आज दुपारी फोनमधले फोटो चाळत बसले होते. (हो, मी असलेही उद्योग करत बसते, रिकाम्या वेळात.) यावेळी भारतात असताना काढलेल्या अनेक फोटोंमधला एक फोटो पाहिला आणि छान वाटलं. तो फोटो पोस्ट करावा म्हटलं आणि त्याचं टायटल सुचलं, "This made me smile today."
मागच्या वर्षीपर्यंत रोज ट्रेनने प्रवास करत होते तेव्हा अनेक छोट्या गोष्टी पाहून असं वाटायचं. कधी ट्रेनमधलं एखादं पोस्टर, एखादं प्रेमात चाळे करणारं तरुण जोडपं तर कधी बाबासोबत डाउनटाउनला जाऊन परत घरी निघालेलं, दमलेलं छोटं मूल. आणि या अशा अनेक गोष्टी पाहून वाटायचं, "This made me smile today." आज फोटोला टायटल देताना हे आठवलं. होतं काय की दिवसभरात एखाद्या गोष्टीवरुन वैताग आला, चिडचिड झाली, दिवस अख्खा खराब गेला याची अनेक कारणं असू शकतात, असतात. पण हे असं हसवणारं, हसू खुलवणारं एखादंच. पण ते जाणवून घेतलं पाहिजे. नाही का? नाहीतर, असे अनेक क्षण येऊन निघूनही जातात आणि आपण त्या एका खराब गेलेल्या मीटिंगचाच विचार करत बसतो.
खरंतर, उगाच 'ग्यान' देत बसत नाही, मला काय म्हणायचंय ते कळलं असेलच.
तर आज इतरांनाही विचारावंसं वाटलं, "What made you smile today?"
विद्या भुतकर.
No comments:
Post a Comment