यावर्षी शाळा सुरु झाली तेंव्हापासून घरात दार थोड्या दिवसांनी एक गोंधळ चालू होता. शाळेत मुलांना काही चांगलं काम केलं तर त्याबद्दल एक कार्ड मिळत होतं, उत्तेजनार्थक. स्वनिकला आजवर १० मिळाली. प्रत्येक वेळी काही ना काही चांगल्या कामाबद्दल ते मिळायचं. त्याचा आम्हाला आनंद होताच. (अर्थात पोरगं घरातही इतकं चांगलं वागेल तर उपकार होतील, वगैरे वाटायचंच. असो.) तर प्रत्येक वर्गात जे काय दोन-चार मुलांना हे असे दार आठवड्याला कार्ड मिळायचे. मग प्रत्येक तुकडीच्या ५-६ वर्गातील सर्वांचे कार्ड एकत्र करून त्यांची लॉटरी काढली जायची. बॉक्स मधून ज्या मुलाचं नाव निघेल त्याला एक ब्रेसलेट मिळतं, शाळेचं नाव असलेलं.
स्वनिकला या ब्रेस्लेटचं इतकं आकर्षण होतं की विचारायला नको. प्रत्येक वेळी त्याला कार्ड मिळालं की तो खूष व्हायचा, मला आता ब्रेसलेट मिळू शकतं म्हणून. त्याचं म्हणणं, "I have a chance to get it". सुरुवातीला त्याला समजावणं अवघड जायचं की,"लॉटरी म्हणजे काय आणि त्याचा नंबर लागला नाही तरीही ठीक आहे." त्याला ब्रेसलेट नाही मिळालं तर शुक्रवारी उदास होताना पाहून मला अजूनच वाईट वाटायचं. एकतर पोराला हे असं काहीतरी कार्ड मिळणार ज्याचं आपल्याला कौतुक आहेच पण त्यात एक प्रकारचा छळही होताच ना. ६ वर्षाच्या मुलाला काय कळणार की आजवर एकच कार्ड मिळालेल्या मुलाला ब्रेसलेट का मिळालं आणि त्याला का नाही? दोन-तीन वेळा तर मी म्हटलं,"बाबू, मी तुला विकत आणून देईन पण तू असा त्याच्या मागे लागू नकोस.", विकत घेतलं नाही हा भाग निराळा. पण एक पालक म्हणून ते पाहणं खूप त्रासदायक होतं. अनेकदा तर असं वाटलं की नकोच मिळायला ते त्याला ते कार्ड. मग प्रत्येकवेळी आम्ही त्याला समजवायला सुरुवात केली,"Its not important to get the bracelet, its important to work hard and get that card." त्यालाही ते हळूहळू पटलं आणि त्याचा आधीचा त्रास बराच कमी झाला.
या शुक्रवारी घरी आले तेव्हा त्याने मला ओरडून सांगितलं की "आई, मला ते ब्रेसलेट मिळालं.". आणि खरं सांगते, मीच जोरजोरात ओरडू लागले. इतकी खूष झाले. आजवर त्याने इतकी वाट पाहिलेली गोष्ट त्याला मिळाली होती. :) शाळेचं वर्ष संपत होईना शेवटी ते त्याला मिळालं होतं. पण गंमत म्हणजे, गेल्या दोन दिवसांत त्याने ते ब्रेसलेट कुठे टाकलं हेही माहित नाही. आणि तो ते मिळालंय हे विसरूनही गेला.
आपल्यालाही हे असंच होतं, नाही का? एखाद्या न मिलणाऱ्या गोष्टीची इतकी ओढ लागते, लहान मुलांसारखी. कधी कधी योग्यता नसलेल्याना ती मिळते याचं वाईटही वाटतं. पण खरंच त्या मिळणाऱ्या बक्षिसापेक्षा त्यासाठी सतत प्रयत्न करण्यातच जास्त मजा असते. कारण, ब्रेसलेट मिळालं शेवटी तरीही त्याची हौस तोवर राहिलेली नसते. एकदा ते मिळालं की पुढे काय हा प्रश्न असतो तो निराळाच. :)
विद्या भुतकर.