Sunday, February 14, 2021

कोविड डायरीज

      चार खोल्या, चार माणसं. किती अवघड असू शकतं हे? बरंच. गुरुवार सकाळी अकराची वेळ, कॉल महत्वाचा. मी बोलणं गरजेचं, फोन म्यूट ठेवणं हा ऑप्शन नाहीच. मागून "दिल चाहता है" मधल्या ऑपेरा सिंगर सारखा जोरजोरात, एकतारेतला आवाज घरच्या दुसऱ्या कोपऱ्यातून येतो. सान्वीचा 'कोरस' चा क्लास! मागच्या तीन वर्षातल्या अनुभवातून मला हे कळलंय की माझ्यासारखाच लेकीकडेही संगीत आणि वाद्याचा कान/ गुण नाहीच. त्यामुळे कुठल्याही वाद्यात न पडता सरळ "कोरस घे" असं सांगितलं होतं. काय गळा फाडायचा ते होऊन जाऊ दे. पण मला काय माहित हे माझ्याच अंगलट येणार होतं? बरं, क्लास चालू आहे म्हणून हेडफोन लावलेत असंही नाही. तिच्यासोबत बाकी १५ पोरं कोकलत असतांना हा माझा महत्वाचा कॉल चालू असतो. तिचा क्लास संपला म्हणून जरा हुश्श करावं तर , शेजारच्या रूममधून स्वनिकचा 'रेकॉर्डर' म्हणजे 'बासरी' सारख्या वाद्याचा आवाज. तिथे त्या बासरीतून फुंकलेल्या हवेचा आवाज. :) शेवटी मी मिटिंग मध्ये म्हटलंच,"माझ्या आवाजाला बॅकग्राऊंड देताहेत पोरं". मग माझ्यासोबत बाकीचे चार लोकंही हसले. :) ती वेळ टळून गेली. 
        
        तर हे असं सोमवार ते शुक्रवार, सकाळी ८ ते संध्याकाळी ५. ३० च्या दरम्यान घरात नुसता गोंधळ चालू असतो. एकाच मजल्यावर चार निरनिराळ्या खोल्यात असूनही कामाच्या वेळेत होणारे गोंधळ अटळ झालेत सध्या. :) नवरा त्याच्या ऑफिसमध्ये कुणाशीतरी जोरजोरात हसत बोलत असतो, तर कधी सिम्बा(आमचा कुत्रा) बोअर झालं म्हणून वर येऊन आमच्यावर भुंकत राहतो. अर्थात मागून भूंकण्याचा आवाज येणारी मी एकटीच नाही त्यामुळे ते बरंय. मी परवा फोनवर बोलत असताना लेक चहा देऊन गेली. (असे सुखाचे क्षणही येतात कधी कधी). पण जाताना माझ्या प्लेटमधला शेवटचा चिप्सचा तुकडा घेत होती. मी समोरच्या माणसाशी बोलत तिच्या हातातून तो शेवटचा तुकडा काढून घेण्यासाठी मारामारी करत होते. :) (हो, असा माझ्या ताटातून घास घेणं हे पाप आहे !) :) कधी स्वनिक येऊन तोंडासमोर फोन धरुन पासवर्ड टाक म्हणून मागे लागलेला असतो. कधी जेवायच्या वेळी पटकन भाजी परतून जागेवर येऊन मेसेंजरवर कुणाला तरी उत्तर द्यायचं असतं. नुसती तारांबळ. 

         गेल्या वर्षी जुलै मध्ये सिम्बा घरी आला. तेव्हा तो तीन महिन्यांचाही नव्हता. पुढच्या दोन महिन्यांत त्याला आमचा इतका लळा लागलेला. आजही नवरा, पोरं बाहेर गेली कुठे की हा घरात बसून रडायला लागतो. असंच एक दिवस नवरा पोरांना डेंटिस्टकडे घेऊन गेला होता. तो बाहेर पडला की माझ्या एका महत्वाचा कॉल चालू असतानाच सिम्बाची रडारड होणार हे माहित होतं. मी आपली गप्प माझ्या रुममधे कॉल सुरु केला. १५ मिनिटं झाली तरी सिम्बाचं रडणं थांबेना. शेवटी मी लॅपटॉप हातात घेतला,कॉल म्यूट करुन सिम्बाला वर बोलावलं, तो काही येईना. खाली गेले, म्हटलं याला शु करायचीय का. म्हणून एका हातात लॅपटॉप घेऊन, दुसऱ्या हातात त्याची दोरी पकडून, त्याला बाहेर घेऊन गेले. त्याला शु वगैरे काही करायची नव्हतीच. मी लॅपटॉप वर कानाला हेडफोन लावलेलेच. त्याला परत घरात आणलं, कॉल स्पीकर वर लावला. एका हातात लॅपटॉप, एका हातात त्याला उचलून घेऊन माझ्या डेस्कजवळ गेले. पण त्याला खालीच बसायचं होतं पोरांची वाट बघत. शेवटी मी त्याचा नाद सोडून दिला, आणि दार लावून कॉल पूर्ण केला. 
         एकदा भारतातून एक टीममेट रात्रीच्या वेळी मीटिंगमध्ये बोलत होती. मागून तिच्या मुलीचा रडण्याचा आवाज येत होता. मलाही अस्वस्थ वाटत होतं ते ऐकून. थोडा वेळ तिचा कॉल म्यूट झाला. तिची वाट बघत असताना आमची प्रॉडक्ट मॅनेजर म्हणाली,"बहुतेक तिला तिच्या बाळाला घ्यायची गरज आहे. आपण तिच्याशिवायच सुरु ठेवू जरा वेळ." तिचं हे बोलणं ऐकून मला बरं वाटलं. तिच्या मानाने माझं बरंच म्हणायचं. 

         या सगळ्यांपेक्षा मोठा किस्सा झाला तो म्हणजे माझा नवीन जॉब सुरु झाला तेंव्हा. मी या नोकरीत कधी कंपनीत गेलेच नाही. रिमोट जॉइनिंग होतं. सर्व वस्तू, लॅपटॉप वगैरे घरीच आल्या होत्या. सोमवारी सकाळी मी आवरुन पहिला दिवस सुरु केला. नवरा, पोरं सर्वांना सांगितलं होतं की गोंधळ करु नका. पण हे सांगायला विसरले की मी व्हिडीओ कॉल करणार होते. तर मॅनेजर सोबत कॉल चालू असताना, नवरा रुममधे आला. त्याला सिम्बाला बाहेर न्यायचं होतं. त्यासाठी टीशर्ट हवा होता. मी नवीन बॉसशी बोलतेय आणि मागे दारात बनियन, शॉर्ट घातलेला नवरा. काय बोलावं कळेना. नवराही थांबून गेला. बरं शर्ट तर हवा होता. कपाट उघडणार कसं? माझ्या मागे व्हिडीओ मध्ये कपाट दिसत होतं. नवरा तसाच बाजूने रूमच्या कोपऱ्यात जाऊन उभा राहिला. तिथे गादीवर एक शर्ट दिसत होता पण तो घालणार कसा? शेवटी यांत काही करता येणार नाही म्हणून तो आल्या रस्त्याने तसाच परत गेला. तेव्हापासून व्हिडीओ कॉल म्हटलं की शॉर्ट आणि बनियन घातलेला नवरा आणि समोर लॅपटॉपवरचा मॅनेजरच आठवतो. :) आता तर व्हिडीओ सुरु करायचा म्हटलं की मी दाराला कडीच लावून टाकते. :) 

          बाकी छोटे मोठे किस्से तर होतंच असतात. पोरांचे क्लास चालू असताना मी मोठ्याने ओरडतेय म्हणून त्यांचे शिक्षक त्यांना म्यूट करतात, नवऱ्याचा महत्वाचा फोन चालू असताना त्याचा फोन सान्वीच्या हेडफोनला कनेक्ट होणं, मी घरी आईशी बोलत असताना मागे काय गोंधळ चाललाय म्हणून स्वनिकला त्याच्या शिक्षकांनी म्यूट करणं, घर साफ करताना व्याकयूम क्लिनरचा आवाज, मी कामाचं बोलत असताना इलेकट्रीशियनने सरळ फ्यूज बंद करुन नेट बंद करणे या सगळ्या गोंधळातूनही चाललोय. 
        कधी वाटतं हे सगळं कधी संपणार? सगळे आपापल्या जागेवर कधी परतणार? पण तोवर हे दिवस कायमचे लक्षात राहतील. तुमच्याकडेही होतात का हे असे किस्से?

विद्या भुतकर. 
         

No comments: