गेल्या आठवड्याभरात भरपूर कामे होती. एकेक करत फराळ बनवायचा होता, त्यात पणत्या रंगवणे वगैरे चालूच होते. त्यामुळे दिवाळी सुरु झाली तरी घर अजून सजलं नव्हतं. उद्या लक्ष्मीपूजनाची मुलांना शाळेलाही सुट्टी आहे तर संध्याकाळीच सुरुवात करावी म्हटलं, रांगोळी आणि दिव्यांच्या माळा लावून.
रांगोळी म्हटलं की दिवाळीची पहाटच आठवते. आमच्या घराच्या पुढच्या आणि मागच्या अंगणात रांगोळी काढायची असायची. त्यात आम्ही कधी लवकर उठणारे नव्हतोच. तरीही दारात रांगोळी काढायला मिळेल या आमिषाने उठायचेच. आमची आई सुंदर रांगोळ्या काढते. त्यामुळे दिवाळीला पुढच्या अंगणात तिचीच रांगोळी असायची, असते. पण मला ते अजिबात पटायचं नाही. मोठी होऊ लागले तशी आईशी वाद घालायचे की मला तू मागच्या अंगणात रांगोळी काढायला लावतेस आणि स्वतः पुढे काढतेस म्हणून. कारण काय तर अर्थातच माझी रांगोळी पाहायला मागच्या अंगणात कुणी येणार नसायचं. आता वाटतं थंडीत लवकर उठून रांगोळी काढायचा मला तरी किती अट्टाहास.
कितीही कुडकुडत असले तरी सकाळी उठून रांगोळी काढायचेच. कधी ठिपक्यांची तर कधी फुलांची नक्षी. तेव्हा कॅमेरा असता तर फोटोही काढले असते. आता फक्त त्याच्या पुसत आठवणी आहेत. ठिपक्यांच्या रांगोळीत अनेकवेळा ठिपके कधी तिरके जायचे तर कधी रेषा जोडताना काहीतरी चूक व्हायची. मग त्यात खाडाखोड झाली की ते छान वाटायचं नाही. नक्षी काढताना रेषा तितक्या सुबक यायच्या नाहीत. तरीही ती पूर्ण करण्याचा आग्रह असायचा. तासभर बसून रांगोळी पूर्ण करेपर्यंत उजाडलेलं असायचं आणि सर्वांचे फटाके वाजले तरी आमच्या आंघोळी अजून बाकीच असायच्या. पण ती पूर्ण झालेली रांगोळी बघताना जे समाधान असायचं ते आजही मिळालं.
आज संध्याकाळी ऑफिसमधून आल्यावर सुरुवात केली. अंधार आणि थंडी अगदी घरी असायची तशीच, तिकडे पहाट असायची तो भाग वेगळा. पण मी सुरुवात केल्या केल्या मुलं हट्ट करू लागली. त्यात सान्वीला बाजूला कुठे रांगोळी काढायची नव्हती. वाटलं, माझीच लेक ती, माझ्यावरच गेलीय. :) मग तिला माझ्या शेजारीच खडूने फुले काढून दिली आणि रंग भरायला सांगितले. मुलांनी दोघांनी मिळून ते पूर्ण केलं. माझी मात्र रांगोळी बराच वेळ चालली. पूर्ण होईपर्यंत थंडीने बोटे वाकडी झाली होती आणि पाठ मोडलेली. पण उभे राहून पुन्हा पुन्हा पूर्ण झालेल्या रांगोळीकडे पाहायचे समाधान मात्र खूप दिवसांनी मिळालं. आणि हो, रंग आणि रांगोळी यावेळी भारतातून येताना आईचेच ढापून आणले होते. :) तिला आता यावेळी नवे घ्यावे लागले असणार. :)
इथे पहाटे उठणे, उटणं लावून अंघोळी, फटाके वगैरे काही करणं जमत नाही. पण मुलांना आमच्यासारख्या काही आठवणी मिळाव्यात म्हणून जमेल तेव्हा, जमेल तितकं करत राहतो, इतकंच. :)
तुम्हा सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा !!
विद्या भुतकर.
1 comment:
Beautiful.... Happy Diwali ...
Post a Comment