Monday, March 11, 2019

तर?

     एकेरी वळणदार रस्ता, गाडीत चालू असलेली गाणी आणि एकांत. आजूबाजूने उंच झाडं पण थंडीने त्यांची पालवी हरवलेली. तो वळणदार रस्ता एका मोठ्या तळ्याला वेढा घालून जातो. तळ्याचं रूप रोज बदलतं. त्या तळ्याला वेढा घालून जात असताना, रोज मनात विचार येतो, आता गाडीचा तोल गेला आणि गाडी तळ्यात पडली तर? मग तळ्यात असताना गाडीची दारं बंद होणार. मग मी बाहेर कशी पडणार? एका सिरीयल मध्येदाखवलं होतं एकदा अशीच एकजण त्या पाण्यात बुडून गेलेली मुलगी. मग गाडी आतच तळाला अडकून राहिली तर कुणाला कळणार कसं  मी आत आहे ते? 
       त्या विचारांना मागं टाकत पुढं गेलं की एका छोट्याशाच डोंगरावर जाणारा चढणीचा रस्ता. त्याच्या कपारी बघून सह्याद्रीची आठवण होते. पुणे मुंबई रस्त्याच्या अशा उंच कपारींना दरड कोसळू नये म्हणून जाळी लावलेली असते. मग मला त्या भुईसपाट झालेल्या गावाची आठवण येणे. माळीण की काय नाव त्याचं? हे विचार करत असतांना समोरुन एखादी गाडी आली आणि माझ्या गाडीच्या कोपराला ठोकून गेली तर?  
       एखाद्या दिवशी ऑफिसमध्ये सुंदर एकदम फिकट पिवळ्या रंगाचा टॉप घातलेला. एका हातांत लॅपटॉप, पाण्याची बाटली, फोन, वही आणि दुसऱ्या हातात कॉफीचा कप, वाफाळता. मीटिंगला उशीर होतोय. जरासं घाईत चालताना कोपऱ्यावर वळले आणि समोरुन येणाऱ्या माणसाने धडक दिली तर? कॅंटीनमध्ये ट्रे मधलं खरकटं कचरा पेटीत टाकताना सोबत वालेट किंवा आय-डीही चुकून टाकलं गेलं तर? 
      मुलगा डायनिंग टेबलच्या खाली पडलेली वस्तू उचलण्यासाठी खाली वाकला आणि वर उठतांना त्याच्या डोक्याला लागलं तर? मुलं घरात खेळतांना, मस्ती करताना, दार आपटलं आणि एखाद्याचं त्या दारात बोट चिमटलं तर? एखाद्या मैत्रिणीच्या नुकत्याच जन्मलेल्या बाळाला हातात घेतांना ते एकदम सटकलं तर? मुलीला सायकल शिकवताना हात सोडून दिला आणि ती पडून तिचं हाड मोडलं तर? कपडा इस्त्री करुन झाल्यावर गरम इस्त्री तशीच गादीवर राहिली तर? 
       काय चुकीचं घडू शकतं याचे दिवसभरात असे लाखो विचार येतात किंवा येत नसले तरी त्यांची शक्यता कुठे ना कुठे असतेच ना ? या अशा शक्यतांचा विचार केला तर, आपण एक आख्खा दिवस जगतो हे आश्चर्यच की. नाही का? हा इतका मोठा 'तर' असूनही आपण जगतच राहतो अगदी काहीच घडत नसल्यासारखे. 

विद्या भुतकर. 

2 comments:

sukanya mote said...

हो ना अगदी खरंय, आपण जगतच राहतो

मन कस्तुरी रे.. said...

बाप रे! मी ही अशा बर्‍याच शक्यतांचा विचार करत राहते.
विशेषत: डायनिंग टेबल च्या खाली वाकून मुलाने काही उचललं आणि वर उठताना त्याला लागलं तर, असंच आमच्याकडे एक किल्ल्यांचं कपाट आहे- त्यातून किल्ली काढताना हमखास त्याच्याने किल्ली खाली पडते व तो ती वाकून उचलतो....वरचं दार तसंच उघडं असतं!
आजच मी विचार केला की "उद्याचं कुणी बघितलंय...उद्या आपण असू वा नसू इ इ" अशा पोस्ट्स नेहमी फिरत असतात..पण आपण ऑल्मोस्ट गॅरंटीने सांगू शकतो....कि हो उद्याही मी तर असेनच!