सकाळी शेवटी डॉकटरकडे जाऊन आले. तीन दिवस बिघडलेल्या पोटावर सर्व प्रयोग करून झाल्यावर, नाईलाजाने. अर्थात सर्व शहाण्या भारतीय नागरिकांप्रमाणे मीही दुकानातून औषध आणलं होतं आणि ज्या लोकांना मला बरं वाटत नाहीये माहित होतं त्या सर्वांनी सांगितलेले सर्व घरगुती उपचारही करून झाले होते. डॉक्टरकडे जाणे म्हणजे जणू तुमच्या या सर्व उपचारांची हारच! त्याच हरलेल्या, पडलेल्या मानेने आम्ही गेलो. सुरुवातीचे पैसे वगैरे घेण्यासारखी महत्वाची कामे झाल्यावर तपासण्यासारखी मामुली कामे करायची वाट बघत बसलो. समोर टीव्हीवर ढिगाने चौकोनी बॉक्स दिसत होते. त्यात इतके सगळे ऑप्शन होते की आजारी पडावं तर इथेच असा विचारही मनात येऊनगेला.
थोड्या वेळाने छान आवरलेली नर्स आली आणि गोड हसून चेकिंग रूममध्ये घेऊन गेली. निदान आज तिच्यासमोर माझ्या गबाळेपणाचं स्पष्टीकरण द्यायला 'मी आजारी आहे' हे कारण तरी होतं. ते मी स्वतःला पुन्हा एकदा समजावलं आणि चेकिंग रूममध्ये गेले. तिथे तिने मला प्रेमाने प्रश्न विचारले. कधीपासून पोट बिघडले आहे, किती वेळा जाऊन आला, कळ येऊन होतेय का, पातळ-चिकट, लाल काळी वगैरे टेक्शर वाले प्रश्नही तिने विचारले. ताप आहे का पाहिलं आणि बीपीही तपासलं. हे सर्व वर्णन मी सविस्तरपणे सांगताना नवऱ्याचा चेहरा कडू होऊन वाकडा झाला होता.
तर त्या नर्सने त्याला विचारलंही,"तुम्ही ठीक आहे ना?". मग कुठे जरासा तो हसला आणि म्हणाला,"हो हो".
सर्व चौकशा झाल्यावर डॉकटर येतीलच लवकर असे सांगून ती निघून गेली आणि आम्हाला जाणवलं,"बिघडलेलं पोट" या विषयावर बोलतानाही कुणी इतकं हसून आणि प्रेमानं कसं बोलू शकतं?
खरं सांगते, अशा गोष्टींची सवय नाहीये हो? हॉस्पिटल मध्ये जाऊन आजारी माणसापेक्षा बाकी लोकांची तोंड पाहून आजारी पडू असं वातावरण पाहिजे. त्याची सवय आहे. नर्सने केवळ रक्त काढताना नीट शीर तपासून जास्त त्रास न देता रक्त घेतलं तरी आनंद वाटावा याचीही आहे. पण एकतर आजारी माणूस त्यात त्याला हसायला सांगायचं आणि स्वतःही हसतमुख राहायचं? शक्यच नाही. पुढे डॉक्टरही असाच हसमुख ! मग त्याने मी जे काही करत आहे तेच सर्व करत राहा असा 'विकतचा' सल्ला दिला. शिवाय जाताना दोन-चार पाने प्रिंटआऊटही वाचायला. (मी ते वाचणार नव्हते हे सांगायला नकोच !)
तर हे असे अनेक अनुभव आजवर आले. पोरांच्या डिलिव्हरी पासून हातपाय मोडून घेईपर्यंत. प्रत्येकवेळी, समोरचा माणूस रडत असो, टेन्शन मध्ये असो किंवा झोपेत, आपण हसत राहायचं, मुलं असतील तर त्यांच्याशी अजून.... गोड बोलायचं आणि आपलं काम करायचं. कसं करत असतील हे या नर्सेस? दोन्ही पोरांच्या डिलिव्हरी मध्ये सर्वात मोठा त्रास यांचा होता. का? तर इथे समोर आलेल्या पोराचं काय करायचं, झोपायचं कधी, जेवायचं काय असे महत्वाचे प्रश्न समोर असताना मध्यरात्री तीन वाजता आलेली नर्सही छान बोलत राहते. असं वाटायचं की जरा ब्रेक द्याना माझ्या तोंडालाही. किती वेळ हसणार मी हे असं तोंड वासून? त्यातल्या काहीजणी इतक्या पेशन्स वाल्या होत्या. बाळाला फीड कसं करायचं पासून डायपर पर्यंत छान समजावून सांगणाऱ्या.
हे असे अनुभव आले की भारतातल्या सर्व डॉकटर व्हिजिट्स आठवतात आणि त्यात आठवते ती म्हणजे 'लक्षात राहणारी नर्स' नसणं !! शक्य होईल तितका निर्विकार, रुक्ष चेहरा, हातात दिलेलं काम चुकूनही तोंडातून ब्र न काढता करून रुममधून निघून जाणं. चुकून काही प्रश्न विचारला तरी त्याचं उत्तर न देणं किंवा एका शब्दात देणं, वगैरे पाहिलं आहे. समोर माणूस २० तास उभा असला तरी त्याच्याबद्दल कणभर दया न येणाऱ्या अनेक नर्स पाहिल्या. वाटतं, त्यांना कसं जमत असेल असं निर्विकार राहणं, किंवा कणभर रागीटपणाकडेच झुकणारं वागणं? अर्थात त्यात त्यांचे शैक्षिणक, आर्थिक स्तर त्याला कारणीभूत असेल का? त्यात त्यांच्याशी अजूनच तुसडेपणाने बोलणारे डॉक्टरही पाहिलेत. त्यांच्या वागण्याने या अशा शांत राहात असतील का? माहित नाही.
अजून या कामासाठी अयोग्य असूनही नोकरी करणाऱ्या आणि चक्क रुग्णाकडे दुर्लक्ष करणारे महाभाग निराळेच. त्यांना नोकरीवर ठेवणारे बेजबाबदार डॉक्टर तर अजून डेंजर. तो जरा जास्तच गंभीर विषय आहे. असो.
मुलाच्या जन्माच्यावेळी हॅलोविन होता. तेंव्हा रात्री १२ वाजता घाबरवणारा मेकअप करुनही तितक्याच उत्साहाने मदत करणाऱ्या नर्स मी पाहिल्या आहेत. अशा वेळी कितीही नाही म्हटलं तरी तुलना होणं साहजिकच आहे. रोज तेच काम करावं लागणं हा ज्याच्या त्याच्या नोकरीचा अनिवार्य भाग आहे. पण ते आपण कशारितीने करतो यालाच महत्व आहे. नाही का?
विद्या भुतकर.
No comments:
Post a Comment