Monday, March 10, 2008

त्या दोघी आणि मी

ती सकाळी त्याच्यासोबतच उठते आणि कामाला लागते. सकाळची वेळ फार पळापळीची. रात्री निवडून ठेवलेली भाजी करायची असते. चहा, मग चपाती. त्याचा डबा भरून देऊन तो जाईपर्यंत अगदी जीव नकोसा होतो. देवाने दोन ऎवजी चार हात दिले असते तर बरं झालं असतं असं वाटत राहतं. तो गेला की मग जरा निवांत होतं. चहा घेता-घेता ई-सकाळ वाचून होतो. मेल, बातम्या दोन-चार लोकांशी गप्पा आणि घरी फोन करून आईशीही बोलणं होतं जरा. विशेष काही नाही, नेहमीचंच, जेवण झालं का, आवरलं का, इ,इ. मग पुन्हा आवरा-आवर सुरु होते. सकाळी अर्धवट पडलेला पसारा, भांडी आवरून होतो तोच तिची आवडत्या मालिकांची मालिका टी.व्ही. वर सुरु होते. दोनेक तास टीव्ही पाहून मग ती संध्याकाळच्या जेवणाची तयारी करु लागते. हो, संध्याकाळी तो आला की मी निवांत बोलत बसता येतं, तेव्हा कुठे किचनमध्ये वेळ घालवायचा. तसंच जरा बाहेर पडून काही सामान आणायचं असेल, कुणा मैत्रिणीला भेटायचं असेल तर तेही करता येतं, जिम ला जाता येतं. शुक्रवारीच घरातली आठवड्याची कामं केली की मग पुढचे दोन दिवस बाहेर जाता येतं कुठेतरी. एक बरं आहे, काही जणी तिच्या जवळच्या मैत्रिणी झाल्यात त्यामुळे त्यांच्यासोबत काही ना काही प्लान बनवता येतो, शनिवार-रविवार असो किंवा एखादा सण असो. दिवस कसे सरतात कळतच नाही. दिवस,महिने काय आणि वर्ष काय...
ती तशी तर दुसरी.... तीही तशी लवकरच उठते. आणि जडावलेल्या डोळयांनी आवरताना उगाचच रात्री उशीरा झोपल्याबद्दल चिडचिड करते. जमेल तसं तो किंवा ती चहा ठेवतात, नाहीतर मग हाताला जे लागेल ते पर्समधे टाकून त्याला बाय-बाय करून कामाला जाता-जाता कंटाळा आलेला असतो अगदी. कधी एखादी मिटींगला जायची पळापळ तर कधी काल राहिलेल्या कामाचं टेन्शन. वाटतं सगळं सोडून घरी राहावं. पहिले दोनेक तास घाईत गेल्यानंतर जरा मेल चेक करता येतात. मग जेवायच्या आधी घरी एकदा फोन करायचा. संध्याकाळी आलं की चहा होतो न होतो तोच gym ला जायचं. हो, दिवसभर काहीच हलचाल नाही, असं बैठं काम करून ५/६ वर्षात काय होईल? रात्री ८ नंतर जेवण बनवून जेवेपर्यंत किती त्रान राहणार? दोघं मिळून जेवण बनवताना कुठे जरा गप्पा मारता येतात. कधी कामाचं frustration तर कधी promotion चं. कधी साहेबाच्या कटकटी तर कधी त्याच-त्या लोकांना पाहून आलेला कंटाळा. अशात जेवणात काही साग्रसंगीत करणं जमत नाही. एका तासाच्या आत जे काहि होईल ते उत्तमच. चपाती-भाजी नाहीतर भात-आमटी. ज्या दिवशी हे सर्व बनवायाचं तो म्हणजे सुट्टीचा नाहीतर मग काही खास दिवस असेल तरच. जेवणानंतर मग टी.व्ही. आणि झोप. दोघांचाही शनिवार, रविवार घरातली सफाई, सामान आणणे आणि झोपा काढणे यातंच जातॊ. घर,नोकरी, नवरा,मित्र-मैत्रिणी, सण-वार कशाकशाला आणि किती वेळ द्यायचा हे तिला, खूप चांगलं म्हणता येणार नाही पण, जमतं बऱ्यापैकी आणि दिवस कधी सरत जातात समजतच नाही....
आणि मी? मी सकाळी उठते, कधी? कधीतरी. तो आधीच निघून गेलेला असतो. किंवा जात तरी असतो. मग बंद डोळ्यांनीच त्याला बाय करून पडून राहते. कधीतरी सकाळी लवकर उठून चहा-नाश्ता करण्याचा प्रयत्न केला होता पण ते काही जमत नाही. त्याने केलेला चहा असेल तर प्यायचा नाहीतर जे मिळेल ते चघळत सकाळच्या मेल चेक करायच्या. कुणी ना कुणी online असतंच. गप्पा मारत १०-११ वाजतातच. नसेलच कुणी तर टीव्ही असतोच. मग तो दुपारी येणार असेल तर पटकन काहीतरी बनवायचं. तो येऊन गेल्यानंतर मग पुन्हा टीव्ही संध्याकाळी पाचपर्यंत.हो, मध्ये मधे काही लोकांचे फोन येत असतात, interview साठी, काही चौकशीसाठी की किती वर्षं नोकरी केलीत, काय काय येतं, काय काम केलं, कधी, कुठे. आता तेही प्रश्न पाठ झालेत. थोडं-फार वाचत होते अभ्यासाचं, पण आता त्यातही काही राम उरला नाही. :-)) संध्याकाळी तो आला की चहा, gym आणि परत आल्यावर जेवण आणि झोप. कुणाला फोन नाही, मेल नाही, डोक्याला कसलाही त्रास नाही.
अशा या perfectly आळशी आयुष्यात problem काय आहे? एक म्हणजे त्या दोघींनाही माहीत आहे की त्यांचं काम काय आहे, त्यांना काय करायचं आहे आणि प्रत्येकाचं रुटीन ठरलेलं आहे. मला मात्र माहीत नाहीये की मला काय करायचं असतं. कधी कधी मी प्रयत्न करते काहीतरी खास करण्याचा, काही रुटीन लावण्याचा किंवा निदान साधं का होईना त्याच्या मदतीशिवाय जेवण बनवण्याचा. पण किचनमध्ये दीडेक तास घालवल्यावर सर्व अवघड आहे असं वाटतं आणि आयुष्यात जेवण बनवणे आणि भांडी याशिवाय काहीच नाही की काय असं वाटून अगदी रडायलाच येतं. :-) मग अगदी इकडची काडी तिकडे करावीशी वाटत नाही. पण पूर्वीसारखं सतत पळत राहायची, नोकरी करायची किंवा नवीन काही शिकायची इच्छाही होत नाही. अर्थात त्याला माझा आळशीपणाही कारणीभूत आहे.असो. मी सध्या नक्की कुठल्या रोलमधे fit होते हे मलाच माहीत नाहीये. पण एका रोलमधून दुसऱ्यामधे जाणं खूप अवघड आहे हे नक्की. हे सर्व मी आता विचार करतेय, कदाचित अजून थोड्या दिवसांत हे सगळे विचार करायची गरजही पडणार नाही. मी जुन्या रोलमधे जाईन आणि सर्व सुरळित होईल. पण तरी सध्या माझा Identity Crisis रोज चालूच राहतो. कधी कधी मी अगदीच घाईला आल्यावर, पुन्हा एकदा तो मदतीला धावून येतो. :-) ’राहू दे ना सगळं. बाहेर जायचं का आपण? चल फिरून येऊ.’ त्याच्या प्रेमळ शब्दांनी रडता-रडताही हसू येतं आणि दिवस सरतच जातात.....

-विद्या.

6 comments:

मोरपीस said...

फ़ारच छान. आपण आपला ब्लोग ब्लोगवाणीवर कसा पोस्ट केला ते मला सांगाल काय?

Meghana Bhuskute said...

just hang in there.... :)

संवादिनी said...

yep...just hang in...

Anonymous said...

You have a very good ability to convey your thoughts in exact words.. Liked this one..

Dk said...

Hmmm hang in as mhnne sope aahe pan tyatlya tyaat hech sarl saadh :)

Bhagyashree said...

mi hi ti tisari ahe.. :(
pan challay 1li honyacha prayatna.. :)