Monday, December 03, 2012

कन्फेशन पुढे चालू..

        मागच्या पोस्ट नंतर म्हटलं बघावं तरी काय होतंय गाणी लावून. म्हणून आज सकाळी एका ऑफिसमधून दुसऱ्या ऑफिसला जाताना गाणी लावली जगजीत सिंग ची. थोडासा पाउसही पडत होता. एकदम पोषक वातावरण अशी गाणी ऐकण्यासाठी. पाहिलं गाणं सुरु झालं, 'होशवालो को खबर क्या?' आणि एकदम धस्स झालं. कित्त्ती वर्षांनी आवाज ऐकतेय असं वाटलं. पुढे मग 'तुम इतना जो मुस्कुरा रहे हो..'. ते ऐकताना वाटलं की असे शद्ब कानी पडूनच किती काळ लोटलाय.
        १५-२० मिनिटांचा रस्ता तो. रोजच्या रस्त्यावर ३०मैल ची स्पीड लिमिट असते आणि जवळच पोलीस स्टेशन आहे हे लक्षात ठेवूनच चालवत असते.पण पुढची एकेक गाणी ऐकण्यात इतकी गुंग झाले की जाग आली ती मागे येणाऱ्या पोलिसाच्या गाडीनेच आणि त्याच्या सायरन मुळे. सगळ्या कल्पना, इ मनातच ठेवून जागेवर आले, गाडी बाजूला घेतली. पोलीस येऊन लायसन घेऊन गेला. म्हटले 'अरे मला आयुष्यात कधी तिकीट नाही मिळालं. आता नाही चालवणार जोरात'. पण तो बाबा कुठला ऐकतोय. त्याने मला तिकीट दिलंच. १२० डॉलर चा बांबू. :( आणि ४ तासाचा क्लास घ्यावा लागणार तो निराळाच. मग सगळा मूड गेलाच. कशी बशी ऑफिसमध्ये पोचले तर हे भाराभर इश्यू.
          संध्याकाळ पर्यंत वेळच मिळाला नाही विचार करायला. घरी यायला निघाले तेंव्हा सकाळी राहिलेली गाणी पुन्हा सुरु केली. त्यात मग 'बात निकलेगी तो' आलं, 'हजारो ख्वाहिशे ऐसी' आलं, आणि 'कोई ये कैसे बताये' पण आलं. पण ना फक्त गाणं आणि आवाज याच गोष्टीकडे लक्ष होतं आज. आधी असायची तशी उदास संध्याकाळ नव्हती ती. त्या गाण्यांना मागचा पुढचा कसलाही संदर्भ नव्हता. फक्त गाणी आणि आवाज. स्वत:लाच आश्चर्य वाटलं या गोष्टीचं. म्हणजे पूर्वी ना त्या गाण्यांमध्ये फक्त जगजीत नसायचा, मी पण असायचे, माझी गोष्ट पण त्यात असायची. पण त्या गाण्यातून, त्या गोष्टीतून, त्या काळातून, आणि त्या चक्रातून कधी बाहेर पडले कळलंच नाहीये. आणि मला त्यात काही वाईट वाटतही नाहीये बहुतेक. कारण त्याच्या त्या आवाजातला दर्द आणि शब्दातील खोच आता जाणवली पण टोचली नाही.
मग विचार आला मी जरा काळ बदलला की कशी त्या दुखा:तून बाहेर आले. म्हणजे चिंता, काळजी, त्रास वगैरे असतातच पण दु:खं नाही. पण जगजीतला कसा तो आवाज आयुष्यभर ठेवता आला? कुठलं दु:खं होतं जे त्याला आयुष्यभर पुरलं काय माहित. तेव्हा वाटलं,' बरं झाला बिचारा सुटला त्यातून !' Rest In Peace !

विद्या.

4 comments:

सिद्धार्थ said...

जगजीत की याद में

शाम से आँख में नमी सी है,
आज फिर आप की कमी सी है|

Anonymous said...

>>>पण जगजीतला कसा तो आवाज आयुष्यभर ठेवता आला? कुठलं दु:खं होतं जे त्याला आयुष्यभर पुरलं काय माहित.

u said it!!
त्याने ’दर्द’ टिकवून ठेवला की टिकून रहाण्याइतपत त्याचं दु:ख सशक्त होतं देव जाणे !!

तुझी दोन्ही कन्फेशन्स विचारात टाकून गेली!!

Anonymous said...

मस्त लिहिले आहे.
वो कागज की कश्ती ऐकले की आजही डोळे आपसूकच भरून येतात

भानस said...

ऐन तारुण्याच्या उंबरठ्यावर एकुलता एक मुलगा गेला... दु:खाची परिसीमाच गाठली असणार जगजीत+चित्राने. तिने तर गाणेच सोडून दिले. आणि जगजीतने सारा दर्द आवाजात भरुन टाकला...

सिध्दार्थ ++++