मागच्या आठवड्यात काही कपडे खरेदीसाठी बाहेर जायचं होतं. थंडी वाढेल तसं बाहेर पडण्याचा आळस टाळून काही ना काही घेणं गरजेचं होतं. लेकाला प्लेडेट (play date , इथे तो डोळे फिरवणारा स्माईली पाहिजे) ला सोडून दोन तासांत यायचं ठरवून बाहेर पडलो. एकतर खूप दिवसांनी असे फक्त खरेदीला बाहेर पडलो होतो त्यात लेकीला कधी नव्हे ते एकटीला घेऊन. सुरुवातीला दुकानांत गेल्यावर तिच्यासाठी न घेता माझी खरेदी सुरु केली. तरीही तिने कुरकुर न करता स्वतः मला काय चांगलं दिसेल ते सुचवायला सुरुवात केली. दोन चार झगमगीत कपडे मी पाहिले तर म्हणे,"आई तू हे असलं घालशील?". म्हटलं, का नाही? तिने तसा बराच वेळ संयम ठेवला. पुढे लेकाला घ्यायची वेळ झाल्याने मी आणि दोघीच उरलो.
म्हटलं चल आता तुझी खरेदी करु. मी सुचवेन त्यातलं बरंचसं ती नाहीच म्हणत होती. मग एकदा बोललीही," मला तुला प्रत्येकवेळी नाही म्हणताना वाईट वाटतंय, पण मला खरंच ते आवडत नाहीयेत." म्हटलं, असू दे चल अजून बघून पुढे.". मग एखादा कपडा कसा दिसतोय यावर हसत, 'हे काये?' वगैरे कमेंट करत आम्ही पुढे चालत राहिलो. मोजून दोन कपडे घेतले. दुसऱ्या दुकानात फिर फिर फिरुन तिने एक शर्ट उचलला. विकत घ्यायला जावं म्हटलं तर तिथे भली मोठी रांग होती. ती म्हणे,"आई मला या टॉपसाठी इतका वेळ उभं राहायची गरज नाहीये." असं म्हणून तो तिथेच ठेवून पुढे निघालो. तिला आता दोन तास फिरुन भूक लागली होती. तिचे आवडते 'प्रेत्झल (pretzels) घ्यायची माझी इच्छा नव्हती. म्हटलं,"तुला खरंच सांगते तो नुसता मैद्याचा गोळा असतो. त्यापेक्षा काहीतरी चांगलं खाऊ." ती नाईलाजाने हो म्हणाली. मग आम्ही माझा आवडता 'समोसा चाट' घेतला. तिने आधी समोसा खाल्लेला पण समोसा चाट खाल्लेलं नव्हतं. सोबत मँगो लस्सीही.
दोघी मग एका ठिकाणी निवांत बसून एकाच प्लेटमधून समोसा चाट खाऊ लागलो. भुकेला काय? पण 'खूप भारी लागतंय' म्हणाली. ती ते मन लावून खात असताना मी तिला सांगायला लागले. म्हटलं,"प्रत्येकवेळी खूप किंमत असलेली वस्तूच चांगली असते असं नाही. उलट तू आज्जीला सांग एखादी साडी छान आहे म्हणून ती तुला सांगेल तिने कशी कमी दरात चांगली साडी घेतली ते. आपल्याला आवडली वस्तू तर त्याची किंमत बघायची नाही. उलट कमी असेल तर 'इट्स गुड डील' म्हणून आनंद मानायचा. प्रत्येकवेळी ब्रँड बघायला तू अजून लहान आहेस. blah blah ..... " मी बोलत राहिले ती खात ऐकत राहिली. परत येताना म्हणालीही,"खूप मजा आली आज आपणच खरेदीला जायला."
बरं गोष्ट इथेच संपत नाही..... :) लेकाची बाजू आहेच ना? हिला जितका खरेदीमध्ये उत्साह आणि संयम तितका हा उतावीळ आणि कंटाळलेला. दोन दिवसांनी सान्वी क्लासला गेलेली असताना त्याला घेऊन खरेदीला गेलो. तर याचं गाडीतच सुरु झालं,"मला कशाला घेऊन जाताय, मी शाळेत असताना का जात नाही? तुम्ही खूप वेळ लावता. बाबांचे कपडे घ्यायला माझं काय काम?...." तोंड वाकडं करुनच मॉलमध्ये आला. थोडा वेळ झाल्यावर निवळला तेव्हा मी बोलायला सुरुवात केली.
म्हटलं, "चल बाबा कपडे ट्राय करताहेत त्यांना अजून काही चांगलं दिसतं का बघू. " त्याला विचारुन दोन टी शर्ट उचलले. त्यानेही कुठला रंग चांगला वगैरे सांगितलं, बाबाला एक शर्ट 'टाईट आहे, पुढचा साईज घे' म्हणून सांगितलं.
बाबा ट्रायल रुममधे असताना मी लेकाला म्हटलं, "बाबू तुला सांगू का काय होतं? तू आता कंटाळा करशील हे कपडे घ्यायला. पण उद्या तू मोठा झाल्यावर तुझ्या गर्लफ्रेंड सोबत गेलास शॉपिंगला तर काय करशील?".
हे ऐकल्यावर त्याने कान टवकारले. "
म्हटलं," तुला कपड्यातलं काही माहीतच नसेल. तू बाहेर आपला फोन घेऊन बसशील. आणि ती म्हणेल हा किती बोअरिंग माणूस आहे."
यावर हसला आणि पुढची खरेदी एकदम सुरळीत झाली. :) अगदी दीदीसाठी लिपग्लॉस घ्यायचा का यावर चर्चाही झाली आमची. निघताना स्टारबक्स दिसलं आणि त्याने माझ्याकडे पाहिलं. त्याचा आवडता केकपॉप तिथे होता ना? नवराही खुश होऊन एक केकपॉप त्याच्यासाठी घेऊन आला.
म्हटलं,"हे बघ याला म्हणतात win-win. तुला खाऊ मिळाला आणि आम्हांला चांगले कपडे. " म्हणे,"हो ५०-५० ना?". म्हटलं,"५०-५० मधेही, you lose 50%. Win-Win मध्ये दोघांचाही फायदा असतो, नुकसान नसतं." अशा गप्पा करत घरी परतलो.
यावर विचार करताना वाटलं, दोन्ही पोरं आपलीच. पण ते आपल्यासोबत एकटेच असताना जे बोलणं होतं ते किती वेगळं आणि खास असतं. ती जवळीक वेगळीच. आणि याहीपेक्षा, रोज अभ्यास, शाळा, क्लासेस आणि चांगलं वागायचं वळण लावणं या सगळ्या नियमांच्या गराड्यात आपण त्यांचे लाड करायचं विसरुनच जातो. ते हे असे एकटे सोबत असतांना जास्त जाणवतं. नाही का?
अरे हो, सांगायचंच राहिलं, परत येताना स्वनिक म्हणे,"आई खरंच असे लोक असतात? जे आपल्या बायको-गर्लफ्रेंड सोबत खरेदीला जात नाहीत?". म्हटलं, किती भोळं ते पोरगं माझं. आता त्याला काय सांगणार? :)
विद्या भुतकर.