मागच्या आठवड्यात डिस्नेच्या आईस स्केटिंग इव्हेंटला मुलांना घेऊन गेलो होतो. छान होता शो, विशेष करून दोघेही स्केटिंग शिकत असल्याने अजून पुढे काय शिकता येईल हे दाखवायला चांगले होते. तिकीट तसे महाग होते पण मागच्या सीट घेतल्या. तिथे गेल्यावर नेहमीप्रमाणे खाण्याचे पदार्थ, पाणी हे सर्व ४ पट किमतीचे होतेच. अनेकदा अशा ठिकाणी उगाच चिडचिड झाल्याने आता अशा गोष्टींचा त्रास कमी करायचा हे ठरवून गेलेले. बेसिक खाण्याचे आणि पाणी घेऊन शो ला गेलो. मुलांना सर्व आवडले. नेहमीप्रमाणेच तिथे असलेल्या खेळण्यांच्या स्टॉलवरून काहीतरी घेण्याचा हट्ट त्यांनी केलाही. ज्याची किंमत योग्य वाटली ते घेतलेही. स्वनिकला तिथे एक खेळणे आवडले जे आम्हाला जरा जास्तच महाग वाटत होते. तरी मी त्याचा हट्ट म्हणून लाईन मध्ये उभी राहून तिथे गेली. पण शेवटी इतके पैसे घालून ते घेण्याची इच्छा झाली नाही आणि हिम्मतही. सर्व शो चांगला होऊनही स्वनिक नाराज होऊन घरी आला. आता एक आई म्हणून त्यांनी त्या शोबद्दल खुश व्हावे अशी आमची इच्छा असणारच. पण ती काही पूर्ण झाली नाही.
खूप चिडचिड होते अशा अनेक ठिकाणी जिथे तुमच्या मुलांच्या हट्टाचा वापर त्या वस्तू घेण्यासाठी केला जातो आणि तेही अव्वाच्या सव्वा दर लावून. डिस्ने तर या बाबतीत नंबर एक वर असेल. असो. आपल्याला जे अनुभवता आलं नाही ते मुलांना मिळावं अशी प्रत्येकाची इच्छा असतेच. पण शेवटी आई-बाप म्हणून किती पिळवणूक व्हावी याला काही मर्यादा? यातील काही वस्तू घेऊन देऊही शकतो. कुणाला वाटेल,'This is a good problem to have'. पण ते तितकं सोप्प नाहीये. मी किंवा नवरा लहान असताना घरची परिस्थिती वेगळी होती शिवाय पैशाची किंमत
जरा जास्तच समजावलेली होती आणि वेळप्रसंगी समजलीही होती. त्यामुळे तेच संस्कार मुलांनाही देता यावेत अशी धडपड नेहमी चालू
असते. मी आणि संदीपने बरेच प्रयत्न केले त्यादिवशी स्वनिकला समजवण्याचे पण त्याने ऐकले नाही. त्यादिवशी आम्ही नाराज झालो तरीही खरा आनंद पुढच्या वेळी त्यांना आईस स्केटिंग घेऊन गेल्यावर झाला. स्वनिक स्वतःहून म्हणाला की 'तो शो पहिला त्यामुळे मला आज स्केटिंगला जायची जास्त इच्छा होत आहे'. त्याचं हे वाक्य ऐकून मला आपल्या त्यादिवशीच्या निर्णयाचाही आनंद झाला.
तर आज काल असे अनेक प्रसंग येतात जिथे आम्हाला सारखे त्या त्या वेळी योग्य-अयोग्य ठरवावे लागते. उदा: बाहेर गेलेले असताना दुकानांमध्ये अनेक ठिकाणी चॉकलेट, गोळ्या, चिप्स, बिस्किटे इत्यादी समोर ठेवलेले असते. तिथे त्यांना काही मागण्यापासून, हट्ट करण्यापासून परावृत्त करणे हे तर कठीणच, शिवाय त्यांनी हट्ट केल्यावर तिथेच स्पष्टपणे 'नाही' म्हणून सांगून टाकणे, मग रडारड हे अजून अवघड. अगदी 'त्याच्या हातात अख्खा बिस्किटाचा पुडा आहे तर मला का नाही?' असे प्रश्नही येतात. असे प्रसंग येतातच. स्वनिकच्या बाबतीत तर असेही झाले आहे की तो म्हणतो,'माझ्या मित्राला फक्त चिकन नगेट्स असतात डब्यात रोज, मग मी का रोज वेगळं जेवण न्यायचं आणि संपवायचं? '. बरीच मुले डबा अर्धवट खाऊन उरलेला टाकून मोकळी होतात. अशावेळी त्याला तू स्वतःचा डबा पूर्ण संपव असा आग्रह किती दिवस टिकणार?
बरं खेळण्यांच्या बाबतीतही तेच. मुलांकडे, मित्र-मैत्रिणींकडे अनेक महागडी खेळणी त्यांना दिसतात आणि तसेच एखादे घ्यावे म्हणून आग्रह करतात. अशा वेळी वाटते की प्रत्येक दिवस म्हणजे एक लढाई आहे. आणि ती लढाई किती दिवस लढाईची? बरं, समजा मुलांच्या चांगल्यासाठी ते केलंही, पण मग लाड पुरवणे आणि वळण लावणे यातली 'डॉटेड लाईन' कशी ओळखायची?
आज अनेक वर्षात पहिल्यांदा मी दोघांसाठी व्हेंडिंग मशिनमधून चिप्स
घेतले तर त्यांना कोण आनंद झाला. स्वनिकने दोनदा मिठी मारली. तसं पाहिलं तर
१$ च्या आतली ती वस्तू पण 'घ्यायची नाही' हे त्यांना अनेकदा सांगितलं आहे.
अशावेळी कधीतरी ती मिळाल्यावर होणार आनंद जो असतो तो खूप जास्त महत्वाचा
वाटला. रोजच किंवा नियमित जर तेच त्यांना मिळाले तर त्याची किंमतही राहणार
नाही असे वाटते. किंवा कधी कधी जेव्हा सान्वी माझी वांग्याची भाजी, तूप मीठ भात चवीने खाते तेंव्हा असं वाटतं आपण केलेला आग्रह योग्य होता.
मध्ये सानूच्या शाळेत एका कार्यक्रमात तिने सहभाग घेऊन घरी बनवलेल्या काही वस्तू तिने विकल्या. लोकांना वस्तू नको असतील तर ते कसे आपल्यासमोरून न बोलता निघून जातात असा वाईट अनुभव तिला त्या दिवशी आला. ते पाहताना वाईट वाटलं. पण तिला तो एक महत्वाचा धडा मिळाला त्यादिवशी. प्रोत्साहन म्हणून तिला १० डॉलर दिले. तिनेही मग नीट विचार करून, २-४ दुकाने फिरून आधी खेळणी पाहिली आणि एक ६ डॉलरचे सॉफ्ट टॉय आणि ४ डॉलरचे एक छोटे खेळणे घेतले. ती ते घेत असताना तिला दिसत होतं की 'अजून थोडे पैसे असते तर मी हे मोठं खेळणं घेऊ शकले असते'. तिचा चेहरा बघून वाटत होते की घेऊ द्यावे का पण तिनेही जास्त आग्रह न करता त्याच पैशात मिळेल ते घेतले. शिवाय 'स्वनिक रडत आहे तर मी त्याच्यासाठीही काहीतरी घेते म्हणाली'. तिचे ते बोलणे ऐकून एकदम भरून आल्यासारखं झालं. आपण इतके दिवस जे शिकवत आहोत ते योग्य आहे असं वाटलं. हे असे प्रसंग दुर्मिळच पण अनमोल.
मी आणि नवरा दोघेही अनेकवेळा वेगवेगळ्या कार्यक्रमात गेलो की मदत करण्याचा, निदान फोटो काढण्याचा, कधी कुणाच्या मुलांना सांभाळण्याचा किंवा जेवायला वाढण्यात जमेल तशी मदत करत असतो. आपल्या मुलाला घेऊन त्याचेच बघत बसणे आम्हांला दोघांनाही जमले नाहीये. मुलं लहान असताना अनेकवेळा वाटायचं की आपण पण तसं करावं का? पण ते जमलं नाही. आणि खरं सांगायचं तर त्यामुळे मुले बरीच सोशल झाली. कार्यक्रमात आम्हालाच चिकटून राहिली नाहीत. आजकाल आम्ही कुठे गेल्यावर सान्वी लहान मुलांना आनंदाने खेळवते. मागच्या पार्टीत डेकोरेशन करताना स्वनिकने येऊन विचारले की 'मी काही मदत करू का?' आणि मग एकेक करून तो आम्हाला वस्तू देत राहिला. हे सगळं त्यांना करताना पाहून आता खूप आनंद होतो.
आता ही पोस्ट केवळ मुलांचे कौतुक करण्यासाठी लिहीत नाहीये, आणि समजा केलं कौतुक आपल्या मुलाचं कधीतरी तर काय हरकत आहे नाही का? :) असो. तर मुद्दा असा, ही पोस्ट म्हणजे माझे विचार एकसलग मांडण्याचा प्रयत्न आहे. अनेकवेळा अजूनही आम्हाला छोटे मोठे निर्णय घेताना आपण चूक करत आहोत की नाही अशा शंका येतात. कधी वाटतं शॉर्टकट मारावा, घेऊ द्यावा मुलांना फोन कार्यक्रम चालू असताना आणि आपणही निवांत गप्पा मैत्रिणीशी माराव्यात. पण ही पोस्ट लिहिताना जाणवत गेलं की अशा अनेकवेळी घेतलेले ते छोटे निर्णय तेव्हा त्रासदायक वाटले तरी नंतर कधीतरी त्यातून आनंद मिळाला आहे.
तुम्हालाही असे अनुभव आले असतील तर नक्की सांगा. या पोस्टमध्ये काही गोष्टीबाबत सूचना असतील तर त्याही सांगा. आई-वडील म्हणून त्या आम्हाला उपयुक्तच असतील. :)
विद्या भुतकर.
No comments:
Post a Comment