Sunday, November 10, 2019

आमच्या काकू

        एका खांद्यावरुन दुसऱ्या बाजूला कमरेवर लटकणारी छोटी पर्स घेऊन, साडीचा पदर खोचूनच किंवा पिनेने नीट लावून, पायांत काळ्या थोडीशी उंची असलेल्या चपला घालून, डोळ्यांवर गोल आकाराच्या भिंगाचा आणि सोनेरी काड्यांचा चष्मा लावून काकू नेहमी कुठे ना कुठेतरी जाण्याच्या घाईत असतात. वेळ, काळ यांचा त्यांच्या गतीशी काहीही संबंध नसतो. त्यांचा जोश तितकाच. संध्याकाळी बिल्डिंगच्या खाली पार्किंगमध्ये टाकलेल्या बेंचवर शक्यतो बाकी काकूंसोबत बसलेल्या दिसतील. आता 'काकू' सारखा बहुप्रचारी शब्द सापडणार नाही. का तर लग्नं झालं की पुतण्यांकडून आपोआप मिळणाऱ्या 'काकू' पदापासून माझ्यासारख्या दोन मुलांची आई असलेल्या काकू पर्यंत आणि तिथून पुढे 'आजी'च्या आधीच्या वयाच्या सर्व बायका म्हणजे काकू ! आता एखादी, दुचाकी चालवत रिक्षाला आडवी जाणारी 'ओ काकू !' वेगळी. पण आमच्या या 'काकू' म्हणजे दोन मोठ्या मुलांची आजी असूनही पोरांच्या वयाचा उत्साह असणाऱ्या काकू. काय नाव देऊया त्यांना? नको राहू दे.

         तर काकू देशस्थ. रंग सावळा, उंची ५.३ असावी. केस करडे- सफेद. कपाळावर ७ सेंटीमीटर व्यासाची गोल टिकली आणि एक बारीकशी रेघ. हातात २-४ काचेच्या बांगड्या. डोळ्यावरचा चष्मा वर सरकवण्यासाठी नाकाचा शेंडा अधूनमधून आपोआप वर जातो. काकूंना खळखळून हसताना पाहिल्याचं मला आठवत नाहीये. आवाज भारदस्त पण थोडा किनरा. त्यामुळे त्या प्रेमाने बोलत असल्या तरीही चिडल्यात की काय असं वाटावं. बिल्डिंगच्या आवारात त्यांचा वावर नेहमी जाणवत राहतो त्या समोर असल्या किंवा नसल्या तरीही. प्रत्येकवेळी भारतात गेल्यावर, दिसल्या दिसल्या की , 'काय गं? कधी आलीस?' आणि पुढे 'आमचा मुलगा काय म्हणतो?" हे ठरलेलं. काकूंसाठी बिल्डिंगमधल्या सर्व माझ्यासारख्या मुली (बरं बायका म्हणू) म्हणजे त्यांच्या सुना आणि त्यांचे नवरे हे काकूंची मुलं. मागच्यावेळी घरात दुपारी मी सोफ्यावर पडलेली असताना काकू घरी आल्या आणि 'माझा लेक किती काम करतो बघा !' हे ऐकून घ्यायला लागलं. खरं सांगू का? काकूंच्या या बोलण्याचा राग येत नाही. प्रत्येक माणसाचा एक स्वभाव असतो, तो ओळखला की मग त्याच्या वागण्याचं वाईट वाटत नाही. तसंच काहीसं काकूंबद्दल झालं.

         बिल्डिंगमध्ये राहायला आल्यावरच अशा कुणी काकू आहेत हे कानावर पडलं होतं. त्यांच्या गोष्टीही ऐकलेल्या. म्हणे सकाळच्या वेळी रोज एक माणूस एक लिफ्ट अडवून ठेवायचा. लिफ्टच्या दारात सामान ठेवून हा प्रत्येक फ्लोअरवर फिरणार. एकतर सकाळी पोरांची शाळांची घाई, दूध वगैरे आणायची लोकांची घाई. मग एक दिवस काकू थांबून राहिल्या कोण हा माणूस आहेबघायला आणि मग त्याला रागावल्याही. कधी पोरं दुपारी जास्त आरडाओरडा करायला लागली की काकू रागावणार हे नक्की. एक दोनदा पोरांना म्हटलंही बाकी 'जाऊ दे निदान २-४ या वेळात तरी गाड्या खेळू नका. म्हणजे मला थोडं तरी बोलता येईल.'. प्रत्येक गोष्टीत 'काकू काय म्हणतील?' याच्यावर बोलणं व्हायचंच. हळूहळू या सगळ्या गोष्टींच्या पलीकडे जाऊन काकूंना आणि काकूंचं कामही पाहायची संधी मिळाली आणि त्यांचं कौतुक वाटू लागलं.

        बिल्डिंगच्या प्रत्येक सणात त्यांचा उत्साह आणि सहभाग ठरलेला. गणपतीच्या साधारण ३-४ आठवडे  आधीच 'कार्यक्रमांत सहभागी होणाऱ्या मुलांची नावं द्या' असा मेसेज व्हाट्सअपवर आला की आपापल्या मुलाचं नाव मुकाट्याने लगेच सांगून टाकावं. 'नंतर नावं घेतली जाणार नाहीत' अशीही सूचना त्यात असतेच. अगदी मीही इथून पोरांची नावं आधीच देऊन टाकायचे. एकदा काकू अशाच बिल्डिंगखाली भेटलेल्या. म्हणाल्या,'अरे इतक्यांदा सांगूनही लोक का देत नाहीत आधी नाव? रात्री १०च्या आत सर्व कार्यक्रम संपवावा लागतो. मग एखाद्याला मिळालं नाही परफॉर्म करायला तर वाईट नाही का वाटणार त्या पोराला?'. त्यांचं म्हणणं बरोबर होतं. पोरांचं जाऊ दे, एकदा आमचंच ठरलं की सगळ्या जणींनी डान्स करायचा. मी तर म्हटलं, 'लंडन ठुमकदा' वरच करु. तिथंच नाचायलाही सुरुवात केली होती मी. मग कळलं की त्यातले शब्द, अर्थ वगैरे बघून ते कॅन्सल केलंय. असंही होऊ शकतं हे मला माहीतच नव्हतं. खरंतर, बाहेर, 'टिव्हीवर इतक्या गोष्टीं मुलं बघत असतात तर या गाण्यांनी काय होतंय असं मला वाटलं होतं'. तसा काकूंशी वादही घालण्याचा प्रयत्न केला होता मी. पण इतक्या वर्षात ती बिल्डिंगची पॉलिसी बदललेली नाहीये आणि आता मला त्याचं कौतुकही वाटतं. आजही लंडन ठुमकदा ऐकलं की गाण्यापेक्षा काकूंची आठवण जास्त येते.

          दवाखान्यात सिनियर सिटीझन रुग्णांची सेवा करायला जाणे, जवळच्या आश्रमासाठी मदत करणे किंवा कुणाला करायची असेल तर ती सुचवणे, मुलांसाठी संध्याकाळी खालीच पार्किंगमध्ये संस्कारवर्ग घेणे हे सर्व काकू नियमित करतात. मुलांसाठी पुस्तकपेटीही सुरु केली होती काकूंनी. पण प्रत्येकवेळी पुस्तकं देणं-घेणं त्यांचा हिशोब ठेवणं अवघड होऊ लागलं म्हणून त्यांनी ती बंद केली. मुलींसाठी स्वरक्षणासाठी काही क्लासेसही घेत होत्या. म्हणजे त्या स्वतः नाही पण त्यासाठी लागणारी सर्व अरेंजमेंट करणे त्यांच्याकडेच. गणपतीतलं लेझीम आणि मुलांचं नाटक बसवणं हेही त्यांच्याकडेच. ८-९वी च्या मुलांना एकत्र आणून एखादं काम करवून घेणं ही सोपी गोष्ट नाही.यावर्षी वृक्षारोपणही केलं मुलांसोबत. नंतर स्वनिक घरी येऊन सांगत होता 'झाड कसं लावतात याची प्रोसेस'. दिवाळीसाठी मुलांचं पणत्या रंगवण्याचं वर्कशॉप घेणं, गोपाळकाल्यासाठी मेसेज करणं, प्रत्येक कामाला स्वतः हजर राहणं, होळीच्या वेळी सर्व पोळ्या होळीत न घालता त्यांचं वाटप करणं, अशी अनेक कामं काकू सतत करत राहतात. त्यांना 'कंटाळा येत नाही का?' असं विचारायची माझी हिंमत नाही. ते तसं त्यांच्याकडे पाहून वाटतही नाही. बरं नुसतं मुलांसाठी नाही तर त्यांच्या सिनियर ग्रुपसोबतही बऱ्याच कार्यक्रम करत राहतात.

       होतं काय, जेव्हा एखादी व्यक्ती इतक्या ठामपणे एखाद्या मोठ्या सोसायटीत, ५०० च्यावर लोकांच्या घोळक्यात एखादं काम आग्रहाने करते तेंव्हा त्याला बोलणारे, त्या नावडणारेही असतातच. काकू मात्र हे सर्व माहित असूनही, शक्य होईल तितक्या लोकांचा विचार करुन काम करत राहतात. ते करण्यासाठीही एक खमक लागते अंगात, ती त्यांच्याकडे आहे. आणि त्याचंच मला जास्त कौतुक वाटतं. मी त्यांना एकदा विचारलं, "काकू तुम्ही कुठे होतात इथे यायच्या आधी?". बहुतेक त्यांनी ठाणे किंवा वाशी वगैरे काहीतरी सांगितलं. नक्की आठवत नाही. म्हणजे त्यांचं ५०-५५ वर्षाच्या आधीचं आयुष्य पुण्याच्या बाहेरच गेलं. इथे त्या मुलगा, सून, नातींसोबत राहतात. नातीच्या अभ्यासाचं, क्लासेसचं वगैरे आवर्जून बघतात. मी काकांना कधी पाहिलं नाही. किंवा कुणी सांगितलं असेल तरी ते कसे दिसतात हे आता आठवत नाही. काकूंच्या समोर मला कदाचित बाकी कुणी दिसलंच नसेल.

            दोन वर्षांपूर्वी मी इथेच असतांना फोनवरुनच मला बातमी कळली की 'काका गेले'. नेमका तेंव्हाच सून आणि नाती उन्हाळ्याच्या सुट्टीला परदेशी आलेल्या. काकूंनी तिकडे बिल्डिंगमध्ये ओळखीच्या दोन-तीन जण आणि मुलासोबत जाऊन सर्व कार्य उरकलं, कशाचाही जास्त बाऊ न करता. 'आपण रोज काही परदेशात असे जात नाही आणि ती इकडे येऊन काय होणार होतं?' असं म्हणून सुनेला सुट्टी सोडून यायचा हट्टही केला नाही. मला या गोष्टीचं नेहमी आश्चर्य वाटत राहिलं. पण हिंमत होत नव्हती विचारायची. मग मागच्या वेळी म्हटलंच काकूंना, की 'काकू असं कसं तुम्ही सर्व मॅनेज केलं?'. त्या म्हणे, "जे व्हायचं ते झालं होतं. मग इतका खर्च करुन ती बहिणीकडे गेलेली, कशाला परत बोलवायचं? आणि बाकी लोक असतील बोलणारे, अगदी मी रडले की नाही रडले हेही म्हणणारे. मला नाही जमत ते लोक आले सांत्वनाला की उगाच रडायचं. आमचा ३८ वर्षांचा संसार. ते गेल्यावर मला वाईट वाटणारच ना? ते मी बाकी लोकांना कशाला दाखवू? माझं मन मी बाकी गोष्टीत रमवते." त्यावर पुढे बोलायचं काही राहिलं नव्हतं. अशा महत्वाच्या, भावनिक वेळी संयम दाखवून योग्य तो निर्णय घेण्याची त्यांची क्षमता आणि तितकाच नंतर माझ्याशी झालेला भावनिक संवाद. त्यांच्याशी झालेल्या त्या पाच मिनिटांच्या बोलण्यानंतर काकूंबद्दल वाटलेला आदर अजूनच वाढला होता.

         १५ ऑगस्टला बिल्डिंगमध्ये प्रमुख पाहुणे म्हणून तिथल्याच एखाद्या काका-काकूंना बोलावलं जातं. दोनेक वर्षांपूर्वी काकू प्रमुख पाहुणे होत्या. त्यांच्याबद्दल जी माहिती सांगितली होती तोच कागद मी जपून इकडे घेऊन आले होते. तो कुठंतरी हरवला. मग लिहायचं राहिलंच. अनेकदा त्यांचा विचार आला की चिडचिड व्हायची लिहिता येत नाही म्हणून. मग म्हटलं, असंही त्यांचा जन्म कुठला, शिक्षण आणि बाकी सर्व माहितीपेक्षा त्यांचं व्यक्तिमत्वच त्यांच्याबद्दल बोलण्यासाठी पुरेसं आहे, नाही का? तर अशा आमच्या काकू. रागावून का होईना काम करवून घेणाऱ्या, पोरांवर गोंधळ करतात म्हणून रागावल्या तरी तितक्याच प्रेमाने त्यांच्यासाठी काम करणाऱ्या.  काकू जेव्हा त्यांचे फोटो काढल्यावर 'माझे फोटो कधी पाठवशील?' असं म्हणतात तेव्हा त्यांच्यातही एक लहान मूल दिसतं आणि मला हसू येतं. मी तिथे नसले तरीही बिल्डिंगच्या व्हाटसऍप ग्रुपवर काकूंचं वास्तव्य जाणवत राहतं. त्यांच्या सूचना, सुचनापत्रकं, नवीन उपक्रम, त्यांचे, त्यांच्या कामाचे फोटो हे नियमित येत राहतं. आजही तिथे गेले की समोर गेटमधून ती पर्स लटकवून चालत येणाऱ्या काकू दिसल्या की आपण पुण्यात आलोय, आपल्या बिल्डिंगमध्ये आलोय हे जाणवतं. त्या आमच्या तिथल्या घराची एक ओळख आहेत. 


विद्या भुतकर.
https://www.facebook.com/VidyaBhutkar1/

No comments: