Wednesday, October 24, 2007

मन वढाय वढाय...

ब्लॉग आणि तोही भर दुपारी ऑफिसमधे :-) बऱ्याच दिवसांनी अशी संधी मिळालीय. :-)) अर्थात त्याआधी मेल लिहिणे, चेक करणे, हा पेपर ,तो पेपर सगळं उघडून झालं.म्हटलं चला जरासं लिहूनही बघावं. खरंतर मी विचार करत होते की आता लिहीन....तर ते घरी गेल्यावरंच....पण त्याआधीच संधी मिळाली. तर त्याचं असं झालं.....एकाच कंटाळवाण्य़ा प्रोजेक्टवर काम करून मी बरीच कंटाळले. मधे मेघनाने एका पोस्ट मध्ये लिहिलं होतं तसं पळून जाण्यात काय मजा आहे, स्वत:ला प्रूव करूनच जायचं असा अट्टाहासही केला. आणि खरंच एकेका दिव्यातून पार पडत एक प्रोजेक्ट पूर्ण केलाही. त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत, वेळ आल्यास कुठलीही गोष्ट स्वत: अभ्यास करूनही पूर्ण करण्याचा आत्मविश्वास तर मिळालाच पण न कंटाळता काहीतरी क्रिएटिव्ह केल्याचा आनंदही.
त्यात १०० वेळा 'Are you there?' असं विचारल्यावर एकदाच उत्तर देणारा , बग आहे हे माहीत असूनही तॊ शेवटपर्यंत न कळवणारा, आणि शेवटी त्याला सांगण्य़ापेक्षा स्वत:च मेलेलं बरं असा वाटणारा भारतातील एक टीममेंबर. कितीही वेळा प्रोजेक्टचं स्टेट्स सांगितल्यानंतरही मग याचं काय आणि त्याचं काय असं विचारून पिडणारां मॅनेजर, आणि सगळ्य़ा कटकटीतून बाहेर पडलेतर मग Time Sheet Defaulter म्हणून आलेला एखादा फालतू मेल...अशा सगळ्या दिव्यातुन पार पडत शेवटी काल डेमो पण पूर्ण झाला आणि आता जरा कुठे हुश्श होतंय असं वाटलं.
हे सगळं होतं असतानाच एक गोष्ट जाणवली होती. एव्हढी मरमर करूनही मिळावी तितकी शाबासकी नाहीच...आणि ती कधी मिळणारही नाही हे कळलं तेव्हाच यातून बाहेर पडायचा निर्णय घेतला. तसं बरंच अवघड वाटत होतं, दोन वर्ष अगदी घर ,रोजचा येण्याजाण्याचा रस्ता काय, काहीच बदलावं लागलं नाही. अशा स्थिरतेकडून अस्थिरतेकडे जायला मन धजावत नव्हतं. पण प्रत्येक वेळी एक असा क्षण येतो ना तेव्हा वाटतं की बस्स...खूप झालं आता. सुदैवाने म्हणा तसा क्षण लवकरच आला आणि मग पावलं हळूहळू त्या मार्गाने वळू लागली. आता हो-नाही करत माझी रीलीज पक्की झाली, लवकरच माझ्या जागी येणाऱ्या माणसाची पण आयात झाली. मग काय, त्याला फक्त काय काय केलंय ते सांगायचं आणि सुटायचं. त्यातही १०-१२ documents वाचायला दिले की आपली अजून थोडी सुटका. गेले दीडेक आठवडा तेच करत आहे. :-) एक-दोन तास बडबड करायची, काही documents लिहून ठेवायची,इ.इ.
खरं सांगायचं तर त्यातही मी जाणार म्हटल्यावर असं वाटलं की मी अचानक विरुद्ध गटात आलीय आणि माझ्यासोबत मॅनेजरबद्द्ल गॉसिपिंग करणारी मुलगी, मी काही issues अर्धवट तर टाकत नाही ना हे बघण्यासाठी एकदम दुसऱ्या गटात गेली. लोक कसे फिरतात ना? असो. इतके दिवस प्रोजेक्टवर काम केल्यावर सगळं दुसऱ्याच्या हातात देणंही अवघड जात होतं. वाटलं ही गोष्ट करताना आपल्याला किती कष्ट पडले होते, ती केली तेव्हा कसे प्रोब्लेम आले होते. :-) हे सगळं सोडून देणं जितकं सोप्पं वाटलं होतं तितकं नाहीये हे ही जाणवलं. असो, या सगळ्य़ांपेक्षा आता फक्त १५-२० दिवस राहिलेत घरी जाण्यासाठी हेच महत्वाचं वाटतंय आणि बाकी सगळं फालतू वाटत आहे. कुणाचं आपल्यावाचून अडणार आहे? आता घरी जाऊन हे करणार, ते करणार, अशी दिवास्वप्नं बघत आहे. :-) कधी कधी तर मी १५-२० दिवसांत घरी असेन या कल्पनेनंच काही काम सुचत नाही. असो... इतके दिवस सरले..हेही सरतील.... :-))

आता मात्र लिहीन ते.....घरी गेल्यावरच........

-विद्या.

Monday, October 08, 2007

दोन टोकं

तू आणि मी... किती वेगळे. म्हणजे दोन टोकं म्हणण्यासाठीही मध्ये काहीतरी हवं ना? मला नेहमी आश्चर्य वाटत राहिलं की काय म्हणून आपण जवळ आलो असू? काहीतरी असायलाच हवं ना? त्याशिवाय का आपण भेटत राहिलो दर थोड्या दिवसांनतर, ते ही परत तोंडही पहायचं नाही असं ठरवून. हां, नाही म्हणायला मला एक वाटायचं, आपण दोघेही जरा वेडे होतोच. सुरुवातीला एकमेकांसाठी आणि नंतर..... ते सुरुवातीचे स्वप्नातले दिवस सोडले तर बाकी काय होतं सांग ना? आपल्या आवडी-निवडी, स्वभाव सगळंच वेगवेगळं होतं. तरीही किती विचित्र असतं ना माणसाचं मन? दरवेळी त्या मंतरलेल्या दिवसांच्या मागे मागे धावून पुन्हा तुझ्याकडे यायचे आणि तूही माझ्याकडे. मग थोडे दिवस पुन्हा तो खेळ, एका हव्या असलेल्या, हरवलेल्या स्वप्नाला नवीन जोमाने एकमेकांत शोधायचं. साहजिकच तीच भांडणं, तोच अपेक्षाभंग आणि तेच अजूनच दुखावलेलं मन. पुन्हा एकदा वेगळं होणं, थोड्या दिवसांनी हरवलेल्या स्वप्नांचा शोध घेत परत येण्यासाठी. तुला नंतर कळलंच असेल म्हणा, मला तुझ्या आधीच कळला हा खेळ. तेव्हापासून तर तुझी चिडचिड अजूनच वाढली माझा तटस्थपणा बघून.तुला काय त्रास होत असेल चांगलंच कळत होतं मला, पण मी तरी काय करणार होते? तुला समजावणं अवघड होतं रे, हे असं धावणं किती व्यर्थ आहे. पण मागच्यावेळी भेटले तेव्हा, तुझ्या डोळ्यांत तो शोध थांबलेला दिसला आणि किती बरं वाटलं, माझ्यासाठी नव्हे, तुझा त्रास, छळ अखेर संपला म्हणून.
पण खरं सांगू? त्या रात्री झोप लागली नाही मला. शेवटी दोन टोकं जोडणारा धागा तुटला होता.
-विद्या.

Wednesday, October 03, 2007

जे जे उत्तम...

नंदनने टॅग केल्यावर जरा गडबडलेच होते. :-) हो, नुसत्या छान,सुंदर अशा प्रतिक्रिया देताना सोप्पं असतं पण जावे त्यांच्या वंशा..... असो. मी त्याच्या 'जे जे उत्तम' या उपक्रमाबद्दल बोलतेय.
त्याच्या म्हणण्यानुसार...."पुस्तक वाचताना, अनेकदा काही परिच्छेद आवडतात. संपूर्ण पुस्तकाचा विचार केला तर ते कदाचित तितके महत्त्वाचे नसतीलही; पण त्या त्या वेळेला ते आवडून जातात. असेच काही आवडलेले उतारे, कुठल्याही भाष्याशिवाय देण्याचा हा एक उपक्रम. अर्थात मागचा-पुढचा संदर्भ जरी नसला, तरी तो तितका उतारा वाचनीय वाटावा इतपत उद्धृत करण्याचा प्रयत्न करेन. आपल्या प्रतिक्रियांचे स्वागत आहे. "
तर मी बराच बिचार केला की कुठला उतारा द्यावा बरं इथे.पण मला काही केल्या आठवेनाच एखादं पुस्तक आणि आठवलं तरी ते आता जवळ नसल्याने त्यातला उतारा देणं अवघडच होतं. विचार केला त्याला सांगाबं की 'मी जेव्हा भारतात परत जाईन ना, तेव्हा लिहिते,चालेल का?' :-) पण तेही योग्य वाटेना. तेव्हाच मला गेल्या काही दिवसांपूर्वी एका पुस्तकाची अर्धवट का होईना PDF फ़ाईल वाचायला मिळाली होती ती आठवली. ज्यादिवशी ती मिळाली तेव्हाच वाचून पूर्ण केली होती आणि त्यातलाच एक उतारा जो मला कित्येक दिवस अस्वस्थ करत राहिला.
-----------------------------------------------------------------
".......आप्पांना मृत्यू मोठा छान आला. ....डॉक्टर मला म्हणाले,"त्यांना आलेला ऍटॅक इतका जबरदस्त आहे की आम्ही कितीही प्रयत्न केला तरी आता ते त्यातून वाचणार नाहीत. सकाळपासून इतका वेळ राहिले ते केवळ त्यांच्या विलपॉवरवर. सगळ्या मुलांना भेटायची त्यांची इच्छा होती.असावी. ती आता पूर्ण झाली आहे. मला नाही वाटत आता ते फार वेळा राहतीलसे". आणि तसंच झालं. दहा-पंधरा मिनिटांत आप्पानी प्राण सोडला.
बिच्याऱ्या आईचा आजार मात्र साडेतीन-चार महिने रेंगाळला. तिला स्ट्रोक आला आणि अर्धांग लुळं पडलं. हळूहळू स्मृती, वाचा, भान सगळे जात चालले; आणि नेमके तिला नको असलेले परावलंबित्व आले. पैसा, मनुष्यबळ, काही कमी नव्हते.पण अपंग होऊन तिला जगायचे नव्हते आणि तेच नशिबी आले. ती आजारी पडताच आम्ही मुंबईला आणले.तिथे सगळी मुले, नातवंडे, लेकी, सुना-सगळीसगळी होती. त्या तीन-चार महिन्यांत आळीपाळीने तिच्या जवळ बसत होती. कामे वाटून घेऊन करत होती. तिऱ़्हाईताला पाहताना वाटावे, आई किती भाग्यवान! कुणी कमी पडून देत नाहीत. पण प्रत्यक्षात मात्र हे सगळे कर्तव्यबुद्धीने, नाईलाजास्तव चालले आहे याची जाणीव मला अस्वस्थ करत होती, अद्याप करतेय. समजा, तिच्याऐवजी मी अशी आजारी असते, तर ती सारखी काहीतरी औषधोपचार, सेवासुश्रुषा, नवसायास करत राहिली असती. तिचा हा शेवटचा आणि खराखुरा एकमेव आजार. यापूर्वी, गेल्या इतक्या वर्षाच्या काळात ती कधी आजारी पडलीच नाही असे नाही. पण डॉक्टरपेक्षाही स्वत:चे औषधपाणी स्वत;च करत ती त्या अवस्थेतही घरकाम जमेल तसे करतच राही. ती अंथरूणात आराम करयेत आणि दुसरं कुणी तिची सेवासुश्रुषा करतंय असं दृष्य प्रयत्न करूनही माझ्या डोळ्यांपुढे येऊ शकत नाही. परावलंबित्व ही गोष्टच तिला न मानवणारी. आणि दुर्दैवाने नेमकी ही अवस्था मला पुरेपूर जाणवत होती, तरीही तिच्यासेवेला सगळे सोडून मी द्यावा तितका वेळ दिला नाही.
आई गेली. मुलेबाळे,नातवंडे,लेकीसुना, अगदी भरले घर होते, तरी तिच्या शेवटच्या क्षणाला ती एकटीच होती. ती तर गेली, चांगली म्हातारी होऊन गेली. मग आता त्याबद्दल लिहून मी दु:ख उकरून काढतेय,का? हे दु:खं नव्हे, हा वरचेवर होणारा मनाचा गोंधळ आहे. उलट्सुलट विचारांचा, भावनाम्चा गुंता आहे. तो सोडवता आला तर पहावा, त्यातून स्वत:ची सुटका करून घेण्याचा प्रत्न करावायासाठी हा सारा खटाटोप. या तिच्या आजाराच्या तीन-चार महिन्यांत, दोन-तीन दिवस, दोन-तीन दिवस असे सर्व मिळून फार तर पंधरा-वीस दिवस मी तिच्याजवळ असेन.उरलेल्या वेळात माझ्या सव्त:च्या व्यापातच गुंतले होते, घर संसार,प्रुफे, नव्या कविता वाचनाच्या कार्यक्रमाची तयारी, आमच्या ट्रस्टच्या एका मोट्या व्यवहाराची कामे आणि त्यानिमित्त आवश्यक ती धावपळ, घरातले इतर किरकोळ आजार, अडचणी, वगैरे-वगैरे. पण हे सर्व चालू असताना आपण आईसाठी काही करू शकत नाही ही खंतही सतत होतीच. पण फक्त खंत नव्हती. या काळात पूर्वनियोजित कामांसाठी एक-दोन छोटे प्रवास झाले. बोरकरांच्या कवितावाचनाचे मुंबई-पुण्याचे पहिले दोन आनंत्रिंसाठीचे वगैरे मोठे कार्यक्रम झाले. अशा वेळी, या कार्यक्रमात काही अडथळा तर येणार नाही? ऎनवेळी, अगदी नेमक्या त्याच दिवशी तिचा आजार ही आमची अडचणही होऊन बसली होती आणि नेमक्या याच घटनेच्या मनाला अधिक यातना होत. आपण किती स्वार्थी, कृतघ्न,ढोंगी आहोत असे वाटे. ..."
".....मी म्हणे लहानपणी लहानपणी फार अशक्त होते, वरचेवर काही ना काही होऊन आजारी पडे. सारखी किरकीर आणि रडणे चालू असे. माझ्या लहानपणी आईची स्वत:ची, चुलत दिराची, बरीच मुलेमाणसे घरात होती. स्वैपाकपाणी, आले-गेले, सर्वांचा अभ्यास करून घेणे, सणवार, एअव्हढ्या मोठ्या घर संसारात त्याकाळच्या गरजेनुसार पडणाऱ्या सर्व जबाबदाऱ्या उचलून, पुन्हा आमचे आजार, जाग्रणे, म्हणजे तिला किती कष्ट पडले असतील! माझ्यापुरते तरी कृतद्न्यतेच्या भावनेने मी तिच्यासाठी काही करायला नको का?आता इतक्या उशिरा दुसरे काय करणार? ...."
पुस्तक - आहे मनोहर तरी
लेखिका - सुनिता देशपांडे
-------------------------------------------------------
मी बऱ्यापैकी ब्लॉगवर पाहिलंय की कुणी यांना टॅग केलं नाहीये ना तरी चुकून चुकल्यास चु.भू.दे.घे.
केतन(बरेच दिवसांत तुझं लिखाण वाचायला मिळालं नाहीये..यानिमित्ताने....)
अमित(तुझा 'पुस्तकांची मांदियाळि' मला खूप आवडला म्हणून हा खो.)
कोहम(तुझाही वाढदिवसानंतर हा पहिला पोस्ट होईला ना?:-) या पोस्टमधे काय असेल याची उत्सुकता आहे.)
स्वाती(तुझ्या अनेक सुंदर कवितांसारखी याचीही वाट पहात आहे.)
बडबडी स्नेहल(तुझ्या आवेशपूर्ण लेखांसारखाच एखादा आवेशपूर्ण उताराही वाचायला मिळावा ही सदिच्छा.)

-विद्या.