या महिन्यांत पोरांची शाळा सुरु झाली. सुरु झाली एकदाची ! तीनेक महिन्यांच्या सुट्टीनंतर आम्ही सुटलो. खरंतर इथे नवीन वह्या-पुस्तकं, युनिफॉर्म या कशाचंच कुणालाच सोयरं सुतक नसतं. तरी मी आणि नवरा आपलीच शाळा सुरु झाल्याच्या उत्साहात असतो. तीनेक आठवड्यांपूर्वी, 'युनिफॉर्म नाहीत तर निदान नवीन चार कपडे तरी घ्यावे' म्हणून रविवारी दुपारी बाहेर पडलो. त्याच दिवशी स्वनिकने नवीन टुमणं सुरु केलेलं. या पोरांना रोज मागे लागायला काहीतरी कारण कसं मिळतं? त्याला कुठलातरी व्हिडीओ गेम हवा होता. आम्ही घेणार नाही ही खात्रीच त्यामुळे 'दोन महिन्यांनी वाढदिवसाला तरी घ्या असं' आतापासूनच सुरु केलं होतं. नेहमीप्रमाणे या सगळ्याकडे 'वेळ येईल तेव्हा बघू' म्हणून मी दुर्लक्ष करतच होते.
तर मी काय सांगत होते? हां, आम्ही कपडे घ्यायला बाहेर पडलो आणि स्वनिकने बोलायला सुरुवात केली,"आपण असं करू शकतो का? आपण घरातले काही विकू शकतो."
घरातल्या वस्तू विकायच्या म्हटल्यावर मात्र मी कान टवकारले, "म्हटलं काय विकणार? "
स्वनिक,"आमचे जुने toys विकू शकतो."
आणि इथेच माझी वाद घालायची खुमखुमी जागी झाली.
मी,"म्हणजे एकतर मी तुमच्यासाठी खेळणी घ्यायची. ती तुम्ही खेळणार नाहीच. शिवाय आपण १० डॉलरला घेतलेलं खेळणं तू समजा ५ ला विकलंस, तरी ५० टक्के नुकसानच ना?".
हे त्याला पटलं.
त्याने दुसरा पर्याय सांगितला," मग आम्ही तुमच्यासाठी काहीतरी काम करतो. Like getting plates for dinner, clean-up, अशी. आणि तुम्ही आम्हाला पैसे द्या."
मला मजा यायला लागली होती.
म्हटलं,"बाबू ही कामं तर तुम्ही घरी राहता म्हणजे केलीच पाहिजेत. तुम्ही मदत केली तर त्यासाठी पैसे का द्यायचे?".
माझ्या या युक्तिवादावर तो वैतागला. चिडून म्हणाला,"मग आम्हाला कसे पैसे मिळणार? मी काय तुमच्यासारखा जॉब पण करू शकत नाही. "
मला जरासं वाईट वाटलं. त्याचं म्हणणं बरोबर होतंच. I could understand his frustration. इतक्यात कपडे घ्यायला जाणार ते दुकान आलं. पण विषय सोडून जाता येणार नव्हतं. इतक्या वेळ गप्प असलेल्या नवऱ्याने यावर थोडी फिलॉसॉफी सांगण्याचा प्रयत्न केला.
तो म्हणाला,"हे बघ, तुम्ही काही चांगलं काम करता ना तेंव्हा ते आमच्या हार्टच्या गुड अकाउंट मध्ये जातं. तुला त्यासाठी पैसे मिळवायची गरज नाही. फक्त चांगलं काम करा."
आता यातलं आमच्या पोरानं फक्त कामाचं ऐकलं. तो म्हणे,"हां आपल्याकडे मनी बँक आहे. त्यात पैसे जमवू."
पैसे हातात द्यायची इच्छा नसल्याने मग आम्ही फक्त चांगल्या कामाच्या चिठ्ठ्या त्यांच्या बरणीत टाकायचं ठरवलं. आता हा संवाद दुकानात पोचला होता. कुठल्या रंगाची आणि आकाराची पँट त्याला बसते हे बघत असताना, मधेच याचं सुरु होतं.
"माझे आणि दीदीचे पॉईंट एकत्र करायचे. गेमसाठी ५८ लागतील, मग फक्त २९-२९ मिळायला हवेत. "
मी, "का पण? दीदीला व्हिडीओ गेम नको असेल तर? तिला दुसरं काही हवं असेल तर? "
तो,"ओके आपण दीदीचं अकाउंट वेगळं करू पण आम्ही आम्हाला पाहिजे तर एकत्र करू शकतो. "
मी,"बरं."
तो,"पण ५८ पॉईंट झाले की लगेच गिफ्ट घ्यायचं. बर्थडे ची वाट बघायची नाही." असं आमचं negotiation चालूच होतं.
मधेच नवरा,"बस की, बच्चे की जान लोगी क्या?" वगैरे कमेंट टाकत होता. चार कपडे घेऊन घरी परत आलो. आता इतकं ठरलं होतं की 'चांगलं काम केलं की पॉईंट मिळणार'. मग चांगलं काम म्हणजे काय? घरी आल्यावर दप्तर जागेवर ठेवलं, डबा धुवायला टाकला, १ पॉईंट. होमवर्क न सांगता केलं, १ पॉईंट, पियानो प्रॅक्टिस, कराटे प्रॅक्टिस एकेक पॉईंट. गणिताचे दोन पॉईंट... असं करत गेल्या काही दिवसांपासून आमच्या घरात पॉईंट्सनी धुमाकूळ घातलाय. पोरांनी एक चार्ट बनवला आणि त्यावर आम्हाला विचारुनच पॉईंट्स लिहिले.
दीदी मोठी असल्याने आणि तिचा या सिस्टीम (आणि आईबाबांवर) अजिबात विश्वास नसल्याने ती फारसा उत्साह दाखवत नव्हती. स्वनिकने मात्र स्वतःच काम शोधून 'मी सर्वांचे शूज आत ठेवले तर पॉईन्ट मिळेल का? ' वगैरे कामही करून टाकली. आता उद्यापर्यंत त्याचा हा तक्ता पूर्ण होईल. तर त्यांचं असं ठरलंय की या दोन तक्त्यांचे पॉईंट घेऊन व्हिडीओ गेम आणू आणि पुढचा तक्ता पुस्तकांसाठी ठेवू. 'खरंच हे पूर्ण केलं तर आपली आवडती पुस्तकंही विकत घेता येतील' या कल्पनेनं दीदीही एकदम आनंदात आहे. त्यांचा ठरवलेलं काम पूर्ण करत असल्याचा आनंद, आईबाबांच्या मागे लागण्याची चिकाटी, पुढेही काय काय करु शकतो याचा विचार आणि उत्साह पाहून मलाही आता ही अशीच सिस्टीम माझ्यासाठी बनवायची इच्छा होतेय. समोर एक ध्येय ठेवायचं, ते पूर्ण करायला कष्ट करायचे. ते पूर्ण झालं की नवीन ध्येय .....
विद्या भुतकर.