आज दुपारी भारतातल्या मैत्रिणीशी व्हाट्सऍप्प वर बोलत होते.
ती मधेच बोलली, "आज काय ड्रेस कोड? ".
अशा मैत्रिणी आयुष्यात असणं फारच गरजेचं आहे असं मला वाटतं. नाहीतरी दिवसभर नवीन कपडे घालून फिरलं तरी नवऱ्याच्या लक्षात येणार नाही असं होऊ शकतं. असो.
तर तिला म्हटलं, "कपडे जाऊ दे, हे बघ. "
म्हणून मी हातात घातलेल्या नवीन 'केट स्पेड' घड्याळाचा फोटो काढून लगेच तिला पाठवला. त्यावर तिचा खूप W आणि O असलेला wow आला. मोजून २-४ मिनिटं बोललो असू पण एकदम फ्रेश झाले. अशा चौकशा करणे आणि घाईघाईत का होईना गप्पा मारणे हा प्रत्येकाचा जन्मसिद्ध हक्क आहे असं मला वाटतं. असो. तर दुपारीची धावपळीची वेळ असल्याने त्या नवीन घड्याळाचीतिला पूर्ण गोष्ट सांगता आला नव्हती. (तशी तर माझ्याकडे प्रत्येक गोष्टीची गोष्ट असते.) संध्याकाळी त्यावर विचार करताना वाटलं लिहूनच टाकावं ना?
तर झालं असं की बरेच दिवस न वापरल्याने काही घड्याळं बंद पडली होती. एक दिवस आठवणीने ती घड्याळं घेऊन नवरा, मुलांसहित मॉलमध्ये गेले. आता दुकानांत चार सेल बदलेपर्यंत वेळ होताच तर एक नवीन घेऊनच टाकलं. महत्वाचं काम झाल्यावर अजून दोन चार दुकानं फिरलो आणि घरी परत आलो. घरात येत असतानाच लक्षात आलं की ती सेल बदललेली घड्याळं आणि हे नवीन ठेवलेली पिशवी सापडत नाहीये. नवऱ्याने पुढच्या दोन चार क्षणांत लगेच फायदा घेऊन मला बोलूनही टाकलं, 'असं कसं तू करू शकतेस' वगैरे, वगैरे. अशा वेळी गप्प बसण्यात आपलं भलं असतं हे मला केव्हांच कळलं आहे.
पुढच्या २-४ मिनिटांत सर्व दुकानांमध्ये फोन करून पिशवीचा पत्ता लागला. त्यांनी अगदी नीट ठेऊ म्हणून सांगितलं. मग एका मित्राला दुसऱ्या दिवशी ती त्या दुकानातून आणायला सांगितली. तो 'हो' म्हणूनही दुसऱ्या दिवशी गेला नाही. दोन दिवसांनी त्याच्या बायकोने ती आठवणीने आणली. आणि त्यांच्याकडून ती माझ्या घरी यायला एक महिना गेला. तर अशा प्रकारे मार्च मध्ये विकत घेतलेलं घड्याळ मे मध्ये घातलं गेलं. त्यामुळे आनंद तसा दुणावलेलाच होता. त्यात मैत्रिण बोलायला. एकूण आजचा दिवस खासच.
हे सर्व रामायण सांगायचं कारण म्हणजे, गेल्या १०-१५ वर्षात अनेक घड्याळं घेतली गेली आणि प्रत्येकाचं एक स्थान आणि आठवण आहे जशी आजची होती. पण आज ते नवीन घड्याळ पाहताना, मला माझ्या पहिल्या घड्याळाची आठवण झाली आणि ती मांडून ठेवावीशी वाटली. तर मी पाचवीत असतांना कधीतरी आजोबांकडून एकदा त्यांचं घड्याळ घेतलं होतं हातात घालायला. आबांचं गोल मोठी डायल असलेलं पट्ट्याचं घड्याळ होतं. हळूहळू मी रोजच त्यांच्याकडून मागून ते घालू लागले होते. मला आठवतं की एकदा शाळेच्या पर्यवेक्षिका म्हणाल्याही होत्या की, "इतक्या लहान वयात कशाला हवंय घड्याळ?". तेव्हा ते माझ्या मनगटाला मोठंही व्हायचं. तरी हातात घालायला आहे ना, याचं कौतुक वाटायचं. आता विचार केला तर त्यांनी स्वतःचं घड्याळ मला कसं दिलं असेल असा प्रश्न पडतो. मला माझं एखादं मुलीला द्यायची हिम्मत होणार नाही. तिने ते हरवलं तर? असो.
पुढे सातवीत असताना मला एकदा सायकलची हुक्की आली. सर्व मैत्रिणींच्या सायकली आहेत तर मलाही हवी असा हट्ट धरुन बसले. दिवसभर खोलीचं दार बंद करुन, काहीही न खाता बसले होते. रात्र होत आली तरी माझं कुणी ऐकणार नव्हतंच. मग शेवटी वाट बघून, भूक लागल्यावर मीच बाहेर आले. त्या दिवसानंतर, हट्ट म्हणून उपाशी राहायचं नाही, अगदी भांडण झालं तरी जेवून घ्यायचं हा धडाही शिकले. :) असो. तर रात्री माझा उतरलेला चेहरा पाहून आबांनी मला बोलावलं आणि हळूच कानांत बोलले की, "सायकल नाही घेता येणार पण आपण तुला घड्याळ घेऊ". मग काय? एकदम खूष मी. पुढच्या काही दिवसात मग आबा मला एका घड्याळ दुरुस्त करणाऱ्या माणसाकडे घेऊन गेले. त्याने आम्हाला दोन चार घड्याळं दाखवली. ही सगळी घड्याळं वापरलेली होती. अर्थात हे आता कळतंय. पण तेव्हा मला कोण आनंद झाला होता. मग जे काही आम्ही निवडलेलं होतं ते नवीन सेल वगैरे घालून सुरु करून देतो असं तो माणूस म्हणाला. मग पुन्हा एकदा शाळेतून परत आल्यावर आम्ही त्या दुकानात गेलो आणि ते घड्याळ आणलं.
आज आठवायचा प्रयत्न केला तरी त्या घड्याळाचं पुढं काय झालं हे आठवत नाहीये. पण ते गोल्ड प्लेटेड एच एम टी(HMT) कंपनीचं घड्याळं होतं, तसाच गोल्ड बेल्ट असलेलं. डायल बहुतेक चौकोनी होती. पुढे किती वर्ष ते वापरलं हेही आठवत नाहीये. मला वाटतं प्रश्न घड्याळाचा नव्हताच. त्यादिवशी मी दिवसभर सायकलचा हट्ट करत होते आणि तो पुरवता आला नाही तरी मला खूष करण्याचा आबांचा प्रयत्न आणि त्यातून त्यांनी त्यांना जमेल तसं घेतलेलं ते घड्याळ हे अविस्मरणीय आहे. नोकरी लागल्यानंतर मी घेतलेली, नवऱ्याने भेट दिलेली घड्याळं हे सर्व पुढे येत गेलं. आता नवीन घड्याळाचं कौतुक असलं तरी, आबांचं ते गोल डायलचं मी दोन वर्ष वापरलेलं घड्याळ आणि माझं पहिलं यांच्याशी त्याची तुलना होऊ शकत नाही. आज खूप दिवसांनी त्याची आठवण झाली.
अर्थात प्रत्येकासाठी त्यांचं पहिलं घड्याळ तसं खास असतंच. नाही का? तुमचंही आहे का?
(फोटो गुगलवरुन साभार.)
विद्या भुतकर.