Wednesday, March 08, 2017

आधीच भरलं वांगं त्यात थालीपीठ

       शीर्षक वाचून काय काय विचार केले असतील माहित नाही. भरलं वांगं हेच मुळात इतक्या लोकांचं आवडतं आहे आणि थालीपीठही. आजची ही पोस्ट आहे भरल्या वांग्याच्या थालीपीठाची. घरी अजूनही आई कधी कधी शिल्लक राहिलेल्या वांग्यांची, दोडक्याच्या भाजीची कधी आमटीची भाकरी करते. भाकरीच्या पिठात ती राहिलेली थोडीशी भाजी, तिखट, कांदा, कोथिंबीर घालून मोठ्या भाकरी थापते. आम्ही घरी असताना आवडीने अशा भाकरी खायचो त्यावर भरपूर तूप किंवा लोणी घेऊन. इथे माझ्याकडे भाकरीचे पीठ नियमित नसते, जे थोडंफार भारतातून आणते ते संपून जातं. घरून आणलेलं भाजणीचं पीठ मात्र मी फ्रिजर मध्ये ठेवून पुरवून वापरते. आता भाजणीचं पीठ पुरण्यास मुख्य कारण म्हणजे मी प्रत्येक वेळी थालीपीठ करताना भाजणीच्या पिठात थोडी कणिक, तांदळाचं पीठ, बेसन अशी भर घालून मळते त्यामुळे ते थोडे जास्त दिवस पुरतं.
       तर एकूण काय की मला अशा मसाल्याच्या भाजीच्या भाकरी करता नाही आल्या तरी थालीपीठ मात्र नक्की करते. कालच वांगी करताना थोडा जास्त रस ठेवला होता. भाजीही आज सकाळी डब्यात न नेता फ्रिज मध्ये ठेवली होती संध्याकाळी थालीपीठ करायची म्हणून. आज ती बनवताना आठवणीने थोडे फोटो काढून घेतलेत. कदाचित अनेक जणी करतही असतील. आजच एका मैत्रिणीशी बोलताना लक्षात आले की ती तव्यावरच थापते. माझ्या सासूबाईही तव्यावरच थापतात. त्यामुळे गरम तवा थोडा थंड करून करेपर्यंत बराच वेळ जातो. इथे मी फोटो इन्वा व्हिडीओ मध्ये आई करते तसे कापडावर थापून तव्यात टाकायची कृती देत आहे. सुरुवातीला थोडे हळू होते पण एकदा हात बसला की एकावेळी दोन तव्यात थालीपीठे पटापट होतात.

साहित्य: शिळी शिल्लक राहिलेली मसाल्याची भाजी,
एक बारीक चिरलेला कांदा , कोथिंबीर चिरून, धणे-जिरे पूड, मीठ, हळद, हिंग, १ चमचा तिखट,४ चमचे तीळ, भाजणीचे पीठ(भाजीत मावेल इतपत, साधारण एक वाटी भाजीमध्ये २ वाट्या पीठ मावते).
कृती: भाजी पूर्णपणे चुरून पिठात आधी मिस्क करून घ्यावी.
पीठ कोरडे असतानाच त्यात हळद, तिखट, हिंग, मीठ, तीळ, कांदा, कोथिंबीर, धणे-जिरेपूड सर्व साहित्य कालवून घ्यावे.
एका वाटीत थोडे गरम पाणी घेऊन पिठात लागेल तसे घालून पीठ मळून घ्यावे. (मी सर्व पीठ पातळ करत नाही. सर्व पीठ घट्ट मळून घेते आणि लागेल तसे प्रत्येक गोळा थापताना त्यात पाणी घालते.)
गॅसवर तवा किंवा जाड बुडाचा पॅन ठेवून गॅस मध्यम आचेवर ठेवावा.
एका ताटात एक रुमाल किंवा सुती कापड ओले करून पसरून घ्यावे. ( माझ्याकडे सध्या रुमाल नसल्याने मी जाडजूड टीशू पेपर आहेत बाऊंटी ब्रँड चे ते दुहेरी करून वापरते. ८ थालीपिठांना टिकतात. )
कणकेचा गोळा थोडे पाणी लावून त्या रुमालावर हातानं थापून पसरवावा. चार ठिकाणी भोके पाडून पुन्हा एकदा त्या थापलेल्या  थालीपिठावर पाणी मारून रुमाल ओला करून घ्यावा. (याने थालीपीठ रुमालावरून अलगद सुटून येते तव्यात.
रुमाल दोन्ही टोकांना धरून थालीपीठ तव्यात पालथे करावे. थोडा झटका दिल्यावर ते सहजपणे तव्यात उतरते.
एकदा ते तव्यात पडले की मग दोनीही बाजूला तेल लावून खरपूस भाजून घ्यावे.
थोडे शिजण्यासाठी वरून झाकण ठेवले मिनिटभर, तरी चालते.  तेलावर परतून गेल्याने जास्त तेल वापरले जात नाही(आई तळूनही करते, ती चांगली लागतात पण तेल खूप खातात . )
दही, शेंगदाण्याची चटणी, थालीपिठावर भरपूर तूप घेऊन खायला मजा येते. सोबत लोणचं असेल आंब्याचं तर उत्तमच. :)

कधी कधी मसाल्याची भाजी दोन वेळा खायचा कंटाळा येतो. अशावेळी त्या भाजीची थोडी चव, भाजणीच्या पिठाचा खमंग वास, कांदा-कोथिंबिरीची चव, दाताखाली येणारे तीळ हे सर्व एकदम जमून येतं आणि जेवण एकदम झकास होतं मग. आधीच भरलं वांगं त्यात त्याचं थालीपीठ, मग काय? आजचा बेतही तसाच झाला. तुम्हीही करून बघा नक्की.
























विद्या भुतकर.

No comments: