आज पहाटे जाग आली आणि परत झोप लागेना. असे दिवस माझ्या आयुष्यात विरळच. :) बरेच दिवस झाले लिहायचं होतं पण जमलं नाही. म्हटलं आता लिहीत बसावं. सकाळच्या शांततेत लिहीत बसण्यात एक वेगळाच आनंद आहे.
तर भारतात आता शाळा सुरु झाल्या आणि आमच्या संपल्या. सर्वांकडून त्यांचे ऑनलाईन शाळेचे अनुभव ऐकत होते. म्हटलं आपलेही लिहावे. मी एक त्रासदायक आई आहे असं मला वाटतं. पोरांची शाळेत असताना थोडीफार सुटका व्हायची तीही आता नाही. :) काही महिन्यांपूर्वी मी एक पोस्ट लिहिली होती की लॉकडाऊन मध्ये सुरुवातीलाच मी एक वेळापत्रक तयार केलं होतं पोरांसाठी. अगदी शाळेत असतं ना तसंच. पण ते फार काळ टिकलं नाही. आमच्या इथे ऑनलाईन शाळा अशी नव्हतीच. फक्त आठवड्यातून वर्गांची दोन किंवा तीनदा मीटिंग. बाकी सर्व असाईनमेंट होत्या. दोन पोरांच्या बाबतीत निरनिराळे अनुभव आले. सान्वीची पाचवी होती आणि स्वनिक दुसरीला.
सान्वीला बऱ्यापैकी अभ्यास दिलेला होता पण ती मोठी असल्याने तिला सांगून तिने ऐकलंय असं होत नव्हतं. मग मी ठरवलं की मागे लागायचं नाही. पहिल्या आठवड्यात तिने टाळाटाळ केली. मग शेवटचे तीन दिवस संध्याकाळी उशिरा अभ्यास करत बसली. त्यामुळे तिला आपण खूप काम करतोय असं वाटत होतं. ( हे मोठ्यांच्या बाबतीतही होतं , घरुन काम करत असल्याने दुपारी जरा रखडलं की रात्री उगाच जागरण होतं आणि दिवसभर आपण ऑफिसचं कामच करतोय असं वाटू लागतं. )
मग दुसऱ्या आठवड्यात मी तिला सांगितलं की दुपारी ४ नंतर शाळा नसते त्यामुळे जो काही अभ्यास आहे तो ४ च्या आधी करायचा. ४ नंतर लॅपटॉप मिळणार नाही. आता मी इतकंच सांगून सोडून दिलं. आई मागे लागत नाहीये म्हटल्यावर तीही निवांत. असे चार दिवस गेले आणि तिला एकदम जाणवलं की खूप काम बाकी आहे. तिने मागूनही मग चार नंतर लॅपटॉप दिला नाही. शेवटचे दोन दिवस फार घाई झाली तिची.
तिसऱ्या आठवड्यात तिला कळलं की सुरुवातीपासूनच कामाला लागलं पाहिजे. म्हणून तिने स्वतःच यादी करुन वेळेत होमवर्क करायला सुरुवात केली. पण अर्थात त्यातही थोडं बाकी राहिलंच. आणि आता दुपारी चार नंतर लॅपटॉप मिळणार नाही असं सांगितलं होतं. त्यामुळे शुक्रवारी २-३ असाइनमेंट बाकी असतानाही तिने सोडून दिलं. म्हटलं, "असं चालणार नाही. जे काही बाकी आहे ते शुक्रवारी उशिरापर्यंत बसून करावं लागेल. शुक्रवारी movie night होणार नाही."
एकूण चौथ्या आठवड्यापासून सर्व रांगेला लागलं. सोमवार आला की ती स्वतःच कामाची यादी करू लागली आणि शुक्रवारी दुपारच्या आत काम कसं संपेल याचं स्वतःच प्लांनिंग करु लागली. मोठ्या मुलांना त्यांच्या कामाची जबाबदारी आली की ऑनलाईन शाळा जरा सोपी जाते.
स्वनिकच्या बाबतीत मात्र हे पाळणं अवघड होतं. एरवी शाळेत स्वतःहून सहभाग घेणारा मुलगा पण इथे त्याला काही मोवीवेशन नाहीये असं वाटत होतं. असाइनमेंट पूर्ण झाल्यावर टीचर कडून एखादी ओळ कमेंट यायची तितकीच. त्यामुळे बरेचदा मीच त्याच्या मागे लागून ऍक्टिव्हिटी पूर्ण करुन घेतल्या. त्यात निदान २० मिनिटं वाचन २० मिनिटं गणित आणि २० मिनिट लिखाण इतकं होतं. बाकी टाईमपास असाइनमेंट होत्या ज्या करायला मी मध्ये मध्ये मदत केली. फक्त एक नियम पाळला की त्यालाही ४ नंतर लॅपटॉप नाही. कधी कधी मी उगाच सर्व अभ्यास पूर्ण झाला पाहिजे असा हट्टही सोडून दिला. दुसरी तर आहे. एखादी असाइनमेंट राहिली तर जाऊ दे. नाही का? (त्यावरुन शाळेतून मेल आली ही गोष्ट निराळी, पण चालतंय की कधीतरी. ) तर हे असं अभ्यासाचं.
दुसरी गोष्ट म्हणजे मुलांचा स्क्रीन टाईम वाढलाय यावर बाकी लोकांशी चर्चा होत होती. मला स्क्रीन टाईम पेक्षा त्यांचं posture कसं आहे याची जास्त काळजी वाटते. शाळेत टेबलची उंची कमी असते. मुलांसाठी योग्य असते. आणि ते बसतानाही ताठ बसलं जातं . घरात प्रत्येकवेळी ते टेबलपाशी बसतातच असं नाही. मुलं लॅपटॉप घेऊन गादीवर बसली की मी अनेकदा त्यांना पाठीच्या मागे उशी लावून दिलीय किंवा मांडीवर उशी दिलीय लॅपटॉप ठेवायला. म्हणजे मान जास्त वाकली जात नाही. स्वनिक डाईनिंग टेबल बसत असेल तर त्याची उंची कमी पडते. त्यामुळे खांदे उंच करुन टाईप करावं लागतं. तर त्याला बसायला सीटखाली अजून एक उशी दिलीय. सोफ्यावर वाकून बसले की 'सरळ बस' म्हणून आठवण करुन देते. लॅपटॉप नसेल आणि फोनवर असाइनमेंट बघत असाल तर फोनकडे फार वेळ वाकून बघायला लागत नाहीये ना याकडे लक्ष द्यायला लागत. अनेकदा टेबलची उंची जास्त असते. तेंव्हा पाव बराच वेळ लटकत राहतात. तेव्हा त्यांच्या पायाखाली स्टूल किंवा काहीतरी देणं आवश्यक आहे. मला वाटतं या गोष्टींकडे सतत लक्ष देणंराहणं गरजेचं आहे.
दिवसा शाळेच्या वेळात टीव्ही नाही हे सांगितलं होतं. त्यामुळे टीव्हीवरून वाद जरा कमी झाले. या सगळ्यांपेक्षा महत्वाचं म्हणजे दुपारी जेवण झाल्यावर आणि संध्याकाळी जरावेळ हालचाल करायला सांगत होते. बरेचदा ते दारातच सायकल चालवत बसायचे. काही ना काही व्यायाम झालाच पाहिजे ना. :) असो. पुढचे काही महिने हे असंच राहणार आहे. त्यामुळे शक्यतो एक रुटीन राहिलेलं चांगलं. कधी कधी फार वैताग येतो, थकायला होतं, पण सध्या काही पर्याय नाही. आमच्याकडे सुट्टी असल्याने निवांत आहे. बाकी भारतात सर्व आई-बाबांना ऑल द बेस्ट. :)
विद्या भुतकर.
1 comment:
खूप चांगली माहिती
Jio Marathi News
Sd Movies Point मुळे चित्रपट इंडस्ट्रीला लाखो-करोडो चे नुकसान
मिर्जापूर सीजन टू रिलीज होण्यासाठी फक्त एक दिवस बाकी.
महाराष्ट्र भूषण पुरस्कार पुन्हा एकदा सुरू होणार मुख्यमंत्र्याचा महत्वाचा निर्णय
Post a Comment