Sunday, August 13, 2017

सोडून दे :)

       थोड्या दिवसांपूर्वी फेसबुकवर एका बाईने एका ग्रुपवर प्रश्न टाकला होता,"थोड्या दिवसांसाठी माझे सासू सासरे अमेरिकेत आमच्या सोबत राहायला आले आहेत. सासुबाई छोट्या छोट्या गोष्टींतून भेदभाव करतात. त्याबद्दल  त्यांच्याशी बोलावं की नाही?". बिचारी खूपच त्रासलेली वाटली. तसं पाहिलं तर मीही फटकळच. कधी कधी पटकन बोललं जातं. त्यात आवाजही खूप काही गोड नाही. उलट जरा जास्तच मोठाही आहे. तिला उत्तर देताना खरं तर मी लिहिलंही असतं की "सांगून टाकायचं ना मग?  त्रास करून घेतेस" वगैरे. तिथे असेही काही लोक होते जे सासू किंवा तत्सम नातेवाईक सुनांना कसे त्रास देतात इ. इ. यावर वाद घालत होते. पण माझं उत्तर जरा वेगळं होतं आणि त्याला कारण माझ्या सासूबाईच आहेत.
       गेल्या १२-१४ वर्षांपासून मी त्यांना ओळखते. त्यांच्याकडून मी इतक्या वर्षात हे शिकले की नाती जपायची असतील तर काही गोष्टी सोडून द्याव्या लागतात. त्या वागायला, बोलायला एकदम साध्या आणि कष्टाळू आहेतच. पण सुना, जावा, सासू-सासरे आणि अनेक नातेवाईकांचे अनुभव त्यांच्यापाशी आहेत. त्यातल्या त्यात सुना म्हणून आम्हाला जे अनुभव येतात ते अजून जवळचे. माझ्यासारख्या फटकळ मुलीलाही त्यांनी सामाऊन घेतलं किंवा आपलंस केलं ते त्यांच्या स्वभावानेच. उदा: मला किंवा नवऱ्याला त्यांनी स्वतःचं बंधन घातलं नाही. स्वतः उपवास करतात पण आम्ही करत नाही तर त्याबद्दल जबरदस्ती केली नाही. हे फक्त उदाहरण झालं.  छोट्या गोष्टींमधून मला जाणवत राहतं की आपल्याला एखादं नातं जपायचं असेल तर काही गोष्टी दुय्यम आहेत.
         एखाद्याची काही गोष्ट पटली नाही म्हणून तो माणूस वाईट होत नाही ना?  कधी कुणी उगाचच एखादा टोमणा मारून जातं. म्हणून त्याच्याशी बोलणं बंद करायचं का? You have to choose your battles. कधी कधी वाटतं की स्वत्व जपण्याच्या नावाखाली आपण बरेच संबंध सहज तोडून टाकत आहे. अनेक लोक असतात ज्यांच्या काही गोष्टी पटत नाहीत. पण म्हणून उगाच वाद घालून ते नातं गमवण्यात अर्थ नसतो.  नातेवाईकच नाहीत तर आपले मित्र-मैत्रिणीही असतात. असतो एखादा वल्ली, पण त्याच्या बारीक सारीक गोष्टींसाठी नाराज होणं योग्य नाही. मग तो असाच बोलतो, असंच वागतो. तो त्याचा स्वभावच आहे म्हणायचं आणि त्या माणसाच्या चांगल्या गोष्टींकडे बघायचं. एकच करायचं,"सोडून द्यायचं". कदाचित आपण न बोलण्याने समोरच्या व्यक्तीमध्येही फरक पडेल जसा माझ्यात  झाला(थोडा का होईना) सासूबाईंच्या समजूतदार स्वभावामुळे.
         अर्थात सगळीच नाती जपलीच पाहिजेत असं नाही आणि त्यात आपला अपमान करून घेऊन सहन करणंही योग्य नाही. पण आपल्याला नक्की काय हवंय याचा विचार जरूर केला पाहिजे. मी काही अलका कुबल टाईप्स नाहीये आणि कुणी व्हावं असं म्हणणारही नाही. पण बोलताना/वागताना एकदा विचार जरूर करावा. आणि हो हा लेख सर्वानाच उद्देशून आहे. स्त्री-पुरुष सर्वांसाठी. नाहीतर आजकाल उगाचच बायकांनीच कसे नाती जपण्यासाठी चांगलं वागलं पाहिजे यावर अनेक लेख येत असतात. असो. त्याबद्दल पुन्हा कधीतरी. :)
         तर मी वर सांगितलेल्या किश्श्यामध्ये मी उत्तर दिलं की,"असंही सासू सासरे महिनाभरच आहेत सोबत, पुन्हा भारतात जाणारच आहेत.  कशाला वाद घालून त्रास  घेतेस आणि त्यांनाही त्रास देतेस? सोडून दे." अर्थात तिने पुढे काय केलं माहित नाही पण त्यातून मला एक कळलं होतं की माझ्या मनात या 'सोडून दे ' वृत्तीने घर केलं आहे.

विद्या भुतकर. 

No comments: