Friday, April 04, 2008

हुरहूर

रविवारी संध्याकाळी रश्मीला बाय करून, जड मनाने दोघं गाडीत बसलो. कोलंबसमधे दोन दिवस कसे गेले कळलंच नाही. पहिले पाच मिनिटं जरा शांततेतच गेले. रश्मी नसल्याने अजूनच शांत वाटत होतं. May be I was already missing her.
मग मीच म्हटलं ,'येताना शिकागोहून निघाल्या दिवशी खूपच ट्र्यफिक होती, तेव्हढी दिसत नाहिये, होय ना? बरं झालं उशीराच निघालो तिच्याकडून, तेव्हढाच वेळ सोबत घालवता आला.'
तोही मग, ' हो ना. काल पण म्युझियमला गेलो ते बरं झालं. एकतर बंदिस्त असल्याने थंडीचा त्रास नाही आणि एका दिवसात होण्यासारखंही होतं.'
माझाही होकारच त्याच्या बोलण्याला. मध्येच मला आठवण येते, 'आता परवा जाऊन भाज्या आणायला लागतील सर्व.' इ.इ.
आणि मग पुढचे ५-६ तासही असेच गेले दोन दिवस आठवण्यात घालवलेले नाहीतर मग घरात काय मागे सोडून आलोय त्याची चर्चा.
तसं हे नेहमीचंच. आमची मग कपिल-सोनालीची एक दिवसाची भेट असो की ४-५ दिवसांची ट्रीप. मित्र-मैत्रिणींना भेटल्यावर सर्व विसरून रमून गेलेले आम्ही परतीच्या प्रवासात जणू गेल्या दिवसांचा आढावा घेत राहतो. आणि विसरलेल्या घराचीही ओढ लागायला लागते. पण त्या ओढीतही कसली तरी हुरहूर असते. कदाचित गेला तो दिवस किती चांगला होता आणि परत तेच रुटीन असा नकोसा वाटणारा विचार असेल किंवा आता त्याच लोकांना परत कधी भेटणार याची हुरहूर. की चला इतके दिवस धावपळ करून केलेली ही ट्रिप संपली, तीही सुरक्षितपणे आणि आता धावपळ नाही याचं समाधान? नक्की काय असतं माहीत नाही पण गाडीत बसल्यावर म्हणा किंवा परतीच्या प्रवासाला लागल्यावर म्हणा, ती पहिली पाच मिनिटं दोघंही शांत असतो एकेक विचार मनातल्या मनात करत आणि गेलेले क्षण डॊक्यात बंद करत. आमच्या घरी तर आई-दादा दोघंच, ते किती गोष्टींचा असा विचार करत असतील नाही? असो.
बरं हे ट्रिपचच असं नाही. दीडेक वर्षापूर्वी अर्णवचा पहिला वाढदिवस साजरा केला इथे. संध्याकाळी क्लब हाऊस मधून सर्व सामान आणायला आम्ही बरेच लोक मदतीला होतो योगिता आणि जी.टीं.च्या. एकेक करत सफाई करून क्लब हाऊसचा ताबा सोडला आणि घरी परतून सर्व जण योगिताकडे बसलो काही वेळ. पुन्हा तीच शांतता. :-) मी, आमचे अजून एक शेजारी, योगिता,जी.टी. सर्वच आपापल्या परीने काहीतरी विचार करत होते.
मग कोणीतरी बोललंच,' तरी बरेच लोक आले, नाही? ५०-६० तरी असतील.'
मग कुणी,' बरं झालं सर्वांनी मदत केली ते, नाहीतर सफाई करून वेळेत हाल परत देणं अवघड होतं'.
तर एकजण, 'सही झाला बरंका योगिता कार्यक्रम.'
आणि अशा या गोंधळात आणि नवीन भेट म्हणून आलेल्या खेळण्यांना सोडून जुन्या चेंडूशी खेळणारा अर्णव अजूनही आठवतो आणि त्याचा क्यूट ड्रेस पण.कसला भारी दिसत होता. :-) असो. तर हे असं नेहमीचंच, आढावा घेणं आणि मनातल्या मनात एक हुरहूरही, की संपला तो दिवस अखेर ज्यासाठी गेले कित्येक दिवस पळापळ चालली होती.
या सगळ्या तर अगदीच छोट्या छोट्या गोष्टी झाल्या. Imagine लग्न घरात कसं होतं ते. विशेषत: मुलीकडे. वर्र्हाड गेल्यावर एका कार्यालयच्या कुठल्यातरी एका खोलीत त्या पांढऱ्या गादय़ांवर पडलेल्या अक्षता, फुलांच्या पाकळ्या, आणि आहेराचं आलेलं सामान, त्यासर्वांच्या मधे सर्व मंडळी बसलेली असतात. त्यात जरा जास्त चांगली नटलेली पण रडण्याने डॊळे सुजलेली ती मुलीची आई कुणाशी तरी बोलत असते, 'बाळ ने काही खाल्लं की नाही?'
तर हा 'बाळ' त्या लग्नात अगदी सर्व कामे पार पाडणारा मुलीचा कष्टकरी भाऊ असतो. त्याला कुणीतरी ताट लावून देतं. मग जेवता-जेवताच तो लोकांना काय-काय कसं आवरायचं, कार्यालय कधी सोडायचं, फुलं वाल्याला किती पैसे द्यायचे हे सांगत असतो.आणि मधेच एखादी मामी/ काकू बोलते, 'तो सूट मधे आलेला माणूस कोणं होता ओ?, त्याची बायकॊ पण अगदी भारी साडी नेसून आली होती'.
कुणाला आहेर चांगला झाला की नाही यावर बोलायचं असतं तर कुणाला मुलाच्या खडूस, भांडखोर काकाबद्दल.
एखादा मामा मधेच बोलतो,'त्या मुलाचा काका जेवताना नाटकच करायला लागला होता. त्याला म्हणे जिलेबी हवी होती आणि कुणी पटकन आणली नाही. बरं झालं शेवटी शांतपणे निस्तरलं. माझं डॊकंच फिरलं होतं. कुणा-कुणाचं बघायचं इथे?'.
तर अशा शंभर गोष्टी. गप्पा मारत-मारत तास-दोन तास कधीच निघून जातात. आणि शे-पाचशे लोकांनी भरलेलं कार्यालय एकदम भकास झालेलं असतं. आता घरी जाऊन बरीच कामंही निस्तरायची असतात त्यांची आठवण यायला लागते. सगळ्या गोंधळात का होईना शेवटी लग्न छान झालं ना याचं, तर कधी, पोरगी चांगल्या घरात गेली हो! याचं समाधान मनात असतं.सगळं झाल्यावरही, पोरीचा घरी पोचल्यावर फोन येईल ना याची हुरहूर असतेच...
-विद्या.

Thursday, March 27, 2008

माझिया मना जरा सांग ना....

माझिया मना जरा सांग ना....मनात येईल ते लिहित जायचं, या ना त्याप्रकारे....अनेकदा अनेक पोस्टवर मी वाचलयं की 'काय लिहावं हे सुचत नाही' किंवा काही घडतच नाही तर काय लिहिणार. बरोबर ना? :-) अनेक अनुदिनींमधे कमीत कमी एक तरी पोस्ट असेल यावर. पण 'का' लिहितोय हा प्रश्न पहिल्यांदाच. तसं मी माझ्या ब्लोगला एक वर्ष पूर्ण झाल्यावर एक पोस्ट लिहिलं होतं त्यातले बरेचसे मुद्दे रिपीट होण्याची शक्यता आहे.तरीपण केतनच्या भाषेत 'खाज'. :-) मी शाळेत असताना किंवा नंतरही अनेकांनी कौतुक केलेलं, की छान पत्र लिहितेस हं. मग थोड्या कविताही आल्या/ अर्थात ते दिवसच कविता सुचण्याचे आणि लिहिण्याचे होते हे मला नंतर कळलं. असो. मी लिहायला सुरुवात केली तेव्हा एकच कारण होतं, अनेक वर्षात मराठीत काही लिहिलंच नव्हतं, अगदी माझं नावंही मराठीत लिहिलं नव्हतं(कधी कागदावर मराठीमधे नावं लिहून बघा, खूप वेगळं वाटतं). ब्लोग लिहिण्याच्या निमित्ताने त्याला सुरुवात झाली.
याआधी अनेकदा एखादा विचार मनात येऊन फारतर थोडावेळ टिकायचा आणि निघून जायचा. एकदा ब्लोग लिहायला लागल्यावर मात्र असं झालं की एखादा विचार मनात आला की तो कधी एकदा कागदावर उतरवेन असं व्हायला लागलं. असं मला शाळेत सुरुवातीला काही कविता लिहिताना झालं होतं. ती अस्वस्थता परत माझ्यात आली होती. रात्री झोपताना काहीतरी मनात येतं आणि वाटतं की हे लिहिलं पाहिजे. मग एकदा का असा विचार मनात आला की संपलं, झोपेचं खोबरं. अनेकदा मी रात्री २-३ वाजता झोपलेय. ते विचार जणू भडाभडा बाहेर पडल्याशिवाय शांतपणे झोपूनच देत नाहीत.कधी असंही झालंय की एखाद्या व्यक्तीबद्दल, घटनेबद्दल काय वाटतं हे दुसऱ्या कुणाला सांगण्यापेक्षा लिहिणं जास्त सोप्पं जातं. तिथं कुणी अडवणारं, प्रश्नं विचारणारं नसतं. त्यात कधी एखादी छोटी कथा होती, तर कधी कविता तर कधी नुसतेच भरकटणारे विचार.
हो, हे भरकटणारे विचार पण ना. कधी कधी इतका गोंधळ होतो डोक्यात सगळ्याच गोष्टींचा, योग्य-अयोग्य, मग त्या विचारांना एका ओळीत मांडण्यासाठी लिहित जाते. कधी कधी लिहितानाच कळून जातं की काय योग्य आहे आणि काय नाही. तर कधी अख्खा पोस्ट संपून जातो आणि मला काय करायचंय हे कळतच नाही.आता हेच पहा ना, मला मी 'का' लिहिते हे सांगायचंय पण सुसूत्रता येत नाहीये. मग काय करायचं? तर लिहित जायचं, मग घडी उलघडल्या सारखे एकेक विचार सुटत जातात.असेही अनेक पोस्ट लिहिलेत मी माझा कंटाळा व्यक्त केलाय तर कधी घरी जायचा आनंद. :-) केवळ 'व्यक्त' केल्यानाही बरं वाटतं. तर कधी, अगदी थोड्या दिवसांपूर्वी मी जेव्हा 'मी सध्या काय करतेय' किंवा 'मला काय करायचं आहे' यावर लिहिलं तेव्हा दोन-तीन उद्गारही आले, 'Just hang in there'. :-) कधी कधी ते मिळण्यासाठीही मी लिहिते.
अनेकदा आपण केवळ अशा एका मोठ्या विश्वाचे एक घटक आहोत याचाच आनंद मिळवण्यासाठी लिहिते. कितीतरी वेळा नवीन पोस्ट लिहिल्यावर marathiblogs.net वर यादीमध्ये आपलं नाव पहिलं आलं हे बघण्याचाही आनंद मी घेते. :) खरं तर आपण ब्लोगर्स थोड्याफार प्रमाणात सर्व सारखेच. कधी भरभरून लिहिणारे तर कधी आळशी.बरेच दिवसात काही लिहिलं नाही तर, 'काय कुठे गायब' असं कुणी विचारणारं असल्यावरही बरं वाटतं की नाही? एकमेकांना असे 'खो' देत आपण आपलं हे विश्व 'चालवत' राहतो. त्याचा एक घटक बनून राहण्यासाठी लिहिते. आणि कधी boring routine, आई-बाबा, शेजारी-पाजारी किंवा मित्र-मैत्रिणी सोडूनही आपलं थोडं फार का होईना एक 'secret life' आहे आणि जिथे सर्वांच्या नावं बदलून चुगल्याही करता येतात यासारखं मजेशीर कारण अजून काय असेल लिहायला? :-)
काही दिवसांपूर्वी माझ्या जुन्या मैत्रिणींना भेट्ल्यावर माझ्या असं लक्षात आलं की ते जुने दिवस मी कधीही विसरणार नाही म्हटलं तरी अनेक संदर्भ पुसट होत जातात. फक्त मुख्य घटना लक्षात राहतात किंवा त्या लक्षात आहेत असं वाटत तरी राहतं. काय माहीत आयुष्यात अशा किती गोष्टी ५०-६० वर्षाचे होईपर्यंत लक्षात राहतील. पण विचार करा हेच पोस्ट आपण म्हातारे असताना वाचले तर किती मजा येईल. :-) माझे स्वत:चेच नाही, बाकीच्यांचेही जुने पोस्ट. तेव्हा 'अगं तुला ते हे आठवतंय का?' असं विचारणारं जवळ कुणी नसेल तरी हा ब्लोग नक्की असेलच. :-) होय ना? (आयुष्यात एव्हढी आधीपासून planning मी कशाचीच केली नसेल, हाहाहा... ) असो, कदाचित थोड्या काळाने हा पोस्ट वाचूनही मी हसत बसले असेन की मी काहीही लिहिते...... :-))
मी निवांत विचार करून लिहावं म्हटलं असतं तर माहीत नाही जमलं असतं की नाही लिहायला, म्हणून जे आठवेल तसं पटापट लिहून काढलंय. अजून नंतर वाटलं भर टाकेनच. पण तोपर्यंत माझा खो जास्वंदीला.
-विद्या.

Thursday, March 13, 2008

यावेळी भारतात होते तेव्हा दोन महिन्यांत बराच प्रवास झाला. मी अगदी बस, ट्रेन, रिक्षा सोबत सहा सीटर, Tempo trax आणि share auto मधूनहई प्रवास केला. त्यात अनेक लक्षात राहण्याजोगे प्रसंगही घडले. कदाचित ते सगळे वाचताना बोअरींग वाटतीलही पण लिहिल्याशिवाय राहवत नाहिये. :-)
मी मुंबईत उतरले आणि समीरसोबत, त्याने बुक केलेल्या KK Travels च्या पुण्याच्या गाडीत आम्ही बसलो. आता गाडी AC असली, नसली किंवा ती दोन तास उशीरा निघाली याने काही फरक पडत नव्हता. I was very much excited just to be there. मी गप्पा मारण्यात आणि आजूबाजूला (अंधार असला तरी) पाहण्यात मग्न होते. पहिले २-३ तास झाले असतील आणि गाडी मुंबई-पुणे हायवे वर बंद पडली.कुणीतरी म्हणालं की हे लोक आजकाल ऱोकेलवर गाड्या चालवतात. :-) त्यामुळे इंजिनाची पार वाट लागते. रात्री ३-४ वाजता हायवेवर आम्ही अशा ठिकाणी होतो जिथे कुणीही mechanic मिळणं अवघड होतं आणि दर एक मिनिटांत मोठे-मोठे ट्रक तिथून जात होते.एरवी मला अशावेळी फार चिडचिड झाली असती किंवा भीतीही वाटली असती. पण त्या क्षणाला मी इतकी आनंदात आणि तेव्ह्ढीच समाधानात होते की मी घरी जाणार आहे की मला या गोष्टींनी काहीच फरक पडत नव्हता. अर्ध्या तासाने कळलं की KK चीच एक गाडी थोड्यावेळात येणार आहे त्यात बसून जाता येईल. काय कुणास ठाऊक ते वातावरण फारच छान वाटत होतं. एका दगडी कट्ट्यावर पहाटे ४ वाजता बसून मी आणि समीर गप्पा मारत होतो. कसलंही tension नाही की भिती नाही. थोड्या वेळात दुसरी KK ची गाडी आली आणि सर्वात पहिली गोष्ट मी केली ती गाडीत घुसून जागा पकडली. :-) कितीही वर्षे,कुठेही रहा, Ur basic habits never die. :-) चार तासात होणारा प्रवास आम्ही ८ तासांत केला. आणि हो, हे KK चे लोक अगदी घरापर्यंत सोडतात बरं का, पण जर तुमचं घर सर्वात शेवटी येणार असेल तर अख्ख्या पुण्याची सैर झाली म्हणून समजा. :-)) पुण्यात बहिणींना भेटून चार-पाच तास विश्रांती घेतली आणि पुढच्या प्रवासाची तयारी केली. Btw, मी आई-दादांना surprise देणार होते. :-) त्यामुळे केव्हा एकदा घरी पोचते असं झालं होतं.
स्वारगेटवर पुणे सातारा लाल-डब्बा मिळाला. समीरने कंडक्टरला सांगूनही ठेवलं की बाबा हीने बराच प्रवास केला आहे, त्यामुळे सातारा आलं की तिला नक्की उठवा.नाहीतर जाईल कोल्हापूरला. मी नुकतीच आल्याने जवळ मोबाईलपण नव्हता. अर्धवट झोपेत मी तो अडीच तासांचा प्रवास केला आणि मी साताऱ्यात उतरले. आता फक्त शेवटचा टप्पा. सातारा-कोरेगांव. :-) तो फक्त अर्ध्या तासाचा रस्ता आहे. संध्याकाळी साडेसातच्या दरम्यान मला कोरेगांव गाडी मिळाली. कोरेगांवला संध्याकाळी जाणाऱ्या गाड्य़ांतून प्रवास करणं जरा अवघडच. एक तर शहरात आपला माल विकायला, खरेदीकरायला आलेले गावतले लोक तेव्हा प्रवास करतात. त्यामुळे गर्दी असतेच, पण त्यात पिऊन तर्रर्र झालेलेही बरेच.:-)
तर मी माझी handbag घेऊन गाडीत चढले. आता ही handbag विमानात कितीही छोटी वाटत असली तरी बसमधे डोक्यावरच्या जागी, किंवा पायासमोर कुठेही बसत नाही. त्यामुळे मला ती दोन ओळींच्या मधे ठेवावी लागली. पहिला stop आला आणि एक ६५-७० वयाचा माणूस आत शिरला. त्याआधी ती ब्याग ओलांडून बरेच लोक गेले होते आणि मला कळतंही होतं की अडचण होतेय, पण पर्याय नव्हता. त्या म्हाताऱ्याने(हो, आजोबा म्हणायची इच्छा होत नाहीये) धडपडत bag ओलांडली आणि माझ्या तिरक्या पुढच्या सीटवर बसला. त्याला धड पाऊलही टाकता येत नव्हतं,( वयामुळे नाही प्यायल्यामुळे)आणि तो सुरु झाला. ’असे कसे ठेवतात रस्त्यात सामान. शिकलेले लोक नव्हं तुम्ही, कळत न्हाय काय?मी कोण हाय माहीत नाही तुम्हाला. कंडक्टर कुठाय? बोलवा त्याला, मग सांगतो मी....’ मी शांतपणे समजावयाचा प्रयत्न केला, पण तो सुरुच.मी गप्प बसले होते, पण शेवटी माझ्या मागच्या माणसाने बोलायला सुरुवात केली,’अहो गप्प बसा ना जरा. सांगितलं ना, बसत नाय वर ब्याग म्हणून.किती कटकट लावलीय.बसलाय ना जागेव एका, बसा ना मग.’ शेवटी असं झालं की bag माझी, मी गप्पच आणि हेच दोघे भांडत आहेत. कसाबसा तो अर्धा गेला आणि माझ्या नशिबाने मी त्या म्हाताऱ्याच्या आधीच उतरले नाहीतर अजून एकदा शिव्या बसल्या असत्त्या. :-))
गावांत उतरले आणि मंगळवार! एकही लाईट नव्हती गावात, ना कुठल्या घरात ना रस्त्यावर. कसबशी रिक्षात बसले आणि घरचा पत्ता सांगितला.त्याने रिक्षा इतकी जोरात घेतली की माझ्या हातातले पैसे कुठेतरी उडालेच. माझ्याकडे जास्त सुटे पैसेही नव्हते आणि होते त्यात काही इथले पैसेही मिक्स होते. घराजवळ रिक्षा आली, अंधारातच अंदाजाने पैसे दिले. घराबाहेरही इतका अंधार होता की आई-दादा घरात नसतील तर घाबरून जाईन म्हणून रिक्षावाल्यालाच एक मिनिटं थांबवून ठेवावं असं वाटलं. पण मी पैसे देताच तो निघून गेला आणि मी घरात घुसले.
२ वर्षांनी घरात येताना रडून येतंच होतं. बाहेरच्या खोलीत एक मेणबत्ती जळत होती. दाराचा आवाज झाला म्हणून आई बाहेर आली. तिला अंधारात कळेना की कोण आलंय. मी पट्कन आईला मिठी मारली आणि तेव्हां आईला कळलं की ती मी आहे. तेव्हढ्यात दादा बाहेर आले. त्यांना तर अजून काही कळेना. मेधा(माझी बहीण) सकाळी तर पुण्याला गेली होती, आता परत कशी आली आणि आईला मिठी मारून रडतेय का? :-)) मग त्यांनाही अशीच मिठी मारल्यावर कळलं की मीच आहे. जरा सर्व शांत झाल्यावर आईने सांगितलं,’ हे बघ, calender घेऊनच बसलोय,तू कधी येणार आणि तुला आणायला कसं, कधी जायचं ते. तू आधीच आलीस आणि सगळंच फिसकटलं. :-)’ फार तर २०-२५ मिनिटं बसले असेन मी बोलत. आईला म्हटलं काहीतर जेवायला दे आणि मी झोपते. आईने मस्तपैकी भाकरी आणि मेथीची भाजी केली होती. ती खाल्ली, आंघोळ केली आणि गादीवर पडल्याच्या दुसऱ्या क्षणाला मी झोपलेले होते. :-)) मी शिकागोमधून निघाल्यापासून घरी पोचेपर्यंत ४४ तास सलग प्रवासात गेले. But it was worth it. I was home.
-विद्या.
P.S. ज्या हेतूने मी लिहायला सुरुवात केली होती त्यापासून जरा भरकटलेच. पण पुढचे वर्णन पुढच्या भागात....

Tuesday, March 11, 2008

One fine day...

आज सकाळी उठले आणि सगळ्यात पहिला प्रश्न डोक्यात आला, ’डासाला इंग्रजीमधे काय म्हणतात?’ :-) कदाचित एखाद्या अर्धवट स्वप्नाचा परिणाम असेल आणि माझं डोकं इतकं जड होतं नुकतेच उठल्याने. कितीतरी वेळ(२/३ मिनिटे?) मला डासांच्या सर्व जाहिराती आठवल्या, good knight, All out, कछुवा छाप अगरबत्ती,इ. सारखा ’मच्छरों का हमला’ आठवत होता. :-)पण इंग्रजीत काय म्हणतात ते काही आठवेना. चहा ठेवून ब्रश करेपर्यंत एकदम आठवलं, mosquitoes.... :-) I got it आणि माझं मलाच हसू आलं. :-)
अशा अनेक सकाळी एखादा विचित्र विचार येऊन सुरु झाल्या असतील. त्या सगळ्या काही मला आठवत नाहीत आणि ते शक्यही नाही. सकाळी उठल्या-उठल्या पहिली ५ मिनिटांत एकतर काही सुचत नसतं. पण डोळे उघडताच एखादा विचार डॊक्यात येण्याच्या ठराविक फेजेस येऊन गेल्यात. सर्वात पहिली आणि prominent phase शाळेतली. ते दिवसच उत्साहाचे असतात म्हणा. प्रत्येक वर्षी, शाळेच्या पहिल्या दिवशी, उठून पहिल्या पाच मिनिटांतच नवीन दप्तर, पुस्तके, वह्या सगळं चाळून झालेलं असतं. मे महिन्याचा पहिला दिवस, दिवाळीची सकाळ, नवीन सायकल मिळाल्यानंतरचा दुसरा दिवस. सर्वात त्रासदायक असायचे ते परिक्षेचे, निकालाचे. :-) एप्रिल महिन्यातील अनेक सकाळी यावर्षीचा निकाल काय असेल असा विचार करत सुरु केल्या असतील, विशेषत: १० वीच्या निकालाआधी. मे,जून महिन्यात आमच्या घराच्या अंगणात मोगऱ्याची फुले मोहरत असत. सकाळी मिटल्या डोळ्यांनी दरवाजा उघडून तो सुवास मनभरून अनुभवला आहे आणि किती फुले आहेत त्यावर आज किती मोठा गजरा करता येईल याचा विचार केला आहे. कधी रात्री मी मेहंदी लावल्यानंतर, सकाळी अवघडल्या हातांकडे पहायची उत्सुकता असायची,की कुणाचा हात जास्त रंगला असेल. हातांचा वास आणि गादीवर पडलेले मेहंदीचे कण त्या दिवसाची सुरुवात करायचे.
शाळेनंतरची फेज कोलेजची. तिथल्या अनेक अविस्मरणीय आठवणी आहेत. पण शेवटच्या वर्षी काही interview दिल्यानंतर, एखादी सकाळ येते जेव्हा सर्वात पहिला विचार येतो, I have a job. :-) I loved that day. त्यानंतर आठवते ती संघर्षाची फेज. स्वत:ला prove करण्यासाठी आई-दादांची भांडण्याची. एखाद्या सकाळी उठून, ’आपण का उगाच भांडतोय?देऊन टाकावं त्यांना हवं ते’ असं वाटण्याची. त्यात भर मुंबईच्या उन्हाळ्याची. अजिबात कसलाही विचार करायला लागू नये म्हणूने सकाळी ११-१२ पर्यंत झोपून रहावं आणि खिडकीतून आलेल्या उन्हानं अस्वस्थ होऊन उठल्यावर अजूनच depression यावं. त्या काळात पावसाळ्यातला एखादा दमट दिवसही अगदी नको करून सोडतो. किंवा कधीतरी घरी गेल्यावरही त्या तंग वातावरणात उठावसंच वाटू नये अशा त्या काळातल्या सकाळी माझ्या सर्वात नावडत्या. पण यावेळी दोन वर्षांनी घरी गेल्यावर रात्री गाढ झोपून गेले आणि सकाळी डोळे उघडायच्या आतच ते फीलिंग आलं,I am home. Nothing can beat that.
माझी सर्वात आवडती फेज म्हणजे प्रेमात पडतानाची. डोळे उघडताच त्याचा विचार डोक्यात येतो आणि त्याने आदल्या दिवशी बोललेलं एखादं वाक्य आठवत रहावसं वाटतं. मग आज तो दुपारी भेटेल की नाही, आज कोणता ड्रेस घालून जावा, अशा प्रकारचे काही प्रश्न त्या फेज मधे येत राहतात. एखाद्या सकाळी, ’आज तो भेटणार नाहीये’ हाच विचार डोक्यात येतो आणि उगाचच सकाळ झाली असं वाटतं किंवा याच्या उलट ’आज तो भेटणार’ याचा आनंद. प्रत्येकाला आयुष्यात एकदा तरी ती सकाळ अनुभवायला हवी जेव्हा दोघांनाही माहीत असतं ’तिचं/त्याचं माझ्यावर प्रेम आहे’. :-) गादीवर नुसतं पडून रहावसं वाटतं, आदल्या दिवसाचा सर्व प्रसंग वारंवार आठवत. सर्वात भयानक, भीतिदायक सकाळ ती, जेव्हा आपण खरंच आयुष्यभर बरोबर राहू शकणार नाही की काय अशी आशंका आणणारी. जाऊ दे, तो दिवस कधी कुणाला पाहायला लागू नये. त्याला मागे सोडून नवीन जागी गेल्यावर उगवणारी सकाळ किती भकास असते सांगता येणार नाही. पण या सर्व प्रसंगातून गेल्यावर, असा एखादा दिवस येतो, जेव्हा डोळे उघडल्यावर तो शेजारी दिसतो आणि सर्वात पहिला विचार डोक्यात येतो ’आता आपण आयुष्यभर सोबत राहणार’.:-) You know all the fight you have gone through till now is worth to have this feeling one fine day.
-विद्या.

Monday, March 10, 2008

त्या दोघी आणि मी

ती सकाळी त्याच्यासोबतच उठते आणि कामाला लागते. सकाळची वेळ फार पळापळीची. रात्री निवडून ठेवलेली भाजी करायची असते. चहा, मग चपाती. त्याचा डबा भरून देऊन तो जाईपर्यंत अगदी जीव नकोसा होतो. देवाने दोन ऎवजी चार हात दिले असते तर बरं झालं असतं असं वाटत राहतं. तो गेला की मग जरा निवांत होतं. चहा घेता-घेता ई-सकाळ वाचून होतो. मेल, बातम्या दोन-चार लोकांशी गप्पा आणि घरी फोन करून आईशीही बोलणं होतं जरा. विशेष काही नाही, नेहमीचंच, जेवण झालं का, आवरलं का, इ,इ. मग पुन्हा आवरा-आवर सुरु होते. सकाळी अर्धवट पडलेला पसारा, भांडी आवरून होतो तोच तिची आवडत्या मालिकांची मालिका टी.व्ही. वर सुरु होते. दोनेक तास टीव्ही पाहून मग ती संध्याकाळच्या जेवणाची तयारी करु लागते. हो, संध्याकाळी तो आला की मी निवांत बोलत बसता येतं, तेव्हा कुठे किचनमध्ये वेळ घालवायचा. तसंच जरा बाहेर पडून काही सामान आणायचं असेल, कुणा मैत्रिणीला भेटायचं असेल तर तेही करता येतं, जिम ला जाता येतं. शुक्रवारीच घरातली आठवड्याची कामं केली की मग पुढचे दोन दिवस बाहेर जाता येतं कुठेतरी. एक बरं आहे, काही जणी तिच्या जवळच्या मैत्रिणी झाल्यात त्यामुळे त्यांच्यासोबत काही ना काही प्लान बनवता येतो, शनिवार-रविवार असो किंवा एखादा सण असो. दिवस कसे सरतात कळतच नाही. दिवस,महिने काय आणि वर्ष काय...
ती तशी तर दुसरी.... तीही तशी लवकरच उठते. आणि जडावलेल्या डोळयांनी आवरताना उगाचच रात्री उशीरा झोपल्याबद्दल चिडचिड करते. जमेल तसं तो किंवा ती चहा ठेवतात, नाहीतर मग हाताला जे लागेल ते पर्समधे टाकून त्याला बाय-बाय करून कामाला जाता-जाता कंटाळा आलेला असतो अगदी. कधी एखादी मिटींगला जायची पळापळ तर कधी काल राहिलेल्या कामाचं टेन्शन. वाटतं सगळं सोडून घरी राहावं. पहिले दोनेक तास घाईत गेल्यानंतर जरा मेल चेक करता येतात. मग जेवायच्या आधी घरी एकदा फोन करायचा. संध्याकाळी आलं की चहा होतो न होतो तोच gym ला जायचं. हो, दिवसभर काहीच हलचाल नाही, असं बैठं काम करून ५/६ वर्षात काय होईल? रात्री ८ नंतर जेवण बनवून जेवेपर्यंत किती त्रान राहणार? दोघं मिळून जेवण बनवताना कुठे जरा गप्पा मारता येतात. कधी कामाचं frustration तर कधी promotion चं. कधी साहेबाच्या कटकटी तर कधी त्याच-त्या लोकांना पाहून आलेला कंटाळा. अशात जेवणात काही साग्रसंगीत करणं जमत नाही. एका तासाच्या आत जे काहि होईल ते उत्तमच. चपाती-भाजी नाहीतर भात-आमटी. ज्या दिवशी हे सर्व बनवायाचं तो म्हणजे सुट्टीचा नाहीतर मग काही खास दिवस असेल तरच. जेवणानंतर मग टी.व्ही. आणि झोप. दोघांचाही शनिवार, रविवार घरातली सफाई, सामान आणणे आणि झोपा काढणे यातंच जातॊ. घर,नोकरी, नवरा,मित्र-मैत्रिणी, सण-वार कशाकशाला आणि किती वेळ द्यायचा हे तिला, खूप चांगलं म्हणता येणार नाही पण, जमतं बऱ्यापैकी आणि दिवस कधी सरत जातात समजतच नाही....
आणि मी? मी सकाळी उठते, कधी? कधीतरी. तो आधीच निघून गेलेला असतो. किंवा जात तरी असतो. मग बंद डोळ्यांनीच त्याला बाय करून पडून राहते. कधीतरी सकाळी लवकर उठून चहा-नाश्ता करण्याचा प्रयत्न केला होता पण ते काही जमत नाही. त्याने केलेला चहा असेल तर प्यायचा नाहीतर जे मिळेल ते चघळत सकाळच्या मेल चेक करायच्या. कुणी ना कुणी online असतंच. गप्पा मारत १०-११ वाजतातच. नसेलच कुणी तर टीव्ही असतोच. मग तो दुपारी येणार असेल तर पटकन काहीतरी बनवायचं. तो येऊन गेल्यानंतर मग पुन्हा टीव्ही संध्याकाळी पाचपर्यंत.हो, मध्ये मधे काही लोकांचे फोन येत असतात, interview साठी, काही चौकशीसाठी की किती वर्षं नोकरी केलीत, काय काय येतं, काय काम केलं, कधी, कुठे. आता तेही प्रश्न पाठ झालेत. थोडं-फार वाचत होते अभ्यासाचं, पण आता त्यातही काही राम उरला नाही. :-)) संध्याकाळी तो आला की चहा, gym आणि परत आल्यावर जेवण आणि झोप. कुणाला फोन नाही, मेल नाही, डोक्याला कसलाही त्रास नाही.
अशा या perfectly आळशी आयुष्यात problem काय आहे? एक म्हणजे त्या दोघींनाही माहीत आहे की त्यांचं काम काय आहे, त्यांना काय करायचं आहे आणि प्रत्येकाचं रुटीन ठरलेलं आहे. मला मात्र माहीत नाहीये की मला काय करायचं असतं. कधी कधी मी प्रयत्न करते काहीतरी खास करण्याचा, काही रुटीन लावण्याचा किंवा निदान साधं का होईना त्याच्या मदतीशिवाय जेवण बनवण्याचा. पण किचनमध्ये दीडेक तास घालवल्यावर सर्व अवघड आहे असं वाटतं आणि आयुष्यात जेवण बनवणे आणि भांडी याशिवाय काहीच नाही की काय असं वाटून अगदी रडायलाच येतं. :-) मग अगदी इकडची काडी तिकडे करावीशी वाटत नाही. पण पूर्वीसारखं सतत पळत राहायची, नोकरी करायची किंवा नवीन काही शिकायची इच्छाही होत नाही. अर्थात त्याला माझा आळशीपणाही कारणीभूत आहे.असो. मी सध्या नक्की कुठल्या रोलमधे fit होते हे मलाच माहीत नाहीये. पण एका रोलमधून दुसऱ्यामधे जाणं खूप अवघड आहे हे नक्की. हे सर्व मी आता विचार करतेय, कदाचित अजून थोड्या दिवसांत हे सगळे विचार करायची गरजही पडणार नाही. मी जुन्या रोलमधे जाईन आणि सर्व सुरळित होईल. पण तरी सध्या माझा Identity Crisis रोज चालूच राहतो. कधी कधी मी अगदीच घाईला आल्यावर, पुन्हा एकदा तो मदतीला धावून येतो. :-) ’राहू दे ना सगळं. बाहेर जायचं का आपण? चल फिरून येऊ.’ त्याच्या प्रेमळ शब्दांनी रडता-रडताही हसू येतं आणि दिवस सरतच जातात.....

-विद्या.

Monday, March 03, 2008

तुझी भेट

तुझी भेट

परवा तू भेटलास आणि वाटलं
सुकलेली फुलं अलगद तळहातावर ठेवून,
दोन बोटांनी चुरगळली गेलीत आणि 
थोडा-फार उरलेला सुवासही उडून गेला.

बरं झालं भेटलास ते !
आता तो चुरा
फुंकर मारून उडवता येईल
असेही डायरीमधे, नवी फुले ठेवायला
जागाच उरली नव्हती.

-विद्या भुतकर.

https://www.facebook.com/VidyaBhutkar1/

Tuesday, February 19, 2008

मी सध्या काय करतेय?

अर्थात मी सध्या काय करतेय यात कोणाला interest असणार म्हणा. पण माझ्या आयुष्यातील ही एक वेगळीच phase आहे. हो, कारण मीसध्या काहीच करत नाहीये. कित्येक वर्षात असं झालं नव्हतं. पण खरंच मी काही करत नाहीये. :-) फक्त त्रासदायक प्रोजेक्टमधून सुटका करून घेतली.घरी जाऊन दोन महिन्याहून जास्त सुट्टी टाकली. सुट्टीत काहीही केलं नाही, फक्त नोकरीचा राजीनामा दिला. मग पुढे काय होईल याचा विचार न करता दोन महीने घरी पडून राहीले. हो, वजनाचा विचार न करता :-),दर दोन दिवसांत २-४ वडापाव नक्कीच खाल्ले. आपण आता कमवत नाही याचा विचार न करता, मनमुराद खरेदी केली. इथल्या नवीन consultant ने नोकरीवर कधी रुजू होणार विचारल्यावर त्याला महिन्याभर उत्तरच दिले नाही. आणि घरून परत आल्यावरही दोन आठवड्यानंतर असे वाटले की आता काहीतरी केले पाहीजे. पण ते ही फक्त १ आठवडा, नंतर परत निवांत.
तर आता गेले महिनाभर मी शिकागोमधे घरात पडून आहे. नवीन नोकरीचे , नवीन client मिळायचे टेन्शन येते, जाते, मग मी थोडेफार काही वाचते, परत टीव्ही पाहायला लागते. आता या सगळ्यात कुणाला फोन करावा, कुठे फिरून यावं, काही लिहावं, काही वाचावं किंवा लोकांनी काही लिहिलं तरी त्यांना कमेंट टाकाव्या यातलं काही एक मला वाटत नाही. ना मला सकाळ संध्याकाळ काही छान करून खावं, खायला घालावं असं वाटतं. कदाचित मी एक मुलगी असल्याचा हा फायदा असेल म्हणा, पण आयुष्यात एव्हढं निवांत कधी वाटलं नव्हतं. माहीत नाही, ही phase चांगली की वाईट. वाईट,कारण, कुठल्याच गोष्टीबद्दल इतकं निष्क्रिय असणं मला नवीनच आहे. पण Imagine, सकाळी संदीपला bye करायला धडपडत उठून, सोफ्यावर पडून राहीले आणि तो मला पांघरूण घालून, (मला उठायला नको म्हणून) माझा मोबाईल शेजारी ठेवून निघून गेला. :-) यासारखं सुखं कुठलं आणि ते आता अनुभवायचं नाही तर कधी? :-ड
-विद्या.
(आज बरेच दिवसांनी मराठीत टाईप करायला पण जरा कष्टच पडले, पण तेव्हढं चालायचंच. हहाअहा :-) )