणून परत मिळाली त्याला. आणि बायकोचा एकटीचा फोटो पोस्ट नाही केला त्याने, आईचाही केलाच ना?".

"हो बरोबर तू तेव्हढेच बघणार?", मी.  
त्याच्याशी बोलण्यात काहीच अर्थ नव्हता. अजून आमच्या लग्नातली अर्धवट राहिलेली भांडणं सुरु झाली असती. बरंच काही होतं बोलण्यासारखं पण दमले होते. मी आपली पुन्हा फोनमध्ये घुसले. पुन्हा अजून काही पोस्ट दिसायला लागल्यावर मात्र माझी चिडचिड झाली. च्या मारी, यांची मजा आणि आमचं भांडण. त्यातही त्रास फक्त मलाच. रागाने फोन आपटून बंद करुन टाकला आणि लवकर झोपायला गेले. रात्री कधीतरी येऊन त्याने माझ्या पोटावर हात घेऊन जवळ ओढून घेतलं, मीही सवयीने त्याच्या हातावर हात ठेवला आणि झोपून गेले. 

         लवकर झोपल्यामुळे निदान झोप तरी पूर्ण झाली. सकाळी शांतपणे आवरत विचार केला, म्हटलं जाऊ दे, नव्या लग्नाचे नऊ दिवस झाले की त्यांच्या भांडणांचे गॉसिप वाटायला परत येईनच. आधी १० वर्षं लग्न टिकवून तरी ठेवा म्हणावं. ऑफिसमध्ये, सकाळच्या मेल चेक करुन झाल्यावर, बॉलीवूड मॉर्निंग अपडेट मध्ये शाहिद आणि मीराच्या मॅचिंग ड्रेसचा फोटो आला होता. ऍनिव्हर्सरीला असाच एखादा मॅचिंग ड्रेसमध्ये फोटो काढायची खूप इच्छा होती. त्याची प्लॅनिंग मी आतापासूनच सुरु केली आहे. :)

विद्या भुतकर. 
https://www.facebook.com/VidyaBhutkar1/

Sunday, December 10, 2017

लेट इट स्नो

         या वर्षातला पहिला स्नो पडला आणि पुन्हा एकदा चेहऱ्यावर हसू उमटलं. कधी कधी आपण पाहतोय ते खरंच घडतंय याच्यावर विश्वास बसत नाही. वर आकाशाकडे बघत आहे आणि छोटे छोटे कण एकदम अलगद जमिनीकडे येत आहेत. सुरुवातीचे काही मिनिट ते कण जमिनीवर पडताच विरघळून जातात आणि त्यांचं अस्तित्व राहातच नाही. पण हळूहळू सलग १-२ तास ते येत राहतात. त्यांना पावसासारखा आवाज नसतो की कधी जोरात येणाऱ्या गारांची तीव्रता. अगदी कापसाचे बारीक कण अलगद तरंगत जमिनीवर हळुवार टेकावेत असे ते शांतपणे साचत राहतात. आणि लवकरच एक पांढरा शुभ्र थर गवतावर किंवा रस्त्यावर दिसू लागतो. गेल्या दहा वर्षात माझ्या अमेरीकेतील वास्तव्यात हे असे अनेक 'स्नो फॉल' मी पाहिले असतील पण त्यातील नावीन्य अजूनही जात नाही.

           माझ्या कुतुहलात कदाचित माझ्या मराठीपणाचा त्यात मोठा हात असेल. मी हे बोलतेय ते 'प्रत्येक गोष्टीत मराठीपणा कसा आणावा' या सवयीमुळे नाही. विचार करा, महाराष्ट्रातील जास्तीत जास्त थंड हवेचे ठिकाण म्हणजे महाबळेश्वर किंवा पाचगणी यांच्या पलीकडे कधीही काही पाहिले नव्हते. त्यामुळे थंडी थंडी म्हणजे किती असू शकते याचा कधी अनुभवच घेतला नव्हता. हिंदी सिनेमात पाहायचे तेव्हा मला नेहमी प्रश्न पडायचा, हे इतकं छान ऊन असताना तो बर्फ वितळत का नाही? इतका साचून कसा काय राहू शकतो? त्यात भरीला म्हणून हिरोईनचे कपडेही छोटेच त्यामुळे तिथे थंडी असेल अशी कणभरही शंका वाटायची नाही. तेव्हापासून असलेले हे अनेक प्रश्न आणि आकर्षण यामुळे आजही स्नो पडायला लागला की त्याच्याकडे बघत बसावेसे वाटते.

         निदान आज माझ्यासारख्या अनेक लोकांची एक शंका तरी दूर करते. स्नो पडतो तेव्हा आणि विशेषतः त्याच्यानंतर खूप थंडी असतेच. हिरोईन च्या कपड्याकडे बघून थंडीचा अंदाज लावू नये. उन्हांबद्दल बोलायचे तर, ते केवळ दिखाव्याचे असते असे म्हणायला हरकत नाही. तापमान शून्याच्या खाली असल्याने ऊन असूनही तो बर्फ वितळत नाही. तापमान शून्याच्या वर जाऊ लागते आणि उन्हाची तीव्रता वाढते तसे तो बर्फ वितळू लागतो. असो. हे झाले प्रश्नांचे उत्तर. पण खरी मजा येते ती स्नो पडताना बघायला आणि त्यानंतरचे बर्फाच्छादित निसर्गसौन्दर्य बघायला. अनेकवेळा सलग दिवसभरही हिमवर्षाव झालेला मी अनुभवला आहे. त्यामध्ये जमिनीवरचा थर वाढत जातो.आणि आक्खे शहर सफेद होऊन जाते. आपल्या घराच्या खिडकीतून जितके दूरपर्यंत पाहता येईल तितके पाहत घरातल्या उबीत बसून राहते. पण कधी ना कधी बाहेर पडायला लागणारच असतं......

              बाहेर पडायचं तर ट्रेन, बसने जाण्याचे वेगळे अनुभव तर गाडीने जाण्याचे वेगळे. बाहेर पडताना गाडी असेल तर गाडीच्या वरचा स्नो काढणे, आजूबाजूचा काढणे हे सर्व प्रकार करावे लागतात. हातात खोऱ्यासारखे स्नो-स्क्रॅपर घेऊन गाडीवरचा स्नो ढकलून काढावा लागतो. त्यासाठी हातात कितीही जाड मोजे घातलेले असले तरी हात गारठून जातातच. कधी कधी फुटभरापेक्षा जास्त बर्फ जमलेला असतो. अशावेळी गाडीवरचा काढून भागत नाही, आजूबाजूचाही काढावा लागतो. एकदा एका मोठ्या स्टॉर्म मध्ये ऑफिसमधून बाहेर पडताना कळतंच नव्हतं की माझी गाडी कुठली आहे. एव्हढ्या मोठ्या पार्किंगमध्ये सर्वच गाड्या पांढऱ्याशुभ्र झाल्या होत्या. बराच वेळ साफ केल्यावर कळलं ती माझ्या शेजारची गाडी होती. चिडचिड नुसती. 

           गाडीत बसणे, ती गरम करून सुरु करणे यासारखी कामे करून एकदाची सुरु झाली की पुढे गाडी चालवणे हेही संकट असतेच. रस्ते तसे भराभर साफ केले जातात तरीही वादळ असेल तर स्नो सलग पडतच राहतो आणि गाडी चालवणे (कार) अतिशय अवघड होऊन जाते. अशाच वेळी अपघात होण्याची शक्यता जास्त असते. कदाचित आमच्या हवामान खात्याचे अंदाज दुर्लक्ष करण्याच्या सवयीमुळेही असेल, आम्ही अशाच वादळात बाहेर पडलो आणि दोन-तीन वेळा आमची गाडीही चालवताना घसरलीही आहे. समोरून सरळ जाणारी गाडी अचानक सरकून दुसऱ्या बाजूच्या लेनमध्ये गेल्याने झालेले अपघातही पाहिले आहेत. आता शक्यतो स्नो पडला की घरी बसतो. गप्प घरात बसतो. :) एकूण काय तर सुंदर दिसणाऱ्या या बर्फाची अनेक भयानक रूपेही आहेत. 

          हायवे वर गाड्या बंद पडून गारठलेले लोक, अपघात, लाईट गेल्यावर हीटिंग बंद पडून लोकांचे होणारे हाल. मी एका प्रोजेक्ट्साठी २ महिने न्यू जर्सीला होते. बसने येऊन जाऊन करायचे. एक बस चुकली की अर्धा तास अशा थंडीत काढायचा म्हणजे नको वाटायचं. त्यात असेच एका वादळानंतर घरातून बाहेर पडले. बसस्टॉपला येईपर्यंत बर्फ बुटात जाऊन त्यांचं पाणी झालं होतं. दिवसभर तसेच ओले झालेले थंड पाय घेऊन ऑफिसात बसावं लागलं होतं. प्रेग्नंट असताना बर्फात घसरून पडायची खूप भीती वाटायची. नवऱ्याचा हात धरून अलगद चालत राहायचे. अर्थात हे सर्व झाल्याला ७-८ वर्षे उलटली. पण प्रत्येक हिवाळ्याच्या अशा अनेक आठवणी आहेत. आणि प्रत्येक वर्षी पावसात जसे आपल्याकडे कवींची भरती येते तशी प्रत्येक स्नो-फॉल मध्ये माझ्या या आठवणींची गर्दी होते. गेल्यावर्षी अनुभवात स्कीईंगची भर पडली होती आणि घरातून दिसणाऱ्या ऊंच ऊंच झाडांवर साचलेल्या बर्फाच्या अविस्मरणीय दृश्यांची. 

        निसर्गसौन्दर्य म्हणजे तरी काय? आणि तेही किती अविस्मरणीय !! झाडांची सर्व पाने झडून गेलेली असतात त्यामुळे केवळ सुकलेल्या फांद्या राहतात. हळूहळू करत त्या काळ्या फांद्यांवर सफेद बर्फ जमा होतो. थंडीने त्याला काचेसारखी पारदर्शकताही येते. गवत असलेली सर्व जमीन पांढरीशुभ्र झालेली असते आणि त्यात कुठेही असमानता दिसत नाही. इतका एकसलग बर्फ कसा काय साठू शकतो? त्यात चुकून बोटही घालायची इच्छा होत नाही इतके ते पर्फेक्ट असते. चालताना त्यात उठणारी पावलं समुद्राची आठवण करून देतात रेतीसारखे ठसे पाहून. इतके सुंदर दृष्य आणि त्यात डिसेंबर मध्ये येणारा ख्रिस्तमस अजून भर घालतो. ठिकठिकाणी केलेली रोषणाई, दुकानातून लावलेले डेकोरेशन्स, सजलेले डाऊनटाऊन, जिंगल करणाऱ्या बेल्स, टीव्हीवर येणारे ख्रिस्तमसचे चित्रपट, हॉट चॉकलेट, वेगवेगळे कुकीज-केक्स.... अशा अनेक गोष्टी हा ऋतू उजळून टाकतात. 

      आजपर्यंत अनेकवेळा मी आवडता ऋतू कोणता यावर शाळेत निबंध लिहिलाय. भारतात उन्हाळा, पावसाळा आणि उन्हाळ्याचे आपआपले आवडते-नावडते रूपही पाहिले आहे. पण इथला हिवाळा वेगळाच, स्वतःची वेगळी ओळख दाखवणारा. मुलांना त्यात खेळायला खूप छान वाटते. कधी एकदा बर्फ पडतोय असं झालेलं असतं त्यांना. इतके वर्षे आणि इतक्या आठवणी असूनही बर्फ पडल्यावर बाहेर जाऊन त्याच्यात खेळण्याची उत्स्फूर्त इच्छा उफाळून येत नाही. मुलं हट्ट करतात, त्यांना ढीगभर कपडे घालून बाहेर जाऊ देते. दर थोड्या वेळाने आत बोलावत राहते. बाहेर पडावंच लागलं तर स्वतःही जमेल तितके गरम कपडे घालून जाते. किंवा खूपच सुंदर दिसतंय म्हणून घरातूनच किंवा दारातून फोटो काढून घेते. मुलं समोर आहे त्याचा आनंद घेत असतात. मी मात्र समोर असूनही त्या बर्फाला, चोप्रांच्या चित्रपटांसारखी दुरूनच एन्जॉय करते. :) 

विद्या भुतकर. 
https://www.facebook.com/VidyaBhutkar1/