Monday, September 11, 2017

थँक्यू बायको !

    या वर्षी उन्हाळ्याच्या सुट्टीत भारतात जायचं होतं. नुकतीच नवी नोकरी लागल्याने मला जास्त रजा मिळणार नव्हतीच. पण मुलं कंटाळली होती आणि त्यांना केव्हा एकदा भारतात जाऊ असं झालं होतं. असेच एक दिवस नवऱ्याला म्हटले तुम्ही तिघे पुढे गेला आणि मी १५ दिवसांनी आले तर? गंमत म्हणून बोललेला हा विचार पुढे प्रत्यक्षात आला. मुलं आणि संदीप पुढे जाणार आणि मी नंतर जाणार असं ठरलं. अर्थात हे सोप्पं नव्हतंच. 

      मुळात दोन मुलांना घेऊन ३०-३२ तास एकट्याने प्रवास करणे अतिशय कंटाळवाणं आणि त्रासदायक काम आहे. त्यात एअरपोर्टच्या सिक्युरिटी, सामान, विचित्र वेळा, बेचव जेवण वगैरे सर्व आलंच. मी एका चांगल्या बायकोचं कर्तव्य करत नवऱ्याच्या कार्यक्षमतेवर संशय घेतला, त्याला ढिगाने सूचना  दिल्या आणि पोरांना बाय करताना ढसाढसा रडलेही. सर्वजण नीट घरी पोचले, आठवडाभर राहिलेही पुण्यात. मीही न राहवून १५ ऐवजी ७च दिवसात पळून गेले. 

     आता या सात दिवसांत मी इकडे दुःखात सतत टीव्ही बघत, अजिबात स्वयंपाक वगैरे न करता दिवस काढत होते तर तिकडे नवऱ्याला ढिगाने मदत होती. सासू-सासरे, दीर-जाऊ, घरी कामाला येणाऱ्या मावशी, एकदा तर माझ्या मैत्रिणीही त्यांच्यासाठी डबा घेऊन गेल्या होत्या. आता हे सगळं सांगण्याचं कारण म्हणजे ही काही पहिली वेळ नाही मला असा अनुभव येण्याची. याआधीही मी एक दोनदा ऑफिसच्या कामासाठी बाहेर गेले असताना नवऱ्याची काळजी करणारे लोक पाहिले आहेत. शिवाय सासूबाईंना वाटणारे मुलाचे कौतुक आहेच. त्याच ठिकाणी मी असते तर? आणि इथेच आजच्या पोस्टचा मुद्दा आहे. 

      लाखो-करोडो नवरे नोकऱ्यांसाठी परगावी असताना अनेकींना घर, नोकरी आणि मुलं सर्व सांभाळावं लागतं. खरंतर कुणासाठीही हे अतिशय अवघड काम आहे. पण नवऱ्याने एकट्याने मुलांना सांभाळणे, घर पाहणे या सर्वांचा इतका बाऊ अजूनही का केला जातो? उलट त्याला जी सहानभूती आणि मदत मिळते ती बाईला मिळाली तर बिचारी अजून काम करेल. खरं सांगायचं तर मी तर म्हणते,"Its not rocket science". ऑफिसमध्ये अनेक मोठं मोठी कामे करणाऱ्या नवऱ्याला पोरांच्या जेवायच्या वेळा पाळणं, झोपवणे वगैरे काही अवघड नाहीये. तरीही अशी परिस्थिती इतक्या कमी वेळा का पाहायला मिळते. असो. 

      बरं, नुसते बाकीचे लोक मदत करतात असे नाही, बायकांनाही आपल्या नवऱ्याचे कोण कौतुक वाटते. (अर्थात मलाही वाटले कारण मला एकटीला पोरांना सांभाळणे झेपणार नाही. लै ताप देतात. असो.) अनेकदा मी फेसबुक वगैरे वर मुलींचे पोस्ट पाहते, 'मी नसताना मुलांचे सर्व नीट करणाऱ्या' नवऱ्याचे कौतुक करणारे, Thank you for holding fort वगैरे. थँक्यू काय? तुमचाच नवरा आहे ना? आणि मुलं त्याचीही आहेत ना? मग थँक्यू कशाला? आणि तेही पब्लिकसमोर? हे कौतुक का? अर्थात अगदी 'नवऱ्याने आज मॅगी बनवून दिली' म्हणूनही कौतुक करणारे कमी नाहीत. माझं काय म्हणणं की असे किती पोस्ट्स आपण नवऱ्याचे पाहतो? बायकोने मॅगी बनवली म्हणून? उलट 'बघा नवऱ्याला मॅगी करून घालते' म्हणून बोलणारे कमी मिळणार नाहीत. असो. 

      अगदी परगावी जायचे राहू दे, मुलं आजारी असतानाही बायकोनेच कशाला सुट्टी घेतली पाहिजे? पोराला किती औषध द्यायचंय, काय खायला द्यायचं वगैरे बेसिक गोष्टी माहित असल्या म्हणजे झालं. महिन्या-दोन महिन्यात पोरं आजारी पडतात, सर्दी-खोकला ताप वगैरे. त्यासाठी 'त्याला आईच लागते' म्हणून आपणच का काम सोडून घरी बसायचे? करियर बद्दल मी बोलत नाहीयेच. माझं म्हणणं इतकंच की वडीलही मुलाची तितकीच काळजी घेऊ शकतात आणि प्रेम देऊ शकतात. 

     अर्थात आपण इतकाही विश्वास का दाखवू शकत नाही? समजा त्याने नाही दिलं पोटभर जेवायला किंवा मागे लागून नाही भरवलं तरी काय बिघडणारेय? भूक लागल्यावर येतीलच ना मागे,'खायला द्या' म्हणून? का मग आया मुलांना वडिलांकडे सोडत नाहीत? प्रत्येकवेळी आपलं आईपण सिद्ध करायची काय गरज आहे? मी जेव्हा एक आठवडा आधी निघून गेले तेंव्हा अनेकांनीआश्चर्य व्यक्त केलं. जणू मुलांना असं पुढे पाठवणारी आई म्हणजे इतकी इमोशनल कशी काय म्हणून. अशा लोकांना किंवा विचारांना घाबरून कुणी राहात असेल तर चूकच ते. कारण आई म्हणून तुम्ही मुलांसाठी काय करता ते चूक का बरोबर हे बाकी लोक कोण ठरवणारे? 

     मला वाटतं की अशा अनेक परिस्थितींमध्ये, कौतुकच करायचं असेल तर दोघांचं करा, मदत करायची तर दोघांची करा आणि दोघांनी करा. आजपर्यंत मी कुणा नवऱ्याचे पोस्ट पाहिले नाहीयेत,'थँक्यू बायको' वाले. यायचेच तर तेही दिसावेत अशी अपेक्षा. असो. :) 

विद्या भुतकर. 
https://www.facebook.com/VidyaBhutkar1/

No comments: