आज संध्याकाळी चालायला बाहेर पडल्यावर कोपऱ्यावर एक ओळखीचा वास आला. खरंतर मी एका नवीन बांधकाम चालू असलेल्या घरासमोरून जात होते. तिथे तो वास येण्याचं काय कारण असेल? तरीही तो वास माझा माग सोडेना. म्हणून थांबले दोन क्षण तिथेच. किराणामालाच्या दुकानातल्या रद्दीच्या कागदांच्या थप्पीचा वास तो. रद्दीच्या दुकानातला नाही हां. तो वेगळाच असतो. हा वास जरासा ओलसर, जरासा तेलकट,मीठ-साखर आणि त्यात मिसळलेला कागदाच्या थप्पीचा. त्या वासाने मला आप्पाची आठवण आली. आता वयानुसार आप्पाला 'अहो आप्पा' म्हणणं गरजेचं, पण सवय. मला तर वाटतं आजवर आईने, रात्री उशिरा घरात काही संपलंय म्हणून 'जा आप्पा उघडा आहे का बघ' म्हटल्याचा परिणाम असेल. असो.
घर आणि शाळेच्या रस्त्याच्या मधोमध अंतरावर आप्पाचं किराणामालाचं दुकान होतं. मी जन्मायच्या किती आधीपासून होतं माहित नाहीत. माझ्या पहिलीपासून तरी होतं. १२ बाय १५ चं ते दुकान असेल. दुकानाच्या बाहेरच लटकलेल्या छोट्यामोठ्या गोष्टींपासून आत प्रत्येक कोपऱ्यात वरपर्यंत खचखचून भरलेलं. दारात दोन चार सायकली ठेवलेल्या, भाड्याने देण्यासाठी.२ बाय ४ चा काउंटर, दिवसभरात १०० वेळा पुसलेला. त्याच्यामागे मांडी घालून बसलेला आप्पा ! त्याच्या मागे भिंतीवर लक्ष्मीचा फोटो, मोत्याची माळ घातलेला. ती माळही किती जुनी ते त्या लक्ष्मीलाच माहित. दुकान आठपर्यंत उघडं असलं तरी आप्पा उघडा नसायचा. आप्पाच्या अंगात नेहमी ढगळी सफेद रंगाची बंडी, पायात सफेद पायजमा. शाळेतून जात येताना मान वळवली तर त्या काऊंटरवर हमखास आप्पा दिसणार याची खात्री असायची. किंवा कधी दुपारी पाहिलं तर त्याच्या चेहऱ्याच्या जागी त्याच्या हातातला पेपर दिसेल याची.
पहिलीपासून त्याच्या दुकानातल्या निरनिराळ्या वस्तूंचं मला आकर्षण. कधी कागदाच्या बॉक्समधल्या पाटीवरच्या पेन्सिली, कधी रंगीत शिसपेन्सिली तर कधी रेनॉल्डच्या पेनचं. शनिवारी दुपारी लवकर शाळा सुटली की आईने हातात दिलेले २५ पैसे घेऊन दुकानात जायचे. २५ पैशात, काचेच्या बरणीतल्या लेमनच्या ४ गोळ्या घ्याव्या, नवीन पेन्सिल घ्यावी की आवळा सुपारी यांवर कितीतरी वेळ जायचा. माझा निर्णय होईपर्यंत माझ्यावर लक्ष ठेवत आप्पा अजून चार पोराचं शंकानिरसन करायचा. एखाद्या गिऱ्हाईकाचं सामान बांधून द्यायचा. काहीही मागितलं की डाव्या हाताचं मधलं बोट तोंडात घालून, त्या काउंटरच्या खालीही न बघतात्या बोटाने रद्दीच्या ढिगातून एक कागद न चुकता काढून घ्यायचा आणि समोरच्या परड्यात ठेवायचा. उजव्या हातानं जे काही धान्य असेल ते त्या कागदात टाकून आपला वजनाचा अंदाज किती बरोबर आहे यावर खुश व्हायचा. गुंडीला लावलेल्या दोऱ्याचा एक तुकडा दातात अडकवत तोडून सराईतपणे पुडा बांधून द्यायचा. त्या त्याच्या कलेचं कौतुक करत मी आपली आवळासुपारीची छोटी पुडी घेऊन निघायचे. कधी वाटतं की मी तितकी लहान असताना आप्पा तरुण असेल का? डोक्यावरचे केस काळे असतील का? आठवत नाही. मी पाहिलं तेव्हापासून आप्पा वयस्करच होता. त्याच्या डोक्यावरच्या विरळ होणाऱ्या, बंडीतून दिसणाऱ्या छातीवरच्या, हातावरच्या केसांसहित.
५-६ वीत गेल्यावर सायकल भाड्याने घ्यायला गेलं की आप्पाचं ऐकून घ्यायला लागायचं. 'एक रुपयात अर्धाच तास मिळणारे, किती वाजले बघितलंस का?'. मी त्याच्या दुकानातल्या पेन्डूलम असलेल्या घडाळ्याकडे बघत हिशोब करायचे. ५.३२ पासून अर्धा तास कसा मोजणार? मी उत्तर देऊन, सायकल घेऊन निघाले की कधी स्वतःच थांबवून म्हणायचा, 'थांब हवा नाहीये त्यात'. माझी चिडचिड सायकल मिळायला वेळ लागला म्हणून. एकदा सायकल चालवत शेतात गेले आणि बांधावरच्या बाभळीच्या काट्यानी सायकल पंक्चर झाली. ती परत आप्पाकडे न्यायची या विचारानं मला रडू फुटलं होतं. आप्पा सायकलचं पंक्चर काढताना मी तिथे जाऊन बसले, तर त्याने विचारलं, 'रडतीयस का? पायात गेलाय का काटा?'. मी रडतच 'नाही' म्हणत मान हलवली. मग हसला आणि म्हणाला, 'मग जा की घरी!'. सातवीत आजोबांनी नवीन शाईचं पेन घेऊन दिलं. त्याचा प्रॉब्लेम एकच. शाईची बाटली विकत कोण घेऊन देणार? मग दर दोन चार दिवसांनी आप्पाकडे जाऊन शाई भरून आणायची, २५ पैसे. निब तुटली,५० पैसे. आपल्या बंडीवर, बोटांवर थेंबही न लागू देता आप्पा वेळ घेऊन सर्व करून द्यायचा. माझ्या त्या २५,५० पैसे, एक रुपयांनी आप्पाचं असं काय भलं झालं असेल?
कधी संध्याकाळी सामान आणायला आईसोबत गेलं की आप्पाची बायकोही दिसायची. डोक्यावरून पदर घेतलेली. 'काय म्हणताय भाभी?' आई विचारायची. बाकी बायका 'वहिनी' आणि ही 'भाभी' का ते मला कळायचं नाही. आमच्या या छोट्या गावांत आप्पा कुठून आला असेल? काय माहित. आई बोलत असताना, मी तिथं समोर ठेवलेल्या धान्याचे कप्पे बघत बसायचे. मला तांदळाचे चार दाणे का होईना गव्हात टाकायची खूप इच्छा व्हायची, पण मागे असलेली आप्पाची नजर जाणवायची. त्याच्या बायकोशी आम्ही कितीही गप्पा मारल्या तरी आप्पा काही बोलायच्या भानगडीत पडायचा नाही. त्याची रस्त्यावरची नजर आणि काऊंटर सुटायचा नाही. आम्ही रात्री उशिरा गेलं की हमखास खेड्यात जाणारा एखादा माणूस तर असायचाच, आम्ही जायची वाट बघणारा. त्यांच्याकडे पाहून कळायचं नाही की हे असे थांबलेत का? मोठी झाल्यावर कधीतरी मला कळलं की उधारीवर घेऊन जाणारा असायचा एखादा. हिशोब कागदावर लिहून ठेवायला लावणारा. आम्ही निघालो की आप्पा त्यांचं सामान मांडायला सुरु करायचा.
आठवीत स्वतःची सायकल आल्यावर सायकलवरूनच किराणा सामान आणायला जाणं व्हायचं. तोवर रेनॉल्डच्या पेनचं आकर्षण वाढलं होतं. आणि नव्या वह्यांचंही. आप्पाच्या पोराच्या कोऱ्या करकरीत वह्या, पुस्तकं आणि नवीन दप्तर पाहून मला त्याच्याशी लग्न झालं तर आपण किती श्रीमंत होऊ असं वाटलेलंही आठवतंय. ते डोक्यावर पदर घ्यायचं काही जमायचं नाही हे मात्र आधीच ठरलेलं. शाळा संपली आणि रोजचं रस्त्यावरून होणारं आप्पाचं दर्शन बंद झालं. कधी कधी आईने सांगितलंय म्हणून जायचे तितकंच. ज्युनियर कॉलेजच्या रस्त्यावरच्या नवीन दुकानातल्या ग्रीटिंग कार्ड्स, चंद्रशेखर गोखल्यांच्या 'मी माझा' ने भुरळ घातली. मग आप्पाचं दुकान लहान वाटू लागलं, आणि जुनंही. आता आठवायचा प्रयत्न करतेय तर आप्पाचा आवाजही आठवत नाहीये नीट. कदाचित त्याच्या कमी बोलण्यामुळे असेल. एका वाक्याच्या पुढे आप्पा बोलल्याचं आठवत नाहीये. बारावीच्या सुट्टीत त्याच्या मोठ्या पोरीचं लग्न लावून दिलं त्याने. माझ्यापेक्षा एक वर्षाने मोठी. त्यावेळी पहिल्यांदा मी आप्पाला ग्रे कलरच्या सफारी ड्रेसमध्ये पाहिलं. वेगळाच वाटत होता. शाळेच्या ग्राऊंडवर मोठा तंबू लावून जोरात लग्न लावून दिलं.पहिल्यांदाच आप्पाला मी हसताना आणि पोरगी गाडीत बसल्यावर रडतांनाही पाहिलं. चष्मा हातात घेऊन डोळे पुसणारा बाप जास्तच वयस्कर वाटलेला.
कॉलेज मग नोकरी आणि परदेशवारी यांत घरच्या फेऱ्या कमी होत गेल्या. त्यातही आप्पाकडे जाणं अजूनच कमी. पाचेक वर्षांपूर्वी पोरांना माझी शाळा दाखवायला गेले. त्यादिवशी माझ्या मनात शाळेसोबत आप्पाचं अस्तित्व किती जोडलेलं होतं हे लक्षात आलं. दुकानावरून जाताना पोराना घेऊन आत गेले. दुकान तेव्हढंच, १५ बाय १२. आप्पाची बैठकीची जागा आता खुर्चीने घेतलेली आणि आप्पाची जागा त्याच्या पोराने. पोटावर घट्ट बसलेला शर्ट सरळ करत तो खुर्चीतून उठला आणि त्यानं पोरांकडे बघत विचारलं 'काय पायजे?.त्याच्या तोंडातला गुटख्याचा वास आल्यावर जाणवलं, आप्पा हे असलं कुठलंच व्यसन नव्हतं. वरचा फोटो मात्र तोच होता. मीही फोटोतल्या लक्ष्मीकडे बघून ओळखीचं हसले. पोरं कुठलं चॉकलेट घ्यायचं हे ठरवत असताना मी दुकानावर नजर फिरवली आणि वाटलं आप्पाला आयुष्यात काही Goal नसतील का? या दुकानाच्या मागे त्याचं घर होत. मी तिथे कधीच पाय ठेवला नव्हता. त्या दोन खोल्यांच्या चार झाल्या असतील का? या पोराची सून तिच्या सासूसारखाच पदर घेत असेल का डोक्यावर? पोरांनी एकेक चॉकलेट निवडलं आणि ते विकत घेऊन निघणार इतक्यात आप्पा आला. १० वर्षांत त्याचे केस अजून विरळ आणि सफेद झाले असतील इतकाच काय तो फरक. त्याने एका बरणीतली छोटी आवळा सुपारीची पुडी काढून माझ्या हातात दिली आणि बहुतेक हसला. पोरांची नाव काय, तू काय करतेस, कुठे असतेस वगैरे विचारण्याच्या भानगडीत तो पडला नाही. मीही पुडीतला एक तुकडा तोंडात टाकून गेल्या ३०-३५ वर्षाच्या आठवणी चघळत चालत राहिले. तेव्हाच काय ते मी आप्पाला शेवटचं पाहिलेलं.
आज त्या कोपऱ्यावरच्या वासाने त्याची आठवण करून दिली. फोन केला की आईला विचारायला हवं कसा आहे आप्पा.
विद्या भुतकर.
(काल्पनिक व्यक्तिचित्रण)
No comments:
Post a Comment