Thursday, March 27, 2008

माझिया मना जरा सांग ना....

माझिया मना जरा सांग ना....मनात येईल ते लिहित जायचं, या ना त्याप्रकारे....अनेकदा अनेक पोस्टवर मी वाचलयं की 'काय लिहावं हे सुचत नाही' किंवा काही घडतच नाही तर काय लिहिणार. बरोबर ना? :-) अनेक अनुदिनींमधे कमीत कमी एक तरी पोस्ट असेल यावर. पण 'का' लिहितोय हा प्रश्न पहिल्यांदाच. तसं मी माझ्या ब्लोगला एक वर्ष पूर्ण झाल्यावर एक पोस्ट लिहिलं होतं त्यातले बरेचसे मुद्दे रिपीट होण्याची शक्यता आहे.तरीपण केतनच्या भाषेत 'खाज'. :-) मी शाळेत असताना किंवा नंतरही अनेकांनी कौतुक केलेलं, की छान पत्र लिहितेस हं. मग थोड्या कविताही आल्या/ अर्थात ते दिवसच कविता सुचण्याचे आणि लिहिण्याचे होते हे मला नंतर कळलं. असो. मी लिहायला सुरुवात केली तेव्हा एकच कारण होतं, अनेक वर्षात मराठीत काही लिहिलंच नव्हतं, अगदी माझं नावंही मराठीत लिहिलं नव्हतं(कधी कागदावर मराठीमधे नावं लिहून बघा, खूप वेगळं वाटतं). ब्लोग लिहिण्याच्या निमित्ताने त्याला सुरुवात झाली.
याआधी अनेकदा एखादा विचार मनात येऊन फारतर थोडावेळ टिकायचा आणि निघून जायचा. एकदा ब्लोग लिहायला लागल्यावर मात्र असं झालं की एखादा विचार मनात आला की तो कधी एकदा कागदावर उतरवेन असं व्हायला लागलं. असं मला शाळेत सुरुवातीला काही कविता लिहिताना झालं होतं. ती अस्वस्थता परत माझ्यात आली होती. रात्री झोपताना काहीतरी मनात येतं आणि वाटतं की हे लिहिलं पाहिजे. मग एकदा का असा विचार मनात आला की संपलं, झोपेचं खोबरं. अनेकदा मी रात्री २-३ वाजता झोपलेय. ते विचार जणू भडाभडा बाहेर पडल्याशिवाय शांतपणे झोपूनच देत नाहीत.कधी असंही झालंय की एखाद्या व्यक्तीबद्दल, घटनेबद्दल काय वाटतं हे दुसऱ्या कुणाला सांगण्यापेक्षा लिहिणं जास्त सोप्पं जातं. तिथं कुणी अडवणारं, प्रश्नं विचारणारं नसतं. त्यात कधी एखादी छोटी कथा होती, तर कधी कविता तर कधी नुसतेच भरकटणारे विचार.
हो, हे भरकटणारे विचार पण ना. कधी कधी इतका गोंधळ होतो डोक्यात सगळ्याच गोष्टींचा, योग्य-अयोग्य, मग त्या विचारांना एका ओळीत मांडण्यासाठी लिहित जाते. कधी कधी लिहितानाच कळून जातं की काय योग्य आहे आणि काय नाही. तर कधी अख्खा पोस्ट संपून जातो आणि मला काय करायचंय हे कळतच नाही.आता हेच पहा ना, मला मी 'का' लिहिते हे सांगायचंय पण सुसूत्रता येत नाहीये. मग काय करायचं? तर लिहित जायचं, मग घडी उलघडल्या सारखे एकेक विचार सुटत जातात.असेही अनेक पोस्ट लिहिलेत मी माझा कंटाळा व्यक्त केलाय तर कधी घरी जायचा आनंद. :-) केवळ 'व्यक्त' केल्यानाही बरं वाटतं. तर कधी, अगदी थोड्या दिवसांपूर्वी मी जेव्हा 'मी सध्या काय करतेय' किंवा 'मला काय करायचं आहे' यावर लिहिलं तेव्हा दोन-तीन उद्गारही आले, 'Just hang in there'. :-) कधी कधी ते मिळण्यासाठीही मी लिहिते.
अनेकदा आपण केवळ अशा एका मोठ्या विश्वाचे एक घटक आहोत याचाच आनंद मिळवण्यासाठी लिहिते. कितीतरी वेळा नवीन पोस्ट लिहिल्यावर marathiblogs.net वर यादीमध्ये आपलं नाव पहिलं आलं हे बघण्याचाही आनंद मी घेते. :) खरं तर आपण ब्लोगर्स थोड्याफार प्रमाणात सर्व सारखेच. कधी भरभरून लिहिणारे तर कधी आळशी.बरेच दिवसात काही लिहिलं नाही तर, 'काय कुठे गायब' असं कुणी विचारणारं असल्यावरही बरं वाटतं की नाही? एकमेकांना असे 'खो' देत आपण आपलं हे विश्व 'चालवत' राहतो. त्याचा एक घटक बनून राहण्यासाठी लिहिते. आणि कधी boring routine, आई-बाबा, शेजारी-पाजारी किंवा मित्र-मैत्रिणी सोडूनही आपलं थोडं फार का होईना एक 'secret life' आहे आणि जिथे सर्वांच्या नावं बदलून चुगल्याही करता येतात यासारखं मजेशीर कारण अजून काय असेल लिहायला? :-)
काही दिवसांपूर्वी माझ्या जुन्या मैत्रिणींना भेट्ल्यावर माझ्या असं लक्षात आलं की ते जुने दिवस मी कधीही विसरणार नाही म्हटलं तरी अनेक संदर्भ पुसट होत जातात. फक्त मुख्य घटना लक्षात राहतात किंवा त्या लक्षात आहेत असं वाटत तरी राहतं. काय माहीत आयुष्यात अशा किती गोष्टी ५०-६० वर्षाचे होईपर्यंत लक्षात राहतील. पण विचार करा हेच पोस्ट आपण म्हातारे असताना वाचले तर किती मजा येईल. :-) माझे स्वत:चेच नाही, बाकीच्यांचेही जुने पोस्ट. तेव्हा 'अगं तुला ते हे आठवतंय का?' असं विचारणारं जवळ कुणी नसेल तरी हा ब्लोग नक्की असेलच. :-) होय ना? (आयुष्यात एव्हढी आधीपासून planning मी कशाचीच केली नसेल, हाहाहा... ) असो, कदाचित थोड्या काळाने हा पोस्ट वाचूनही मी हसत बसले असेन की मी काहीही लिहिते...... :-))
मी निवांत विचार करून लिहावं म्हटलं असतं तर माहीत नाही जमलं असतं की नाही लिहायला, म्हणून जे आठवेल तसं पटापट लिहून काढलंय. अजून नंतर वाटलं भर टाकेनच. पण तोपर्यंत माझा खो जास्वंदीला.
-विद्या.

11 comments:

a Sane man said...

"...एखाद्या व्यक्तीबद्दल, घटनेबद्दल काय वाटतं हे दुसऱ्या कुणाला सांगण्यापेक्षा लिहिणं जास्त सोप्पं जातं. तिथं कुणी अडवणारं, प्रश्नं विचारणारं नसतं." agadi khara!

"अनेकदा आपण केवळ अशा एका मोठ्या विश्वाचे एक घटक आहोत याचाच आनंद मिळवण्यासाठी लिहिते. ...बरेच दिवसात काही लिहिलं नाही तर, 'काय कुठे गायब' असं कुणी विचारणारं असल्यावरही बरं वाटतं की नाही? एकमेकांना असे 'खो' देत आपण आपलं हे विश्व 'चालवत' राहतो. त्याचा एक घटक बनून राहण्यासाठी लिहिते." :-)

nice!

Meghana Bhuskute said...

सहभागी झाल्याबद्दल मनापासून धन्यवाद. :-)

संवादिनी said...

chaan lihilays....karaNa kahihi asot....apan sagale lihito he sarvat mahatvacha....nahi ka? ends that matter not the means.....or should i say reasons...

Nandan said...

chhan lihila aahes, lekh aavadala.

Monsieur K said...

u know what - this appears as a free flow of thoughts - mhanje jasa manaat yet gela, tasa tu ithe utravla aahes. tyaat ek veglaach anand asto. :)

majha 'kho' ghetlya baddal thanks a ton! :)

aani itke divas/mahine jhale, tari mi tujha 'kho' ajun visarlo naahiye. gelya 2-4 mahinyaat ji pustaka vaachat aahe, tevha ekhada para aavadla, ki lagech aathvan hote - ki arey, chala - ha para type karun taaku!
maajhaa aalshipanaa jhatakalaa paahije malaa..

मोरपीस said...

खो देण्याची पध्द्त मनाला भावली

Raj said...

chhaan lekh. vichar sahajapaNe alyasarakhe vaaTatat. aavaDale.

Abhijit Bathe said...

अरेच्चा - इथे कमेंट लिहायची होती पण नंतर लिहुन विसरुन गेलो. सगळेच लोक लिहिताहेत या विषयावर (आणि मी आडमुठेपणे लिहीत नाहिए) त्यामुळे त्यावर मी काही बोलणं अप्रस्तुत.
पण हे रात्रीचे २-३ पर्यंत लिहिण्याबद्दल ऐकुन लिहावंसं वाटलं - कि च्यायला लिहायची तल्लफ कधी येईल ते सांगता येत नाही. लिहायचं म्हटलं तर लिहायला सुचत नाही आणि तल्लफ आल्यावर लगेच लिहायला जमतंच असं नाही...

पण खरं सांगायचं तर अशा तलफी येणं वाईटही नाही. मला तर सात आठ दहा वर्षापुर्वी ’याच्याबद्दल लिहिलंच पाहिजे’ असं वाटलेले प्रसंगही अजुन तसेच आठवतात - त्याचे वेगवेगळे perspective मिळतात.

एकेकाळी मी सुचलं आणि लिहायला वेळ नसला कि ’याच्याबद्दल लिहु’ म्हणुन ’याद्या’ वगैरे करुन ठेवायचो!

च्यायला मी अगदीच रिकामटेकडा माणुस आहे असं मला वाटायला लागलंय. कुठेही लिहायला लागलो कि लईच पाल्हाळ लावत बसतो...:(
(plus I am so full of myself!)

Abhijit Bathe said...

आणि ते मराठी ब्लॉग्स च्या यादीत (पहिलं) नाव वगैरे काय? मला तर ते लई embarrassing वाटतं. म्हणजे ते कसं - महत्वाची कामं सोडुन व्हिडिओ गेम वगैरे खेळत बसायचं, हाय्येस्ट स्चोर वगैरे करायचा (मग ते नाव पहिलं येतं) आणि (मग गिल्ट लवकर जाण्यासाठी) अजुन दहा लोकांनी यापेक्षा जास्त स्कोर करुन माझं नाव या यादीतुन काढुन टाकावं याची वाट बघत बसायची....

आता बहुतेक हे माझं - बिनमहत्वाची कामं केल्याचं - Friday evening चं गिल्ट बोलतंय बहुतेक!

शतदा प्रेम करावे said...

sagali charcha tari sadhyavachu shakat nahi pan jamel tasa vachen
chaan lihala aahe.

Dk said...

shaiye he aawdya :)