Wednesday, August 16, 2017

पारंब्या

     वीकेंडला घरी गेले होते, कोरेगावला. तशी तर मागच्या वर्षी पण गेले होते, यावेळी जरा निवांत. जाताना रस्त्यात नवीन होत असलेल्या फ्लायओव्हर आणि वाढलेले टोल यावर बोलणं झालंच. घरी श्रावणातली सत्यनारायणची पूजा होती. घरी आयतं पोळ्याचं जेवण करून  डाराडूर झोपले. म्हणजे अगदी नेहमी घरी गेल्यावर झोपते तसंच.
      संध्याकाळी पूजेला काही मोजकी का होईना लोकं येऊन गेली. त्या सर्वांना भेटताना  जाणवलं कोरेगांव मध्ये काही गोष्टी अजूनही बदलल्या नाहीयेत आणि तरीही बरेच काही बदलून गेलंय. आम्ही शाळेत असताना सर्व शिक्षकांना आवर्जून आमंत्रण द्यायचो. घराजवळ सर्वांना घरी जाऊन आमंत्रण द्यायचो आणि तीर्थ-प्रसाद घ्यायला सर्वजण यायच्या आधी  छान आवरून तयार राहायचो. सर्वजण येऊन जाईपर्यंत नऊ वाजून जायचे, आम्ही सर्वजण कंटाळलेले असायचो. 
      यावेळी गेले तर आईनेच फोनवर काही लोकांना आमंत्रण दिले होते. त्यातील काही जण येऊन गेले. ठराविक लोक बसून, गप्पा मारून आमची चौकशी करून गेले. लहानपणी असायचा तो उत्साह दिसला नाही तरी काही ठरलेली वाक्य मात्र यावेळीही ऐकली,'अरे तुमचा फोन आला म्हणजे येणारच', 'हो मिळाला ना निरोप, तुमचा फोन डायरेकट आला नाही तरी चालतंय', 'प्रसाद घेऊन जा घरच्यांना', 'थांबा पुडीत बांधून देते', 'काय म्हणताय? बराय ना सगळं?',इ. इ. हे सर्व जितकं परिचयाचं होतं तितकेच वय झालेले सर, मोठी झालेली मुलं, त्यांची लग्नं, छोटी मुलं हे सगळं तितकंच नवीन होतं.
     हे झालं सत्यनारायणाचं. घराभोवती सकाळी पारिजाताखाली पडलेला सडा अजूनही तसाच होता आणि चिंचेच्या झाडावर उड्या मारणारी माकडंही, सीताफळांनी भरलेलं झाडही. इतकं असलं तरी मोगऱ्याचे जुने दोन वेल कधीतरी काढून टाकलेले. त्या वेलीवरच्या फुलांचे एकेकाळी मोठमोठे गजरे डोक्यात माळलेले होते. दारातील बंब काढून पाणी तापवायला गीझर लावलेला. जुन्या अनेक इमारती पडून नवीन बांधलेल्याही पाहिल्या.  शाळेबद्दल विचारलं तर अनेक बदल झालेत. गाडीत हवा भरायला थांबलो तर त्या दुकानाच्या मालकाला ओळखलंही नाही. अगदी नंतर आठवलं 'अरे हा तर आजोबांकडे शिकवणीला यायचा'. अशा अनेक गोष्टी मनात घेऊन पुण्यात परत आले.
      आता कुणी म्हणेल हे आताच का जाणवलं. आता जाणवलं नाही पण त्याबद्दल लिहिलं मात्र नव्हतं अजून. हे सर्व लिहिण्याचं कारण असं की अनेक देशांत -गावांत फिरताना मनात खात्री असायचीच की आपलं मूळ
अजूनही त्या गावातच आहे जिथे आपण वाढलो. पण त्या गावातले बदल पाहताना, जुन्या लोकांची ओळख पटायला वेळ लागतो तेव्हा वाटतं, 'अरे खरंच आपण हे सर्व विसरत चाललोय का?'.  त्याच वेळी ओळखीच्या जागा, लोक आणि प्रथा पाहून अजूनही आपण त्या गावचेच आहोत हा आधारही वाटतो.
       गावातून निघताना रस्त्यात वडाची अनेक झाडं दिसतात, माझी आवडती एकदम. यावेळी आवर्जून त्यांचा फोटो काढला. त्या वडाच्या पारंब्यांसारखेच आम्हीही पसरत, विस्तारत राहतो. पण कितीही दूर गेलं तरी मूळे मात्र अजून तिथेच असतात.

विद्या भुतकर. 

No comments: