Sunday, January 28, 2018

आई म्हणजे ....डेंजर असते

   परवा आईचा आणि माझा व्हाट्सएप्प कॉल झाला. आमची आई फेसबुक, व्हाट्सएप वगैरे व्यवस्थित वापरते. माझ्या फेसबुक पेजवरचे पोस्टही नियमित वाचून लाईक वगैरे करते. सकाळी उठल्यावर चेक करायच्या सर्व गोष्टींमध्ये माझ्या पोस्ट वाचणे हे काम नियमित असतंच. त्यामुळे मी काहीही लिहिलं तरी ते तिने पाहिलेलं असतं. तर झालं असं, आमच्या त्या कॉलवर तिने मला सांगितलं, काही दिवसांपासून आमच्या गावातील महिलांच्या एका व्हाट्सएप्प ग्रुपवर तिला माझ्या काही पोस्ट फॉरवर्ड येत होत्या आणि तेही निनावी. ती अक्षयपात्र, मॅगीची पोस्ट वगैरे. 
         खरं सांगायचं तर गेले दोन वर्षे झाली मी हे पाहतेय. मी पोस्ट लिहिते, पब्लिश करते, कुणी नावासहित शेअर करते, कुणी निनावी. काही जण विचारतातही 'मी शेअर करु का नावासहित', मी 'हो' म्हणून टाकते. आता माझी पोस्ट कुणाला तरी आवडली आणि ती अजून कुणाला दाखवावीशी वाटली हे चांगलंच आहे ना? पण एकदा ती व्हाट्सएप्प वर पोचली की त्याच्या लेखकाचं नाव कधी पुसलं जातं माहित नाही. अनेकजण ते तसेच निनावी पाठवत राहतात. आधी मला खूप चिडचिड व्हायची. पण आता सोडून देते. वाटतं जाऊ दे, आपण आपलं लिहायचं काम करायचं. कारण, पोस्ट वाचून पुढे पाठवताना त्याच्या लेखकाचं नाव डिलीट करावंसं का वाटत असेल माहित नाही. 
       मी सोडून देते पण आमची आई? ज्यांनी पोस्ट फॉरवर्ड केल्या होत्या त्या बाईंना आईने कॉल लावला आणि विचारलं, "तुम्हाला माहित आहे का याची लेखिका". त्यांना माहित नव्हतंच.
आईने लगेच सांगितलंही माझं नाव आणि म्हणाली,"मी तिची आई बोलतेय". 
त्या बाईं बोलल्या,"मलाही अशाच फॉरवर्ड आल्या होत्या, मी पुढे लोकांना पाठवल्या. सॉरी हां.". 
आईचं म्हणणं, आपल्याला नाव माहित नसेल तर नाही पाठवायच्या ना मग? 
म्हटलं,"अगं जाऊ दे. उलट मी इथे अमेरिकेत बसून लिहिलेलं काहीतरी आणि आठवड्याच्या आत आपल्या गावात लोकांपर्यंत पोहोचतंय तर भारीच आहे ना? त्यांना सांगितलंस की मी त्यांच्याच गावातील आहे तर त्यांना अजून आनंद होईल ना? तू कशाला एव्हढा त्रास करुन घेतेस?". 
मी असं बोलल्यावर जरा शांत झाली.
मनात विचार आला, "मी सोडून दिला आपला हक्क, तरी आईला त्रास झालाच."
एकूण काय तर, एखादी आई आपल्या मुलाच्या हक्कासाठी कुठे, कधी आणि कशी भांडेल सांगता येत नाही. म्हणून म्हटलं, आई म्हणजे....डेंजर असते. :) 

विद्या भुतकर. 

No comments: